आणि बरंच काही- आषाढी एकादशी
आषाढी एकादशी
विठ्ठल...! अवघ्या महाराष्ट्राचं चैतन्य! आज आषाढी एकादशी. ही इतिहासातील दुसरी अशी आषाढी एकादशी आहे की पायी वारी घडली नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी सुरू केलेली ही वारी अखंडितपणे सुरू आहे. गेल्या वर्षी वाटले होते, २०२१ साली पायी वारी नक्कीच घडेल, पण कोरोनाचे सावट अधिकच गडद झाले आणि यावर्षीही पायी वारी काढू नये असे ठरले. ‘वारी म्हणजे काय?' हे एखाद्या वारकर्याला विचारावे. मी वारी केली नसली तरी वारीच्या मार्गावर त्यादरम्यान केलेल्या प्रवासात वारी अनुभवली आहे.
वारी म्हणजे महाराष्ट्रात आलेले भक्तीचे उधाण, वारी म्हणजे अठरापगड जाती विसरून, गरीब श्रीमंत भेदभाव विसरून केवळ विठ्ठल नामाचा जप करत पंढरपुरी सारे एक झालेल्या वैष्णवजनांचा मेळा, वारी म्हणजे उत्साह..., चैतन्य..., आनंद.., परमानंद. वारी म्हणजे महाराष्ट्राची धरोहर.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत वारकरी संप्रदायाचा खूप मोठा वाटा आहे. महाराष्ट्राचं जे काही सुसंस्कृतपण आहे ते वारीतून जी काही सामाजिक घुसळण झाली आहे त्यातून आलेलं आहे असे मला तरी वाटते. वारी या विषयावर लिहिण्यासारखे खूप आहे, किंबहुना खूप लिहिले गेले आहे, तरीही वारी हा विषयच असा आहे की त्यावर कितीही लिहिले तरी कमीच आहे.
गेल्यावर्षी वारी घडली नाही, अशावेळी नियमितपणे वारी करणार्या वारकर्याच्या मनातील भावना मी त्यावेळी कवितेतून व्यक्त केली होती.
तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏
पंढरीची वारी २०२०
आजि पाऊले थांबली
अशी पहिल्यांदा यंदा
ना भक्तांचा मेळा होई
ना ही डोईवर वृंदा
वाळवंटी उभा देव
आहे विठोबा सावळा
वाट पाहे विटेवरी
आज होऊनी बावरा
टाळ मृदंगाचा दंगा
आस लावी वेड्या जीवा
सुन्या सुन्या तीरा कशी
सुनी वाटते भीवरा
नाही तुडवली वाट
ना पायांना फोड आला
हृदयात काटा आज
पहिल्यांदा हा टोचला
असं कसं हे तू देवा
घातलं आहेस कोडं
बळ दे सोडवायला
आम्हा आता तरी थोडं
वारी तुझ्या पंढरीची
आज नाही तुझ्या दारा
अंगणात आहे माझ्या
आज भारलेला वारा
_विजय सावंत
२०/०७/२०२१
फोटो- विजय सावंत
#pandharichivari2020 #pandharpur #vithhal #vijaysawant
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-2420490495890015"
crossorigin="anonymous"></script>





दररोजची कसरत, चढाओढ, न बसणारीआर्थिक घडी आणि आयुष्यभर न सुटणारा आपलाच गुंता. वारीतल्या समर्पणामुळे आपले सर्व पाश आपोआप दूर होतात. छान कविता...
ReplyDelete