कथा- नानी

नानी

          रोवळी, कणगी, तट्टा, लाकडी घिरट, दगडी जातं, व्हायण, मुसळ, मोठी लाकडी ट्रंक, नारळाच्या रसासोबत भुरकायच्या ताज्या शेवया गाळायचा भलामोठा लाकडी साचा, फाटी, इरला, पितळेचा जाळीदार पानाचा डबा, पाटल्या दारात गवताची तनस व चार एकर जमिनीसह  कोकणातले सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेले नळ्याचे घर आणि इतर ऐवज... ही उगवतीची कुणेवाडीतली इस्टेट. जमिनीचं ठीक आहे पण वर उल्लेख केलेल्या वस्तू नानीसाठी इस्टेटीपेक्षा कमी नव्हत्या. सगळीकडे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या वस्तू नानीने जीवाच्या पलिकडे सांभाळल्या आहेत. वाडीतले पूर्वेकडचे पहिलं घर नानीचं. म्हणून ती उगवती. वय वर्षे साधारणतः ऐंशीच्या आसपास. घरात एकटीच. नवरा जाऊन दहा वर्षे झाली. मुलगा मुंबईला पोलिसात होता, कसलातरी ताप आला नि त्यांतच गेला. एक मुलगी मुंबईत असते, ती आपल्या व्यापात. मुलीचा मुलगा नानीचा नातू तानाजी अधूनमधून गावी येणार्याकडे पैसे पाठवत असतो, स्वत:ही येत जात असतो. 
         एवढी मोठी इस्टेट वार्यावर टाकून नानी कुठे गेली काही कळायला मार्ग नाही. सकाळपासून म्हातारी हरवली आहे... !
          कुठे दिसली नाही म्हणून वाडी तिच्या घरात येऊन बसली आहे.

” रात्री बायकोन अळवाची भाजी नि काळ्या वाटान्याचा सांबारा दिल्यान ता खाल्ल्यान नि घरातच निजली... सकाळी न्हेमीगत म्हातारेक हाक मारुक इलय तर म्हातारीचा हूं नाय की चूं नाय... दार सताड उघडा...म्हातारी तशी घर सोडून खय जातव नाय... मी टेनशनमदे इलय ना...! जगल्याक सांगितलंय वाडीत बगूक... तोव शोधून दमलो. म्हातारीचो पत्तो नाय...!" बाबी, नानीचा चुलत पुतण्या. समोरच राहतो. तिच्याकडे लक्ष ठेवून असतो. नानीच्या घरात बसलेल्या वाडीतल्यांना सांगत होता. नानीने वाडीत माणसं जमवली होती त्यामुळे खबर लागताच सगळे खुशाली घ्यायला आले. तोपर्यंत जगदिश दुसर्यांदा वाडी फिरून आला.
     
“नाय, खय गावाक नाय. वरली वाडी, मधली वाडी, खालची वाडी, सगळा धुंडाळून झाला...,म्हसवटेपर्यंत जावन इलय." जगदिश धापा टाकतच म्हणाला.

 “वायच बस... पानी खा!" नाना बोलले. जीजी, नाना, अण्णा, आप्पा, आबा, ताता, भाई, दादा सगळे एका पिढीचे शिलेदार, ऐंशी नव्वदीच्या आसपास असलेले, आता घरं वेगळी असली तरी  सर्वांचा खापर पणजोबा एकच. ‘अर्ध्या हाताची बनियान आणि उभ्या पट्टयांची चड्डी'वाली ही कदाचित शेवटची पिढी.

“टेन्शननच झाला ह्या, बारा वाजोक इले, म्हातारीचो अजून पत्तो नाय... तान्याक कोनी कळवल्यान काय रे?" अण्णांनी काळजीच्या सुरात बाबीला विचारले.

“आनखी तासभर वाट बघुया, उगाच त्येच्या जीवाक घोर नको!" बाबी बसल्या जाग्यावर म्हणाला.

