कवडसा- आडवाटेवरचा खजिना- ३, कर्णेश्वर मंदिर
आडवाटेवरचा खजिना- ३
श्री कर्णेश्वर मंदिर
कसबा
तालुका- संगमेश्वर, जिल्हा- रत्नागिरी
जवळचे रेल्वे स्थानक- संगमेश्वर रोड
हेदली, संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेले निसर्गरम्य गाव. इथल्या खानविलकर कुटुंबियांपैकी एक असलेले माझे मित्र राज यांच्याबरोबर या निसर्गरम्य गावी जाण्याचा योग आला. रात्री गप्पा चालल्या असताना मित्राचा पुतण्याही तिथे होता. दुसर्या वर्षाला आहे. विषय इतिहास. गावाबद्दलची माहिती सांगू लागला. छत्रपती संभाजी राजेंना शेवटचे जिथे कैद केले गेले ते कसबा... पांडवकालीन हेमाडपंथी कर्णेश्वर मंदिर... श्रृंगारपूर (सुर्वेंची जागीर)..., आणि वरच्या बाजूला चांदोलीत असणारा प्रचितगड. आता वापरात नसलेला जुन्या काळातला रत्नागिरी - मिरज तेव्हाचा वापरातला पायघाट इथूनच जातो. चांदोली अभयारण्यामुळे घाटमार्गे प्रचितगडावर येण्यास बंदी आहे. त्यामुळे प्रचितगडावर श्रुंगारपूरमार्गेच जाता येते. हे सगळं हेदलीच्या आजूबाजूलाच आहे असे सांगितल्यावर माझी उत्सुकता चाळवली गेली. प्रचितगड हा वनकिल्ल्यात मोडत असल्यामुळे तिथे तयारीनेच जाणे योग्य. पुढल्या वेळी वेळेचे गणित जुळवून श्रृंगारपूर आणि प्रचितगड करावा असे ठरवले. श्रृंगारपूर आणि प्रचितगडावर खूप सारी माहिती नेटवर उपलब्ध आहे.
आधीही मित्राच्या गावी आलो होतो पण या गोष्टींचा उल्लेख झाला नव्हता. कसब्यामध्ये हेमाडपंथी मंदिर आहे हे ऐकून मी खुश झालो. वाटेत असणारे व संभाजी राजेंच्या पदस्पर्शाने पुनित झालेले कसबा आणि कर्णेश्वर मंदिर सकाळी लवकर उठून बघायचे ठरवले.
दुसऱ्या दिवशी लवकर उठून हेदली गावाचा छोटासा फेरफटका मारला. निसर्गाच्या, सहयाद्रिच्या कुशीतलं हे गाव, बाजूने खोल वाहाणारी नदी, डोहामध्ये पाणी राखून असलेली. डोंगरउतारावर वसंतात बहरलेली पांगारा, पळस, गुलमोहर, लक्ष वेधून घेणारी. हेदलीचे ते क्षण जमतील तसे कॅमेर्यात साठवून ठेवले.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या आधीचा दिवस होता. पुतण्या अथर्वला सकाळी लवकर त्यासंबंधीत काही कामानिमित्त(volunteer) रत्नागिरीला जायचे होते. दोघेही निघालो. कर्णेश्वर मंदिराच्या आवाराजवळ गाडी पार्क करून मंदिर परिसरात प्रवेश केला.
अप्रतिम दगडी सौंदर्य! आजकालच्या नेटकरांच्या भाषेत बोलायचे झाले तर, Wow! नजरेला काहीतरी खास दिसल्यावर जसे डोळे विस्फारतात तसेच काहीसे. मी हेमाडपंथी मंदिरांचा चाहाता आहे. खूप दिवसांनी हेमाडपंथी मंदिराचे दर्शन झाले होते. त्या मंदिरांवरची कलाकुसर, काळ्याकभिन्न दगडातले खुलून आलेले सौंदर्य, त्यांचा सुबकपणा, सारेच मनाला भुरळ घालणारे असते. म्हणूनच महाराष्ट्रभर फिरत असताना ‘इथे कुठे ते हेमाडपंथी मंदिर आहे का?' असे स्थानिकांना हमखास विचारतो.
आजूबाजूचे गाव सोडून किती जणांना हे मंदिर माहिती असेल कुणास ठाऊक? नेटवर खूप माहिती उपलब्ध आहे. पण जोपर्यंत एखाद्या वास्तूशी प्रत्यक्ष संबंध येत नाही तोपर्यंत आपण तिकडे बघत नाही. कोकणातला असूनही हे मंदिर माहीत नव्हते. मुद्दाम आडवाट करून बघण्यासारखे आहे हे मंदिर.
