कथा- नलिनी


नलिनी

          “गो नलग्या... ! शिरा पडली ती, वसाड पॉर... मालीकाकीच्या झाडाचो कडीपत्तो आनूक पाठवलंय तर थय खेळत बसलंस!" शारदाबाई करवादल्या तशी नलिनीला कडीपत्ता आणायची आठवण झाली.
            नलिनी, पांडूआबां आणि शारदाबाईंची एकुलती एक लेक. अल्लड अप्सरा. घरात जरासुद्धा थारा होत नाही. वाडीतली मुले शाळेतून आली की कुकारे घालायला सुरुवात करतात, पाटल्या दाराने नलिनी कधी पशार होते ते शारदाबाईंना कळतही नाही. लहान नाही, चांगली एकवीस वर्षांची झाली आहे परवाच्या चतुर्थीला. बी.ए. पास आहे पण अजूनही बालवाडीतल्या मुलांबरोबर खेळत असते. एका जागी थांबेल तर शपथ, सगळी वाडी  फिरून झाली की रान आहेच पालथं घालायला. इकडून तिकडे तिकडून इकडे, उडणारं फुलपाखरूच जणू. एखाद्या झाडावरच राहिली असती पण अंधाराची भीती आणि पंख नाहीत म्हणून संध्याकाळी घरी येते.
          आज रविवार. मिठबांकरीण सकाळीच ताजे बांगडे घेऊन दारात आली. लेकीला आवाडतात म्हणून आबांनी दोन वाटे घेतले. आईने कडीपत्ता आणायला सांगितला होता, ही कडीपत्ता आणायला बाहेर पडली. रविवार असल्यामुळे नानांच्या खळ्यात मुले लगोरी खेळत होती. त्यांना खेळताना बघून मागचं पुढचं सगळं विसरली नि त्यांच्याबरोबर खेळायला लागली. आईने हाक मारली तसं आठवलं. कडीपत्ता घेवून आली,“ काय गेे! किती आराडतंस, ह्यो घे तुझो कडीपत्तो!"

         “हात जोडलय गो तुज्यापुढा, आता लग्नाचा झालस, उद्या सासरी गेलस की असाच वागतलंस?" कडीपत्त्याची फोडणी देता देता शारदाबाई म्हणाल्या.

          “गे आये, ता लगनाबिगनाचा काय बोला नको हा!, जड झालंय तर सांग, बाईच्या कोंडीर जावन उडी घेतय!" लग्नाचा विषय काढला की नलिनीचा पारा चढायचा. आपले लाडाचे आईबाबा, ज्या घरात रांगत रांगत मोठे झालो ते घर, वाडीतली मुलांची गँग, तो आंब्याखालचा बांधावरचा कट्टा, ते खळं, तो झोपाळा, ती पाटल्या दारासमोरची परसबाग, नदीवरील मौज, गौरी गणपतीच्या सणातली धमाल... हे सगळं एका रात्रीत सोडून दुसरीकडे जायचं म्हणजे मुलींवर केलेला अन्याय आहे असं तिला वाटायचं.

            “आपला वय काय... त्या नकावड्या पोरांबरोबर खेळतस काय... काय म्हनतील लोकां ...?" चटणीत बांगडे सोडता सोडता शारदाबाई म्हणाल्या.

“मी काय लोकांचा खातय?" नलिनी उत्तरली.

“तेवडा बोलला मगे झाला, वायच हयतो आडाळो घे, कांदो नि काकडी कापून ठेव... आनि म्हायती हा ना उद्या सकाळी बाजारात भात घेवन जावचा हा ता, फॉव कांडपून आनूचे हत. नायतर र्हवशील उतानी पडान.  ते नायत उद्या, सकाळीच जातले हत खैरटात!" शारदाबाईंनी  बांगडे तळायला घेतले.