       वीस पंचवीस माणसं नानीच्या घरात बसली होती, दहा-बारा झिलगे खळ्यात तर बाईमाणसे मधल्या खणात उभी होती, सगळ्यांच्या डोक्यात नानीचाच विषय.

 “म्हातेरेचो डबो बघ खय दिसता काय पानाचो." अण्णांनी जगदीशला सांगितलं तसा त्याने पलंगाखाली ठेवलेला नानीचा पानाचा डबा त्यांच्या पुढ्यात सरकवला.

“ आप्पा...! वायच तंबाकुची डबी दे तुजी!" अण्णांनी मागितल्यावर आप्पांनी आपली एका बाजूला चूना व दुसऱ्या बाजूला सुगंधी तंबाखू भरलेली चपटी हिरवी डबी त्यांना दिली. नानीच्या डब्यात तंबाखू होता तरी त्यांना आप्पांचाच हवा होता...आप्पा आर्मीमधून रिटायर्ड झालेले दिलदार सुभेदार.  दोनच शौक...! मिलिटरी कॅन्टीनमध्ये मिळणारी ओल्ड मंकची बाटली आणि सुगंधी जाफरानी पत्ती. पाव किलो तंबाखूत एक भोला छाप जाफरानी पत्तीचा डबा मिसळला की महिनाभर बघायला नको. वाडीतल्या झिलग्यांना त्या तंबाखूचं खूप वेड. आप्पा कुठेही दिसले की ‘ आप्पांनु वायच तुमची ती तंबाकुची डबी देवा वो!' म्हटल्यावर आप्पांनी काढून दिली की रिकामी होऊनच आप्पांकडे यायची. आताही तेच झाले, डबी सगळ्यांकडे फिरून आप्पांकडे आली तसे आप्पा काठी टेकवत खूर्चीवरून उठले आणि नानीक उद्देशून म्हणाले,“अर्धी हाडा मसनात गेली नी खय फिरता हा ही म्हातारी...? जेवन येतय मी... इली तर कळवा माका."

       जसजसा वेळ जात होता तसं टेन्शन वाढत चाललं होतं. बाबीने जगदिशला पुन्हा एकदा नानीला शोधायला पाठवलं. सकाळपासून येऊन बसलेले आता वाट बघून आपापल्या घरी पांगायला लागले. बाबीच्या बायकोने चार वेळा निरोप पाठवल्यावर ताते म्हणाले,“ बाबल्या कित्याक मेल्या त्वांड खदूळ करून बसलस, जा...! घासभर खावन ये, मगे बगूया काय ता....मीपन येतय जेवन...! काय रे ह्या न्हिंबार पडला हा भायर मरनाचा...!"

             दुपारनंतर  उन्हाचा तडाखा थोडा कमी झाला तसं नानीचं घर पुन्हा भरायला लागलं. सर्वांचे चेहरे आता सुतकी झाले होते. अजूनही नानीचा काहीच पत्ता नव्हता.

“ काय करूया ...? सगळा शोधून झाला... म्हातारी गावाक नाय." बाबीने चिंता व्यक्त केली.

“वाग बिग नाय ना रे येत गावात...! नाय आपला इचारलय!" आप्पांनी शंका व्यक्त केली.

“आप्पा, मेल्या इतक्या वरसात कधी वाग दिसलो काय रे...! कायव आपला!" भाई पितळेच्या तांब्यातलं पाणी पेल्यात ओतून घेता घेता म्हणाले.

“मग काय मेल्या म्हातारी हवेत उडाली की सीतामाईसारखी जमनिन खाल्ल्यान तिका!" आप्पांचे म्हणणे रास्त होते.

“जगल्या पांदीत बघितलस रे!" भाई तांब्या पुढे सरकवत म्हणाले.

   सकाळपासून वाडीत आणि वाडीच्या बाहेर चार चकरा मारून आलेला जगदीश म्हणाला,“अन्नांनु सगळा शोधून झाला, आड्यातसुदा जावन इलय. आता व्हाटसअपवरपण टाकलंय."

