कवडसा- आडवाटेवरचा खजिना २७- प्रयागराज
महाकुंभमेळा, प्रयागराज २०२५
भारतीय संस्कृतीत रंगलेली माझी जीवनशैली. या संस्कृतीचा मी निस्सीम चाहाता. भारतीय संस्कृतीचं मला कोण अप्रूप. कारण ती आहेच तशी...विविध रंगी, विविध ढंगी, निर्मळ, सोज्वळ, उर्जेनं भरलेली. या संस्कृतीतील प्रथा परंपरांचा आवाका एवढा मोठा...अख्ख्या जगाने तोंडात बोटं घालावीत.
असंच तोंडात बोटं घालायला लावणारं एक महापर्व सध्या प्रयागराज येथे भरलं होतं...महाकुंभ मेळा. ज्या दिवसापासून तो सुरू झाला त्या दिवसापासून त्याच्याबद्दलची उत्सुकता वाढीस लागली. मित्रांनी 'महाकुंभला येतोस का?' म्हणून दोन महिने आधीच विचारणा केली होती. पण त्यावेळीतरी माझं जाण्याचं नक्की होत नव्हतं. पुढे या महापर्वाच्या बातम्या जसजशा दृष्टीस पडत गेल्या, कानावर येत गेल्या...आपल्यालाही या कुंभमेळ्यात सामील होता येईल का, हा विचारही मनात बळावत गेला. त्यात बायकोने बारा जोतिर्लिंग करण्याचा विचार माझ्याकडे बोलून दाखवलेला.
"मला कुंभमेळ्याला घेऊन चल, माझं काशीही होईल."
"तुला काय सोपं वाटतंय का सगळं, गर्दी पाहातेयंस ना किती ती...!" मी समजावण्याच्या सुरात.
"मग काय झालं...तू आहेस ना!" झालं...! असं म्हणून तिनेच कुठेतरी माझ्या मनात कुंभमेळ्याला भेट देण्याचं पक्क करणारं बीज रोवलं असं म्हणायला हरकत नाही. मग पुढील पायरी म्हणजे प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांचा शोध घेणं. IRCTCच्या एपवर तपासलं तर Regretशिवाय काही हाती लागेना. विमानांचे दर तपासले तर डोळे गरगरायला लागले. प्रयागराजला जाणं काही दृष्टीपथात येईना. मित्राला फोन केला तेव्हा कळलं त्याच्या गाडीत आधीच चार सीट नक्की झालेल्या. डोक्यात विचारांचं चक्र सुरू झालं. गूगलमॅप मी सर्रास वापरतो. मी गूगल गाईड, लेवल सेव्हन. एखाद्या ठिकाणाहून कुठे जायचं असेल तर किती वेळ लागेल, अंतर, तिथली जवळची ठिकाणं, राहाण्याची सोय ही सगळी माहिती गूगलमॅप पुरवतं. मी गूगलमॅपवर सर्च करायला सुरुवात केली. प्रयागराजचा जरासा अभ्यास केला. इतर शहरांपासूनची कनेक्टिव्हिटी तपासली. आणि साक्षात्कार व्हावा तसं काहीसं झालं. नागपूर ते प्रयागराज... रेडबसवर अगदी ढेर साऱ्या बस उपलब्ध होत्या. म्हटलं...जमतंय तर!
IRCTC वर मुंबई-नागपूर ट्रेन तपासल्या. सगळ्या वेटींग दाखवत होत्या. एक सोडून...दुरांतो. या गाडीला मुंबई नागपूर दरम्यान फक्त दोनच थांबे असल्याकारणामुळे असेल कदाचित पण कन्फर्म सीट दाखवत होत्या. जास्त विचार न करता जायच्या यायच्या दोन सीट बुक करून टाकल्या. अर्धी बाजी इथे जिंकली. पण तिकीट बुक करण्याआधी तिला सांगायला विसरलो नाही,"तिकीट बुक करायच्या आधीच सांगतोय, मुंबई ते नागपूर आणि नागपूर ते मुंबई हा प्रवास आरामदायक होईल खरा पण नागपूर ते प्रयागराज आणि प्रयागराज ते नागपूर या प्रवासात काय दडलेलं आहे हे मी सांगू शकत नाही. तो सगळा प्रवास खडतर असू शकतो. तुला जमणार असेल तरच..."
"नाही, तू काढ!" आयला हिने खरंच मनावर घेतलेलं दिसतंय असं समजून मी तिकीटं काढली.
तिकीटं काढली २८ जानेवारीला आणि दुसर्याच दिवशी बातमी आली, मौनी अमावस्येला चेंगराचेंगरीत अमुक इतकी माणसं दगावली. टेन्शन.
वृत्तवाहिन्यांना आठवडाभर पुरेल एवढी मोठी बातमी. झालं....! "नको जाऊया! काय जाणार त्या गर्दीत!" डळमळायला थोडीशी सुरुवात झाली होती.
या दिवसापासून मग दरदिवशी कुंभमेळ्याचा अंदाज घेतला जाऊ लागला. आमच्याकडे फक्त नागपूर रिटर्न तिकिटं होती. काहीतरी हातात असावं म्हणून काढून ठेवलेली. प्रयागराजला जाणं न जाणं हा नंतरचा भाग. पुढील कुठलंच बुकिंग आम्ही केलं नव्हतं. ते मिळतही नव्हतं. अनुभवाच्या शिदोरीवरच पुढील प्रवास होणार होता. त्यामुळे विचार केला...अगदीच हाताबाहेरची परिस्थिती असेल तर जाणं रद्द करायचं. दोन दिवस आधी तिकीटं रद्द करायची. तोपर्यंत पाहू काय होतंय ते!
आमच्या रोजच्या कामात कुंभमेळा अधूनमधून डोकावत होता. कुंभमेळा साद घालत होता, एकेक दिवस मागे सरत होता. आता जे कुंभमेळ्याला जाऊन आले अशांना फोन करून तिथे काय परिस्थिती आहे ते विचारावं असं ठरवलं.
मौनी अमावास्येच्या शाही स्नानाला परिचयापैकी एकजण जाऊन आले होते. त्यांना फोन लावला. अर्धा तास ते आपले अनुभव सांगत होते. ते एक उत्तम फोटोग्राफर आहेत. महाकुंभमेळ्याचे खूप सुंदर सुंदर फोटो आम्ही सामाईक असलेल्या गृपवर त्यांनी पाठवले होते. मौनी अमावास्येची गर्दी त्यांनी अनुभवली होती, शक्यतो जाऊच नका असे त्यांनी सुचविले. खूप चालावं लागेल, त्यात महिला सोबत असेल तर थोडं अवघडच होईल हेही त्यांनी सांगितलं. झाली का पंचाईत...! त्यांचंही म्हणणं बरोबर होतं. कारण मौनी अमावास्येच्या रात्रीच ती चेंगराचेंगरी झाली होती. त्यानंतर बर्याच जणांनी प्रयागराजला न जाण्याचा निर्णय घेतला होता.
मुलीच्या मैत्रिणीचे बाबा कुंभमेळ्याला भेट देऊन आले होते. त्यांचा अनुभव कसा होता हे विचारण्यासाठी त्यांना फोन केला. चार महिने आधीच त्यांनी टेंट आणि ट्रेनचं आरक्षण केलं होतं, तसंच कुंभमेळ्याच्या पहिल्याच आठवड्यात त्यांनी हजेरी लावली होती त्यामुळे त्यांना तेवढा त्रास झाला नाही. त्यांनी सांगितलं, तुम्ही जा, पण प्रयागराजला जायचं तर खूप चालायची तयारी ठेवावी लागेल. त्यांनी तिथल्या एका टेंटवाल्याचा नंबरही दिला. त्याला फोन केल्यावर त्याने जितक्या तत्परतेने उचलला तितक्याच तत्परतेने 'नही है' म्हणाला.
