कवडसा- आडवाटेवरचा खजिना १
आडवाटेवरचा खजिना- १
राजे खोजा नाईक यांचा भुईकोट किल्ला, श्रीराम स्थापित शनिमंदिर, नस्तनपूर तालुका- नांदगाव जिल्हा- नाशिक
चाळीसगांवचं काम संपलं आणि मुंबईला परतीचा प्रवास करायचं ठरलं. चाळीसगाव- मालेगांव- चांदवड- नाशिक- मुंबई रस्ता नेहमीचाच होता. दुपारी साडेतीन वाजले होते, त्यामुळे नेहमीच्याच रस्त्याने जाण्यापेक्षा दुसरा एखादा न पाहिलेला पर्यायी मार्ग आहे का ते गुगलून पाहायचं ठरवलं. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातल्या एखाद्या नवीन भागाची ओळख होईल हा उद्देश. चाळीसगाव-नांदगाव-सिन्नर-घोटी-मुंबई असा पर्याय दिसला. सिलेक्ट केला आणि निघालो.
चाळीसगाव नांदगांव रस्त्याचं सिमेंट कॉंक्रिटीकरणाचं काम सुरु आहे. कदाचित त्यामुळेच एका ठिकाणी गुगीने मला डावीकडे वळायचा सल्ला दिला.आधी विचार केला, हीचा सल्ला मानावा की सरळच जावं, ही कधी कधी अशी गोंधळवून टाकते की ज्याचं नाव ते... वैजापूर ते चाळीसगाव मला तिने बरोबर रस्ता दाखवला होता. एका ठिकाणी तिने शॉर्टकट मारला पण कच्चा रस्ता... गाडी मला चालवायची होती, तिला काय...! रस्ता कधी संपतो असं झालं होतं. मुख्य रस्त्याला लागलो तेव्हा हायसं वाटलं. त्यामुळे गुगीचं ऐकावं की न ऐकावं विचार केला आणि म्हटलं चला हीच्याच मार्गाने जाऊया. जरासाच डावीकडे वळलो, उजवीकडे बुरुजसदृश बांधकाम दिसले. समोरून एक गाववाले येत होते, गाडी थांबवून त्यांना विचारलं, “हा किल्ला आहे का?" त्यांनी हो म्हटल्यावर मी सरळ त्या किल्ल्याच्या आवारातच गाडी थांबवली.
किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर तीन वीशीतले मुलगे दिसले. कदाचित आजूबाजूच्या गावातील असतील. किल्ल्यावर फेरफटका मारायला आले असावेत. त्यांनी जुजबी माहिती दिली.
आतिशय वाईट अवस्थेत, (कदाचित किल्ला खासगी असल्याकारणाने) सरकार दरबारीही कुठली दखल न घेतली गेलेला, ओसाड, गतकाळातल्या वैभवाच्या निशाण्या शिल्लक असलेले बुरूज आजही खिन्नपणे मिरवणारा असा हा अतिदुर्लक्षित भुईकोट... आदिवासी समाजाचे राजे खोजा नाईकांचा किल्ला. इंग्रजांच्या काळातला आहे असे स्थानिक सांगतात. तसेच राजे खोजा नाईक यांच्या इंग्रजांसोबत झालेल्या संघर्षाच्या कहाण्या इथल्या गावकऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहेत.
मात्र किल्ल्याबद्दल खूपच कमी माहिती गुगलवर उपलब्ध आहे. दंतकथा मात्र खूप आहेत. किल्ल्याच्या आवारात फेरफटका मारला, सेलफोनमध्ये जेवढा कैद करता येईल तेवढा केला. उंच बुरुज, तटबंदी, कमानी, पायविहीर, घोड्यांच्या पागेची जागा, वाडा, हौद, एखाद्या परिपूर्ण भुईकोटावर असणारं सगळं काही आहे या किल्ल्यावर. पण काळाच्या ओघात पडझडीच्या रूपात. अतिशय दुर्लक्षित असलेल्या या किल्ल्याकडे लक्ष दिल्यास आजूबाजूच्या जिल्ह्यातील शाळेतल्या मुलांना शैक्षणिक सहल आयोजित करून भुईकोट किल्ला कसा असतो ते अभ्यासता येईल.
किल्ल्याला लागूनच मुंबई-नागपूर रेल्वेलाईन जाते. ती ओलांडली की समोरच नस्तनपूरचं प्रभू श्रीराम स्थापित, जिर्णोद्धारीत शनिमंदिर आहे. आपल्या वनवासकाळात पंचवटी येथे जाण्याअगोदर प्रभू रामचंद्रांनी काही काळ इथे वास्तव्य केले होते. त्यांनीच हे मंदिर स्थापित केले अशी मान्यता आहे. शनिच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी नस्तनपूर हे एक पूर्ण पीठ आहे. मंदिरात गर्दी नसते पण भाविकांचा ओघ सतत सुरू असतो. नस्तनपूर हे काही महाराष्ट्रातील खूप प्रसिद्ध स्थळ नाही पण किल्ल्याकडे लक्ष दिल्यास, त्याची डागडुजी करून सुधारणा केल्यास, सौंदर्यीकरण केल्यास, नस्तनपूर हे महाराष्ट्राच्या नकाशावरील एक उत्तम पर्यटन स्थळ होऊ शकतं.
ध्यानीमनी नसताना अगदी सहज ही दोन्ही स्थळं गुगीमुळे पाहता आली. त्यात कहर म्हणजे सिन्नरच्या रस्त्यावर नांदुर मधमेश्वर धरण पाहता आले. अतिशय सुंदर, पुन्हा कधीतरी येऊन निवांत बघता येण्यासारखा परिसर. धरणाच्या चिंचोळ्या भिंतीवरुन जाताना आणि भिंतीच्या दोन्ही बाजूचे स्पीड ब्रेकर कम लहानश्या टेकड्या ओलांडताना, off road driving करतोय असे वाटले. वेळेअभावी जास्त वेळ तिथे रेंगाळता नाही आले.
क्षितिजावर संध्याचित्रावरचा काळा पडदा हळूहळू गडद होऊ लागला होता आणि तो कापत मला मुंबईचा पल्ला गाठायचा होता.
_विजय सावंत
स्थळभेट - १३/०३/२०१९



















Like it
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!
Deleteखूप छान विजय असा अचानक भेटलेला खजिना खूपच आनंद देऊन जातो नाही का
ReplyDeleteहो! खरं आहे.👍🏻
Deleteआकर्षक वर्णन.
ReplyDeleteजवळचे रेल्वे स्टेशन किंवा एस् टी स्टॅंड दिलं असतं तर माझ्या सारख्या सामान्य माणसाला याच देही याचि डोळा पुन:प्रत्ययाचा अनुभव घेता येईल.
कृपया, विचार व्हावा.
नवनवीन ठिकाणे उत्कर्षात आणण्याच्या प्रयत्नांस खूप खूप शुभेच्छा !🙏⚘
मनःपूर्वक धन्यवाद!
ReplyDeleteआपली सूचना चांगली आहे. यापुढे त्या ठिकाणाची अधिकची माहिती म्हणजे त्याचे भौगोलिक स्थान, जवळचे स्टेशन इत्यादी देण्यात येईल. आभारी आहे. नस्तनपूरला जायचे झाल्यास मुंबई नागपूर रेल्वे लाईनवरील नांदगाव स्टेशन सोयीचे आहे.