आडवाटेवरचा खजिना- ८, गणपती पंचायतन मंदिर, तासगाव, सांगली
आडवाटेवरचा खजिना -८
श्री गणपती पंचायतन देवस्थान, तासगाव
जिल्हा - सांगली
कवठे महांकाळ - कराड रस्त्यावरील तासगावी, आडवाटेवरचा हा खजिना मला इतक्या सुंदर रूपात दिसेल असे अजिबात वाटले नव्हते.
तासगावचे श्री गणपती पंचायतन मंदिर, पेशवेकालीन मराठा स्थापत्यकलेत दाक्षिणी आणि राजस्थानी कलेचा सुंदर मिलाफ असलेले देखणे गणेश मंदिर.
थोडंसं जाणून घेऊया मंदिराविषयी! असं म्हणतात, गणपतीपुळेच्या मंदिराचे पुजारी पटवर्धन कुटुंबाचे मूळ पुरुष हरभट बाबा दृष्टांतानुसार कोकण प्रांत सोडून देशावर आले. इचलकरंजीच्या घोरपडे सरदारांकरवी मुलांना पेशवे दरबारी नोकरीत रूजू केले.
हरभट बाबांचे नातू भाऊसाहेब रामचंद्र पटवर्धन; १७५५ ते १७९९ या काळात सुमारे शंभर लढाया लढलेला निष्णांत लढवय्या... ब्रिटिश सेनापती लॉर्ड वेल्स यांनी गौरोवोद्गार काढलेला योद्धा. आपल्या राजनिष्ठेने आणि पराक्रमाने पेशव्यांचे सरसेनापती झाले. त्यांच्या जास्तीत जास्त मोहिमा या दक्षिणेकडच्या; मुख्य शत्रू टिपू सुलतान. दक्षिणेच्या मोहिमांवर असताना भाऊंच्या नजरेत भरली ती तिथली गोपूरी शैलीतली हिंदू मंदिरं. १७६७ साली भाऊंची तासगावी नेमणूक करण्यात आली. इथूनच कुठेतरी तासगाव संस्थानाची मुहुर्तमेढ रोवली गेली असावी. १७७१ ला भाऊ तासगावला स्थायिक झाले.
भाऊंची गणपतीपुळेच्या श्री गणेशावर मोठी श्रद्धा. त्याच्या दर्शनासाठी ते अधूनमधून गणपतीपुळेला जात असत. गणपतीपुळेच्या गणपतीचे भक्त असलेल्या भाऊंना तासगावात गणपती मंदिर बांधण्यासाठी दृष्टांत मिळाला अशी मान्यता आहे. त्यातूनच १७७१ नंतर भाऊंनी गणपती मंदिर उभारणीस प्रारंभ केला. त्यासाठी कर्नाटकातील महादेव शेट्टी या नावाजलेल्या गवंड्यास पाचारण करण्यात आले. तसेच राजस्थानी कारागिर तासगावात दाखल झाले. १७७९ साली मंदिर बांधून पूर्ण झाले आणि श्री गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. त्याच वर्षापासून आजतागायत, आपली परंपरा टिकवून महाराष्ट्रातला टिळकांनी १८९३ साली सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरवात करायच्या आधीचा, सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे इथला महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, कर्नाटकात सुप्रसिद्ध असलेला रथोत्सव.
तासगावातील श्री गणपती पंचायतन मंदिर हे एक भव्य दिव्य, प्रशस्त, काळ्या दगडातले खुलून आलेले सौंदर्य! चारही बाजूंनी तटबंदी, पूर्वेला प्रवेशद्वार आणि नगारखाना...त्याच्या बाजूला पाच मजली व तीस फूट उंच श्रींच्या रथासाठी रथगृह...नगारखाना व गोपूरीच्यामध्ये प्रशस्त पटांगण... ९६ फूट उंच सात मजली देखणं गोपूर... दोन बाजूंना उंच काळ्याकभिन्न दगडी दीपमाळा... मुख्य मंडपात आग्नेयेस महादेव, इशान्येस विष्णू, वायव्येस उमादेवी, नैऋत्येस सूर्य, आणि मध्यभागी तांबूस गारेची श्री गणपतीची मूर्ती असलेलं; मराठा, दाक्षिणात्य व राजस्थानी स्थापत्य शैलीचा अद्वितीय मिलाफ असलेलं हे महाराष्ट्रातील एकमेवाद्वितीय गोपुरी श्री गणपती पंचायतन मंदिर म्हणजे भाऊसाहेब पटवर्धन यांचे सुंदर स्वप्न आहे.