या त्यांच्या अनुभवावरून एक गोष्ट लक्षात आली कि प्रयागराजला जायचं तर भरपूर चालायची तयारी ठेवावी लागेल. मी पुन्हा पुन्हा तिला विचारत होतो..."बघ बाई, खूप चालावं लागेल, वेळ पडली तर घाटावर झोपावं लागेल. काय करतेस बोल?"
"चालेल." असं म्हणून तिने आपला दृढनिश्चय दर्शवला.
दरम्यान प्रयागराजहून येणाऱ्या बातम्यांवर माझं बारीक लक्ष होतं. रोजची खबर मी ठेवून होतो.
माघी पौर्णिमेच्या शाही स्नानानंतर गर्दी ओसरेल अशी अपेक्षा प्रयागराजला भेट देऊ पाहाणारे सारेच करीत होते. आम्हीही. रविवार १६ फेब्रुवारीची आमची जाण्याची तिकीटं...शनिवार १५ तारीख, हिचा फोन, "मी रजा टाकू कि नको, काय ते सांग लवकर?"
मीही दृढनिश्चय करून म्हणालो,"टाक!"
प्रयागराजला जाताना कमीत कमी सामान घेऊन जायचं असं आम्ही ठरवलं होतं. तुझं तू माझं मी. तेही पाठपिशवितून. म्हणजे दोन्ही हात कसे मोकळे. माझी तयारी जायच्या तीन तास आधी. मला लागतं तरी काय म्हणा, अख्ख जग फिरायला मला कपड्यांचे दोन जोड पुरेसे. एक अंगावर एक बॅगेत. मी माझी सॅक भरली तिने तिची. मुलांना सगळ्या सूचना देण्याचं काम हिचं. निघालो आम्ही छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनसच्या दिशेने. एक मिनिट इकडे नाही कि एक मिनिट तिकडे नाही, बरोबर सात पंचावन्नला गाडीने CST स्टेशन सोडलं.
दुरांतोचे कोच आरामदायी असतात त्यामुळे रात्रीची झोप छान झाली. सकाळी ७:२०च्या आधीच बिफोर टाईम गाडी नागपुरात पोहोचली. याआधी मी कामानिमित्त नागपूर फिरलेलो होतो, हे शहर माझ्यासाठी नवखं नव्हतं. स्टेशनजवळ एका माहितीतल्या हाॅटेलमध्ये आम्ही रूम घेतला, फ्रेश झालो आणि निघालो नागपूर दर्शनला. प्रयागराजला जाणारी बस संध्याकाळी पाचची. तेवढा वेळ हातात होता. सर्वात प्रथम स्टेशनजवळील टेकडी गणेशाचं दर्शन घेतलं. सीताबर्डीच्या एका छोट्याशा टेकडीवर असलेलं हे स्वयंभू गणपती मंदिर, म्हणून याचे नाव टेकडी गणेश मंदिर असं पडलं. मंदिर खूप सुंदर असून आत प्रवेश करताच अंतर्गत सजावट लक्ष वेधून घेते. श्रीगणेशाची मूर्तीही सुंदर. अडीचशे तीनशे वर्षांचा इतिहास आहे या मंदिराला. नागपूरकर भोसले आणि इंग्रज यांची लढाई याच परिसरात झाली होती. पिंपळवृक्षाखालून आलेली ही स्वयंभू मूर्ती. आजही तशीच आहे. सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा इत्यादी क्रिकेटपटूंनी या मंदिराला भेट दिलेली आहे. हे नागपुरातील प्रसिद्ध मंदिर विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक आहे.
श्री गणेश मंदिर, टेकडी, नागपूर
टेकडी गणेशाचे दर्शन घेऊन झाल्यावर तिथून आम्ही सीताबर्डीचा किल्ला पाहाण्यासाठी गेलो. पण तिथे गेल्यावर कळाले कि तो काही दिवस पर्यटनासाठी बंद आहे. मग तिथून आम्ही Zero miles of India या भारताच्या मध्यकेंद्रबिंदूजवळ आलो. इथे एक उंच स्तंभ(Milestone) उभा करण्यात आला आहे. भारताच्या चारही दिशांचं अंतर इथून सारखंच आहे. स्तंभासमोर पत्रे लावण्यात आले होते. काहीतरी सुशोभीकरणाचं काम अजूनही चालू आहे. या स्तंभाच्या समोरच गोवारी हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेलं स्मारक आहे, ते पाहून आम्ही तिथून जवळच असलेल्या महाराजा बागेला भेट दिली. हे आहे एक छोटेखानी प्राणीसंग्रहालय. आम्हाला इथे खुलेआम फिरणारं मुंगसाची एक जोडी, पिंजऱ्यात असलेले दोन बिबटे, चार अस्वलं तसेच हरणं, काळवीट आणि नीलगाय यांचे कळप बघावयास मिळाले. अस्वल हा प्राणी खूप वर्षांनी पाहिला. प्राथमिक शाळेत असतानाचं आठवलं, एक दरवेशी अस्वल घेऊन चाळीत यायचा... त्याला उभं राहायला सांगायचा... हातातले टाळ वाजवून नाच करायला लावायचा... त्याचे केस ओढून काढून तावीज बनवून द्यायचा. आमच्या बालबुद्धीला वाटायचं की त्या अस्वलाच्या केसात काहीतरी अद्भूत शक्ती आहे. तो दरवेशी आपला खेळ संपला कि जायला निघायचा, तो पुढे आणि ते अस्वल त्याच्यामागे डुबुक डुबुक चालायचं. आम्ही लहान मुलं लांब हाताने त्या अस्वलाचे केस ओढायचो, ते बिचारं ते निमूटपणे सहन करायचं. आता दरवेशी ही जमात पूर्णपणे नामशेष झालेली आहे. त्यांच्याकडे असलेली अस्वलं कुठल्या ना कुठल्या प्राणीसंग्रहालयात अशी गजाआड.
बागेच्या एका कोपर्यात मत्स्यालय आहे पण ते नसतं तरी चाललं असतं असं. तिथे त्या बागेत थोडा वेळ घालवून आम्ही हॉटेलकडे निघालो. वाटेत जेवणही उरकून घेतलं. हाॅटेलवर जाऊन तासभर आराम केला. संध्याकाळी सहा वाजता आम्ही नागपूर सोडलं.
"गाडी इससे आगे नही जाएगी।" बस अटेंडेंट म्हणाला. सकाळचे नऊ वाजले होते. बस एका चौकाजवळ येऊन थांबली होती. आम्हाला ज्या रस्त्याने जायचं होतं तो समोरचा रस्ता वाहनांनी भरलेला. कुठलीच गाडी जागची हलत नव्हती. म्हणजे जे आम्हाला अपेक्षित होतं ते ठिकाण आलं तर...! बसमधील जो तो एकमेकांच्या तोंडाकडे बघत होता. "अब क्या करने का?"
"अब क्या...? उतर जानेका!" असं त्याला सांगताना मला तरी दुसरा कुठला पर्याय दिसत नव्हता.
