कथा- मौसम
मौसम
निखिलने चार वेळा दरवाजाची बेल वाजवल्यावर प्रियाने दरवाजा उघडला. दरवाजा उघडायला एवढा उशीर का केला विचारायच्या आधीच प्रिया बेडरूममध्ये ऊशीत तोंड खुपसून पडलेली बघून निखिलने विचारले, “काय झालं प्रिया? बरं नाही वाटत?"
निखिलने चार वेळा दरवाजाची बेल वाजवल्यावर प्रियाने दरवाजा उघडला. दरवाजा उघडायला एवढा उशीर का केला विचारायच्या आधीच प्रिया बेडरूममध्ये ऊशीत तोंड खुपसून पडलेली बघून निखिलने विचारले, “काय झालं प्रिया? बरं नाही वाटत?"
प्रियाचं काहीच उत्तर नाही.
“अगं काय विचारतोय मी!"
निखिलला कळून चुकले की काहीतरी गडबड आहे, त्याने बाजूला बसून तिचा हात आपल्या हातात घेतला.
“काय झालं ते सांगशील की नाही, बोल ना! काय झालंय तरी काय?"
लाडात वाढलेली मां की लाडली बेटी प्रिया रडत रडत म्हणाली “ दादाने आईला महिलाश्रमात ठेवायचं ठरवलं आहे..., परवा सोमवारी सकाळी घेऊन जाणार आहे..., सगळं झालं...!, आणि आज मला फोन करून सांगितलं. गेला महिनाभर हे चालू होतं..., मी नाही सांगितलं तुला."
निखिलने तिच्या रडून रडून लाल झालेल्या डोळ्यात रोखून पाहिलं तशी ती सावरून उठून किचनमध्ये गेली. गॅलरीत बसलेला निखिल प्रियाने हातात दिलेल्या कपातले चहाचे घोट घेत घेत कुठेतरी दूर हरवून गेला...
▪▪▪
तीन वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये लैला मजनू म्हणून फेमस असणारे प्रियानिखिल लग्नबंधनात अडकले. लहानपणीच वडीलांचे छत्र हरपलेल्या निखिलचे लग्न त्याच्या आईने मोठ्या थाटामाटात केले होते. निखिल एकुलता एक. मानसोपचार तज्ञ. प्रिया एका आयटी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर. सगळं कसं छान चाललेलं असताना सासू सुनेचे खटके उडाले, एकदा नवीन फ्लॅट घेताना आणि लग्नानंतर वर्षभराने जेव्हा प्रियाने ‘पाळणा तीन वर्षे लांबवायचा' आपला निर्णय आईला सांगितला तेव्हा. त्यानंतर दोनतीनदा वाद झाला आणि आईने आपला निर्णय घेतला. आपल्या मैत्रिणींच्या लेकालेकींच्या विस्कटलेल्या संसाराच्या कहाण्या तिने ऐकल्या होत्या. तिचा निर्णय पक्का होता. निखिल स्वत: एक मानसोपचार तज्ञ असूनही केवळ आईच्या आग्रहाखातर तयार झाला. एकच सल मनात खलत होती. ‘प्रियाने आईला थांबवायला हवे होते.'
▪▪▪
रात्री अंथरुणात दोघंही एकमेकांना पाठ करून आपल्याच विचारात तळमळत होती. निखिलने पुढाकार घेतला, हळूच तिच्या खांद्याला स्पर्श केला. जणू ती त्याचीच वाट पाहत होती.
“ हं! मी बोलतो उद्या सकाळी तुझ्या दादाशी... संध्याकाळी एक मिटिंग दादाच्या घरीच त्याला ठेवायला सांगतो."
प्रिया अलगद त्याच्या कुशीत शिरली. त्याची बोटं तिच्या मऊशार केसांमधून तिचं सांत्वन करू लागली.
रविवारी रात्री अकरा वाजले निखिलला घरी यायला. तोपर्यंत प्रिया गॅलरीत उपाशीच वाट पाहत बसली होती. दारावरची बेल वाजताच तिने क्षणाचाही विलंब न लावता दरवाजा उघडला आणि निखिलवर तुटून पडली.
“ काय झालं? ऐकला का तो?"
निखिल शांतपणे सोफ्यावर बसून मौजे काढत म्हणाला,“ पाणी दे आधी एक ग्लास!"
