आणि बरंच काही- माझं गाव
माझं गाव
काही वर्षांपूर्वी मुंबईजवळच्या ‘मामाच्या गावाला' भेट दिली होती. म्हणजे तसं नाव असणार्या रिसॉर्टला. ज्यांना गाव नाही त्यांची दुखरी नस बरोबर पकडली होती मालकांनी. खरंच गाव हे हवंच. माझ्या एखाद्या मित्राला किंवा ओळखीच्यांना मी जेव्हा त्यांचं ‘गाव कुठलं?’ असं विचारतो आणि त्यावेळी ते उत्तर देतात, ‘आम्हाला गाव नाही, मुंबईच आमचं गाव!', खरं सांगू खूप वाईट वाटतं. त्यांना वाटत नसेल पण मलातरी वाटतं. गाव हवंच राव! देशाच्या कानाकोपऱ्यातून आपलं गाव सोडून लोक चरितार्थासाठी मुंबईत येतात. गावाची ओढ नसेल आणि दोन तीन पिढ्या मुंबईतच काढल्या असतील तर त्यातले काही इथलेच होऊन जातात, ज्यांची नाळ गावाशी घट्ट जुळलेली असते ते गावाला कधीच विसरत नाहीत. माझ्या जन्मानंतरची पहिली सहा सात वर्षे गावी गेली. त्यानंतर मी मुंबईत आलो. पण शाळेत असताना मे महिन्याच्या सुट्टीत आणि त्यानंतरही अधूनमधून गावाची फेरी ठरलेली, म्हणूनच असेल कदाचित माझ्या गावाशी माझी नाळ आजही जुळलेली आहे. ते कसंही असो, अगदी दुष्काळी भागातील असो, प्रत्येकाला आपलं गाव प्रिय असतंच.
लहानपणी शाळेच्या पुस्तकात असलेली देशावरून कोकणात उतरणार्या सात घाटांची नावं पाठ करावी लागायची. त्यातला एक घाट म्हणजे माझं गाव फोंडाघाट. त्यावेळी अभिमानाने मित्रांना सांगायचो, ‘हे माझं गाव हं!' फोंडाघाट, एक स्वप्नातलं गाव. आता सह्याद्रीच्या कुशीतलं गाव असंच असणार ना! बलुतेदारी, गावगाडा अनुभवलेलं गाव. निसर्गाने भरभरून दिलंय गावाला. सह्याद्रीच्या पायथ्याशी असणारे फोंडाघाट जितके सुंदर तितकेच घाटमाथ्यावर असणारे दाजीपूर. घाटाच्या माथ्यावर खिंडीच्या पलिकडे कोल्हापूर तर पश्चिमेला अलिकडे फोंडाघाट. दाजीपूर, ओलवण, हसणे या कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर असणार्या गावांचा भावनिक, सांस्कृतिक संबंध तसा फोंड्याशी जुळलेला. ह्या गावातल्यांची सोयरीक फोंड्याशी. फोंड्याच्या मधून वाहणारी उगवाई घाटमाथ्यावर उगम पावते. दाजीपूरला उगवाईचं मंदिर आहे. घाटमाथ्यावरचा परिसर भन्नाट वेड लावणारा. त्यात राधानगरी डॅमचं बॅकवॉटर दाजीपूरपर्यंत पसरलेलं. कोल्हापूरहून येताना खिंड पार केली की समोर कोकणाचा विस्तिर्ण परिसर नजरेत भरतो. तळाला फोंडाघाट गाव लक्ष वेधून घेतो. खोलगट बशीसारखं फोंडाघाट, मधून वाट काढत मार्गस्थ होणारी उगवाई. पावसाळ्यात नजर लागावी अशी. नदीच्या ह्या काठावर गांगोचं तर पलिकडच्या काठावर माऊलीचं मंदिर गर्द राईत उभं आहे. तसेच एका रात्रीत बांधलेले वाघोबाचे मंदिर तमाम माहेरवाशिणींचं श्रध्दास्थान आहे.
गाव भाताचं कोठार आहे. पावसाळ्यात नजर जाईल तिथवर हिरवंकंच. चतुर्थीपर्यंत भाताच्या लोंब्यां लोंबू लागतात, एक मस्त सुगंध वातावरणात दरवळू लागतो. गावात सर्व पारंपरिक उत्सव मोठ्या उत्साहाने थाटामाटात पार पडतात. चतुर्थीला चाकरमानी गावी येतात, एरवी बंद असणारी दारं त्यानिमित्ताने उघडतात. गौरी गणपती मोठा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. शिमग्याला चव्हाट्यावर फोंड्याचे गावकरीच नाही तर सिंधुदुर्गातल्या इतर गावातले पाहुणे, माहेरवाशीणी गर्दी करतात. दर तीन वर्षांनी येणारा माऊलीचा गोंधळ म्हणजे फोंडा गावी आलेलं उत्साह आणि श्रध्देचं उधाण. किती पिढ्या बदलल्या तरी आजही कोल्हापूरजवळील चिकोडीच्या गोंधळी कुटुंबाचा मान इथे शाबूत आहे. नव्वदच्या दशकाच्या अखेरीपर्यंत फोंडा ही घाट आणि कोकणच्या मालाची देवाणघेवाण होणारी मोठी बाजारपेठ होती. हा बाजार बघण्याचा अनुभव मी घेतलेला आहे. इथला नागवेलीच्या पानांचा बाजार प्रसिद्ध आहे. नव्वदीच्या दशकांनंतर जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले, आणि फोंड्यासारख्या बाजारपेठांना उतरती कळा लागली. असो... काळानुरूप बदल ठरलेला आहे. बाजारपेठेची ती रया गेली पण गावाचा रुबाब आजही तसाच आहे. अशा या सुंदर गावावर खूप लिहायचं आहे. पण तूर्तास या कवितेतून त्याची ओळख करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न. माझं गाव आवडल्यास कमेंट करून जरूर कळवा.
सर्वांना शिमगोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा!
धन्यवाद! 🙏
माझं गाव
सह्याद्रीच्या गच्च कुशीतला ते आहे माझं गाव
नदी उगवाई वाहे मधुनी पावसाळी घेई धाव
दिले भरभरून निसर्गानेही उधळले मुक्तहस्ते
वळणावळणातून गावात उतरती सुंदर नागमोडी रस्ते
पिकवी गोटा भाताचा होतं ओलं हिरवं शिवार
सोनराशीनं भरून जातं पुढलं पाटलं दार
वनराईत उभी आमुची ग्रामदेवी गांगोमाऊली
तिला लाभली पाहा कशी ही सह्यगिरीची सावली
माहेरवाशीण आहे इथली लेक लाडकी हो गावाची
येता जाता तिच्या साथीला सोबत आहे वाघाची
मराठमोळ्या परंपरा अजुनि जपल्या आहेत जिथे
धाव घेई चाकरमानी शिमगा चतुर्थीला इथे
कधीकाळी होता इथे मोठा बाजाराचा काळ
घाट आणि कोकणच्या मालाने फुलून जायचा माळ
स्वप्नाहून सुंदर आहे काय वर्णावा मी थाट
रूबाब त्याचा नका विचारू नाव फोंडाघाट
माझे गाव फोंडाघाट, माझे गाव फोंडाघाट
© विजय सावंत
२१/०३/२०२१
फोटो- विजय सावंत














Comments
Post a Comment