बस प्रयागराजपासून वीस किलोमीटर अंतरावर अलिकडेच अडकली होती. तिची पुढे जाण्याची काही चिन्हं दिसेनासी वाटल्यावर जो तो निमूटपणे खाली उतरला. आम्ही दोघंही खाली उतरलो. त्या परिस्थितीने आमच्या डोळ्यावरची पेंग उतरवली होती. आमच्या रात्रीच्या झोपेचं पार खोबरं झालेलं होतं. त्याचं काय झालं, नागपूरहून बस हलली...पण एखाद दोन किलोमीटर पुढे गेल्यावर लक्षात आलं कि हिचं हलणं काही बंद होत नव्हतं. बसच्या सस्पेन्शनचे तीनतेरा वाजलेले होते. गाडी स्लीपर कोच होती पण आम्हाला असं वाटलं कि आम्ही एखाद्या व्हायब्रेटिंग गादीवर झोपलो आहोत की काय! बरं....! रात्री त्याने ज्या धाब्यावर गाडी थांबवली त्याचा चेहरा बघून हिचा चेहरा उतरला. मी बस ड्रायव्हरला विचारलं," दुसरा कोई ढंग का धाबा नही मिला क्या?" त्यावर तो उत्तरला,"क्या करे साहब, दुसरे अच्छे धाबेपर खडा करते है तो वहां गर्दी बहुत होती है। भीड की वजह से किसी को खाना भी नही मिलता।"
खरं असेलही त्याचं म्हणणं, पण आम्हाला तरी तिथे जेवावसं वाटलं नाही. धाब्याच्या दारातच फळांचा एक स्टाॅल होता. त्याच्याकडून केळी, सफरचंदाच्या आकाराची बोरं आणि द्राक्ष घेऊन खाल्ली. केळी खात असताना तो फळविक्रेता चाचा माझं बारकाईनं निरिक्षण करीत होता असं वाटतं. आपल्या स्टाॅलवरून उठून माझ्याजवळ आला. "साहब, आपके जैसा ही एक जंटलमेन आया था, उसने मेरे पास से केले खरीदे, केले खाकर केले के छिलके यहीं जमीन पर फेंक दिए, उसकी वो हरकत देखकर मैने उसे समझाया, बोला, कचरे के डिब्बे मे छिलके डाल दो, कोई फिसलकर गिर जाएगा... तो मुझसे बहस करने लगा, कहने लगा...मैने पैसे देकर लिए है, मै कहीं पर भी फेंक दूं, तुम्हे उससे क्या। आता त्याने हे माझ्याजवळ येऊन सांगावं तेही आपल्या स्टाॅलवरून उठून येऊन...का तर केळी खाऊन झाल्यावर मी कचऱ्याचा डबा आजूबाजूला शोधत होतो आणि तो दिसताच त्यात मी ती केळ्याची सालं टाकली होती. मी त्याला म्हणालो, "देखो चाचा, आदमी पढ़ालिखा हो तो ये जरूरी नहीं कि वो समझदार भी हो गया हो।"
असो. तर हा रात्रीचा अनुभव. आता सकाळी सकाळी एका नव्या अनुभवाला आम्हाला सामोरं जायचं होतं. प्रयागराज गाठायचं तर वीस किलोमीटर चालावं लागणार होतं. बसमधून खाली उतरल्यावर आम्ही त्या चौकाच्या जरासे पुढे आलो. तिथे काही ऑटोरिक्षा उभ्या होत्या. आमच्या डोळ्यादेखत पटापट भरल्या. आणखी दोन उभ्या होत्या पण त्यातल्या ड्रायव्हरचा पत्ता नव्हता. मी एकाला विचारलं,"भाईसाहब इसका ड्रायव्हर किधर है?" त्यावर तो म्हणाला," कहां जाना है आपको? मी म्हणालो,"नैनी, कोई बाईकवाला रहेगा तो भी चलेगा।"
"चलो, छोड देता हूं।" जेव्हा तो असं म्हणाला तेव्हा तो एखादा देवदूतच असावा असं वाटलं.
"कितना लोगे?" मी व्यवहाराला हात घातला.
"साहब, जो देना है दे दो, आपकी मर्जी।" हा खरोखरच देवदूत निघाला.
दुसरा कुठलाच पर्याय आमच्यासाठी उपलब्ध नव्हता, इतर कुठल्याही तीनचाकी किंवा चारचाकी वाहनातून गेलो असतो तर कुठल्या ना कुठल्या चौकात अडकलोच असतो. त्याचा प्रत्यय पुढे ठिकठिकाणी आलाच. बाईकवरून जाण्याचा निर्णय आम्ही घेतला तो आमच्या पथ्यावर पडला. सगळीकडे गोंधळाची परिस्थिती. त्यात आम्ही ट्रिपल सीट नैनीकडे निघालोय. समोरून कॅमेर्यात ते दृश्य टिपलं असतं तर...घरात फ्रेम करून लावावं असं. तिच्या पाठीवर बॅग, माझी माझ्या मांडीवर. कसाबसा तोल सावरत तो चालवतोय. अशा परिस्थितीत दोनेक किलोमीटर ठीक पण वीस किलोमीटर म्हणजे...
या वीस किलोमीटरच्या प्रवासाला आम्हाला अडीच तास लागले. त्याने थेट अरेल घाटाच्या दीड किलोमीटर अलिकडे आम्हाला सोडलं. त्याची मेहनत बघून त्याला मी साडेसातशे रुपये दिले. विनातक्रार त्याने ते स्विकारले. मधे रस्त्यात गप्पा मारताना तो म्हणाला होता," वैसे तो हमने हजार हजार रुपए एक सीट के लिए है।"
खरंच त्याने आमच्याकडून कमी पैसे घेतले होते. कारण अरेल घाटावर दीडदोन किलोमीटरला दोनशे ते तिनशे रुपए माणशी दर चालू होता. त्यामुळे वीस किलोमीटरसाठी साडेसातशे रुपए मोजताना आम्हाला काहीच वाटलं नाही. पण आमचा निरोप घेताना त्याने एक डायलॉग मारलाच,"आपके यहां हमारे लोगों के साथ अच्छा बर्ताव नही होता." त्याला काय म्हणायचं ते माझ्या लक्षात आलं, "भाईसाहब ऐसा कुछ नही है, आपको गलतफ़हमी हो गई है।" असं म्हणून मी त्याचे आभार मानले आणि चालू लागलो अरेल घाटाच्या दिशेने. त्यानेही आम्हाला अरेल घाटापर्यंत सोडलं असतं पण चालायला रस्ता तर हवा. रस्त्यावर ही तुफान गर्दी. अरेल घाटाकडे जाणारे जेवढ्या गल्ल्या, रस्ते असतील सर्वच्या सर्व माणसांनी भरून गेलेले.
त्या गर्दीतून दीड किलोमीटरची पायपीट करीत, वाट काढत आम्ही अरेल घाटाला समांतर असणार्या डांबरी रस्त्यावर आलो. इथून पुढे उतरंड आणि अरेल नदीघाट सुरू होतो.
रस्ता ओलांडल्यावर समोर जे काही दृश्य दिसलं...अहाहा...! अतिसुंदर! त्रिवेणी त्रिवेणी संगम म्हणतात तो हाच! तिथे जी काही अध्यात्मिक उर्जा निर्माण झाली होती त्यात तिथल्या त्या स्थळाच्या सौदर्यातून निर्माण झालेल्या उर्जेचा मिलाफ... अवर्णनीय! एक पॅनोरमा...दोन नद्यांचं ते विस्तृत रुपेरी पात्र... एकाचवेळी शेकडो बोटींची येजा...तिन्ही किनार्यावर आलेला भक्तांचा बहर...! सारं काही शब्दातीत. माझी नेहमीची सवय...असं अद्भूत असेल तर आधी डोळे भरून बघून घेतो. चारही अंगाने त्या स्थळाची निरिक्षण करतो आणि मगच फोटोला हात घालतो. आता हे तिला कोण सांगेल?
