कवडसा- आडवाटेवरचा खजिना१२ - उग्रसेन की बावली
नमस्कार मंडळी!🙏
कळविण्यास आनंद होतो की गूगलने आपल्या या ब्लॉगला adsense account approve केले आहे. त्यामुळे ब्लॉग वाचताना मध्ये जाहिराती येण्याची शक्यता आहे. Adsense ची setting Auto वर असल्या कारणाने सध्या गुगलच त्या मॅनेज करणार आहे. माझाही adsense चा अभ्यास सुरू आहे, कमीतकमी जाहिराती येतील, जाहिरातीचा व्यत्यय येणार नाही याची मला पुरेपूर काळजी घ्यायची आहे.
ब्लॉगला एक वर्ष झाले. खूप चांगला प्रतिसाद मिळाला. वर्षभरातील माझे लिखाण पाहता मला वाटते मी सतत लिहू शकतो. ब्लॉगवर आलेल्या तसेच वैयक्तिक WAवर आलेल्या तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रिया बघता हा मराठीतला एक चांगला ब्लॉग म्हणून नावारूपाला येऊ शकतो. त्याचे श्रेय तुम्हा वाचकांना. तुम्ही दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल मी तुमचे आभार मानतो. या ब्लॉगला विषयांची कमतरता भासणार नाही याची मला खात्री आहे. यापुढे तो अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहचावा ही अपेक्षा आहे. आपणा सर्वांना मी आवाहन करतो, कृपया आपल्या माहितीतील इतर गृपवर या ब्लॉगची लिंक शेअर करावी जेणेकरून वाचकसंख्या वाढण्यास मदत होईल. आपण सर्व वाचक या ब्लॉगचा हिस्सा आहात. काही सूचना कराव्याशा वाटल्यास, एखादा विषय सुचवायचा असल्यास आपले स्वागत आहे.
आडवाटेवरचा खजिना १२ - उग्रसेन की बावली
कॅनॉट प्लेस, दिल्ली
दिल्लीला आतापर्यंत बर्याच वेळा गेलो आहे. कधी दोन वर्षांतून एकदा भरणार्या अॉटोएक्स्पोच्या निमित्ताने तर कधी फिरण्यासाठी म्हणून. लाल किल्ला, पुराना किल्ला, हुमायून मकबरा, कुतुब मिनार, इंडिया गेट, राजघाट, डॉल्स म्युझियम, जंतरमंतर, जामा मस्जिद, कमल मंदिर, अक्षरधाम, चांदनी चौक, करोल बाग आणि इतर बरीच ठिकाणे पाहून झाली होती. कामानिमित्त नुकताच ४ जून रोजी दिल्लीला जाण्याचा योग आला, ५ तारखेला एक मिटींग आणि ६ तारखेला एक अश्या दोन मिटींग होत्या, ५ तारखेचा दिवस कधी संपला कळालेच नाही.
सहा तारखेचा सकाळचा वेळ मोकळा होता. हॉटेल पहाडगंजमध्ये होते. वेळ मिळाला तर उग्रसेन की बावली(नागपूर सोडल्यानंतर बावडीची बावली होते.) बघायची हे आधीच ठरवले होते. पी के, आणि एक दोन चित्रपटात दिसलेली ही बावड़ी कधीतरी बघायची इच्छा होती. WA वर तिच्याबद्दलची गूढ स्टोरी वाचनात आली होती. दिल्ली बरयापैकी फिरून झालेली असली तरी ही बावडी बघायची राहिली होती. ही बावडी पी.के. चित्रपटानंतर जास्त उजेडात आली. त्यामुळे ती पाहायची उत्सुकता होती.
मुंबईत रोज सकाळी चार ते पाच किलोमीटर चालायची सवय आहे, तसंच सकाळचे मॉर्निंग वॉक समजून सकाळीच सात साडेसात वाजता दिल्ली स्टेशनला लागून असलेल्या पहाड़गंजपासून चालतच निघालो. सोबत गुगी होतीच.
