कवडसा- आडवाटेवरचा खजिना- ४, राधाकृष्ण मंदिर, कोल्हापूर


आडवाटेवरचा खजिना - ४

       श्री राधाकृष्ण मंदिर
       मंगळवार पेठ, कोल्हापूर

नुकताच आडवाटेवर एक खजिना गवसला. कोल्हापूरच्या गजबजलेल्या मंगळवार पेठेत. महालक्ष्मी मंदिरापासून जवळच. मंगळवार पेठेत पद्मावतीचं देऊळ आहे. देवीच्या पाया पडून बाहेर आलो; बूट घालत असताना सहज लक्ष डावीकडे गेले. वास्तूकलेचा एक उत्कृष्ट नमूना असलेले मंदिराचे  एक शिखर आकाशात झेपावू पाहत होते. उंच गेलेले ते शिखर जणू मला बघायला या म्हणून आमंत्रणच देत होते. आनंद झाला. म्हटलं चला या आडवाटेवर आज काहीतरी वेगळे सापडले. पायातले बूट काढले, पुन्हा पद्मावतीच्या  मंदिरात गेलो. त्या पुजार्यांना विचारलं  ‘ हे कुठलं मंदिर?'
                ते मंगळवार पेठेतले राधाकृष्णाचे मंदिर होते. माझी पावलं आपसुकच तिकडे वळली. घरांच्या गराड्यात मंदिराचा उंच कळस तेवढा लांबून दिसत होता. अन्यथा तिथे मंदिर असेल असं कुणालाही वाटणार नाही.
                  मंदिराच्या आवारात प्रवेश केला तेव्हा लोअर परेल किंवा करी रोडच्या एखाद्या जुन्या चाळीत शिरतोय असे वाटले. मंदिराला लागूनच तीन बाजूंनी, प्रवेशद्वाराकडची बाजू सोडून, डिजिटल सी आकारात चाळी उभारलेल्या आहेत. गोकुळाष्टमीच्या आधीचा दिवस होता, सकाळी गेलो तेव्हा तीच चाळीतली गडबड अनुभवास आली. त्यात पाण्याचा टॅंकर आला होता. सगळ्या चाळीची पाणी भरण्यासाठी आणि जे मिळेल त्या भांड्यात साठवून ठेवण्यासाठी लगबग सुरू होती. पूरामध्ये नादुरुस्त झालेल्या महानगरपालिकेच्या पाणी  खेचायच्या मोटर दुरुस्त होईपर्यंत कोल्हापूरच्या नाक्यानाक्यावर हे चित्र दिसत होते.
               मंदिरात जाऊन आधी राधाकृष्णाचं दर्शन घेतले. आतून मंदिर न्याहाळले. सर्वसामान्य मंदिरांसारखच आतमध्ये कुठलीही विशेष कलाकुसर नसलेलं. समाधान देणारं.
             बाहेर आलो. ज्याने मला आपल्याकडे आकर्षित केले होते, तो मंदिराचा कळस न्याहाळू लागलो. इतका सुंदर आणि वेगळेपण असणारा कळस पहिल्यांदा बघत होतो. मंदिराबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता एव्हाना वाढली होती. मंदिराला लागूनच असलेल्या चाळीतील एका गृहस्थांना त्याबद्दल विचारले असता त्यांच्याकडेही फारशी माहिती उपलब्ध नव्हती. चाळीतली माणसं मात्र चांगली होती, आस्थेने कुठून आलात म्हणून चौकशी केली, चहासाठी आग्रह केला, तसंच वर गॅलरीत जाऊन फोटो काढायला त्यांनीच सांगितले. मंदिर पाचशे सहाशे वर्षे जुनं आहे. त्यांच्याकडून एवढंच कळालं की १८५७ चा इंग्रजांविरुध्द जो उठाव झाला होता त्यावेळी क्रांतिकारी मंदिराच्या शिखरात गुप्त खोली आहे त्यात थांबले होते. इंग्रजांनी जेव्हा गोळीबार केला तेव्हा कृष्णाच्या हनुवटीचा तुकडा उडाला होता, पुनर्लेपाने तो ठीक करण्यात आला. तसंच हे ही कळाले की मंदिरात स्वामी विवेकानंद येऊन गेले आहेत. याव्यतिरिक्त काही जास्त हाताला लागले नाही. 
           जुन्या मंदिरांच्या नक्षीकामात काहितरी एक कंसेप्ट असतो तसाच एक कंसेप्ट मला या मंदिराच्या शिखरात दिसला आणि तो म्हणजे संतांची ओळख. मंदिर कधी आणि कोणी बांधलं हे गुगलून बघितलं पण तिथे काहीच माहिती उपलब्ध नाही. सुंदर नक्षीकाम केलेले आहे. नृसिंहाचं शिल्प आहे, गणपती समोरच्या भागावर आहे, संतांची सुंदर शिल्प या शिखरावर आहेत.पण हे संत मला ओळखता आले नाहीत. जाणकारांनी कमेंटमध्ये जरूर लिहावे. हे दगडात बांधकाम केलेले शिखर नाही. चुना, माती आणि लहान आकाराच्या विटा शिखराचं बांधकाम करताना वापरण्यात आल्या आहेत. घोड्यांच्या पायासाठी आणि मोराच्या मानेसाठी लोखंडी शिगा वापरण्यात आल्या आहेत. अजूनही काही घटक असावेत ज्यामुळे आजही शिल्पं आणि कलाकुसर शाबूत आहे. काही ठिकाणी बांधकाम ढिले झाले आहे, शिखरात वापरलेल्या विटा उघड्या पडल्या आहेत, तणही मोठ्या प्रमाणात उगवलेलं आहे. मंदिर सुस्थितीत आहे पण शिखराची डागडुजी आवश्यक आहे. सरकारदरबारी मंदिराची दखल आहे, शासनाकडून निधि मंजूर होऊनही वापरता येत नाही असे कळाले, कदाचित मातीचं बांधकाम असल्यामुळे अडचणी येत असतील. जाणकारांनी लक्ष घालण्याची गरज आहे. पण हा एकमेवाद्वितिय खजिना मात्र जपायलाच हवा.
                
धन्यवाद!
गोकुळ अष्टमी २०१९

©विजय सावंत

(ता.क. - फेसबुकवर एका गृपवर ही पोस्ट शेअर केली होती तेव्हा काही माहीतगार वाचकांनी हे मराठा स्थापत्यशैलीत बांधलेले मंदिर आहे, असा अभिप्राय दिला. या शैलीत बांधलेली मंदिरे कोल्हापूर, सातारा, फलटण या भागात आढळतात. मातीत बांधलेली असल्यामुळे त्यातली बरीच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.)



















Comments

  1. साधेपणात पण खुप सौंदर्य असते...
    मला पण संगमरवरी.. चकचकीत देवळांपेक्षा अशी साधी सुधी देवळे जास्ती भावतात..
    वर्णन खुप छान केल आहे. पाचशे वर्षे म्हणजे काही जास्त काळ नाही तरीही आपण ईतीहास जतन करु शकत नाही हे आपल दुर्दैव!
    असाच आडवाटेने फीरुन खजीना गोळा करीत रहा...
    भ्रमंती ला शुभेच्छा...

    ReplyDelete

Post a Comment