आडवाटेवरचा खजिना ११ - श्री महागणपती, चिरनेर
आडवाटेवरचा खजिना- ११
श्री महागणपती,
जंगल सत्याग्रह स्मारक
चिरनेर, तालुका- उरण, जिल्हा- रायगड
काही ‘आठवणीतले रस्ते' असतात. मुंबई गोवा महामार्गावरील बरीच वर्षे अडखळलेला पनवेल- वडखळ रस्ता हा त्यातला. किती आठवणी त्या रस्त्यामुळे काहींच्या आयुष्यात जोडल्या गेल्या असतील त्याला सुमार नाही. कोणाची मान, कोणाची पाठ, कोणाची कंबर... शरिरातील हाडे खिळखिळी करणारा हा रस्ता आता वळणावर आला आहे. जेव्हा तो दुर्लक्षित होता तेव्हा पर्यायी रस्ता म्हणून वाशी-बेलापूर-चिर्ले-चिरनेर-खारपाडा मार्गे पेण हा आडवाटेचा मार्ग ज्यांना माहिती होता त्यांनी तो वापरला. पेण अलिबागला जायचे झाले तर मी ह्या रस्त्याचा वापर करायचो. प्रत्येकवेळी चिरनेर मार्गे जाताना चिरनेरच्या महागणपतीची कमान लक्ष वेधून घेत असे, थांबावे असे वाटायचे पण पुढे निघायच्या गडबडीत भेट राहून जात असे. नुकताच संकष्ट चतुर्थीला मंदिरात जाण्याचा योग आला.
चिरनेर जसं महागणपतीसाठी प्रसिद्ध आहे तसंच ते १९३० च्या जंगल सत्याग्रहासाठी प्रसिद्ध आहे. हा संपूर्ण परिसर आगरी, कोळी, आदिवासी शेतकरी आणि कातकरी बांधवांचा. उत्तर कोकणात समुद्रकिनारी वास्तव्य करून आपली संस्कृती, आब राखून असलेला आगरी कोळी समाज आपली वेगळी ओळख राखून आहे.
गाडी वाहनतळावर लावली आणि मी मंदिराकडे निघालो, दोन्ही बाजूला जुन्या कौलारू घरांच्या मधून बोळातून एक वाट मंदिराजवळ पोचते. तसेच मंदिरासमोरून गावातला मुख्य रस्ता जातो. संकष्ट चतुर्थी असल्यामुळे आजूबाजूच्या गावांमधील भाविक दर्शनासाठी आले होते. मंदिर परिसर गजबजलेला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हारफुलांची दुकाने होती. गावठी भाज्यांची रेलचेल होती. पोहे पापड, नाचणी पापड, वेगवेगळ्या चवीचे सांडगे, गावठी रानमेवा खुणावत होते.
मंदिरात प्रवेश करताना सभामंडप प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला चिरनेर जंगल सत्याग्रहाच्यावेळी झालेल्या गोळीबारात गोळी लागलेला, प्रदर्शनार्थ खिडकीत बसवलेला लोखंडी गज लक्ष वेधून घेतो.
हे मंदिर नानासाहेब पेशव्यांचे कर्नाळ्याचे सुभेदार रामजी फडके यांनी बांधले आहे. असे म्हणतात, त्यांना झालेल्या दृष्टांतानुसार समोरच्या तलावात सापडलेल्या मूर्तीची गाभाऱ्यात प्रतिष्ठापना करण्यात आली. मुख्य गर्भगृह पेशवेकालीन असून काळ्या पाषाणात बांधलेले आहे, त्यावर रंगकाम करण्यात आले आहे. पूर्वीच्या जुन्या लाकडी सभामंडपाची जागा आधुनिक पद्धतीने बांधलेल्या सभामंडपाने घेतली आहे. गर्भगृहात विनायकाची भव्य मूर्ती विराजमान आहे. सात फूट उंच आणि साडेतीन फूट रुंद, सुंदर आहे. उजव्या हातात परशू आहे तर एक हात आशीर्वाद देत आहे. डाव्या बाजूच्या वरच्या हातात पाश तर दुसर्या हातात मोदक आहे, डोक्यावर मुकुट आहे. गाभाऱ्यातून मूर्तीचे दर्शन घेताना खूप प्रसन्न वाटते. मुख्य गर्भगृहाचे बाह्यकाम नेत्रसुखद आहे. मंदिराचा घुमट लक्ष वेधून घेतो.
गणपती मंदिराला लागून डाव्या हाताला मारुती मंदिर आहे. समोर तळ्याच्या काठी महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. उरण, कोप्रोलि, चिर्ले, मोठी जुई, धाकटी जुई, खोपटे, दिघोडे तसंच आजूबाजूच्या गावांतील भाविक माघी जयंतीला तसेच चतुर्थीला मंदिरात अलोट गर्दी करतात.
२५ सप्टेंबर १९३० रोजी अक्काबाईच्या माळरानावर आणि या मंदिर परिसरात इतिहासात अजरामर झालेला ‘चिरनेर जंगल सत्याग्रह' ही चिरनेरची आणखी एक ओळख.
मंदिर परिसरात जंगल सत्याग्रहात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांचे बंदिस्त स्मारक आहे. स्मारकाच्या आतील भिंतींवर सत्याग्रहाच्या सुरवातीपासूनच्या घटनांचे माहितीसह चित्रण रेखाटण्यात आले आहे.
