कवडसा- आडवाटेवरचा खजिना- ७, कर्पूरवापी, रामटेक,
आडवाटेवरचा खजिना - ७
कर्पूरवापी/ कर्पूरबावली, रामटेक
नागपूर
सकाळी रामटेक बस स्थानकात उतरून ऑटोरिक्षात बसलो तेव्हा तो रिक्षावाला म्हणाला होता “साब! रामटेक गडमंदिर, अंबाला तलाव और जैन मंदिर घुमाके वापस स्टँडपे छोड दूंगा, चारसौ रुपया लूंगा!" मी त्याला तीस रुपए ठरवून गडाच्या पायथ्याशी सोडायला सांगितले. एका अर्थी ते बरेच झाले कारण ऑटोवाल्याबरोबर गेलो असतो तर तेवढ्यावरच समाधान मानावे लागले असते आणि हा अप्रतिम खजिना पाहता आला नसता.
दुपारी दोन वाजता मी श्रीराम गडमंदिर आणि रामटेक परिसर फिरून पुढे जाण्यासाठी मोकळा झालो होतो. दक्षिण पूर्वेकडून गडावर आलेला रस्ता त्रिविक्रम मंदिराच्या समोरून खाली उत्तरेला जैन मंदिराकडे उतरतो. ते दोन किलोमीटरचे अंतर मी चालतच पार केले.
दिगंबर जैन मंदिर हा रामगिरीच्या पायथ्याशी असलेला अठराव्या शतकातील रघुजी भोसलेकालीन जैन मंदिरांचा समूह आहे. खूप सुंदर बारीक कलाकुसर असलेली शिखरं हे त्यांचं वैशिष्ट्य. फोटो काढण्यास मनाई असल्यामुळे सादर न करता येणारा पण रामटेकला आल्यास आवर्जून पाहावा असा हा आणखी एक खजिना.
जैन मंदिराच्या आवाराबाहेर एका साध्याशा खानावळीत रुचकर जेवण उरकून मी कर्पूर बावलीकडे निघालो. त्रिविक्रम मंदिराच्या बाहेर असलेल्या तिथल्या सुरक्षारक्षकाने बोलताना कर्पूरबावलीचा उल्लेख केला होता.
एका मावशीकडून रस्त्याची खात्री केली आणि विचारले “क्या है उधर?" “
“कुछ नही, बस पत्थर के उपर पत्थर रखें हुएँ हैं।"
दक्षिण भारतात दगडांचं वैशिष्ट्य असलेलं एक गाव आहे, तसंच काहीतरी हे असावं असं चित्र डोळ्यासमोर उभं करून मी तिथे जायला निघालो. एक किलोमीटर चालल्यावर मावशीने सांगितलेल्या खुणेला उजवीकडे वळलो. कच्च्या तांबड्या मातीच्या, गाडी जाईल अशा, दोन्ही बाजूला गर्द झाडी असलेलेल्या, आत जंगलात शिरणार्या निर्जन रस्त्याने मी त्या इच्छीत स्थळी पोहचलो.
खजिना समोर उभा होता पण मी आडवा झालो. डोळ्यासमोर उभं केलेलं चित्र खेत की मूली होतं, खजिना २४ कॅरट सोनं होतं.
पहिली नजर स्तंभीत मी
स्तंभ उभे विस्मीत मी
मोडकी दगडी शिखरे तीन
पाचूसह मिरवी पाषाणविण
पहिल्या नजरेतच मी जागच्या जागी खिळून राहिलो. ‘दगडावर दगड रचलेले' ते वास्तूकलेचा एक अद्भुत नमूना असलेले हेमाडपंथी शैलीतील मंदिर होते. रामगिरीच्या पायथ्याशी गर्द हिरवाईत पाषाणशिल्पात हिरव्या पाचूचं कोंदण अर्थात ही कर्पूरवापी. काळौघात मोडकळीस आलेलं जीर्ण सौंदर्य.
रामटेकच्या लक्ष्मणस्वामी मंदिरात कोरलेल्या शिलालेखात उल्लेख असलेली आणि महानुभाव पंथाच्या स्थानपोथीत स्थान असलेली ही कर्पूरवापी अगदीच दुर्लक्षित आहे. त्या दिवशी रामटेकला श्रीरामाच्या दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांपैकी या आडवाटेवर येणारा मी एकटाच.
