आणि बरंच काही- गगनजाई

आकाशनिंब/गगनजाई/गरूडलिंब

          पूर्वी झाडाच्या सालीपासून वाईनच्या आणि औषधाच्या बाटल्यांची बुचं बनवली जायची, म्हणून का कुणी ह्या मंद स्वर्गीय गंध असणार्या सुंदर शुभ्र फुलाच्या झाडाला बुचाचे झाड म्हणावे...? किती हा अरसिकपणा!

           लटक चमेली, गगन मल्लिगे, बिरटू, Tree Jasmine, Indian cork tree, आणि लॅटिनमध्ये Millingtonia hortensis अशी इतरभाषी नावे असणार्या, ऐंशी नव्वद  फूटांपर्यंत आकाशात झेपावू पाहाणाऱ्या, मंद सुवासिक फुलोरा मिरवणार्या आणि निंबाच्या पानांसारखी ह्याच्या पानांची रचना असणार्या ह्या झाडाची आकाशनिंब, गरूडलिंब किंवा गगनजाई हीच अस्सल मराठी नावे किती सुयोग्य वाटतात नाही!
               ह्याच्याशी नातं कधी जुळलं कळलच नाही. आमच्या गृहसंकुलातील बागेत एका रांगेत नऊ आणि इमारतीच्या कुंपणाच्या आत चार, तीही खिडकीसमोर,  नजरेसमोरची ही तेरा इवलिशी रोपं गडगंज संपत्तीत कधी रुपांतरित झाली कळलंच नाही. संकुलातील झाडे खूप विचारपूर्वक लावण्यात आली आहेत. ही झाडं जेव्हा लहान रोपटी होती, तेव्हा वाटायचं का बरं लावली असतील ही...?
          आज चौदा वर्षांनंतर जेव्हा ही झाडं ऐन तारुण्यात आली, त्यांची महती कळायला लागली. चाफा, पाम ट्री, पिंक टयुबेबिया, गुुुलमोहर, सोनमोहर, कंचन, ताम्हण मधुमालती, आकाशनिंब आणि इतर फुलझाडे तसेच एका बाजूला फक्त जंगली झाडे, सगळीच आता आता छान बहरायला लागली आहेत. बागेतल्या लहान लहान लाल बेरी येणार्या झाडावर त्या खाण्यासाठी वेगवेगळ्या जातीचे पक्षी हजेरी लावून जातात. पोपट, कावळे, चिमण्या, कबुतरे, कोतवाल, बुलबुल, पिवळ्या कंठाची चिमणी,   हळद्या, तांबट, खंड्या, शिंजीर, क्वचित कधीतरी दिसणारे डोक्यावर सुंदर ठिपका असणार्या दुर्मिळ पक्षांचं दर्शन झाल्यावर कळतं हा वृक्ष का लावला असेल.
           गगनजाईला फुले येऊ लागली आणि सगळ्या संकुलाला त्याचा लळा लागला. ह्या फुलांचा सडा कुणाचंही मन मोहवेल असा. पहाटे लवकर मॉर्निंग वॉकला निघालेले सगळा साफ करून जातात.
                  लहान मोठे, म्हातारे कोतारे, स्त्रिया, पुरुष,  इतकंच काय ज्युनियर के. जी. त जाणार्या चिमुरड्यांनाही ह्याचा मोह आवरत नाही. शाळेत जाताना मूठभर फुलं घेऊन जाणार. आमच्या इमारतीतली चिमुरडी कंपाउंडच्या आत पडलेली फुले सकाळी सकाळी पोसाभर  गोळा करते. गेल्या वर्षी एकदा सकाळी दहा बारा पोपट ह्या झाडावर आले होते, निरीक्षण केल्यावर लक्षात आले की फुलाच्या देठाची खालची बाजू ते चोचीने कुरतडत होते. खात होते की चव बघत होते कळले नाही, कारण पुन्हा कधी त्या झाडावर दिसले नाहीत. दोन इमारतींना जोडणार्या केबलवर मात्र ते रोज सकाळी आणि संध्याकाळी हजेरी लावून जातात.
            झाड पूर्ण बहरात आलं की फुलांचे घोसच्या घोस झुंबरांसारखे लटकताना बघणे म्हणजे नेत्रसुखच. त्या असंख्य झुंबरातली फुलं छान गिरकी घेत आकाशातून खाली झेपावतात.  खाली पडलेली फुले बावलेली नसतात, ताजी टवटवीत असतात. चार पाकळ्यांची म्हणावी की पाच पाकळ्यांची?  कारण चारपैकी एक पाकळी दुभंगलेली असते, कधीतरी तिच्यावर हलकी गुलाबी छटा असते, अशी ही फुलं गोळा करावीत ओंजळीत घ्यावी आणि हुंगावी, आहाहा! स्वर्गीय मंद सुगंधाचा अनुभव.
                मी फुलांचा चाहाता. रानफुलं तर माझा आवडीचा विषय. कितीतरी टिपून ठेवली आहेत, नावं माहिती नसली तरी. कधी कधी मीही लागतो मग गोळा करायला, आकाशनिंब. वीस पंचवीस मिळाली की पेल्यात किंवा काचेच्या पात्रात साखरेच्या पाण्यात ठेऊन देतो, चांगली तीन चार दिवस राहातात. खाली पडलेला हा सडा असाच संकुलातल्या घराघरातल्या सेंटर टेबलची मंद सुगंध पसरवत शान वाढवत असतो.
               दक्षिण आशियातलं हे झाड आता भारतात चांगलच स्थिरावलंय, ऑक्टोबर ते जानेवारी फेब्रुवारीपर्यंत फुलांचा बहर असतो, झाडाला शेंगा लागतात पण अजूनपर्यंत तरी आवारातल्या एकाही झाडाला शेंग लागलेली नाही, खूपच कमी दिसण्यात येतात, दुर्मिळ असतात. झाडांची मुळे जास्त खोलवर जात नाहीत, वर आलेल्या मुळांच्या फुटव्यांपासून नवीन रोपटी तयार करता येतात. खोडाची साल नरम असते, कधी काळी काचेच्या बाटल्यांच्या बूचांसाठी वापरली जायची.
                    असं हे आकाशनिंब, गगनजाई, गरूडलिंब परिसराची शान वाढवतंच पण बहरलं की त्याचा मंद सुगंध त्याच्या सान्निध्यातल्या सगळ्यांना धुंदावून सोडतो.

_विजय सावंत
पूर्वप्रसिध्दी- २१/११/२०१९
फोटो - विजय सावंत









#TreeJasmine #Indiancorktree #Millingtoniahortensis 

Comments

  1. Replies
    1. खूपच छान लिखाण विजू

      Delete
    2. धन्यवाद मित्रा!

      Delete
  2. गगनजाईच्या मंद, स्वर्गीय आणि दर्शनिय सुगंधात न्हाऊन निघालो. 👌🏻🌷

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏

      Delete
    2. मस्त मस्त
      हा लेख खूपच मात

      Delete
  3. खुप सुंदर वर्णन.

    ReplyDelete

Post a Comment