गाभाऱ्यात गेलो, महादेवाचे दर्शन घेतले. गोल फिरून मंदिराचे दगड न्याहाळले. छतावरील, खांबांवरील काम पाहून तोंडात बोटे घातली. सुंदर कलाकुसर! प्रत्येक दगड तासीव, प्रत्येक मूर्ती सुबक, उठावदार कलाकुसर, अगदी डोळे भरून पाहावी अशी...! मंदिरात वयोवृध्द पुजारीकाका भेटले. त्यांनी एका दमात मंदिराची माहिती दिली. भीमाची बसण्याची जागा दाखवली. ‘पाडवांनी त्यावेळच्या एका रात्रीत (आजचे सहा महीने ) आपला मोठा भाऊ कर्ण याच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधलेले हे मंदिर', ही पुजारी काकांनी सांगितलेली माहिती प्रचलीत जरी असली तरी काही अभ्यासकांच्या मते हे मंदिर अकराव्या शतकातील असून चालुक्य कुळातील राजा कर्णदेव याने बांधले आहे.
“पुरातत्व खात्याचा अधिकारी इथे नाही का?" असे विचारल्यावर लवकरच तो नियुक्त होणार आहे असे कळले. हे मंदिर म्हणजे गतकाळाचा एक अमूल्य ठेवा आहे. तो अबाधित राहावा एवढीच इच्छा.
मंदिराच्या आवारात छोटेसे सूर्यमंदिर आहे. त्यातील डोक्यावर बारा राशी कोरलेली सूर्यदेवाची मूर्ती सुंदरच!
मंदिरापासून थोडसं पूर्व दिशेला खाली अलकनंदा वरुणा आणि शास्त्री नद्यांचा संगम जिथे होतो तिथे घाट बांधण्यात आला आहे. त्याला लागून महादेवाचे आणखी एक छोटेखानी मंदिर आहे.
ते पाहून झाल्यावर आम्ही संभाजी राजे कसब्यात आले की जिथे उतरायचे त्या सरदेसाईंच्या घराजवळ आलो.
इथे आल्यावर अथर्व म्हणाला “बाजूलाच वीरगळ आहे."
मी विचारले “काय आहे ते?"
“चला दाखवतो" असे म्हणत तो मला थोड पुढे घेऊन गेला.
तिथे गेल्यावर मला जे काही दिसले त्याने एकाच वेळी मन विषण्ण आणि आनंदीत झाले. आनंदीत एवढ्यासाठी की वास्तूशास्त्राचा आणखी एक उत्कृष्ठ नमुना माझ्या डोळ्यासमोर होता, विषण्ण एवढ्यासाठी की तो होता पालापाचोळ्यात... पतेर्यात... दुर्लक्षित. गतकाळातल्या या अमूल्य ठेव्याची ही हेळसांडा , इतकी उदासीनता पाहून मन विषण्ण झाले.
स्थापत्यशास्त्र आणि पाषाणसौंदर्य यांचा अप्रतिम मिलाफ असलेल्या तीन वास्तू तेथे खिन्नपणे मोडक्यातोडक्या अवस्थेत उभ्या आहेत. त्यांचे सौंदर्य शब्दांत मांडणे कमी पडावे असे... प्रत्यक्ष जाऊन पाहण्यासारखे.
हेमाडपंथी मंदिरे ही आतल्या बाजूला अवघड वाटेवर किंवा दुर्गम भागात असतात. तिथे पोचता येणे सर्वांनाच शक्य नसते. पण हा परिसर मुंबई गोवा महामार्गाला लागूनच आहे. मुंबईहून गोव्याला जाताना संगमेश्वर एस.टी. स्थानकाच्या आधी शास्त्री नदी ओलांडल्यावर एक रस्ता डावीकडे जातो, त्याच सस्त्यावर हा खजिना दडलेला आहे. जरासा आडवाटेवर. पण एकदा वाट वाकडी करून बघण्यासारखा.
_विजय सावंत
२१/०४/२०१९


आडवाटेने खजिना प्रकट केला.
ReplyDeleteकोकणात हेमाडपंती शैलीत उभारलेली मंदिरे फार कमी असावीत. Of course comparatively. त्यामुळे इतिहासकारांना आणि कोकणकरांसाठी कर्णेश्वर मंदिराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हेदली गावकर्यांनी शासन आणि पुरातत्व खात्यावर न विसंबता मंदिर समुहाचे जतन करावं. मंदिराचा महिमा वाढल्यावर गावाला येणारी समृद्धी हेदलीकरांच्या बरकतीचे कारण ठरेल. याचे अर्वाचीन उदाहरण म्हणजे बदलापूरचे शिव मंदिर.
अर्थात् यात विजय सावंत सरांचे योगदान खारीचे का असेना परंतु महत्त्वाचे असेल. ह्यात काय शंका !🙏
धन्यवाद जय!🙏🏻
Deleteहे खरे आहे की कोकणात हेमाडपंथी मंदिरे कमी आहेत. त्यामुळे हे मंदिर जेव्हा पाहिले त्यावेळी मी खरोखर अवाक् झालो.
वाहवा खूपच छान मंदिर गवसले आहे.
ReplyDeleteजेव्हा कधी जमेल तेव्हा हा खजिना प्रत्यक्ष पाहायला खूप आवडेल.
धन्यवाद विजय 🙏🙏
👍🏻
Deleteधन्यवाद मित्रा!🙏🏻