थोडासा नॉर्मल झाल्यावर मी पायातले बूट काढायला खाली बसलो. बाजूला झेंडूची काही रोपटी होती. झेंडूच्या फुलावर एक फुलपाखरू येऊन बसले. मी फोटो काढायला कॅमेरा सरसावला. माझी चाहूल लागून उडून दूर जायच्या आधी म्हटलं काही फोटो घेईन. छ्या! मी अर्ध्या फुटावर तरी हे जागचं हलायला तयार नाही. मी त्याला म्हटलं “हे बघ फुलूपाखरा! मी काही प्रोफेशनल फोटोग्राफर नाही, पण तुझे चांगले फोटो आले तर एखाद्या मासिकात छापून आणायचा प्रयत्न करेन, श्रीकांत सर काही नाही म्हणणार नाहीत!" तेवढ्यात आणखी एक मनकवडे फुलपाखरू त्याच्या बाजूला येऊन बसले. त्यांचे मनसोक्त फोटो काढून मी कर्पूरबावलीत प्रवेश केला.
मी त्या पाषाणशिल्पाला कॅमेऱ्यात उतरवत होतो. त्या दगडी सौंदर्याचा मला एकही कोपरा सोडायचा नव्हता. संपूर्ण वास्तूला चार चकरा मारल्यावर आणि माझा त्या वास्तूतला रस बघितल्यावर तिथे जवळच वास्तव्यास असणारे बाबा मला अधिक माहिती पुरवायला आले, “पानी के नीचेभी एक मंजिल है, पानी भरा होनेंसे दिखाई नहीं दे रही है, दक्षिण मंडपके दीवारसे एक सुरंग जमिनके नीचे जाती है, जमिनके नीचे कुछ पचासएक कमरे है। सुरंग फिलहाल पत्थरोसे बंद करवा दीं गईं हैं। इसके दीवारोंके कुछ पत्थरोपर निशान बनवाएं गये है, उसका मतलब समझ में नहीं आ रहा है। " त्यांनी सांगितले नसते तर इतक्या बारकाईने मी लक्ष दिले नसते. भिंतींवरच्या काही ठराविक दगडांवर विंचू, साप, बाण, गोल चिन्ह व इतर चिन्हे कोरलेली आहेत. ही चिन्हे आधीपासून होती की नंतरच्या काळात कोणी कोरली हे कळणे कठीण आहे. बाकीची माहिती खरी की खोटी हे पुरातत्त्व खात्याच्या संशोधनानंतरच कळू शकेल. या सुंदर वास्तूतल्या मूर्त्याही तितक्याच सुंदर होत्या असणार...! पण दुर्दैवाने पाचही देवकुलीकांमधल्या मूर्त्या गायब आहेत.
कर्पूरवापी या नावाने ओळखल्या जाणार्या पायविहिरीचा उल्लेख रामटेकवरील लक्ष्मणस्वामी मंदिरातील यादवकालीन शिलालेखात आहे. या परिसरात काही यादवकालीन मंदिरे होती असे येथील उपलब्ध अवशेषांकडे पाहून वाटते. यापैकी हे देऊळ ढासळलेल्या स्थितीत उभे असून या देवळात पाच देवकुलीका( छोटी छोटी स्वतंत्र मंदिरे) आहेत. पूर्वेकडे असलेल्या दोनपैकी एक देवकुलीका पूर्णपणे जमिनदोस्त झाली आहे तर दुसरी कशीबशी तग धरून आहे. बारवेच्या पश्चिमेकडच्या तीन्ही देववकुलीकांचा दर्शनी भाग ढासळलेला आहे, खाली जमिनीवर त्यांचे अवशेष इतस्ततः विखुरलेले आहेत. या सर्वांवर लहान शिखरे असून त्यांच्यासमोर आयताकार दगडी मंडप स्तंभांच्यावर उभा आहे. काही स्तंभ कललेले आहेत. या मंदिराच्या समोर बारवेची निर्मिती करण्यात आली. मंदिराचा आयताकार मुखमंडप जलाशयाच्या सभोवती असलेल्या मंडपासारखाच असून तो ढासळलेल्या स्थितीत उभा आहे. पुरातत्त्व खात्याचे अभियंते सर्वे करून गेलेले आहेत. ही बावडी आणि देवकुलीका पुन्हा मूळ रूपात उभ्या करण्याचा त्यांचा मानस आहे. सध्या मनसर येथे उत्खननात सापडलेल्या नवीन अवशेषांवर संशोधन सुरु आहे, त्यामुळे या कर्पूर बावलीच्या डागडूजीकडे लक्ष द्यायला वेळ लागतो आहे. येत्या काही वर्षांत ही वास्तू पुन्हा दिमाखाने पूर्वावस्थेत उभी राहील अशी आशा आहे. हे एक मोठं आव्हान पुरातत्व खात्याच्या अभियंत्यांसमोर आहे.
