कविता - महाराष्ट्र माझा

नमस्कार मंडळी!

सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्र माझा


महाराष्ट्राचे सगेसोयरे

साद घालती कडे कपारी

शाबूत इथली धग अजुनी

शिवशंभूला आर्त पुकारी


खन् नन् खन् टाळ वाजती

ज्ञान तुक्याचे बोल गुंजती

पंढरपुरी एक होती

अठरापगड इथल्या जाती


सीना भीमा गोदा तापी

कृष्णा कोयना नीरा मांजरी

सुजलाम सुफलाम भूमी सारी

खळ्यात हसरी ज्वारी बाजरी


सह्य उभा तो दक्षिणोत्तर

मावळतीला सिंधुसागर

सातपुड्याचा तोरा आणिक

भव्य मुलुख मैदान पठार


दुर्ग इथला अजुनि त्यावर

निशान भगवे फडके फडफड

सोसले किती मोजू कितवर

वीजाही करती दुरुनी तडतड


वृक्षवेली हिरवळ राणी

चांदरात अन् खळखळ पाणी

कांदाभाकर साधी राहणी

मुखात सदा मधाळ वाणी


मराठमोळा मर्दगडी तो

घटमुट काटक कष्टकरी

शेला पागोटं डोईवरी

रुबाब त्याचा लय लय भारी


क्रीडा साहित्य समाजकारण

उद्योगधंदे अर्थकारण

अग्रेसर सदा हा असे पुढे

ह्या मातीतला प्रत्येकजण


स्वाभिमानी न नमला कधी

हिमालयाला हा सह्यगिरी

सेनापती कॉम्रेड आचार्य ऐसेम 

पुरून उरले कितीतरी


ध्यास एकच होता मनी

संयुक्त महाराष्ट्र आणि मुंबई

हुतात्म्यांची कामी पुण्याई

निर्मिला महाराष्ट्र सहमुंबई


©विजय सावंत

०१/०५/२०२१





Comments

  1. जय महाराष्ट्र

    ReplyDelete
  2. अवघा महाराष्ट्र ऊभा केलास थोडक्या शब्दात...

    ReplyDelete

Post a Comment