कवडसा- आडवाटेवरचा खजिना-२, छोटे पैलवान, गोरांबे, कोल्हापूर

आडवाटेवरचा खजिना - २
छोटे पैलवान, गोरांबे, कोल्हापूर

          आडवाटेवरचा खजिना मला कधी कुठे आणि कुठल्या रूपात दिसेल काही सांगता येत नाही, आता हेच बघा ना...!

          मुधाळ तिठ्याचं काम संपवून मी कागलकडे निघालो होतो. पूर ओसरून काही दिवस झाले होते. कोल्हापूर चांगलच सावरलंय असं दिसलं, नदीकाठाच्या ऊसाला लागलेला चिखल पाणी कुठपर्यंत पोहचलं होते ते दर्शवत होता.


         मुधाळ तिठ्याहून कागलला जाताना वाघजाईचा छोटासा निसर्गरम्य घाट लागतो, घाटमाथ्यावर पोचताच उजवीकडे वाहनांच्या आणि डावीकडे माणसांच्या गर्दीने लक्ष वेधून घेतले. गाडी बाजूला लावली आणि चौकशी केली. कळलं वाघजाई देवीची आज जत्रा आहे, त्यामुळे गोरांबे आणि आजूबाजूच्या गावातले गावकरी देवीच्या दर्शनाला आले होते. त्यातच एका ठिकाणी एवढी गर्दी का झाली आहे याचं मला कुतूहल होतं. थोडं पुढे त्या गर्दीत मिसळून चौकशी केल्यावर कळलं आता थोड्याच वेळाने इथे कुस्तीचे सामने होणार आहेत.
         झालं...! कुस्तीचं नाव ऐकून माझ्यातला रसिक  जागा झाला. 
         इतकी वर्षे कोल्हापूरला येतोय पण कधी कोल्हापुरी कुस्ती पाहायचा योग आला नव्हता, तो या अश्या निसर्गरम्य माळरानावर आला. तीन बाजूंनी उतरतं असं ते नैसर्गिक स्टेडियम... आणि त्यात तो तांबड्या मातीचा तयार केलेला आखाडा लक्ष वेधून घेत होता. त्यानेच मला भुरळ घातली तिथे थांबायला.
        कदाचित माझं नशीब त्या दिवशी जोरावर असावं, मी तिथे पोचलो तेव्हा कुस्तीचे सामने सुरू व्हायला पाच दहा मिनिटे बाकी होती. त्यामुळे तो सोहळा मला पहिल्यापासून पाहाता आला.
         आयोजक आणि गावप्रमुख आखाड्यात आले, त्यांनी गावप्रथेप्रमाने पूजा केली. नुकत्याच येऊन गेलेल्या पूरामध्ये मरण पावलेल्यांना सगळ्यांनी उभे राहून श्रध्दांजली वाहिली.



         आता लहान गटाच्या कुस्त्यांची वेळ होती. मोठ्यांच्या कधीही पाहायला मिळतील पण या चिल्यापिल्यांच्या कुस्त्या पाहायला मिळणं...नशीब लागतं राव!
          वातावरण आल्हाददायक होतं...वर निरभ्र आकाश... खाली हिरव्या माळरानावर लाल मातीत खुलून आलेला आखाडा... त्याच्या चारही बाजूंनी गावकऱ्यांनी केलेली गर्दी...लहान मुलांच्या कुस्त्या बघायला गोरांबे आणि आजूबाजूच्या गावातले गावकरी आवर्जून आले होते. वातावरणात उल्हास उत्साह होता. हे छोटे पैलवान, कुणी आपल्या वडिल किंवा काकांबरोबर आले होते तर कुणी गटाने तालीम चालवणार्या आपल्या उस्तादांबरोबर. आता सगळ्या पिल्लांनी आपल्या अंगावरचे कपडे काढले होते. मघाशी तालमीच्या निळ्या युनिफॉर्ममध्ये दिसलेेले  आता लाल लंगोटावर दिसत होते. त्या छोट्या छोट्या पिल्लांच्या इवल्याश्या कुल्यावरचा लाल लंगोट वातावरणात जान ओतत होता.



         
        कुस्त्या पाहायला जमलेले सगळेच अधीर झाले होते. पंचांनी शिटी वाजवली. कुस्ती खेळणारी मुले आखाड्यात उतरली. मुलं खूप असल्यामुळे आखाड्यात एकाचवेळी दोन दोन तीन तीन कुस्त्या सुरू झाल्या. मी कॅमेरा सरसावला... मुलांना शिकविलेले सगळे डावपेच, नियम, धोबीपछाड प्रत्यक्षात येत होते.एका धोबीपछाडच्या वेळी माझ्या तोंडून ‘क्या बात!' निघून गेलं. पुढील अर्धा तास मी त्या उत्सवाचा एक भाग होऊन गेलो. कोल्हापूर आणि कुस्ती एकमेकांत इतके मिसळून गेले आहेत की एकाला त्यातून वेगळं काढणं शक्य नाही, तो माहौल पाहिल्यावर वाटलं हे छोटे उस्ताद तो वारसा पुढे चालवायला सक्षम आहेत.

















        बर्यापैकी कुस्त्या झाल्या होत्या. डोळ्यांचं पारणं फिटलं होतं. मुंबईच्या माणसाला कोल्हापूरच्या एका माळरानावर लहानग्यांच्या कुस्त्या पाहण्याचं भाग्य लाभलं होतं.
        कोल्हापूरकर तसा रांगडा गडी, संकटांना घाबरून न जाणारा, नुकतच जे काही संकट त्याच्यावर ओढवलयं, गडी बाहेर पडतोय त्यातून. झालं ते दु:खद होतच आणि आपण सगळेच त्यांच्या दु:खात सामील होतो, जे काही झाले त्यातून शिक घेऊन पुढे निघायचं.
 
महालक्ष्मीचा आशिर्वाद लाभलाय तो कोल्हापूरकर
ए भावा म्हणून हाक मारतो तो कोल्हापूरकर
तांबड्या पांढरयाचा आस्वाद देणारा म्हणजे कोल्हापूरकर
आणि
कुस्ती ज्याच्या नसानसात भिनलीय तो  म्हणजे कोल्हापूरकर

          काल तांबड्या चिखलात माखलेलं कोल्हापूर आज तांबड्या मातीत रंगलं होतं. 

_विजय सावंत
२०/०८/२०१९


Comments

  1. बहारदार निवेदन आणि छोट्या बहाद्दरांची एक्सप्रेशन्स तर, लय भारी 👌🏻
    गड्या चितपट लेख लिहिलायस.
    मंजे लयच भारी !
    तोडलंस मित्रा, तोडलंस !!
    Keep it up !!!🙏

    ReplyDelete
    Replies
    1. काय सुंदर कमेंट आहे! मनःपूर्वक धन्यवाद! 🙏

      Delete
  2. एखादी चित्र गोष्ट असते ना तशी छायाचित्र गोष्ट म्हणता येईल अशी लेखन आणि छायाचित्रांची सांगड!
    कोल्हापूरकरांची समर्पक व्याख्या आणि तांबड्यापांढऱ्या रश्शाचे
    तोंडाला पाणी सुटणारे वर्णन!.. 😊

    ReplyDelete
    Replies
    1. आणखी एक सुंदर कमेंट, क्या बात!
      मनःपूर्वक धन्यवाद!

      Delete
    2. सुंदर पोस्ट काय सुरेख लेखन आहे
      लय भारी भावा

      Delete
  3. पुन: आनंदाचं प्रत्यय !👌🏻🌷

    ReplyDelete

Post a Comment