"अरे चल ना...काय इथेच रेंगाळत बसणार आहेस? ती मला पुढे निघण्यासाठी घाई करू लागली. तरीही माझं निरीक्षण चालूच होतं, तिला म्हटलं," बघ गंगा यमुनेच्या पाण्यातला फरक, गंगेचं पाणी रुपेरी तर यमुनेचं काळसर." या दोन्ही नद्या जिथे एकत्र येतात तिथे हा फरक स्पष्ट दिसत होता पण गाॅगल लावला असेल तरच.
समोर प्रचंड जनसमुदाय...अशी गर्दी आयुष्यात पहिल्यांदाच पाहात होतो. गंगा यमुनेचा काठ आणि मधला त्रिवेणी संगम माणसांनी तुडुंब भरून गेला होता. आस्था दुथडी भरुन वाहत होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपण तिथे पोहचलो याचं समाधान.
मुंबईहून आलेला आमचा नवरा-बायकोचा जोडा त्या गर्दीत पार हरवून गेला. आम्हाला कळेना नक्की सुरुवात कुठून करावी. उगाच त्या गर्दीत इकडून तिकडे आणि तिकडून इकडे येरझारा झाल्या. मग एकाला विचारलं असता त्याने संगमाकडे जाणाऱ्या नावा कुठे मिळतील ते सांगितलं. दुपारचे बारा वाजत आले होते. उन्हाचा तडाखा जाणवू लागला होता. आम्ही त्रिवेणी संगमाकडे घेऊन जाणाऱ्या नावा शोधतोय. विचारत विचारत पोहचलो एकदाचे. नावेचे प्रति माणशी दर ऐकून आम्ही घासाघीस करायला सुरुवात केली. दोन हजारावरून पंधराशे, पंधराशेवरून हजार प्रति माणशी नक्की करून आम्ही नावेत बसलो.
नावेत बसून निघालो आम्ही त्रिवेणी संगमात स्नान करायला. नावाडी माहिती देत होता," वो जो दिख रहा है वो है अकबर किला, उस किले में एक मंदिर भी है, अब तुम बोलोगे, अकबर के किले में मंदिर कैसे तो अकबर की पत्नी जोधाबाई हिंदू थी, वो इस मंदिर में पूजापाठ करती थी। यह यमुना साठ सत्तर फीट गहरी है, इसका पानी थोडासा काला है, और गंगा का देखोगे तो सफेद दिखेगा, अगर यमुना का पानी घर ले जाओगे तो कुछ ही दिनो में उसमें उसमे जीवजंतू दिखने लगेंगे, लेकिन त्रिवेणी संगम का पानी लेकर जाओगे तो उसमे कभी जीवजंतू नही दिखेंगे, मै आपको दिखाऊंगा वहीं से पानी भर लेना।
अर्ध्या तासात आम्ही वल्हवायच्या त्या नावेने त्रिवेणी संगमात आलो. याचसाठी केला होता अट्टाहास. कपडे, चपला बोटीतच काढले. बोटीतून खाली उतरलो. ज्या त्रिवेणी संगमाने आम्हाला इथवर खेचून आणलं होतं, त्या संगमाच्या पाण्यात आम्ही उभे होतो. हिच्या चेहर्यावरील आनंद काय वर्णावा, स्वर्ग जणू दोन बोटं उरावा. त्रिवेणी संगमात डुबकी मारून आम्ही देशाच्या एका मोठ्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक सोहळ्याचा सहअंश झालो होतो. हर हर गंगे!
त्रिवेणी संगमात स्नान आटोपून आम्ही पुन्हा अरेल घाटाकडे निघालो. तो सगळा सोहळा याची देही याची डोळा पाहून, स्मृतीपटलावर कायमचा गोंदवून.
सवातीन वाजले होते. अरेल घाटावरील गर्दी मागे सारून पुन्हा त्या आडव्या रस्त्यावर आलो. आतापर्यंत तहानभूक काही जाणवलीच नव्हती. पण डोळे आता खाण्यासाठी काही दिसतंय का ते शोधू लागले. सकाळी बस वाॅशरूमसाठी थांबली होती तेव्हा खाल्लेली चहा आणि पार्ले जीची बिस्किटं एवढाच ऐवज पोटात होता. समोर एक उत्तर भारतीय इसम डोसे काढत होता. पावलं वळली तिकडे. आधी एका डोशाची ऑर्डर दिली, म्हटलं चांगला असेल तर दुसरा घ्यावा. दोघांनी अर्धा अर्धा खाल्ला पण दुसर्या डोशाची ऑर्डर काही द्याविशी वाटली नाही. पुढे कुठेतरी चांगलं हाॅटेल दिसलं तर तिथे खाऊ असा विचार करून आम्ही तिथून निघालो. कॅम्पा कोलाने भारतीय शीतपेयाच्या बाजारात पुनरागमन केलं आहे, कॅम्पा कोलाच्या मोठमोठ्या जाहिराती प्रत्येक स्टाॅलवर दिसत होत्या पण वितरणाचे ट्रक शहराबाहेर अडकल्यामुळे एकाकडेही उपलब्ध नव्हतं. याच कारणामुळे तिथल्या स्थानिकांनाही जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत होता.
चार वाजून गेले होते. त्रिवेणी संगमात स्नान झाले होते. त्या प्रचंड गर्दीत प्रयागराजमधील इतर ठिकाणं पाहणं शक्य नव्हतं. कारण एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पोहचणं सोपं नव्हतं. ज्या कार्यासाठी प्रयागराजमध्ये आलात ते त्रिवेणी संगमस्नान आटोपून तिथून लवकरात लवकर शहराबाहेर निघणं सर्वांच्याच हिताचं होतं. आम्ही नैनी रेल्वे स्टेशनच्या दिशेने निघालो.
त्रिवेणी संगमात स्नान केल्यावर तिथून लवकरात लवकर शहराबाहेर निघणं शहाणपणाचं होतं असं मला तरी वाटतं. प्रयागराजमधील इतर ठिकाणं किंवा मंदिरं पुन्हा वेळ काढून यावं आणि निवांत बघावीत. त्रिवेणी संगम हे स्थळ तर इतकं सुंदर आहे कि एखाद्या संध्याकाळी तिथं त्या वाळूत बसावं...मावळत्या सूर्याला पाहात...त्याने उधळलेल्या रंगात सामील व्हावं... मंद वारा नभी तारा अशा चंदेरी रात्रीचा अनुभव घ्यावा. असो.
प्रयागराजकडे येणारा भाविकांचा लोंढा प्रचंड होता. सरकारी यंत्रणा आपल्यापरीने सज्ज होत्या. पण त्यांच्यावर खूप ताण होता. मोठं मनुष्यबळ या सोहळ्यावर लक्ष ठेवून होतं. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच. पंचेचाळीस दिवसात साठ कोटींहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात स्नान करणं ही सामान्य गोष्ट नाही. हा सोहळा संपन्न होण्यासाठी किती अभ्यास केला गेला असेल, किती तयारी करावी लागली असेल, सरकारी यंत्रणा तर सरकारी यंत्रणा, स्थानिकांना किती सहन करावं लागलं असेल... सलाम त्या सर्वांना!
