आणि बरंच काही- जैवविविधता दिवस

         जैवविविधता 

         ‘विश्व जैवविविधता दिवस', संयुक्त राष्ट्र संघाने १९९३ सालापासून हा दिवस जैवविविधतेचे महत्त्व सामान्य माणसापर्यंत पोहोचावे यासाठी पाळायचे ठरवले. माणसाची निसर्गातील लुडबूड, पर्यावरणाचा र्हास, हर प्रकारचे प्रदुषण, झपाट्याने नष्ट होणार्या पशूपक्षांच्या जाती, झाडे, सूक्ष्मजीव, किटक, तसेच खनिज संपत्तीसाठी ओरबाडली जात असलेली जंगले, डोंगर... ही काही कारणे आहेतच हा दिवस पाळण्यामागे. हा दिवस आहे जैवविविधता जाणून घेण्यासाठी, लोकांना आठवण करून देण्यासाठी की बाबांनो पुढच्या पिढीसाठी काहीतरी ठेवा. जैवविविधतेच्या र्हासात तुमचाच नाश आहे.
             पृथ्वीवर लाखो प्रजातीचे जीव व वनस्पती आहेत. सगळ्यांची विशेषता आणि निवास भिन्न आहेत, एकमेकांपासून कोसो खंडो दूर आहेत तरीही एका नैसर्गिक शृंखलेने सगळे एकमेकांशी बांधले गेलेले आहेत. जैवविविधतेने सर्वाधिक संपन्न जगातल्या बारा देशांमध्ये भारताचा समावेश आहे. जगातील माहिती असलेल्या ७.८% प्रजातींची नोंद आपल्याकडे आहे. भारतात २००२ साली वनसंवर्धनासाठी कायदा करण्यात आला. महाराष्ट्रात २००८ साली जैवविविधता नियम लागू करण्यात आले. जैवविविधतेची रेलचेल असलेला पश्चिम घाट युनेस्कोच्या वारसास्थळांमध्ये सामील झालेला आहे. सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर ज्यांनी भटकंती केली त्यांनी ही जैवविविधता खूप जवळून पाहिलेली आहे.

          दुर्दैवाने काही मुठभर स्वार्थी मनगटं या जैवविविधतेला नख लावत आहेत. पाणथळ जागा झपाट्याने कमी होत आहेत.  डोंगर पोखरले जात आहेत. सरकारने आखून दिलेल्या नियमांच्या पलिकडे जाऊन खनिज संपत्ती ओरबाडली जाते आहे.  अशावेळी ह्या जैवविविधतेला माणसापासून असलेला धोका माणसाच्या लक्षात आणून देण्यासाठी पाळण्यात येत असलेला आजचा हा दिवस ‘विश्व जैवविविधता दिवस.' जैवविविधतेतल्या घटकांची आर्त हाक जैवविविधतेचे तीनतेरा वाजवणार्यांच्या कानापर्यंत पोहचो आणि त्यांचं हृदयपरिवर्तन होवो ही सदिच्छा.

_
विजय सावंत
२२/०५/२०२०
फोटो- विजय सावंत

ता. क.
Theme- Biodiversity 2022
‘Building a shared future for all life'


                Image - Google

















Comments

  1. निसर्गाने फुकट दिलेले सांभाळले इतुकेही पुरे आहे.

    ReplyDelete

Post a Comment