कविता- सोबतीण
सोबतीण
बघ आजही वाटते मला
कालचीच ही ओळख आहे
दोन दशकांची तुझी माझी
हवीहवीशी ही सोबत आहे
सुखदुःखाच्या धाग्यांनी जणू
तू विणलेली ही शाल आहे
किती उन्हाळे गेले पावसाळे
शाबूत अजुनि ही ढाल आहे
आठवतो त्या पहिल्या भेटी
सुखद क्षणांची गर्दी आहे
प्रिये तू तशीच अजूनही
हृदय आजही दर्दी आहे
साथ ही तुझी अशीच राहो
हेच मागणे मागत आहे
अजूनही खूप जगायचे
मला तुझ्या सोबत आहे
_विजय सावंत
०२/०५/२०२१



Comments
Post a Comment