अरेल घाट ते नैनी रेल्वे स्टेशन हे अंतर आहे साडेचार किलोमीटर. कसंही करून नैनी रेल्वे स्टेशनला पोहोचायचं अन् तिथून मग काशीला जाणारी ट्रेन पकडायची असं मी ठरवलं. नैनी ते काशी, ट्रेनने अडीच तासाचं अंतर. जास्तीत जास्त तीन तास. म्हणजे संध्याकाळपर्यंत किंवा काही कारणास्तव उशीर जरी झाला तरी रात्री दहाच्या आत आम्ही काशीला पोहचणार हा सरळसाधा हिशोब.
साडेचार पावणेपाच वाजता आम्ही अरेल घाट सोडला...नैनी स्टेशनची वाट धरली. नैनीकडून अरेल घाटाकडे येणाऱ्या भाविकांची गर्दी आता वाढत चालली होती. आपण सकाळी अरेल घाटावर पोहचू या हिशोबाने निघालेले आता अरेल घाटाकडे पोहचत होते. त्या परिस्थितीत नैनीकडे चालत जाण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. एक दोन ई रिक्षा वाले दिसले पण तेही जाण्याच्या मनस्थितीत नसलेले. आम्ही चालत राहायचं ठरवलं. एखाद किलोमीटर चाललो, जरा बसलो, चहा बिस्किटं खाल्ली, बरं वाटलं. त्या चहावाल्यानेच मोबाईलची बॅटरी चार्ज करून दिली. आम्ही पुन्हा नैनी रेल्वे स्टेशनची वाट धरली. दोन किलोमीटरनंतर नैनीचा मुख्य रस्ता लागला. आम्ही एखादं चांगलं हाॅटेल दिसतं का शोधू लागलो. एक दिसलंही. पाठीवरील सॅक बाजूला काढून ठेवल्या आणि जरा निवांत बसलो. मोजकेच पदार्थ होते, त्यातल्यात्यात पोटाला आधार म्हणून छोले भटूरेची ऑर्डर दिली. काहीही अरबट चरबट खाणं आम्ही टाळत होतो. खूपच भूक लागली होती म्हणून एकच प्लेट मागवली...आणि लस्सी. म्हटलं काशीला पोहचल्यावरच काय ते व्यवस्थित जेवण करू. इथे पायांना जरा आराम मिळाला.
संध्याकाळचे सात वाजले होते. नैनी रेल्वे स्टेशन आमच्या नजरेसमोर होतं. ही प्रचंड गर्दी. नैनी स्टेशनला लागून असलेला रस्ता माणसांनी तुडुंब भरला होता. प्लॅटफॉर्मवर कुणाला सोडलं जात नव्हतं. सगळे प्लॅटफॉर्म लोखंडी गेट लावून कुलूपबंद करण्यात आले होते. प्लॅटफॉर्मवर जाऊ पाहाणारी गर्दी रस्त्यावर वाढत चालली होती. थोडावेळ सुचेना काय करावं. ती गर्दी पाहून थोडासा गोंधळ उडाला खरा. परिस्थितीचा अंदाज घेतला, नक्की काय चाललंय पाहून घेतलं. माघारी फिरायचा विचार मनात आला. पण माघारी फिरून जाणार कुठे? हाही प्रश्न होताच. काशीला बसने जावं तर बससेवा शहराबाहेर...तिथपर्यंत पोहचणं अवघड. एकंदरीत नैनी रेल्वे स्टेशनला जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा प्रचंड गोंधळलेल्या अवस्थेत होतो.
मनात निरनिराळे विचार येऊ लागले. काशीला जाण्याचा बेत रद्द करावा, रात्र नैनीमध्येच काढावी आणि दुसर्या दिवशी नागपूरचा रस्ता धरावा.... कसंतरी करून शहराबाहेर पडून रात्रीच नागपूरला जाणारी बस पकडावी...
थोडावेळ तिथेच रेल्वेस्टेशनच्या बाहेर उभे राहिलो. वेळ जाऊ दिला. मनाशी पक्का निर्णय केला...काशी गाठायची.
गेटवर उभ्या असलेल्या पोलिसाला आम्हाला काशीला जायचं आहे असं सांगितलं. त्याने आम्हाला सांगितलं, थोडेसे पुढे चालत जा, तिथे तुम्हाला एक गेट दिसेल, तिथून जा. त्याने सांगितलं तसं आम्ही त्या गेटजवळ आलो, इथे पोलीस उभे होते ते सर्वांना आत जाऊ देत होते. आम्हीही गेलो...आणि अडकलो ना दोन तासासाठी!
आता थोडसं लक्षात येऊ लागलं होतं, इथे काय system राबवली जात होती ती. आम्ही प्रयागराजला गेलो त्याच्या दोनचार दिवस आधी दिल्लीत प्लॅटफॉर्मवर चेंगराचेंगरी झाली होती. तसं इथे काही होऊ नये याची काळजी घेण्यात आली होती. कुठल्याही प्लॅटफॉर्मवर जाण्याआधी तुम्हाला एका भल्यामोठ्या चौकोनात(भलंमोठं मोकळं प्रतीक्षालय जिथे बसायची सोय नाही. मोबाईल चार्जिंगची मात्र होती.)थांबावं लागणार होतं. तो चौकोन आणि प्लॅटफॉर्म एका लोखंडी गेटने जोडलेले. ज्यावेळेस प्लॅटफॉर्मवर गाडी लागेल तेव्हाच तो गेट उघडणार...त्याचवेळेस प्रवाशांनी गाडीत जाऊन बसायचं. गर्दीनियंत्रण.
आमची गाडी जाणार होती प्लॅटफॉर्म नंबर एकवरून जो रस्त्याला लागून होता. तिथली गर्दी पाहून आम्ही गोंधळलो होतो...आणि येऊन पडलो होतो प्लॅटफॉर्म नंबर दोनच्या कानपूरच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांच्या या चौकोनात. आता जोपर्यंत कानपूरला जाणारी गाडी प्लॅटफॉर्म नंबर दोनवर लागत नाही तोपर्यंत तो गेट उघडण्यात येणार नव्हता. आता गेट उघडेल, मग गेट उघडेल, संयम...संयम... काय असतो म्हणतात तो आम्ही नव्याने अनुभवला. सातच्या सुमारास आम्ही नैनी रेल्वे स्टेशनवर आलो होतो...नऊ वाजता दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मचा तो गेट उघडला. गर्दीचा रेटा जाऊ दिला. आरामात आम्ही पूल पार करून प्लॅटफॉर्म नंबर एकवर प्रवेश मिळविला. हा आमच्यासाठी द्रविडी प्राणायाम ठरला. आम्ही एक नंबरच्या प्लॅटफॉर्मवर आलो तेव्हा तो रिकामी होता. नैनी ते पंडित दीनदयाळ उपाध्याय (जुनं नाव- मुगलसराय, इथून काशी जवळ) स्टेशनच्या दरम्यान 'महाकुंभ यात्रा स्पेशल ' गाड्या चालविण्यात येत होत्या. त्यातली एक आता प्लॅटफॉर्मवर लागत होती...लागली...आम्ही विनासायास चढलो...दोघांनाही विंडो सीट समोरासमोर. दोन नंबरच्या प्लॅटफॉर्मवर दोन तास अडकलो खरे पण हे त्यामुळेच शक्य झालं. मला खात्री होती आता एक नंबरचा गेट उघडला की गाडी खचाखच भरणार...झालंही तसंच...काही वेळातच गाडी अशी भरली कि पाय ठेवायला जागा नाही. छत्तीसगड, बिहार, उत्तर प्रदेश सगळेच त्या गाडीत. पंडित दीनदयाळ उपाध्याय स्टेशन एक महत्वाचं स्टेशन, इथून बिहार, छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि इतर राज्यात उत्तरेकडील गाड्या जातात.
