कवडसा- आडवाटेवरचा खजिना- २८- केशवजी नाईक फाऊंटन एण्ड क्लाॅक टाॅवर
केशवजी नाईक फाऊंटन एण्ड क्लाॅक टाॅवर
कसली उष्णता आहे ना बाहेर... भयंकर, असह्य! ग्लोबल वार्मिंग जे काही म्हणतात ते शब्दशः खरं ठरू लागलंय. गेल्या शतकात झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे, आमच्या या पिढीच्या नशिबी आले आहेत, दरवर्षी एकदोन डीग्रीने वाढत जाणारे हे उन्हाळे. छताखालून बाहेर पडू नये इतकी उष्णता वाढली आहे. पण ज्यांना पडावंच लागतं, त्यांचं काय?
आज तहान लागली तर बाटलीबंद पाणी सहज कुठेही उपलब्ध होतं. गरीब असो वा श्रीमंत, सर्वांची तहान भागवतं. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बाटलीबंद पाण्याच्या फॅक्टऱ्या शहराशहरात उभ्या राहिल्या, एकविसाव्या शतकात गावागावात. आज कुठल्याही गल्लीबोळात, नाक्यानाक्यावर बाटलीबंद पाणी सहज उपलब्ध होतं.
पण त्याआधी, विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात...परिस्थित खूप बिकट होती. घराबाहेर पडताना एकतर स्वतःचं पाणी स्वतः बरोबर घ्या, किंवा मग इतरांवर अवलंबून राहा. एखाद्याच्या आड्यात शोधा नाहीतर मग कुणाच्यातरी घरातून मागून प्या. तुम्ही आज पन्नाशी साठीत असाल तर आठवा ते दिवस.
एखाद्या तहानलेल्याला पाणी पाजणं म्हणजे पुण्य कमवण्यासारखं. मुंबईतील काही धनिकांनी हे पुण्य खूप कमावलं त्याकाळी, मुंबईतील काही ठराविक भागात पाणपोई उभारून. किती वाटसरूंची त्यांनी तहान भागवली असेल, किती पुण्य कमावलं असेल काही हिशोब नाही.
मुंबईत कधीकाळी पन्नासच्या संख्येने(२०१४च्या SNDT आणि रुईया काॅलेजने केलेल्या संयुक्त सर्व्हेनुसार)असलेले हे प्याऊ काळाच्या ओघात नष्ट झाले, किंवा बंद तरी करण्यात आले. अपवाद मस्जिद बंदर येथील भात बाजाराचा. केशवजी नाईक यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेला हा प्याऊ आजही दिमाखात उभा आहे आणि इथून येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंची तहान आजही भागवतो आहे.
त्या दिवशी नागदेवीहून मस्जिद बंदर स्टेशनच्या दिशेने युसूफ मेहेरअली रोडने चाललो होतो. स्टेशनच्या आधी वाटेत डावीकडे जाणारा एक रस्ता लागला, त्यादिशेने सहज मान वळली आणि ही वास्तू समोर उभी दिसली. काही पावलं पुढे पडलेली आपसूकच मागे वळली. वास्तूचं वेगळेपण नजरेत भरलं, निघाली पावलं काय आहे ते तपासायला.
सुंदर वास्तू होती ती. आधी इंच इंच न्याहाळलं...चकरा मारल्या...दोन दोन...गोल...गोल. तिथे असलेले माहितीफलक वाचून काढले. तिथे पाण्याची सेवा पुरविणाऱ्या रूपसिंह चौहान या व्यक्तीबरोबर बोललो, आणि लक्षात आलं...ही आहे जुन्या काळातील आजही कार्यरत असलेली मुंबईतील एकमेव पाणपोई, प्याऊ...केशवजी नाईक फाऊंटन एण्ड क्लाॅक टाॅवर. Grade- II A दर्जा प्राप्त असलेली ही वास्तू २०१५ साली पुनरुज्जीवित करण्यात आली.
जुन्या काळातली म्हणजे कधीची...तर १८७६ सालातली. केशवजी नाईक हे मुंबईतलं एक बडं प्रस्थ. प्रसिद्ध गुजराती व्यापारी. त्याकाळी तेवीस हजार रुपए खर्च करून उभारण्यात आलेला हा केशवजी नाईक फाऊंटन एण्ड क्लाॅक टाॅवर (प्याऊ, पाणपोई) त्या दिलेर व्यक्तीच्या श्रीमंतीची उंची दर्शवतो.
एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात दक्षिण मुंबई, विकसित होत होती. १८६४ साली फोर्ट येथील तटबंदीच्या भिंती पाडण्यात आल्या. मस्जिद बंदर ते वडाळा दरम्यान वखारी(गोदी) उभारण्यात येत होत्या. औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली होती. मोठं मनुष्यबळ या भागात कामानिमित्त वावरत होतं. परिसरात असलेल्या उघड्या विहिरी त्यांची तहान भागवत होत्या. त्या उघड्या विहिरीतील अस्वच्छ पाणी पिऊन लोकांच्या तब्येती बिघडू लागल्या. रोगराईचं प्रमाण वाढत चाललं होतं, त्यावेळी ब्रिटिश सरकारने परिसरातील उघड्या विहिरी बंद करण्याचा आणि शहरातील धनिकांना आवाहन करून पाणपोई बांधण्याचा निर्णय घेतला. भात बाजारातील ही पाणपोई केशवजी नाईक यांनी केलेल्या अर्थसाहाय्यातून बांधण्यात आली आहे.
त्याकाळी आजच्यासारखी स्पर्धा नसावी...काहीसं निवांत जीवन असावं...कलात्मकता जिवंत होती. पाणपोई तर उभारायची होती, एक चौथरा उभारला असता आणि त्याच्यावर एक भला मोठा माठ ठेवून येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंची तहान भागवता आली असती. पण नाही...! ती सुंदर असावी, त्यात कलात्मकता असावी, ती काळातीत असावी...त्यासाठी वाट्टेल तो खर्च करायची दानत त्यावेळच्या सामाजिक आणि धार्मिक कार्याला सढळ हस्ते मदत करणाऱ्या धनिकांच्यात होती. शिवाय कलात्मकताही जोपासली जात होती.
या पाणपोईचा थाट काय वर्णावा...चार फूट उंचीच्या काळ्या बेसाल्ट जोत्यावर बारा लाल धौलपुरी स्तंभ, या स्तंभांना आपल्यात बेमालूमपणे सामावून घेणाऱ्या, मालाडच्या खाणीतून काढलेल्या पिवळसर झाक असलेल्या दगडात बांधलेल्या भिंती...आणि वरच्या कमानीसाठी पोरबंदर येथील पिवळा चुनखडी दगड... सौदर्य खुलून न येतं तर नवल. एक पाणपोई ती काय आणि थाट काय! म्हणूनच असेल कदाचित माणसांच्या गर्दीतून एखाद्याचा लक्ष या वास्तूकडे जाताच त्याला आपल्याकडे खेचून घेण्याची ताकद त्या रचनेत आहे.
०८ जानेवारी १८७६ रोजी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर फिलीप एडमंड यांच्या हस्ते या पाणपोईचं लोकार्पण करण्यात आलं. पाणपोईची ही आगळीवेगळी रचना एकमेवाद्वितीय आहे. रचनाकार होते मुंबई महानगरपालिकेचे सिव्हिल इंजिनिअर आर. जे. वाॅल्टन. त्यात माणसांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहेच शिवाय घोडे, बैल इतर पशुपक्षी यांचीही तहान भागविण्याची सोय या पाणपोईत करण्यात आली होती. त्यासाठी खाली जमिनीलगत विशिष्ट आकाराची कुंड बेसाल्टच्या दगडात कोरण्यात आली आहेत. दुर्दैव हे कि आजचे काही मूर्ख लोक त्याचा उपयोग पिकदाणी म्हणून करताहेत. रोजच्या जगण्याच्या घिसाडघाईत हे सौंदर्य मातीमोल तर ठरणार नाही ना...उगाच एक शंका मनाला चाटून गेली. कारण ती सापडली आहे 'रोजचं जगू पाहणार्या' लोकांच्या गराड्यात.
अतिशय सुंदर अशी ही पाणपोई, तुम्ही वास्तूकलेचे चाहते असाल तर आवर्जून जावून पाहावी अशी.
मित्रांनो ही पोस्ट कशी वाटली ते सांगा, आवडल्यास आपल्या मित्रपरिवारात शेअर करा.
धन्यवाद!
_विजय सावंत
२९/०३/२०२५


















Comments
Post a Comment