“व्हय!" मनात फुटलेल्या उकळ्या दाबत नलिनी उत्तरली.
...........
          ते ओल्या भाताचं जड पोतं बाजारात न्यायचं म्हणजे  मुलांनाही नको वाटायचं. पण बाजारात जायला मिळणार म्हणून नलिनी एका पायावर तयार असायची. पोतं डोक्यावर घेवून बाजारात निघाली. घरापासून बाजार अडीज मैलावर. घरातून बाहेर पडेपर्यंत दहा वाजले होते. सकाळी लवकर गेलं तर लवकर नंबर लागतो नाहीतर मग ताटकळत राहावे लागते. गिरणीत पोचली तेव्हा पंधराएक पोती आधीच पडली होती. नलिनीने आपलं  पोतं तिथे टाकलं आणि विचारलं,“ किती येळ लागात?"
“ये तासाभरात लावून ठेवतय तुझा."
नलिनी बाजार फिरायला  मोकळी झाली. आईकडून भांडण करून शंभर रुपये घेतले होते. त्याच्या बांगड्या घेतल्या, टिकल्यांची पाकिटं आणि असंच चटरफटर काय-काय क्लिपबिप घेतले आणि सगळं झाल्यावर गुरूकृपात बटाटावडा खात बसली. तोपर्यंत तास होऊन गेला होता.
 परत गिरणीवर आली,“काकांनू , झाला काय वो?"
“नाय गो, वायच थांबोचा लागात, मानूसपन एकच हा आज माज्याकडे!"

           एका जागेवर बसेल ती नलिनी कसली,“ठीक हा, येतय थोड्या वेळान!" असे म्हणून बाजाराच्या दुसर्या बाजूला निघाली. बारा वाजून गेले होते, ऊन मी म्हणत होते. बाजारातील गर्दी ओसरली होती. शेवटच्या आंबूच्या दुकानाजवळ आली तसे तिच्या कानावर कोणाचीतरी हाक आली.

“गो नलिनी!"
नलिनीने आधी दुर्लक्ष केलं, पुन्हा हाक आली.
कॉलेज सोडल्यावर कोणीतरी पहिल्यांदा नलिनी म्हणून हाक मारली होती. तिने मागे वळून पाहिलं.

“ये गो, बस वायच, कधीपासना बाजारात फिरतं हस!" आंबूने तिच्याकडे बघून हातानेच यायचा इशारा केला.
        नलिनीला जरा विचित्रच वाटलं त्याचं बोलावणं. ती त्याच्याकडे पाहत राहिली तसं तो म्हणाला,“गो! तुझ्या बापाशीक चांगलो ओळाखतय मी. ये ये, लाजा नको!"
बाबांचं नाव घेतल्यावर नलिनीची भीड चेपली, ती दुकानात आली.

      आंबूचं दुकान म्हणजे पुढल्या पडवीत काढलेलं, उभ्या फळयांनी बंद करायचं, मधल्या खणात किराणा मालाचे सामान साठवून ठेवलेलं...पाटल्या दारात नारळाच्या, कांद्या बटाट्याच्या गोण्या. पुढल्या दारात दुकानात जनरल सामान आणि एक फ्रीज ठेवलेलं. त्यात दूध, दही, चॉकलेटं आणि इतर जिन्नस ठेवलेले. एका बाजूला कोकणी मेवा ठेवलेला, वरच्या बाजूला लटकत ठेवलेली कुरकुरेची पाकिटं. बरं सजवलं होतं दुकान.

          रस्त्यावर आता सामसूम झालेली. नलिनी दुकानात आल्यावर तो म्हणाला,“ये गो, आत ये, बस वायच, काय देव? कोल्ड्रींक देव?"

“नको!"

“चॉकलेट देव?"

“नको!"

“लाजा नको, बस व्हयत्या पलंगाावर!" नलिनीला मधल्या खणात पलंगावर बसवून तो बाहेर गेला, पुन्हा आत आला, हातात एक डेरीमिल्क होतं.

“काकानू नको माका, जातय मी!" म्हणत नलिनी जायला उठली, तितक्यात तो खेटून तिच्या बाजूला बसला. नलिनीला अवघडल्यासारखे झाले. 

त्याने नलिनीच्या मांडीवर हात ठेवला...