स्टेशनजवळ आलो. गेल्या कित्येक वर्षांपासून दिल्ली खास करून नवी दिल्ली स्टेशन परिसर जसाच्या तसाच आहे, तसूभरही त्यात फरक पडलेला नाही. दर्शनी भागात दिसावे असे एकही, मुंबईत असतात तसे रेस्टॉरंट दिल्ली स्टेशन समोर नाही. असेलही पण ते मला दिसले नाही. स्टेशनसमोर टिपिकल नॉर्थ इंडियन, बाहेर किचन असणार्या छोट्या छोट्या उपहारगृहांची रेलचेल आहे. पण सकाळच्या नाष्ट्याचा वांदा. बघावे तिकडे तेलात चिंब भिजलेले पराठे मांडून ठेवलेले... बघूनच नकोसे वाटतात. बरं कुठे चांगला नाष्टा मिळेल हेही माहिती नसते त्यामुळे थोडी शोधाशोध करावी लागते. ती केल्यावर पराठावाल्यांच्या रांगेत थोडंसं आतल्या बाजूला एक साऊथ इंडियन रेस्टॉरंट दिसले... लहानपणी ठाण्याला राहायला असताना अण्णाच्या साध्याशा उपहारगृहात खाल्लेल्या आप्पम, सांबार आणि चटणीची चव आजही जिभेवर रेंगाळते आहे. त्यामुळे साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर सर्वात आधी मी आप्पम आहे का विचारतो. पण मुंबईत बर्याच ठिकाणी माझ्या पदरी निराशाच पडली. इथे मेन्यू कार्डावर आप्पम होतं, मिळेल कि नाही या शंकेसह विचारले तर चक्क हो म्हणाले. मग काय! मस्त लुसलुशीत आप्पम आणि सांबार्यावर ताव मारला. एरवी मुंबईत बरयाच साऊथ इंडियन रेस्टोरेंटमध्ये आप्पम मिळणं जवळ जवळ बंदच झालं आहे. टिपिकल साऊथ इंडियन आप्पम नॉर्थ इंडियन दिल्लीत बघून आश्चर्य वाटले. रेस्टोरेंट चालवणारे साऊथ इंडियनच होते, त्यामुळे चव राखून होते.
एक मात्र आहे मुंबईत उडप्यांच्या रेस्टोरेंटचं जे नेटवर्क आहे ते बघितलं की नक्कीच त्यांना दाद द्यावीशी वाटते. मुंबईत खाण्याचे वांदे कधीच होत नाहीत.
दाद तर दिल्लीच्या मेट्रो नेटवर्क साठी पण द्यावीच लागेल, आडवीतिडवी पसरलेली दिल्ली, मेट्रोच्या जाळ्यामुळे सहज आणि सुलभतेने ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत फिरता येते.
टमी टम्म करून गुगी वाट दाखवेल तसा मी पुढे निघालो. कॅनॉट प्लेसजवळ आलो. कनॉट प्लेस हा दिल्लीतला पॉश भाग, त्याचा पॉशपणा नजरेत भरतो. कागदाचा तुकडाही रस्त्यावर दिसणार नाही इतकी स्वच्छता राखली जाते. त्या भागातून चालत असतानाच उग्रसेन बावडीच्या वाटेवर डाव्या हाताला एक सुंदर आकर्षक वास्तू दिसली. दिसली म्हणण्यापेक्षा तिनेच माझे लक्ष वेधून घेतले. जवळ जाऊन पाहिले... गेटवर महाराष्ट्र पोलीस उभे होते. त्यांच्याकडे चौकशी केली असता कळाले..., अरे! हे तर आपले वर्तमानपत्रात प्रसिद्ध पावलेले नवीन महाराष्ट्र सदन...! सुंदर वास्तू . दर्शनी भागात शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. नवीन महाराष्ट्र सदनाच्या डौल बघता म्हणता येईल, देशाच्या राजधानीत महाराष्ट्र सदन रुबाबात उभे आहे.
इथूनच पुढे थोड्या अंतरावर हेली रोडवर ती महाराज उग्रसेनची बावड़ी आहे, आजूबाजूला नवनागरीकरणाच्या खूणा, बावडीच्या पायर्यांजवळ जाईपर्यंत कळतच नाही इथे ती प्रसिद्ध बावड़ी आहे. मुख्य रस्त्यावर बावडीकडे जाण्यासाठी दिशा दर्शवणारा फलक आहे, त्यामुळे नवख्यांना तितकासा त्रास होत नाही, बाकी ज्यांच्याबरोबर गुगी आहे त्यांना ती सरळ बावडीच्या दारातच नेऊन सोडते.
