कथा- रियुनियन
रियुनियन
शाळेचा WA गृप बनून आज महिना झाला होता. खरंतर इतरांचे शाळेचे गृप बनून, तुटून, पुन्हा रियुनियनची तयारी चाललेली असताना ह्या उशिराने बनलेल्या गृपला रियुनियनचे वेध लागले होते. एकेक करत चांगला पस्तीसचा गृप झाला होता. रवि, रमेश, श्रीकांत, पवन, रेखा, तनुजा यांनी एकेकाला जमवण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. घरी जाऊन, फोनाफोनी करून, फेसबुकवर शोधून, दहावी अ चा एक एक मोती गोळा केला होता. फेसबुकवर मित्र शोधताना एवढी अडचण नव्हती पण मैत्रीणी शोधताना मात्र गृपवर चांगलीच धमाल उडत होती.
"छ्या! ही आपली नाहीच, ही भलतीच कोणीतरी आहे!"
बदललेल्या नावाची ती शोधताना नाकी नऊ येत. असं करता करता गृप फॉर्म झाला.
गृपने पस्तीसची संख्या पार केल्यावर ‘येणारे येत राहतील आधी रियुनियन' घोषणेने जोर धरला आणि एकदाची तारीख निश्चित झाली. दिवसभरात एकच विषय 'रियुनियन'. रात्री अंथरुणात गप्पांना ऊत आला होता.
रवि: चला! तारीख तर नक्की झाली. उद्या रमेश आणि मी हॉल ठरवायला जाणार आहोत. कोणी येणार आहे का?
रमेश: संध्याकाळी सातला भेट स्टेशनला.
रवि: ठीक आहे, अरे पण त्या शरदचे काही कळाले का?
रमेश: कळेल लवकरच, माझा चुलतभाऊ त्यांच्याच बिल्डिंगमध्ये राहायचा, सांगितले आहे त्याला माहिती काढायला. गेट टुगेदरच्या आधी भेटला तर खूप बरं होईल.
रेखा: खूप बरं होईल काय म्हणतोयस! भेटायलाच पाहिजे, आपला मॉनिटर होता तो.
रमेश: मी माझ्याकडून होईल तेवढे प्रयत्न करतो आहे, बघूया! चला, मी झोपतो. तुमचं चालू दे!
रियुनियनच्या तयारीत दहा दिवस कुठे गेले कळलंच नाही. हॉल बुक झाला होता. आगाऊ रक्कम भरून झाली होती. एक एक जबाबदारी सगळ्यांनी वाटून घेतली होती. रफीने आणि लताने दोन दोन गाणी गायचं कबूल केले होते. रियुनियन दोन दिवसांवर येऊन ठेपली.
रवि: झोपले का रे सगळे?
रेखा: आसाव! आसाव! तुमचीच वाट बघत होताव!
रवि: आता तुका येवक लागला हा मालवणी! तुका मालवणचोच घो शोधून देवक व्हयो होतो, मालवणीची गोडी असलेली वर्हाडची लेक जावन पोचली बेळगावाक.
रेखा: हम तो रंगमंच की कठपुतलीयां है बाबू मोशाय।
ते जाऊ दे! कार्यक्रमाची तयारी कुठपर्यंत आली ते सांग.
रवि: कार्यक्रमाची सगळी तयारी झाली आहे. सगळ्यांनी जरा ठरलेल्या वेळेआधीच या.
रमेश! अरे शरदचा काही ठावठिकाणा लागला का?
रमेश: हो रे! आज संध्याकाळी चुलत भावाबरोबर त्याच्या घरी जाऊन आलो.
श्रीकांत: कसा आहे तो? काय करतो सध्या?
रमेश: संध्याकाळी त्याच्याकडे जाऊन आल्यापासून विचार करतोय तुम्हाला सांगू की नको!
तनुजा: का रे! काय झाले?
रमेश: मित्रांनो! एक वाईट बातमी आहे... शरदला ब्लड कॅन्सर आहे, लास्ट स्टेज आहे... काही दिवसांचाच सोबती आहे तो...भांडुपला राहतो, स्टेशनजवळच बिल्डिंग आहे त्याची. गेल्या दोन वर्षांपासून अंथरुणाला खिळून आहे. एक मुलगी आहे, बायको कमावती असल्यामुळे घर चाललंय त्याचं. खूप वाईट वाटले त्याची अवस्था बघून. एखाद्या आजारी माणसाच्या घरातले वातावरण असते तसेच घर मलूल वाटले.
गृप: ............
पवन: अरे काय सांगतोयस काय?
