कविता- बालमन

बालमन

बालमन माझे मला आज भेटले
पकडून बोट त्याने बालपणात नेले

सावरीत चड्डी, शाळेची पायरी पहिली चढलो
पाहून घोळका मुलांचा भांबावून मी गेलो

टाकून खांद्यावर हात मित्रांच्या मैत्रीत रंगलो
दंगामस्तीत त्यांच्या सुखावून मी गेलो

बालभारती गणिताच्या पुस्तकात रमलो
शरद, कमल, छगनला नव्याने मी भेटलो

लय भारी, म्हातारीचे केस, चिंचा, आवळे, बोरं काळी
शर्टाच्या कोपर्यात तोडलेली अर्धी लिमलेटची गोळी

आठ आण्याची ती सायकल थोडी मोठी झाली
थुंकी लावून ढोपरांची मलमपट्टी मी केली

मामाचं पत्र, लपाछपी आंधळी कोशिंबीर खेळलो
जुन्या या मैदानी खेळात पुरता पुरता मी हरवलो

येताच घरी खेळुनी लाडका पाहुण्यांचा झालो
करकरीत दहाच्या नोटीचा बादशहा मी झालो

बालगोपाळांच्या राज्याचा राजाच की हो झालो
येताच पुन्हा भानावर आजचा रंक मी झालो

_विजय सावंत
१४/११/१९

Comments

  1. Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏

      Delete
  2. फार छान आठवणी... भूतकाळ आठवला...त्यावेळेस सोयीसुविधा कमी असल्यातरी प्रत्येक दिवस रोमांचकारी होता. प्रत्येकाशी न विसरता भेट होणार. मला आठवते संध्याकाळी सर्वजनांची बैठक होत असे. बालगोपाळांचा धिंगाणा... आता मोबाईलमध्ये बंदिस्त झाले सर्व जग...

    ReplyDelete
    Replies
    1. हो खरंच ते दिवस खूप सुंदर, निरागस होते.
      छान प्रतिक्रिया! धन्यवाद!🙏

      Delete

Post a Comment