आम्ही जरा सुटकेचा निश्वास सोडला. साडेनऊ वाजत आले होते...म्हटलं आता काय पोहचतोच मुगलसरायला...बाराच्या आत. तिथेच मुक्काम करायचा, सकाळी लवकर उठून काशी गाठायचं...हाय काय...नाय काय....! हिने बॅगेत चाचपायला सुरुवात केली. एक हल्दीरामचं भेळेचं पाकीट, आणि काल घेऊन ठेवलेली दोन मोठी बोरं हाती लागली. आधाराला पुरेशी होती.
साडेनऊचे दहा झाले...दहाचे साडेदहा झाले...साडेदहाचे अकरा झाले...गाडी काही जाग्यावरून हलायचं नाव घेईना...खिडकीबाहेर पोलीस दिसल्यावर त्याला विचारलं,"कभी हिलेगी?"
"बस निकलही रही है!" असं कितीतरी वेळा ऐकलं आम्ही...आणि एकदाची हलली गाडी. म्हटलं चला, दोन वाजेपर्यंत तरी पोहचू. उम्मीद पर दुनिया कायम है।
आम्ही ज्या रेल्वेमार्गावरून प्रवास करीत होतो तो एक व्यग्र रेल्वेमार्ग होता. आमची गाडी पुढील प्रत्येक स्टेशनला बाजूला काढली जात होती. बाजूला काढली की तास तास थांबत होती. हाय रे माझ्या कर्मा...असं करता करता पहाटे सहा वाजता गाडी पंडित दीनदयाळ उपाध्याय रेल्वेस्टेशनला लागली. आदल्या रात्री झोपेचं खोबरं झालं होतं...दोन रात्री लागोपाठ झालं तर काय शब्दप्रयोग करता येईल...तुम्हीच सुचवा.
आम्ही आमच्या सॅक पाठीवर लादल्या आणि ट्रेनमधून बाहेर पडलो. लोकांनी स्टेशनचा पार उकिरडा करून टाकला होता. पूल चढून बाहेर रस्त्यावर आलो. इथून काशी सोळा किलोमीटरवर. एक ई रिक्शा पकडली. त्याने गंगेच्या पुलावर आणून सोडलं. त्याच्या म्हणण्यानुसार त्याच्या गाडीला काशीत एंट्री नव्हती. पुलाखाली काशी रेल्वे स्टेशन. तिथे एक सायकलवाला उभा होता, दुसरा काही चाॅईस नव्हता. त्याला श्री काशी विश्वेश्वर मंदिराजवळ सोड म्हणून सांगितलं.
पहिल्यांदाच ही सायकल रिक्षात बसली होती, आम्ही खात्यापित्या घरातील...हिला तो सायकल ओढतोय ते बघवेना...
"भैयाजी....रहने दो, इधरही छोड दो...हम पैसा दे देते है आपका।"
तोही हट्टी, कसला ऐकतोय. सोडलं त्याने आम्हाला गेट नंबर चारच्या अलिकडे.
सकाळी सातची वेळ. प्रचंड वगैरे नाही म्हणता येणार पण गर्दी होती. एक नीटनेटकं हाॅटेल शोधलं, फ्रेश झालो, सॅक तिथेच ठेवल्या आणि निघालो आम्ही श्री काशी विश्वनाथाच्या दर्शंनाकरीता.
हाॅटेलमधून बाहेर पडलो. मुंबईतील एकाने काशी विश्वनाथ मंदिराशेजारील एका हारवाल्याचा नंबर दिला होता. तो फास्ट दर्शनाचे अधिकृत पास उपलब्ध करून देईल असे त्यांनी सांगितले होते. त्याला फोन केला असता आधी तर त्याने उचलला नाही, नंतर काही वेळाने केला तेव्हा तिसऱ्या कुणीतरी सांगितलं, साहेब आंघोळीला गेले आहेत.
आम्ही गेट नंबर एक ते चार, सगळीकडे फिरलो. प्रत्येक गेटवर ही भलीमोठी रांग. हिला म्हटलं," आधी एक काम करूया! काहीतरी खाऊन घेऊया!"
गेटनंबर दोनच्या बाहेर दुकानांची रांग...त्यातली काही रेस्टॉरंट...त्यातल्या एकाची स्वच्छता पाहून गेलो आत. नाष्ट्याला ठराविक पदार्थ. न्याहारी उरकून आम्ही बाहेर पडलो. ही म्हणते, त्याला परत एकदा फोन करून बघ. मी तिला म्हणालो," हे बघ, दहा वाजले आहेत. आपण इमानदारीत कुठल्यातरी एका रांगेत उभे राहूया. नंबर लागला तर ठीक, नाहीतर दुपारी तीन वाजता रांगेतून बाहेर पडायचं आणि काशीबाहेर असलेला आपला बसस्टॉप गाठायचा. न्याहारी करता करताच वाराणसी ते नागपूर बसचं तिकीट मी काढलं होतं.
आम्ही एक नंबर गेटच्या आतल्या रांगेत उभे राहिलो. प्रत्येक गेटची रांग तीन तीन चार चार पदरी होती. दिवस जसा वर चढत होता गर्दीही वाढत चालली होती. रांग हळूहळू पुढे सरकत होती. प्रयागराजची अर्धी गर्दी काशीला येत होती. प्रयागराजच्या त्या भल्यामोठ्या घाटांवर गर्दी विखुरली जात होती पण काशीच्या अरुंद गल्ल्या भरून टाकत होती. पाच तास रांगेत उभे राहिल्यानंतर आम्ही मंदिरात प्रवेश केला. मंदिर परिसर सुशोभीकरण आता पूर्ण झालं आहे. मी जेव्हा २०२१ साली काशीला गेलो होतो तेव्हा हे काम अर्धवट अवस्थेत होतं. दगडी शिळा इकडे तिकडे पडलेल्या होत्या. त्यावेळी माझं दर्शन मात्र विनासायास झालं होतं. आताही दर्शन खूप छान झालं.
दुपारचे तीन वाजत आले होते. आम्ही मंदिरातून बाहेर पडून घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आलो. म्हटलं हिला गंगाघाट दाखवेन. कसलं काय. घाटाकडे जाणार्या रस्त्यावर ही तोबा गर्दी. सकाळी गर्दी एवढी जाणवली नव्हती पण आता मंदिरापर्यंत जाणारी प्रत्येक गल्ली, घाटाकडे जाणारा रस्ता, घाट माणसांनी तुडुंब भरून गेला होता. आम्ही तिथून काही पावलांवर असणार्या घाटाकडे जाण्याचा विचार सोडून दिला. आता आमचं एकच लक्ष्य होतं... श्री काशी विश्वनाथ मंदिर परिसरातून बाहेर पडून शहराबाहेर असलेलं लक्जरी बस स्टँड गाठणं.
आम्ही हाॅटेलवर जाऊन आमच्या सॅक घेतल्या. साडेतीन वाजत आले होते. आमची सहाची गाडी. श्री काशी विश्वनाथ मंदिरापासून आम्हाला ज्या बसस्टॉपवर जायचं होतं तो होता बावीस किलोमीटर अंतरावर. जास्तीत जास्त तासाभराचं अंतर. पण आलेल्या अनुभवावरून आम्ही तिथे रेंगाळत न बसता आणि भूक लागलेली असताना रेस्टॉरंट शोधत न बसता सरळ चालायला सुरुवात केली. वाटेत अर्धा किलो संत्री घेतली, कळलंच नाही कधी संपली.