तनुजा: विश्र्वासच बसत नाही तू काय सांगतोयस त्यावर.
राधा: खूपच वाईट बातमी आहे ही. काहीतरी जादू होवो आणि तो चांगला ठणठणीत बरा होवो. वर्गातला सगळ्यात हुशार मुलगा, समंजस इतका की काय बोलावं! सगळ्यांना हवाहवासा वाटणारा.
नितीन: रमेश! एकदा बोल यार, ही बातमी खोटी आहे.
रेखा: काय रे! दोन दिवसांवर रियुनियन आणि आज ही बातमी. शरद आता डोळ्यांसमोर दिसायला लागला. आठवतंय तुम्हाला..., डॉजबॉल खेळताना त्याचा बॉल लागून मी पडले होते... किती वाईट वाटले होते त्याला, दुसर्या दिवसापर्यंत चेहरा उतरलेला होता त्याचा.
कविता: मूडच नाही राहिला रियुनियनचा.
रात्री बराच उशीर झाला होता, आता कोणी काही बोलायच्या मनस्थितीत नव्हते, शरदच्या आठवणीने सगळ्यांचीच मोबाईल स्क्रीन धुसर झाली होती.
▪▪▪
रियुनियनची संध्याकाळ पौर्णिमेच्या चांदण्याने उजाडली. सगळे वेळेआधी हजर होते. एकेक जण जसा येत होता तसे आधी आलेले त्याला मिठी मारत म्हणत
' किती रे बदलास! कसा होतास नि कसा झालास!'
'ए! ही बघा! चवळीची शेंग! आता भोपळा झाली.'
'काय रे! छप्पर उडालं की तुझं!'
उत्सुकता, अधीरता शिगेला पोचली होती, अगदी सोडावॉटरची बाटली खोलावी असा उत्साह तिथे फसफसत होता.
थोड्या वेळाने सगळ्यांनी आपली नवी ओळख करून दिली.
रघूने नाईक सरांची एक्टिंग करून धमाल उडवून दिली. जितूच्या फुलपँटमध्ये सरडा घुसला होता तेव्हा त्याचा आणि घोळका करून त्याच्या सभोवती जमलेल्या सरांचे आणि मित्रांचे... ‘सरडा बाहेर कसा काढायचा? ' ह्या सरड्याची नको तिथे घुसखोरी करणार्या जागतिक घुसखोरीपेक्षा गंभीर प्रश्र्नाने जे चेहरे पाहण्यासारखे झाले होते ते आठवून जो काही हास्यकल्लोळ तिथे उठला त्याचे पडसाद आजूबाजूला कित्येक मीटरपर्यंत पोचले असावेत.
लताने आणि रफीने दोन ऐवजी चार चार गाणी गायली. तीस वर्षांनी सगळे एकत्र आले होते, जुन्या आठवणी दाटून येत होत्या, बेंचमेट तर एकमेकांना सोडायला तयार नव्हते, त्या आठवणींनी वातावरण भारून गेले होते जणू दहावीचा वर्गच आज प्रत्येकाच्या डोळ्यात भरला होता.
...कोणीतरी आडवं आलं म्हणून वाजवलेल्या ट्रेनच्या कर्णकर्कश भोंग्याने सगळ्यांची तंद्री भंग पावली. भानावर येऊन घड्याळाकडे नजर गेली. रात्रीचे बारा वाजत आले होते. गेले पाच तास खाली मान घालून चालणारे घड्याळाचे काटे सुखावले.
जड अंतःकरणाने भारावलेल्या अवस्थेतच प्रत्येकाने आपआपले घर गाठले.
शरद, त्याची बायको आणि मुलगी आज खूप खुश होते. शरदच्या आयुष्यातला हा 'न भूतो न भविष्यति' असा दिवस ठरला. त्याचं मलूल घर आज उजाळून निघालं होतं...आणि तोही आता मरणाला फाट्यावर मारून उर्वरित आयुष्य जगण्यासाठी सज्ज झाला होता.
रियुनियन शरदच्या घरी झाली होती.
©विजय सावंत

Last sentence was 👌👌👌. This was your imagination or real story? I could actually see all the characters alive.
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteSo lively and heart touching 👌👍
ReplyDeleteमस्त गुंफली आहेेस....छानच...
ReplyDeleteव्हेरी टचिंग, विजयराव.
ReplyDeleteसस्पेन्स छान ठेवल्याने मनाला भिडली.
तुम्हाला प्रतिभेचं देणं आहे. असंच सकस लिहित जा. त्यासाठी खुप खुप शुभेच्छा !💐
धन्यवाद!🙏
Delete