आणि बरंच काही- ती!

         ती!

           सकाळी ती ऑफिसमध्ये पोहचलेली असते, मी फोनवर ग्राहकाबरोबर मशिन द्यायला उशीर का होतोय ते पटवून देत असतो, पटवणं हुज्जतीवर येऊन आठवड्याभराचा वेळ घेऊन संभाषण संपतं. टेंशन, टेंशन टेंशन.
            एवढ्यात मॅडमचा फोन वाजतो “अरे संध्याकाळी भेट ना!"
"कशाला?" मी
“असंच ” ती
आधीच मी तो फोन घेऊन वैतागलेला असतो त्यात हिचं असं मध्येच हे...!
“अजिबात नाही, मला वेळ नाही, नंतर बघू, चल बाय!"

          समोरच्या रेस्टोरेंटमध्ये जातो, एक स्वीट लाईम सोडा अॉर्डर करतो, प्रत्येक घोटागणिक मी शांत होत जातो, सीएनबीसीवरून झी युवावर येतो.

माझी दिवसभराची कामं संपवतो.

          संध्याकाळी ती ऑफिसमधून बाहेर पडते, मी गेटवर असल्याचं तिला अजिबात आश्चर्य वाटत नाही, शांतपणे बाईकवर बसते, बाईक बॅंडस्टॅंडला थांबते. बाईक उभी करून टपरीवरच्या पिझ्झाची ऑर्डर देऊन कट्ट्यावर बसतो. सुर्यास्ताला मावळतीचा समुद्रकिनारा छानच खुलतो, तसाच हा पण. मावळतीला रंग बदलू लागतात, पाखरांची आपआपल्या घरट्यात परतायची लगबग सुरू होते, मंद वारा त्या वातावरणात सुखाची झुळूक बनून वाहतो.  कुणा प्रेमी युगुलाची खडकापलिकडे जाऊन बसण्यासाठी त्या खडकाळ भागातून एकमेकांचा तोल सावरत चाललेली कसरत बघून गंमत वाटते. पोटावर फाटी घेऊन चणे शेंगदाणे विकणारा, एनर्जी जाळायला आलेले, कुणी लहान मुंलांबरोबर, कॉलेजचा गृप, छान मेळा भरतो बॅंडस्टॅंडला संध्याकाळी.

             खरं तर बॅंडस्टॅंड आमची बसायची जागा नाही, तिच्या ऑफिसपासून जवळच आहे म्हणून बरं पडतं. आमची आवडती जागा मरीन ड्राइवचा कट्टा. लग्नाआधीच्या सगळ्या भेटी तिथेच.
              दिवसभराच्या रहाटगाडग्यातून वेळ काढून संध्याकाळी समुद्रकिनारी निवांत बसायला बरे वाटते. मध्येच ती संसारातले विषय काढू बघते. मग मला सांगावं लागतं, ‘अगं! समुद्रकिनारी आली आहेस तर तो समुद्र बघ, ते पक्षी आकाशात कसे विहरतात ते बघ, किती छान वारा सुटलायना! , ते संसारातले प्रश्न तर रोजचेच आहेत, तो तर आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे, आणि त्यातच तर खरी मजा आहे...!', माझं तत्वज्ञान तिला पटतं, जराशी मोकळी होते, आम्ही पिझ्झाचा फडशा पाडतो. तशातच मग सुरवातीच्या काळातील आठवणी दाटून येतात, तिने टाकलेला बॉंब मी अलगद झेललेला असतो, आणि मग सुरू होतं ते आठवड्यात अधूनमधून मरीन ड्राईव्हचं दर्शन घेणं.
            मला आजही आठवतो तिचा तो पहिला रेशमी स्पर्श, ते दिवसच कसले धुंद असतात ना! तिची स्टेशनवर वाट बघत उभे असताना अचानक ती माणसांच्या गर्दीतून येताना दिसते, तिच्याभोवती ऑरा तयार झालेेेला असतो आणि त्यात आजूबाजूचं काही दिसेनासं होतं, तंंंं आम्ही  टॅक्सीत बसतो.  तळहातावरल्या चार रेषांची नावं माहिती असतात त्या जोरावर मला भविष्य बघता येतं असं सांगून पहिल्यांदाच तिचा हात हातात घेतल्यावर तो तिच्या हाताचा रेशमी मुलायम स्पर्श...!
स्वर्ग...!
मरीन ड्राईव्हच्या कट्ट्यावरचे दोन तास कधी संपायचे कळायचंच नाही, “अजून बस ना थोडा वेळ!" मी
“नाही रे बाबा, घरी काय सांगू, तुझ्याबरोबर फिरायला आले म्हणून, शहाणाच आहेस!" प्रेमात आम्ही अखंड बुडालो होतो. पण लग्न होईपर्यंत साधी पप्पीपण घेतली नव्हती, फक्त हातात हात घालून बसायचं, इतपतच.
            आता चांगलेच मुरलोय आम्ही संसारात, नुसतं प्रेमच नाही भांडणंपण खूप केली, अगदी तुंबळ. मग चार दिवस अबोला, पाचव्या दिवशी तिरक्या नजरेने ओठांच्या कोनातून मारलेला बाण घायाळ करूनच सोडतो. संसार म्हणजे धमाल असते, पण प्रेमाच्या आणाभाका घेतल्यावर त्या सुरवातीच्या दिवसांची नशा काही वेगळीच असते.

स्पर्श रेशमी होता जरासा
सहवास वाटे तुझा हवासा
सांजवेळी हाय धुंद करी
गंध केसातल्या मोगर्याचा

थांग कधी लागत नाही
मनातल्या मोरपीसाचा
सांग आवरशील कसा
बांध थरथरत्या अधराचा

भिडता नजर नजरेला
खेळ चाले पापण्यांचा
फुलतो मग पिसारा
उरातल्या यौवनाचा

घेता हातात हात तुझा
उरतो स्वर्ग त्या नभाचा
उठता तरंग अंगात
पडतो विसर या जगाचा

प्रेम हे आपुले
जणू नवाच सोहळा हा
श्रावणातला रिमझिम पाऊस
उन्हातला इंद्रधनुष हा

©विजय सावंत

Comments

  1. वीजु... मस्त लीहीतोस तु.....खुप वाचनीय
    साधेच प्रसंग ..पण तु असेकाही गुंफतोस की त्यातुन एक नवीनच कवडसा चमकतो!

    ReplyDelete
  2. रम्य ते दिवस रम्य त्या आठवणी ‌👌👌👌
    नेहमीप्रमाणे छान

    ReplyDelete
  3. ...Kuch haseen yaadein,kuch muskurahat,kuch sharart ,kuch shikayat,kuch kushi,kuch aankhein nam si... Kuch khayal ghum si....

    Amazingly written Vijay.
    It took me down the memory lane....Loved your piece of writing.

    ReplyDelete
    Replies
    1. किती सुंदर कमेंट, वाह!🙏

      Delete
  4. सुंदर वर्णन आणि प्रकाशचित्रे !

    ReplyDelete
  5. मला वाटतं की, भटकंती भाग२ हा विजय सावंत यांनी च करावा.
    मिलिंद गुणाजी नंतर एवढी भटकंती करणारा कोण असेल तर ती व्यक्ती म्हणजे , आमचे सख्खे शेजारी विजय सावंत!. 👌👍🙏

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏

      Delete

Post a Comment