दर संकष्टी, विनायकी चतुर्थी, वर्धापनदिन व भाद्रपदात पालखीतून छबिना निघतो. भाद्रपदात ऋषीपंचमीच्या दिवशी भव्य रथोत्सव लाखो भाविकांच्या साक्षीने साजरा केला जातो. या रथामध्ये श्रींची १२१ किलो वजनाची पंचधातूची उत्सवमूर्ती विराजमान होते. दुपारी रथोत्सवास सुरवात होते. गुलाल, पेढ्यांची उधळण होते. समोर अर्धा किलोमीटरवर असलेल्या काशी विश्वेश्वरापर्यंत हा भव्य रथ दोरखंडाच्या सहाय्याने ओढला जातो. सोबतीला असतात हत्ती, घोडे, लाखो भाविक आणि तासगावी आलेलं आनंदाचं, श्रध्देचं, भावनेचं उधाण...!!
...आणि गुंजतात आसमंतात परशुराम भाऊंच्या मंदिराच्या पोवाड्यातले चांद सुलेमान शाहीर यांचे शब्द...!
"मिरज प्रांत कसबे तासगावची हवा पहावा गणपतीचेसंस्थान मला कुठे कुठे दावा"
_विजय सावंत
स्थळभेट - १४/१२/१९
चित्रफित आणि फोटो - विजय सावंत
तीस फूट उंचीचा भव्य रथ




👌🏻👌🏻🙏
ReplyDeleteधन्यवाद!
Delete👌👌
ReplyDeleteधन्यवाद!
Delete👌👌
ReplyDeleteधन्यवाद!
Delete👌👌
ReplyDeleteधन्यवाद!
Delete🙏🏻🙏🏻👌
ReplyDeleteमस्त आहे
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏
Deleteव्वा ! एक नवा खजिना उजेडात आणल्याबद्दल. मीही तासगावी एक रात्र मुक्कामास होतो. पण, आस्मादिकांना तुम्हांसारखी दृष्टी नाही नां ! पुढच्या खेपेस आवर्जून दर्शन घेईन. कथन केलेल्या इतिहासाने त्या काळात नेले. स्थापत्य शैली सहजतेने समजावून सांगत असतांनाच प्रकाशचित्रांनी मंदिर मुर्तिमंत उभे केले. धन्यवाद विनय सावंतसर. ⚘🙏
ReplyDeleteनेहमीप्रमाणे सुंदर आणि पाठ थोपटणारी प्रतिक्रिया! मनःपूर्वक धन्यवाद जय!🙏
Deleteखुप छान बाप्पाचे आणि देवळाचे दर्शन घडले. असे वाटते की आपण खरोखरच देवळात आहोत. Keep it up 🙏👌🌹🌹🌹🌹🌹
ReplyDeleteमाघी गणेश जयंतीच्या दिवशी बाप्पाच्या दर्शनाची सफर घरबसल्या व्हावी इतके अप्रतिम लेखन!.. दिपमाळे च्या भव्यतेने डोळे दिपले. चित्रफितीने खूप आनंद व समाधान दिले. आपल्याकडून नेहमी असे लिखाण होऊ दे अशी बाप्पाला प्रार्थना व आपल्याला शुभेच्छा!.. 😊👍
ReplyDelete🙏सुंदर
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏
Deleteविजयजी, आपले लिखाण इतके तजेलदार आहे कि, पुर्नवाचनही प्रसन्न करून गेले. Keep it up !
ReplyDeleteसुंदर 👌
ReplyDelete