आणि बरंच काही- वसंतोत्सव
वसंतोत्सव
एरव्ही त्या ओबडधोबड, काटेरी झाडांकडे अगदीच भुईला भार समजून बरेचजण दुर्लक्ष करीत असतील, पण वसंताची चाहूल लागताच एखाद्या माळरानावरचे ते दुर्लक्षित वृक्ष लाल, केशरी, नारिंगी रंगात लडबडून गेले की भलेभले माना वेळावून मुद्दामहून थांबून त्याचं सौंदर्य डोळ्यात साठवून घेतात. एखाद्या रखरखीत माळरानावर सगळीकडे लालेलाल पळस बघणं म्हणजे पर्वणी असते. कारण त्या ओसाड भूभागावर पळसाचं लाल केशरीपण उठून दिसतं. सह्याद्रीच्या सर्वच घाटरस्त्यांवर डिसेंबर संपता संपता पळस(flame of the forest) लक्ष वेधून घेतो. काही दिवसांनी शिशिराला अर्पण केलेला पर्णसंभार विसरून गुलाबी नारिंगी रंगाने काटेसावर बहरते. ती काटेरी गुलाबी नारींगी रंगाची शाल्मली जेवढं लक्ष वेधून घेते तेवढेच फुले फुलल्यानंतर महिन्याभरात तिच्या बोंडातून बाहेर पडलेले शुभ्र कापसाचे पुंजके. मुलायमपणा काय असतो ते अनुभवायचे असेल तर एकदातरी सावरीचा कापूस हातात घेऊन पाहावा... याच दरम्यान पांगाराही आपल्या लावण्याची सृष्टीत भर घालत असतो, त्याचा रंग इतका सुंदर! वाटत नाही जगात कुठल्या फॅक्टरीत तो तयार करता येऊ शकेल. हे टायगर्स क्लॉ मला खूप आवडतात. पळस, शाल्मली (काटेसावर), पांगारा आणि वसंत...! एक अद्भूत नातं. ही आपली पारंपरिक झाडे. ऋतूू बदलाची हाक देणारी. पूर्वी, कदाचित आजही असेल... आदिवासी पाड्यांमध्ये पळसाच्या फुलांंपासून बनवलेला रंग रंगपंचमीला वापरला जातो. सावरीच्या फुलांमध्ये मध मोठ्या प्रमाणात असतो. तो चाखण्यासाठी वेगवेगळ्या जातीचे पक्षी त्या झाडावर गर्दी करतात. हल्ली एका नव्या विदेशी भिडूची भर पडलीय आता वसंतात. हो! तोच तो! विक्रोळीवाला. नाजूक, सुंदर, पिंक ट्रम्पेट (Tabebuia heterophylla), मुंबईचा चेरी ब्लॉसम.
वसंतात गुलमोहराचे पुंजकेही आता नजरेला दिसू लागतात....निष्पर्ण झाडांना नाजूक पोपटी पालवी फुटू लागते... बहावा डोलू लागतो... ताम्हण, कंचन, फुलांनी नटतात... सुरंगी धुंदावते....चाफा बोलू लागतो... अबोली अंगण सजवते...जणू माहेरहून भाऊ घरी यावा, त्याच्या स्वागतासाठी वरखाली व्हावे, तशी एरवी वर्षभर फुलणारी फुले एखाद्या माहेरवाशिणीसारखी वसंतात अधिकच खुलतात. वसंतही पूर्ण बहरात असतो. रंगांची उधळण करत असतो. दरवर्षी वसंत फुलतो, खुलतो पण प्रत्येकवेळी नवाच भासतो. असा हा सृष्टीचा साज, वसंत ऋतूराज.
_विजय सावंत
०५/०४/२०२०

















Beautiful.. शब्द आणि फोटोज् सुद्धा
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
Deleteविजय सावंत सर,
ReplyDeleteतुमच्या शब्द-वसंताने मन मोहरुन गेले.
गेल्या पंधरवड्यात पळसाच्या केशरी उधळणीने विदर्भातील उष्म्यातही 'दिल गार्डन गार्डन' झाले होते. गेल्या आठवड्यात एरव्ही रूक्ष दिसणार्या काटे सावरिने कोकणातील रूक्ष उन्हाळ्याचे स्वागत आपल्या लाल पुष्प तोरणाने केलेले पाहिल्यावर मदनानेच हा संगम घडवून आणला आहे ह्याची प्रचिती आली.
विक्रोळीचा पिंक ट्रम्पेट दिसला असता तर और मजा आता.
प्रकाशचित्रांची नावे दिल्याने माझ्यासारख्या अनपढाची सोय झाली.
बाकी, म्या पामर तर आपला चाहता आहे.🙏
या सुंदर प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. जय, आपल्या सर्वच प्रतिक्रिया वाचनीय असतातच पण माझ्यासाठी मार्गदर्शनाचेही काम करतात. असाच लोभ राहो! मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
Delete