मिटिंगमध्ये काय झाले हे ऐकण्यासाठी तिचे कान आसुसलेले होते, अर्धाच ग्लास त्याच्यासमोर धरत तिने पुन्हा विचारले,“अरे काय झाले सांग ना!"
“हो हो हो! सांगतो...! सांगतो! अगदी तुझ्या मनासारखं झालंय, दादा आणि तुझ्या वहिनीची समजूत काढायचीही गरज भासली नाही, बास आमचे काही नुस्खे वापरले आणि सगळे प्रश्न मार्गी लागले. आई दादाकडेच राहाणार आहे. आणि हो! ही काही जबरदस्तीची तडजोड नाही तर दोघीही सासूसुना अगदी गळ्यात गळे घालून आम्ही आता मायलेकीसारखे राहू म्हणाल्या. मलापण भरून आलं, इथेच जेवून जा म्हणून सांगत होत्या, पण निघालो मी. उशीर होत होता त्यात तू इकडे एकटीच."
“ खरं सांगतोयस ना तू हे सगळं?"
“आता ह्यात खोटं बोलण्यासारखं काय आहे! पाहिजे तर फोन कर भावाला. आधी जेवायला वाढ पटकन, भूक लागलीय!
प्रियाला रडू कोसळलं आणि तिने निखिलला सरळ मिठीच मारली. थोड्या वेळाने सावरल्यावर अपराध्यासारखं म्हणाली,“जेवायला काहीच नाही केलंय!"
“ओळखतो मी तुला..., पार्सल आणलंय, दोन ताटं तेवढी घे!"
गेला महिनाभर घोंघावणारं वादळ त्या रात्री निखिलच्या कुशीत शांत झालं होतं.
सकाळी सहा वाजता साडी नेसून प्रिया तयार होती निखिल उठायची वाट बघत. निखिल कुशी परतला आणि प्रियाला साडीत बघून झोपेतून उठायचं सोडून उडालाच. प्रियाला साडीचा भारी कंटाळा तर निखिल तिला साडीत बघायला तरसायचा.
“काय गं! आज काय ऑफिसमध्ये सारी डे वगैरे काही आहे की काय?"
“सांगते, तू आधी पटकन तयार हो बघू!"
प्रिया दादाकडे जाऊन आईला भेटेल आणि मग तिथून पुढे ऑफिसला जाईल असा विचार करून तिच्याबरोबर जाण्यासाठी निखिलही पटकन तयार झाला.
चहाच्या कपात बिस्कीट बुडवायला आणि फोनची रिंग वाजायला एकच गाठ, प्रियाने बिस्कीट गळू दिलं, फोन उचलला.
“ हां हां! आ रहे है पांच मिनट में, नीचेही ठहरो।"
“चल आटप लवकर, खाली ओलावाला उभा आहे."
प्रियाचं काय चाललंय निखिलला कळेना, दोघेही गाडीत बसले.
गाडी खोपोलीच्या मातोश्री महिलाश्रमाच्या गेटवर थांबली. थोड्याच वेळात रूम नंबर दहामध्ये भावनांचा कल्लोळ उसळला. प्रियाने विमलाबाईंच्या पायाला स्पर्श केला, तिच्या पाणावलेल्या डोळ्यांतून दोन अश्रू विमलाबाईंच्या पायावर पडले, पार विरघळून गेल्या त्या, सुनेला छातीशी घट्ट कवटाळले.
“आई...! मी तुम्हाला थांबवायला हवे होते!"
“नाही गं पोरी..., माझाच हट्ट होता तो, काही क्षण खूप प्रबळ असतात... आपण कितीही कणखर असलो तरी त्यांच्यावर ताबा नाही मिळवता येत आपल्याला, त्यावेळी तरी...!, आणि मग बरंच काही सुटून जातं हातचं आयुष्यभरासाठी... आज तुझ्या हट्टापुढे माझा हट्ट कमजोर पडला बघ!"
गाडी मुंबईच्या दिशेने निघाली. निखिलने मागे वळून पाहिलं, विंडस्क्रीनमधून आत येणार्या मावळत्या किरणांनी आईच्या खांद्यावर डुलकी लागलेल्या प्रियाचा चेहरा अधिकच उजळून निघाला होता.
© विजय सावंत
०२/०४/२०२०


छान लीहीले आहेस....
ReplyDelete👍🏻👍🏻😊
ReplyDeleteVery nice👍
ReplyDeleteMasttt
ReplyDelete