ओळख

नमस्कार मित्रांनो!

          लिखाणाशी माझा तसा काही विशेष संबंध नव्हता. पण मलाही कधी कधी व्यक्त व्हावसं वाटायचं. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या लहानमोठ्या बाबींमध्ये मला सामील व्हावसं वाटायचं. मनात निर्माण झालेले बीज कधीतरी एखादा लेख, कथा लिहून किंवा कवितेच्या रुपाने फुलवावसं वाटायचं. शिवाय निसर्गाचे सौंदर्य कॅमेरात कैद करण्याचा छंदही जोडीला होताच. त्यातूनच  कथा, कविता आणि कवडसा हा साहित्यप्रकार ब्लॉगच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचवावा असे वाटले.
 सुरवातीला आमच्या शाळेच्या गृपवर मी कधी काही लेख तर कधी एखादे कवितासदृश लिखाण करीत असे. तिथे मला मिळालेला प्रतिसाद आणि प्रोत्साहन बघून मी फेसबुकवरील एका मराठी साहित्यिक गृपवर यायचं धाडस केलं. तिथे माझ्या आडवाटेवरील खजिन्यांना खूप छान प्रतिसाद मिळाला. इथेच कुठेतरी मला मी लिहू शकतो असे वाटायला लागले.
         
कधी कामानिमित्त तर कधी पर्यटनासाठी माझे अंशतः विदेशभ्रमण झाले, अर्धे देशभ्रमण झाले आणि महाराष्ट्राच्या बाबतीत म्हणाल तर मी भिंगरीसारखा फिरलो आहे. माझी जन्मभूमी महाराष्ट्र आणि कर्मभूमीही  महाराष्ट्र. त्यामुळे कामानिमित्त चांद्यापासून बांद्यापर्यंत अख्खा महाराष्ट्र मी फिरलेलो आहे. ते म्हणतात ना ‘मी गल्लीबोळातून फिरलेलो आहे', तसाच मी महाराष्ट्राच्या गल्लीबोळातून फिरलेलो आहे. त्या त्या भागातले रीतीरिवाज, खानपान, भौगोलिक, सामाजिक वैशिष्ट्ये जवळून बघण्याचे सौभाग्य मला लाभले.

प्रसिद्ध ठिकाणे सगळ्यांनाच परिचित असतात, त्या प्रसिद्ध ठिकाणांच्या छायेखाली किंवा त्यापासून जवळ आडवाटेवर काही ऐतिहासिक, भौगौलिक खजिने दडलेले असतात. जे तसे अपरिचित, दुर्लक्षित असतात. कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनासाठी भाविक जातात पण तिथून जवळच थोडंसं आडवाटेवर असणाऱ्या खिद्रापूरला अभावानेच कुणी भेट देतात.

वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना मला असेच काही आडवाटेवरचे ऐतिहासिक, भौगौलिक खजिने सापडले, काही ध्यानीमनी नसताना समोर आले, ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. हा घेतला वसा व्यवस्थित पुढे नेण्यासाठी आणि त्यात सुधारणा, नाविन्य आणण्यासाठी तुमच्या सहकार्याची आवश्यकता आहे. तुमचा प्रतिसाद आणि अभिप्राय ह्यांची अवश्य साथ मिळावी हीच माफक अपेक्षा.

धन्यवाद!
विजय सावंत
२५/०३/२०२०
गुढीपाडवा


Comments

  1. Started reading your blog from today. Daily one for sure. Keep writing as you get inspiration👍😃

    ReplyDelete

Post a Comment