पाच वाजत आले होते, भिंतीला टेकून बसलेला बाबी थोडा पुढे येऊन म्हणाला,“माका वाटता पोलिसात कंप्लेट देवची लागात... तान्याकपन कळवूचा लागात, आपल्याकडना होयत तेवढा केला... आता ह्येच्यापुढा काय डोक्या चालना... जगल्या तू मंग्याक घेवन पोलिसात वर्दी देवन ये, मी तान्याक फोन करतय...!"
            वाडीतल्यांना आयता पानाचा डबा आणि गप्पा मारायला नानीचे घर मिळाले होतं. तिन्हीसांजेला वाट बघून  सगळी मंडळी आपापल्या घरी परतली.

आबा बाबीच्या खांद्याला हात लावून म्हणाले,“ काय ता कळव रे...! जातय घराकडे...!

    वाडी काळोखात  बुडाली. रात्री घराघरात एकच विषय ‘म्हातारी गेली कुठे...?'


नानीने रात्रभर काय बाबीला झोपायला दिले नाही. रात्री दोन वेळा बाबी नानीच्या घरी चक्कर मारून आला. पहाटे कुठे जराशी डुलकी लागलेली... तेवढ्यात बाबीचा उशाला ठेवलेला फोन वाजला.
 बायकोने फोन उचलला,“हलो!"

“ हॅलो...!मी कणकवली पोलीस स्टेशनमधून बोलतो आहे... श्रीधर सावंत आहेत आहेत का?

“वायच थांबा!" बाबीच्या बायकोने कसंतरी बाबीला उठवलं आणि फोन हातात दिला.

“बोला!" बाबी डोळे चोळतच म्हणाला.

“तुमची कंप्लेंट काल रजिस्टर झाली होती, म्हातारी हरवल्याची... रात्री कणकवली हायवेवर एक म्हातारी गाडीखाली आली, तुम्हाला ओळख पटवायला यावं लागेल...!"

“अं अं अं..! हा... हा...! येताव, येताव...!"
बाबीची शुध्दच हरपली.

“गो वायच चायक आधान ठेव...! कणकवलेक जावचा लागतला... तान्याक फोन करून बघतंय खय पोचलो तो... जगल्याक उठवून आनतंय...!" बाबी तसाच अंथरूणातून उठून जगदीशला उठवायला गेला. पूर्वेची लाली वाडीवर पसरली आणि हा हा म्हणता बातमी वाडीत पसरली.

           तानाजी मुंबईहून  रात्रीची गाडी पकडून सकाळी साडेआठलाच पोचला. तोपर्यंत नानीच्या घरात वाडी गोळा झाली होती. कोण माच्यावर, कोण पडवीत तर कोण खळ्यात बसले होते.

“बेस झाला बाबा टायमावर इलस तो...! काय ता बघ आता पुढचा... आधी हातपाय धुवान घे... चाय बटर खा आणि राजावांगडा कणकवलेक जा." तानाजी आला तसा तात्यांसह वाडीतल्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

“व्हय व्हय! कळला माका...! मघाशीच बाबल्यान फोन केल्यान होतो... राजग्याक घेवन जातय मी...!" तानाजी आला तसाच पाटल्या दारातल्या बावीवर गेला. उभ्याउभ्याच दोन काढणी अंगावर घेतली... चहा-बटर खाल्ला आणि राजाला घेऊन कणकवलीला निघाला.

       एस.टी.तून ड्रायव्हर म्हणून रिटायर्ड झालेले नि नेहमी पुढे जायच्या गडबडीत असणारे आबा  पानाचा देठ नखाने खुडत बोलले,“ विठ्या! अरे ते कणकवलेक गेले हत तोपर्यंत चार चिवे तरी तोडून आना... पुढच्या तयारीक लागा... उशीर नको... ताटकळत र्हवोचा लागता मगे...न्हिंबरात कलकली येता...!"