ब्रिटिशांचे अन्याय वाढत चालले होते...आमच्याच देशात आम्हाला मीठ महाग करणार्या ब्रिटिशांनी भारतातल्या जंगलसंपत्तीवरही निर्बंध लादले... जंगलात जायचे नाही, झाडे तोडायची नाहीत, (त्याकाळी स्वयंपाक करण्यासाठी चुलीशिवाय दुसरा पर्याय नव्हता.) घरात लाकडांचा साठा करायचा नाही, गुरांना जंगलात सोडायचे नाही... अशा कितीतरी अन्यायकारक नियमांमुळे ज्यांचे पोटच जंगलांवर अवलंबून आहे ते बिथरले. भारतभर असंतोष पसरला. गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. आपल्या जीवाची पर्वा न करता उरणवासीयांनी या चळवळीला पाठिंबा देत सत्याग्रह करून आपला रोष व्यक्त केला.
६ सप्टेंबर १९३० रोजी पनवेल तालुका कॉंग्रेस कमिटीची सभा झाली...७ सप्टेंबर १९३० रोजी सत्याग्रह लढ्याची पत्रके वाटण्यात आली...८ सप्टेंबर १९३० रोजी सत्याग्रहींनी राखीव जंगलातील गवत कापले...गुरे चरायला घुसवली...चिरनेर सत्याग्रहात उतरले.
ब्रिटिश सरकारने सत्याग्रहाचे नेतृत्व करणारे व त्यांना साथ देणारे, सर्वांना अटक करण्यात आली...१८ सप्टेंबर १९३० रोजी वडाच्या पारावर रो.ना. वाणी यांनी भाषण केले... जंगलातील लाकडे तोडून सत्याग्रह केला...
२५ सप्टेंबर रोजी चौकोनी पारावर शंकर नारायण पांडव यांनी वातावरण निर्मितीसाठी पोवाडा म्हटला तसेच तिरंगा फडकावला...गणा जोमा ठाकूर यांनी शिंग फुंकले आणि लोक जंगलात घुसू लागले... मंदिरापासून जवळच असलेल्या अक्क्कादेवी माळावरून पोलीस, सत्याग्रही व मामलेदार येत असताना अचानक गोळीबार सुरू झाला...शेतकर्याच्या मुलाला पोलिसाने गोळी घातली, त्या पोलिसाच्या डोक्यात रमाबाई (साई) यांनी दांडक्याचा घाव घातला...नागीबाई ठाकूर यांनी पोलिसाची बंदूक हिसकावून घेतली... सत्याग्रहाला हिंसक वळण लागले.
चिरनेर येथील जंगल सत्याग्रहात आठ नागरिक व पाच सरकारी नोकर ठार झाले. मामलेदार व राऊंडगार्ड हे ही या गोळीबारात बळी पडले. सत्याग्रहात सामील झालेल्यांना कैद करून त्यांच्यावर खटले भरण्यात आले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ठाणे जेलमध्ये जाऊन सत्याग्रहींची भेट घेतली तसेच जुलै १९३१ मध्ये खटल्याचा निकाल लागला तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. त्यानंतर आरोपींचा पनवेल येथे सत्कार करण्यात आला.
श्री अक्कादेवीच्या डोंगरावर २५ सप्टेंबर १९३० रोजी करण्यात आलेल्या जंगल सत्याग्रहाच्यावेळी गोळीबारात बळी पडलेल्या हुतात्म्यांचे स्मरणार्थ ०३ जानेवारी १९३२ रोजी चिरनेर स्तंभ उभारण्यात आला. हा मिनार ०७ जून १९३२ रोजी ब्रिटिश सरकारने पाडला होता. तो पुन्हा ०२ जानेवारी १९३९ रोजी ना. बा.ग. खेर( मुंबई सरकारचे मुख्य प्रधान) यांच्या हस्ते उभारण्यात आला. तसेच पाडण्यात आलेल्या पहिल्या स्मृतिस्तंभाच्या कळसाची स्थापना २५ सप्टेंबर २००५ रोजी करण्यात आली.
भित्तीचित्रांवरील हा सगळा इतिहास वाचत असताना मीसुद्धा त्या सत्याग्रहात सामील झालो...
एकदा आडवाट करून चिरनेरचा श्री महागणपती आणि इतिहासात घेऊन जाणारे हे स्मारक नक्की बघा. पण सगळं जनजीवन सुरळीत सुरू झाल्यावर...
तोपर्यंत घरी राहा, सुरक्षित राहा.
विजय सावंत
स्थळभेट - १२/०३/२०२०
मोबाईल फोटो- विजय सावंत
#shrimahaganpatichirner #chirner #jangalsatyagrahchirner<script data-ad-client="ca-pub-2420490495890015" async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"></script>google.com, pub-2420490495890015, DIRECT, f08c47fec0942fa0

























देवालयाचा आकृतिबंध नजरेसमोर उभा करतांना गावाचा ऐतिहासिक संदर्भ सविस्तर ज्ञात करून दिल्यामुळे डोळस पर्यटन कसे असावे ह्याचे हे मुर्तिमंत उदाहरण आहे. विजयजी आपले कौतुक करावे तितुके थोडे आहे. धन्यवाद चिरनेर गावाची इत्थंभूत माहिती करून दिल्याबद्दल.
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद! 🙏
Delete