आता हिच्यात चालायचं त्राण नव्हतं.
"अरे ऑटो बघ ना...! " ही.
विचारलं पण ई-रिक्षावाला कुणी तयार होईना. मंदिरापासून ठराविक अंतरापर्यंत वाहनांना आत येण्यास परवानगी नव्हती.
त्या माणसांच्या गर्दीतून बाहेर पडून एखादी ऑटोरिक्षा मिळेपर्यंत आम्हाला चालणं भाग होतं. दीडदोन किलोमीटर चाललो होतो...एका ठिकाणी रस्त्याच्या कडेला दोन स्कूटरवाले दिसले. त्यातला एक माझ्या तोंडाकडे बघतोय, मी त्याच्या तोंडाकडे...मी त्याला विचारलं," आगे छोड दोगे क्या, जहां भी कही ऑटोरिक्षा मिले।"
"दोसो रुपए लूंगा।" तो म्हणाला. म्हणजे मी योग्य व्यक्तीला विचारलं होतं तर.
"ठीक है।" चला कुणीतरी तयार झाला.
त्याच्या स्कूटरवर आम्ही तिघे कसेतरी एडजस्ट करून बसलो. माणसांच्या गर्दीतून सावधपणे तो स्कूटर पळवू लागला....एका ठिकाणी थोडेसे धडपडलोही. एक किलोमीटरवर एका चौकात त्याने आम्हाला सोडलं. पाठीमागून एक ऑटोरिक्षा येतच होती. तिला हात दाखवला. पाचशे रुपयांत तो हायवेला सोडायला तयार झाला. म्हटलं चला, पोचतो वेळेत. वाटेत पुन्हा थोडी फळं घेतली. साडेपाच वाजता त्याने आम्हाला आमच्या पिक-अप पॉईंटवर सोडलं. हुश्श! पोचलो एकदाचे. आता कधी ती बस येऊ दे!
मेला पिक-अप पॉईंट असा कि बसायची सोय नाही. मुख्य रस्ता आणि सर्विस रस्त्याच्या मधे बूड टेकवता येईल एवढीच जागा. तिथेच बसलो.
साडेपाच वाजल्यापासून आम्ही बसची वाट पाहतोय. सहा वाजून गेले बसचा काही पत्ता नाही. पिक-अप मॅनला फोन लावला, तो म्हणाला येईल अर्ध्या तासात.
आता कधी एकदा बस येते आणि आम्ही आडवे होतो असं आम्हाला झालं होतं. प्रतिक्षा करण्यापलीकडे आमच्या हातात दुसरं काही नव्हतं.
दरम्यान वाटेत घेतलेली संत्री आणि द्राक्षे संपली होती.
आठ वाजता गाडी आली. दोन तास उशिरा. आम्ही गाडीत चढलो. जास्तवेळ न रेंगाळता गाडी मार्गस्थ झाली. आमची पाठीमागून दुसरी स्लीपर सीट. बेडवर एका कोपऱ्यात पायाजवळ सॅक टाकल्या. बस एक नंबर होती. स्लीपर कोच असली तरी बसायचं असेल तर पाठ टेकवायला कुशन होतं. सगळ्यात आधी गाडीच्या सस्पेन्शनचा अंदाज घेतला. अप्रतिम...! पोटातलं पाणीही हलणार नाही इतकं उच्च दर्जाचं गाडीचं सस्पेन्शन होतं.
मी हिला म्हणालो," मग सॅक लावू आधी जरा पाठ टेकवतो." तीही म्हणाली,"मीपण." त्यानंतर आमचं काही बोलणं झाल्याचं आठवत नाही.
मला ही खांद्याला हात लावून हलवायला लागली,"काय रे, गाडी जेवायला थांबली नाही कशी?"
मी बावचळतच म्हणालो,"मोबाईलमध्ये टाईम बघ किती झाला."
"अडीच" दोघंही उडालो.
आधीच्या तीन रात्रीचा प्रवास...प्रयागराजला सात आठ किलोमीटर सॅक घेऊन चालणं... त्यात काशीत पाच तास रांगेत उभे राहून घेतलेलं श्री काशी विश्वनाथाचं दर्शन...दर्शन घेऊन झाल्यावर शहराबाहेर पडण्यासाठी केलेली पायपीट...यामुळे आम्ही पार पार थकून गेलो होतो. सत्तावीस तासांनी आम्ही आमची पाठ अंथरुणाला टेकवली होती. इथे मेंदू आणि सर्वंच्या सर्व इंद्रियांनी संप पुकारला होता. गाडी जेवायला थांबलीही असेल कदाचित...पण कळते कुणाला. दोघंही ठार आडवे झालो होतो. म्हटलं, "आता झोप सकाळी बघू." पुन्हा जे गाढ झोपलो ते सकाळी साडेसातला जाग आली. साऊंडप्रूफ A/C स्लीपर कोच आणि अतिउत्कृष्ट सस्पेन्शन यामुळे त्या रात्रीचा धावत्या गाडीतील तो प्रवास, आमचा सारा थकवा, शीण घालवून गेला. सकाळी आम्ही एकदम ताजेतवाने. हंड्रेड पर्सेंट फ्रेश. जणूकाही स्वर्गनिद्रा. ही माझ्या आयुष्यातील दुसरी अशी झोप जिला मी 'काही सेकंदाची झोप' असं संबोधतो. याआधी ट्रेकिंग करताना महाबळेश्वराचा डोंगर उतरलो होतो. चांगलीच दमछाक झाली होती. इतकंच नाही तर खाली ढवळे गावात पोचल्यावर चंद्रगडावर चढाई केली होती. सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही त्या निबिड अरण्यात नुसते चालत होतो. रात्री आठच्या दरम्यान खिचडीचे चार घास पोटात ढकलले आणि मी जो कलंडलो, पहाटे पक्षांच्या किलबिलाटीने जागा झालो. ती एक अविस्मरणीय झोप होती. काही सेकंदांची. या निमित्ताने आठवली.
गाडीने मध्यप्रदेशची सीमा पार केली होती. आधी हिला विचारलं, कसं वाटतंय, तीही म्हणाली, एकदम फ्रेश. मग काय...तासाभराच्या अंतरावर होती... मिनी अयोध्या...अर्थात रामटेक!