“आबांनू तुमच्या जीभेक काय हाड..., अहो अजून म्हायती नाय ती नानी हा की दुसरीच कोन. ता म्हणतत ना अजून नाय इले पावने नि त्येच्या आधीच काढल्यानी घावने." आबांची घाई बघून गणेशला काही राहवले नाही.

“मेल्या काय फुकट जातला हा काय सामान...? मागना कितीतरी मेंबर हत... गावतला कोनाक ना कोनाक...!" आबांनी आपला व्यवहारी विचार बोलून दाखवला.

       आबा काय ऐकण्यातले नाहीत सगळ्यांना माहीत होते, गणू आणि विठूने नानीच्या परड्यातल्या चिवारणीतले चांगले सणसणीत चार बांबू तोडून खळ्यात आणून टाकले तसे बाकीचे झिलगे तासायला मदतीला पुढे आले.

नानीच्या घरात आता तिच्याबद्दलच्या आठवणी एकेकजण काढू लागला.

“बाकी कायव म्हना म्हातारी एकदम खमकी होती, एकटी असली तरी कोनाच्या दारात कधी काय मागोक नाय गेली... लाकडाचे भारेच्या भारे  कालपर्यंत आनायची... गुदस्ता वायच शिक पडली तेवडीच, नायतर आजार कसलो तो तिका ठावक नाय, कोनाच्या बापाक घाबारनारी नाय...अशी अचानक खय गायब झाली काय कळोक मार्ग नाय" सुपारीचे खांड फोडता फोडता जीजी बोलत होते.

       “तान्यान कितींदा सांगल्यान मुंबैक चल..., मुंबैक चल..., पन म्हातारी ऐकोक तयार नाय. म्हनता मेलय तर आपल्या मातीत...! तान्याचो लय जीव म्हातारेवर, मुंबैसून एवढो मिक्सर घेवन इलो पण कलपर्यंत पाट्यारच चटनी वाटत होती " मधल्या दारात उभी असलेली माई दातातलं पदराचं टोक बाजूला करून आठवणी सांगू लागली.

“म्हातारी होती बुटकी पण मनान लय उच होती, कधी कोनाक घरातना उपाशी पाठवल्यान नाय." आनंदीबाईंनी पुस्ती जोडली.

          पुढल्या दारवाजाच्या  बाजूला पडवीत ठेवलेल्या कणगीला अवलो आणि मंगेश टेकून बसले होते. दोघांचं प्रेम अख्ख्या गावाला माहीत. कोणीतरी बाजूने धक्के मारतंय असं मंगेशला जाणवायला लागल्यावर त्याला वाटलं अवलो मुद्दाम खोडी काढतो आहे,"अवल्या मेल्या धक्के कित्याक मारतंस?

“ मेल्या मी कित्याक धक्के मारू?, शुध्दीवर हस रे! काय सकाळीच नदयेच्या पल्याडसून जावन इलस?" अवल्या वैतागला.

“कायव बडबडा नको हां, सांगान ठेवतय तुका..मुंबैत काय करीत होतस म्हायती हा माका, नोकरी घोड्याक खाजवूची नि ऐट बाजीरावाची." मंगेशही वैतागला.

“मंग्या कायव बोला नको हा...! सांगान ठेवतय! खाल्लला सरता पन बोल्लला र्हवता." अवल्याचा आवाज चढला तसं आप्पांनी दोघांना दम दिला.
“गप र्हवा रे मेल्यांनो! हय काय चलला हा...तुमचा काय चलला हा... सूर्य चंद्र एकत्र बसले हत...! एकान हय येवन बसा."

रामू माच्यावर बसला होता, त्याचा लक्ष त्या दोघांवर गेला, त्यांच्या पाठीमागची कणगी त्याला हलताना दिसली, तसं त्याने बाजूला बसलेल्या अण्णांना विचारले,“ अण्णांनू कणगी आता हलताना दिसली, ती बगा...! पुन्ना हलली!"

“मेल्या काय भूतबित लागला की काय तुका, काय त्या कणगीत भूत हा...?" अण्णांनी कणगीकडे बघत त्याला विचारले.

