आणि बरंच काही- जागतिक परिचारिका दिवस
जागतिक परिचारिका दिवस
सकाळी सातची वेळ, बायकोला ज्या नर्सिंग होममध्ये भरती केले होते तिथून फोन आला, “कळा सुरू झाल्या आहेत, तुम्ही या." मी आणि आई तसेच घाईगडबडीत पंधरा-वीस मिनिटात तिथे पोचलो. सकाळची वेळ असल्याने चिडीचूप शांतता. बायकोच्या खोलीत गेलो तर ती तिथे नव्हती. स्वागतकक्षातही कोणी नव्हते. थोडावेळ तिथेच उभे राहिलो. तेवढ्यात ओटीमधून एक परिचारिका बाळाला घेऊन बाहेर आली.
कळा सुरू झाल्या तेव्हा वाटले होते नऊ दहा वाजेपर्यंत प्रसुती होईल. तोपर्यंत डॉक्टरही पोचतील. पण बाळाला एवढी घाई की आम्ही तिथे पोचेपर्यंत हातात स्वारी.
ती पंधरा-वीस मिनिटे खूप महत्वाची होती, एवढ्या सकाळी प्रसुती होईल असे कोणाच्याही ध्यानीमनी नव्हते. नर्सिंग होममध्ये दोन परिचारिका होत्या. त्यांनी डॉक्टरांना लगेच कळवले, पण ते येईपर्यंत तासभर तरी लागणार होता. त्या आपत्कालीन परिस्थितीत त्या परिचारिकांनी धीर न सोडता डॉक्टरांच्या अनुपस्थित अतिशय सहज आणि सुलभतेने ती प्रसुती पार पाडली. ज्या परिचारिकेने यात मुख्य भूमिका बजावली होती ती वयाने लहान पण अनुभवाने खूपच मोठी होती. पुढे कित्येक दिवस बायको तिचं कौतुक करताना थकत नव्हती.
आज जागतिक परिचारिका दिवस, त्यानिमित्ताने ही आठवण ताजी झाली. खरंच रुग्ण आणि डॉक्टर यांच्या नात्यापेक्षा रुग्ण आणि परिचारिका यांचे नाते वेगळे असते. डॉक्टर डोक्याने काम करतात पण परिचारिका हृदयाने काम करते. परिचारिका जन्माला यावी लागते.
अशीच एक परिचारिका १२ में १८२० रोजी जन्माला आली. फ्लॉरेन्स नायटिंगेल. मानवसेवेची पहिल्यापासूनच आवड असणारी ही स्त्री १८५३ ते १८५६ च्या दरम्यान चाललेल्या क्रायमियन युध्दाच्यावेळी उजेडात आली. युध्दात जखमी झालेल्या सैनिकांची त्यांनी मनोभावे सेवा केली. त्या केवळ एक परिचारिका नाही तर उत्तम लेखक आणि संख्याशास्त्रज्ञही होत्या. त्यांनी परिचर्या या शब्दाला एक वेगळा आयाम दिला, नवी दिशा दिली. आपल्या संख्याशास्त्र ज्ञानाचा उपयोग परिचारिका सेवेत केला. सर्व जीवन रुग्णसेवेला अर्पण करणार्या या स्त्रीने आधुनिक शुश्रुषापध्दती विकसित केल्या. लंडनमध्ये त्यांनी केलेल्या रुग्णसेवेमुळे सैनिकांचा मृत्युदर ६९ वरून १८ टक्क्यांवर आला. आपल्या संख्याशास्त्र ज्ञानाचा परिचर्येत केलेल्या उपयोगाचा हा परिणाम होता. रात्र रात्र जागून हातात दिवा घेऊन त्या रुग्णसेवा करीत असत. त्यांच्या या महान कार्यामुळे आणि त्यांनी परिचर्या शाखेला दाखवलेल्या नव्या दिशेमुळे रेडक्रॉसचे संस्थापक हेन्री ड्युनंट यांनी त्यांना ‘लेडी विथ द लॅम्प' या शब्दात गौरविले. अशा या जन्माने परिचारिका असणार्या फ्लॉरेन्स नायटिंगेल यांच्या जन्मदिनी international council of nurses (ICN) १९६५ सालापासून जगभर १२ मे हा दिवस परिचारिकांनी केलेल्या रुग्णसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘परिचारिका दिन' साजरा करते.
आम्ही ज्याला देव म्हणतो तो प्रत्यक्ष या परिचारिकांच्या रूपाने आज या कोरोनाकाळात आपलं अस्तित्व दाखवतो आहे. प्रत्येक संस्थेचा भार हा त्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या महत्वाच्या खांबावर टिकून असतो. आज वैद्यकीय संस्थेवर खूप मोठा भार आला आहे. इतका कि ती कोलमडून जातेय की काय असे वाटावे इतकी गंभीर परिस्थिती आहे. पण आजतागायत या संस्थेच्या प्रत्येक खांबाने आपली कामगिरी चोख बजावली आहे. डॉक्टरांचे योगदान शब्दातीत आहेच पण पण किंबहुना अधिक ताण अर्थातच परिचारिकांवर आला आहे. आणि तो त्या समर्थपणे तोलून धरत आहेत.
कुठे त्यांच्यासाठी असणार्या सुविधांची वानवा आहे तर कुठे घरदार सोडून आल्यानंतरचं आलेलं त्यांचं एकाकीपण आहे. तरीही आपल्या इच्छा आकांक्षा कडीकुलपात बंद करून या परिचारिका आज हसतखेळत आलेल्या परिस्थितीला सामोर्या जात आहेत. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
हा छोटासा पुष्पगुच्छ खास त्यांच्यासाठी.
_विजय सावंत
१२/०५/२०२१



सुंदर, ओघवती शैली , सोप्या शब्दांतील स्वानुभवात वाहून गेलो.👌🏻
ReplyDeleteअसेच लिहिते रहा !💐