ती गांगारली पण सावरली.
तिने केस सोडले...
ताडकन जागेवरून उठली...
समोरच्या कोपऱ्यात दहाबारा गोरे नारळ सोलून ठेवलेले होते, त्यांच्यामध्ये एक काळाकुट्ट भरीव मुठीचा कोयता पडलेला होता...
नलिनीने क्षणाचाही वेळ न दवडता कोयता हातात घेवून वर हवेत उचलला...
मोकळे सोडलेले केस...
ताणलेल्या भुवया...
फुललेले डोळे...
डोळ्यात आग...
फुरफुरनारे नाक...
थरथरनारे ओठ...
हवेत उगारलेला कोयता...

साक्षात चंडिकाच समोर उभी होती...

 नलिनीचा तो अवतार बघून आंबू थरथर कापायला लागला...

 नलिनी आता खरोखरच मानेवर घाव घालते की काय असे वाटल्यावर त्याने पाटल्या दाराने पळ काढला.

           “ह्या काय संचारला माझ्यात!" नलिनी स्वत:शीच पुटपुटली. कोयता खाली टाकला, आंबाडा बांधला. पाटल्या दारातून मान बाहेर काढली. डावीकडे बघितलं. उजवीकडे बघितलं. आंबू कुठे दिसला नाही.

 बाहेर दुकानात आली. फ्रीज उघडला. आत डजनभर डेरीमिल्क पडली होती. फ्रॉकच्या डाव्या खिशात पाच टाकली, उजव्या खिशात पाच टाकली, एक हातात घेवून फोडलं. एक तुकडा तोंडात टाकता टाकता म्हणाली,“मायझयो माका चॉकलेट दिता...!"
         
     नलिनीने पोहे घेतले नि तडक घर गाठले.

           संध्याकाळी शाळेतून आल्यावर मुलांचे कुकारे ऐकायला आले तसं आईला म्हणाली,“आये, जरा जावन येतय गे, इलय लगेेच!"
 पुढल्या दाराची कडी काढली, हळूच बाहेरून दार बंद केलं नि आंब्याच्या बांधावर आली. बाकीची मुले आधीच गोळा झाली होती.

“काय गो तायडे आज पुढल्या दारान इलस ता? आनि गप गप कित्या...?" दहावीतल्या रेश्माने विचारलं.

“काय नाय गो बरा आसय मी!" नलिनीने बोलताबोलताच प्रत्येकाच्या हातात एक एक  डेरीमिल्क ठेवलं.

एक तुकडा कधीतरी मिळताना मुश्किल अख्खं चॉकलेट हातात बघून सगळी मुले चाट पडली. ओमकारने  विचारलं,“काय गो! खयना आनलस येवढी?"

“तू आंब्याच्या झाडाखाली बसलंस ना! मगे आंबो खा, खयना इलो इचारू नको!"

“नाय पन खयच्या खूशीत ता तरी सांग!"आर्याने न राहवून विचारलं.

“या जगात जशी चांगली मानसा आसत तशी वायटव हत, वायट मानसांबरोबर कसा वागायचा तेची ज्ञानप्राप्ती आज माका बाजारात झाली. तेच्या खुशीत ही चॉकलेटाा !"

“तायडे काय कळला नाय!" नलिनीला आज हे काय झालंय म्हणून रेश्मा गोंधळात पडली.

“मगे भेट येकटा, सांगतय तुका! चल म्या जातय, आवशीक कामाक मदत करूची हा!"

काल लगोरी खेळणारी नलिनी नि आताची नलिनी मुलांना फरक जाणवला. घराकडे जाणार्या नलिनीकडे बघत वंदना म्हणाली,“नलग्यात फरक पडल्यासारखो नाय वाटत काय रे तुमका?"

“व्हय! व्हय!" पाठमोऱ्या नलिनीकडे बघत सगळी मुले एका सुरात उद्गारली.

         इकडे आंब्याच्या झाडाखाली बसलेली मुले हातातल्या आंब्याची म्हणजे त्या डेरीमिल्कची चव चाखत होती नि तिकडे आंबूला चॉकलेट एजन्सीच्या माणसाचा फोन आला,“चॉकलेटवर कंपनीची चांगली अॉफर इली हा, किती बॉक्स पाठवू?"

उत्तर आलं,

“आजपासना चॉकलेटा ठेवची बंद केलय!"
▪▪▪▪▪

(पूर्णतः काल्पनिक)

© विजय सावंत
१२/०५/२०२०

Comments