“ ती बगा पुन्ना हलली...!" रामू ठाम होता.

आता कणगी सगळयांच्या नजरेत येईल इतपत हलत होती, सगळे जागचे उठून कणगी का हलते आहे ते बघायला कणगीजवळ आले. बाबीने कणगीत डोकं  घातलं  आणि जोरात ओरडला,“ मेल्यांनो..! म्हातारी कणगीत पडली हा...!"

     दोघां तिघांनी कसंतरी करून नानीला बाहेर काढलं आणि गोधडीवर झोपवलं. बाळूने तांब्यामधलं पाणी तिच्या चेहऱ्यावर शिंपडलं तशी नानी हळूहळू शुध्दीवर येऊ लागली.

“ता म्हनतत ता, काखेत कळसो नि गावाक वळसो तसा झाला ह्या" दादा.

 “शिरा पडली ती! वायच बाजूक होवा रे! हवा येवनेत, घोळको करून र्हवलेत...बाबल्याच्या बायकोक वायच चाय ठेवक सांग, वांगडाक असला तर बिस्कीट पाठव म्हणाव." ताता नानीला बघायला पुढे आले.

“दरवाजा सोडा रे! एकतर भुतुर तरी येवा नायतर भायरतरी जावा." नाना करवादले तसे सगळे दरवाजातून बाजूला झाले. पुन्हा एकदा तोंडावर पाणी मारल्यावर आणि थोडीशी हवा लागल्यावर नानी शुध्दीवर आली. तेवढ्यात बाबीची  बायको चहा- बिस्किटे घेऊन आली. ती खाल्ल्यावर नानीला जरा तरतरी आली. वाडीतील सगळे लहान-मोठे आपल्या घरात काय करताहेत याचं नानीला कुतुहल वाटले,“ हे सगळे कित्याक जमले हत?"

आप्पा म्हणाले,“ता सांगताव मगे, तू कणगेत कशी पडलस  ता सांग आधी...!"

खोकत खोकत नानीने सांगायचा प्रयत्न केला,“ख्खंsss ख्खंsss ख्खं... कणगेत तळाक थोडासे गोटे शिल्लक होते...फॉव कांडूक देवचे होते... सकाळी च्यायत घालूक मिळतत...
... ख्खंsssख्खं...ते काडूक म्हनून कणगेत वाकोक गेलय...तोल गेलो नि डोक्यार आपाटलय... भिरभिरल्यासारख्या झाला... पुढचा काय माका कळला नाय..."

वाडीतल्यांची अवस्था काय झाली असेल ते सांगायला नको. विठूने चारी चिवे खडसवून तुकडे पाडून बांधायला घेतलेच होते.

आप्पा काठी टेकवत खुर्चीवरून उठले,“ बाबल्या तिका जरा निवांत पडानेत... चला रे...! उद्या येवन काय त्यो गजाली मारा...येतय मी...! आमची म्हातारी वाट बघत असात..." जाता जाता विठूकडे नजर टाकून म्हणाले,“ व्हयता खळ्यातला सामान तेवढा वाड्यात नेवन टाका रे! म्हातारीच्या नजरेक पडोच्या आत...!
****
कित्येक वर्षांनंतर सिंधुदुर्गात कणगी उजेडात आली. नानीने मुंबई काळी की गोरी ती कधी बघितली नव्हती, पण मुंबईत चाकरमान्यांच्या मोबाईलमध्ये महिनाभर तरी फिरत होती.

(कथा पूर्णतः काल्पनिक आहे.)

_विजय सावंत
१९/०४/२०२०

Comments

  1. Match..! अर्ध्या हाताची बनियान आणि उभ्या पट्टयांची चड्डी'वाली ही कदाचित शेवटची पिढी.
    - Thodas vait vatun mag chehryavar hasu aananari ol..

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻

      Delete
  2. गावाकडची गजाली आवडली.ग्वाड वाटता ऐकुक ,वाईच बरा वाटला.

    ReplyDelete
  3. Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻

      Delete

Post a Comment