मनसर. महाराष्ट्राचा इतिहास दोन हजार वर्षे मागे घेऊन जाणारी नगरी. महाराष्ट्रातील वाकाटक साम्राज्याचा सुवर्णकाळ. आजही इथे मोठ्या प्रमाणावर उत्खनन चाललेलं आहे. इतिहासात रुची असणाऱ्यांसाठी महत्वाचं ठिकाण. आम्ही मनसर हायवेवर उतरलो. तिथून सहा किलोमीटर अंतरावर रामटेक. ऑटो करून रामटेकला पोहोचलो. एस.टी स्टॅन्डजवळ तथास्तु नावाचं हाॅटेल आहे, ऑटोवाल्याने तिथे आणून सोडलं. ते डिसेन्ट वाटलं म्हणून मग दिवसभरासाठी बुक केलं, म्हणजे रामटेक फिरून आल्यावर जरा आराम करता येईल या हिशोबाने. मी आधी फ्रेश झालो. ती फ्रेश होईपर्यंत मी खाली उतरून चहानाष्ट्याची आणि गडावर जाण्यासाठी ऑटोरिक्शाची काही सोय होते का ते पाहून आलो होतो. तिचं आटोपल्यावर सॅक तिथेच ठेवून दोघंही खाली उतरलो. समोरच एक मराठा नावाचं रेस्टॉरंट होतं, तिथे भरपेट नाष्टा केला. ठरल्यानुसार ऑटोवाला मराठा हाॅटेल समोर आला. चलो रामटेक...श्रीरामाच्या दर्शनाला...गडावर. सोनावणे नावाच्या त्या ऑटोरिक्षा ड्रायव्हरने प्रथम आम्हाला नेलं रामटेक परिसराचा भाग असलेल्या पण विरुद्ध दिशेला असलेल्या श्री सिद्ध नारायण टेकडीवर. श्री सद्गुरु नारायण स्वामी यांचा हा दरबार. येथील संजीवन समाधी पाचशे वर्षांपासूनची आहे. तिथे दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही ऑटोमध्ये बसायला निघालो. पण त्याचवेळी महाप्रसादाच्या बैठका सुरु होत्या. आणि हिला तिथली ताई म्हणाली होती, महाप्रसाद घेऊन जा. ही म्हणाली थोडासा महाप्रसाद घेऊया. मघाशी भरपेट नाष्टा केला होता त्यामुळे पोटात जागा नव्हती. सोनावणेही म्हणाले,"जरा जरासं घेऊया!"
सेल्फ सर्विस होती. आपलं ताट आपण घ्यायचं, त्यात हवं तेवढंच घ्यायचं. मोजकेच पदार्थ, मसालेभात, चपाती, एक भाजी, आणि गुलाबजाम. अतिशय रुचकर. आमचं झाल्यावर आम्ही आमची ताटं स्वतः धुवून पुन्हा जागेवर ठेवली. हा ही एक छान अनुभव होता. तिथून आम्ही निघालो. मघाशी वाटेत लागलेल्या अंबाला तलावाजवळ थांबलो. अंबाला तलावाचं दर्शन अतिमनोहारी. हा खूप सुंदर परिसर. नरसिंहाने हिरण्यकश्यपूचा वध केल्यावर आपली गदा जिथे टाकली त्यातून या तलावाची तिथे निर्मिती झाली अशी कथा प्रचलित आहे. गोलाकार तलावाच्या सभोवती प्राचीन मंदिरं, बाजूंनी डोंगर, आल्हाददायक वातावरण, असं वाटत होतं...बस तिथून निघूच नये. तिथे फोटो काढून झाल्यावर आम्ही निघालो आणि श्रीराम गडमंदिराच्या पायथ्याशी येऊन थांबलो. इथे सोनावणेंनी आपली ऑटोरिक्षा पार्क केली. आम्ही निघालो श्रीराम गडमंदिराच्या पायर्यांकडे.
अंबाला तलाव
प्रभू रामचंद्रांनी आपल्या वनवासादरम्यान रामटेक येथे काही काळ वास्तव्य केलं होतं. इथल्या भागातल्या ऋषिमुनींना काही असुर त्रास द्यायचे. ही गोष्ट प्रभू रामचंद्रांच्या कानावर आली. त्यावेळी त्या दुष्ट प्रवृत्तींना संपवायची प्रभू रामचंद्रांनी प्रतिज्ञा केली. प्रतिज्ञा म्हणजे टेक...म्हणून हे रामटेक. श्री हनुमान, श्री लक्ष्मण, आणि प्रभू श्रीराम यांच्या मंदिरांचा गडाच्या पश्चिम दिशेला असलेला हा समूह. अतिशय देखणी यादवकालीन, नागर शैलीतील शुभ्र मंदिरं. भारताच्या कानाकोपऱ्यातून भाविक इथे येत असतात.
रामटेकवर मी माझ्या ब्लॉगवर तीन स्वतंत्र लेख लिहिले आहेत. सर्चमध्ये जाऊन 'Ramtek' टाईप करा. तिन्ही लेख समोर येतील.
प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो, प्रभू श्रीरामांच्या मंदिराला लागूनच रामझरोका आहे. वर चढून गेल्यास रामटेक गावाचं विहंगम दृश्य नजरेस पडतं.
श्रीराम मंदिराच्या जवळच खाली महाकवी कालिदास स्मारक आहे. असं म्हणतात कि महाकवी कालिदासंना मेघदूत महाकाव्य इथेच रामटेकच्या डोंगरावर स्फुरलं. त्यांच्या सन्मानार्थ उभारण्यात आलेलं ते स्मारक पाहून आम्ही गड उतरायला घेतला. रामटेक येथील विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक श्री महागणपतीच्या मंदिरातील अष्टादशभूजा गणेश प्रसिद्ध आहे. अतिशय सुंदर अशी ही मूर्ती पाचशे वर्षे जुनी आहे. या मंदिराला भेट देऊन आम्ही जैन मंदिराकडे निघालो. जैन मंदिरांचा समूह, मंदिरसौंदर्यशास्त्र आणि वास्तूशिल्पकलेच्या बाबतीत खूपच उजवा आहे. जुन्या मंदिरांच्या शिखरावरील कलाकुसर नुसती पाहात बसावी. नव्याने बांधण्यात आलेलं मंदिरही भव्यदिव्य. हा खजिना रामटेकला आल्यास भेट देण्यास चुकवू नये असा.
जैन मंदिरासमोरील मानस्तंभ
आणखी खूप काही आहे रामटेकमध्ये पाहाण्यासारखं. पण आम्ही आवरतं घेतलं. तिथून हाॅटेलवर आलो....तासभर पडलो...साडेचार वाजता हाॅटेल सोडलं...संध्याकाळी साडेसहा वाजता नागपूरात पोहोचलो. सीताबर्डीतील हल्दीरामच्या आऊटलेटमधून ऑरेंज बर्फी घेतली, तिथेच जेवण केलं...साडेआठची दुरांतो पकडून दुसर्या दिवशी सकाळी मुंबईत सुखरूप पोहोचलो. असा हा आमचा प्रवास मुंबई ते प्रयागराज, काशी व्हाया नागपूर सुफळ संपूर्ण झाला.
काय दिलं आम्हाला या प्रवासाने...? का हजेरी लावली आम्ही महाकुंभमेळ्याला...? का हा अट्टाहास...? याचा ऊहापोह हा स्वतंत्र विषय. बघू जमलं तर त्यावर लिखाण करण्याचा मानस आहे.
या प्रवासात बायकोने दिलेली साथ मोलाची. तिची जिद्द, तिचा कणखरपणा, सोशिकता, सारे गुण कामास आले. प्रवास खडतर आहे माहीत असताना तिला महाकुंभमेळ्याला हजेरी लावाविशी वाटणं... त्या दिशेने मी पाऊल टाकणं...आणि त्यातूनच ही संपूर्ण यात्रा घडून येणं...खरंच आमच्यासाठी आयुष्यातील हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला.
आमचा हा प्रवास कसा वाटला, जरूर कळवा. तुमचा अभिप्राय लाखमोलाचा.
धन्यवाद!🙏🏻
_विजय सावंत
१४/०३/२०२५
होळी पौर्णिमा
#trivenisangam
#mahakumbhmela
#prayagraj
#kashi
#Ramtek


















































मस्त
ReplyDeleteधन्यवाद!🙏🏻
Delete