प्रवेशद्वाराजवळ बावडीबद्दलची माहिती दिली आहे, ती वाचून आत गेलो.
सुंदर...! स्थापत्यकलेचा आणखी एक उत्तम नमुना डोळ्यासमोर होता, १०५ दगडी उतरत्या पायरयांची... दोन्ही बाजूला भिंतीवर उभारलेल्या सुंदर कमानी...पाच मजली...६० मीटर दक्षिणोत्तर लांब पसरलेली...४५ मीटर रुंद... शिवाय सौंदर्य...एक वेगळाच अद्भूत खजिना मी बघत होतो. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या संरक्षणात असलेली ही संरक्षित वास्तू आता भारतीय टपाल खात्याच्या तिकीटावरसुद्धा उमटली आहे.
कोणी म्हणतं ही बावडी पांडवकालीन आहे... अग्रवाल समाजाचे पूर्वज महाराज अग्रसेन यांनी हीचा चौदाव्या शतकात जिर्णोध्दार केला...तर जे दगड वापरले गेले आहेत ते पाहून आणि बावडीची स्थापत्य शैली पाहून बावडीचं बांधकाम तुघलक, लोधीच्या काळात झाले असावे असे वाटते... बावडीला लागूनच एक थोडीशी ढासळलेल्या अवस्थेतील छोटेखानी मस्जिद आहे. वेगवेगळे तर्क जरी लावले जात असले तरी महाराज उग्रसेन यांनी ही बावडी बांधली हे प्रचलित झाले आहे. त्यामुळे त्यांचे नाव या बावडीला देण्यात आले आहे.
ही बावडी दिल्लीत चर्चेचा विषय आहे. तिथे बावडीबद्दलच्या बर्याच गूढ गोष्टी प्रसिद्ध आहेत. असे म्हणतात, कधी काळी ही बावडी काळ्या पाण्याने भरलेली होती... जे कोणी या बावडीजवळ यायचे ते काळ्या पाण्याने संमोहित होऊन त्यात उडी टाकायचे... रात्री बावडीतून चित्रविचित्र आवाज येतात... वगैरे... वगैरे. जेव्हा ती चांगल्या पाण्याने भरलेली होती तेव्हा जुन्या व नवी दिल्लीतील लोक तिथे पोहणं शिकायला यायचे. पण आता जूनच्या पहिल्या आठवड्यात बावडी पूर्ण कोरडी पडलेली होती. मी बावडीतून अगदी वरपर्यंत डोकावून पाहिले. गोल आकाश नजरेस पडले. पायर्या आणि गोल विहीर यांच्यामध्ये पाच मजली कमानीयुक्त, एखाद्या महालाला शोभेल असे बांधकाम करण्यात आले आहे. वरती घुमटाखाली वटवाघळांनी उलटं बस्तान ठोकलेलं आहे. उतरत्या शेवटच्या पायरीपासून बावडी खरंच गूढ वाटायला लागते. त्यात भर घालतात ते वटवाघळांचे चित्कार.
पीके चित्रपटानंतर ही बावड़ी प्रसिध्दीच्या झोतात आली, मी नऊ वाजताच्या सुमारास तिथे पोचलो तेव्हा माझ्याआधी बरेच पर्यटक तिथे हजर होते, नंतरही ओघ सुरूच होता.
जवळच जंतर मंतर, इंडिया गेट, राष्ट्रपति भवन, संसद, राजपथ आहे. दिल्लीत प्रसिद्ध स्थळे बघितली जातात, पण असे काही आडवाटेवरचे खजिनेही आहेत दिल्लीत... तुम्हाला कधी दिल्ली फिरायला सवड गावली तर नक्की बघा उग्रसेन की बावली.
विजय सावंत
स्थळभेट- ०६/०६/१९
#vijaysawantcellphonephotography
#ugrasenkibawalidelhi
#kathakavitakavadasaaanibarachkahi
















अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...
ReplyDeleteVa khup chan Vijay.
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏
Deleteछान!
ReplyDeleteनेहमीप्रमाणे विचक्षण शोध आणि सादरीकरण !!
बावडीच्या स्थापत्याची अधिक माहिती आवडली असती.
तुमच्या ब्लॉगची गुगलने निवड केली त्याबद्दल तुमचे अभिनंदन !!💐
मनःपूर्वक धन्यवाद!🙏
Delete