खरं तर त्या परिसरातून पाय निघत नव्हता. त्या बाबांना म्हणालो “ यहांँ एक रात गुजारने को मन कर रहा है!"
“ रहो, कल सुबह निकल जाओ!" बाबा म्हणाले.
पण ते शक्य नव्हतं. आठ वाजेपर्यंत नागपूरला पोचणं भाग होतं.
कर्पूरवापी बघून झाली होती, “स्टँडवर जाण्यासाठी काही सोय होईल का?" असे विचारल्यावर “आम्हीही तिकडेच जाणार आहोत, सोडतो तुम्हाला, आमची ड्यूटी संपेल थोड्या वेळाने, थोडसं थांबा." तिथला त्या वास्तूची देखरेख ठेवणारा कर्मचारी म्हणाला.
त्यांची ड्यूटीची वेळ संपेपर्यंत मी आणखी काही कॅमेर्याने टिपता येईल का पाहू लागलो, एका दगडाकडे लक्ष गेले. एक सरडा त्या दगडावर दिसला. फुलपाखरांसारखा तोही निडर, चार इंचावरून फोटो काढले तरी हलायला तयार नाही, उलट शेपूट हवेत गोल फिरवून दाखवतो... होता तर गवारीच्या शेंगेएवढा! छान फोटो आले सगळ्यांचे पण पोषक वातावरण असूनही केकारव काही कानावर आली नाही.
त्यांची ड्यूटीची वेळ संपताच आम्ही बाईकवरून निघालो, डांबरी रस्त्यापाशी आलो. रस्त्याच्या पलिकडे ‘जमिन विकणे आहे' असा बोर्ड होता. बाबा म्हणाले “खरीद लो ये जमीन!" मला तो परिसर खूप आवडला होता हे त्यांच्या लक्षात आले होते.
मुंबईवाले म्हणजे पैसेवाले हा अखिल भारतीय गैरसमज इथेही पाहायला मिळाला.
मला तर नको होती पण डोंगरउतार... खाली गर्द झाडी... छोटसं तळं... आणि पुढे सुरू होणारं शेत. प्लॉट तर मोक्याचा होता. पण अडचण ही की आमच्या सहयाद्रीतल्या पाहुण्यांना(मोर) कळवायचं कसं? असो.
महाराष्ट्राचा ज्ञात इतिहास सातवाहनांपर्यंत घेऊन जाणारे रामटेक, आयुष्यातला एक समृद्ध अनुभव ठरला. रामटेक फिरण्यासाठी एक उजेडी दिवस पुरेसा नव्हता. मनसर, नगरधनचा किल्ला, अंबाला तलाव, इतर मंदिरे, स्मारके यांची आस बाकी ठेऊन मी रामटेकचा निरोप घेतला.
येईन पुन्हा...!
_विजय सावंत
स्थळभेट - १६/०१/२०२०
चित्रफीत /फोटो - विजय सावंत
#karpurvapi #karpurvapiramtek # ramtek #VijaySawant #kathakavitakavadasa
















💯💯
ReplyDeleteधन्यवाद!
DeleteWow, what a great place. Quiet and relaxing looks. Very Nice.
ReplyDeleteThanks for sharing.
Sandeep Mulay.
विजयसर,
ReplyDeleteछान ओघवते वर्णन. फोटोंमुळे अधिक माहिती मिळाली.
आपण दुर्लक्षित आणि नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या ठेव्याचे दस्तावेजीकरण स्वखर्चाने करताय हे कौतुकास्पद आहे . तुमचे हे कार्य भविष्यात फार मोलाचे ठरेल ह्यात शंका नाही. पुस्तकरूपाने प्रकाशित केल्यास जतन होईल. आपल्याला खुप खुप शुभेच्छा ! 💐
- धनंजय शिर्के.
धन्यवाद जय!
Delete