कवडसा- आडवाटेवरचा खजिना- ५ - सूर्यमाळ, वैतरणा
आडवाटेवरचा खजिना - ५
सुर्यमाळ, खोडाळा, वैतरणा, अंजनेरी परिसर
सुर्यमाळ, खोडाळा, वैतरणा, अंजनेरी परिसर
पालघर, नाशिक
मुंबई- वाडा- नाशिक -धुळे प्रवास करायचा होता. सकाळीच लवकर निघून वाड्याचं काम संपवलं आणि मी पुढच्या प्रवासाचा विचार करू लागलो. वाडा- मालवाडा- जव्हार- त्रिंबक - नाशिक ओळखीचा रस्ता. याच रस्त्याने जायचे नक्की केले होते, पण नेहमीप्रमाणे दुसरा काही पर्याय आहे का गुगलून बघायचे ठरवले. खोडाळा मार्गे नाशिक हा माझ्यासाठी नवीन ठळक पर्याय गुगी दाखवत होती; रस्ता चांगला असणार त्याशिवाय ती ठळकपणे दाखवणार नाही, तिच्यावर माझा पूर्ण विश्वास. कधी कधी....
जाऊ द्या ना!
एव्हाना तिला माझा भटका स्वभाव आणि निसर्गवेड माहिती झालंय. या आडवाटेवर आज नक्कीच काहीतरी खास दाखवणार असा विचार करून मी गुगीच्या मार्गाने खोडाळा मार्गे नाशिक गाठायचं ठरवलं. निघालो या नव्या आडवाटेवर. वाडा पाठीमागे टाकल्यानंतर दहा बारा कि. मी.वर अगदी हवा होता तसाच निसर्ग साथ द्यायला हजर. माहिती नाही पुढे काय आहे, रस्ता कसा आहे, कसे जावे, पण निसर्गाची साथ आहे म्हटल्यावर आणखी काय हवे!
मुंबई- वाडा- नाशिक -धुळे प्रवास करायचा होता. सकाळीच लवकर निघून वाड्याचं काम संपवलं आणि मी पुढच्या प्रवासाचा विचार करू लागलो. वाडा- मालवाडा- जव्हार- त्रिंबक - नाशिक ओळखीचा रस्ता. याच रस्त्याने जायचे नक्की केले होते, पण नेहमीप्रमाणे दुसरा काही पर्याय आहे का गुगलून बघायचे ठरवले. खोडाळा मार्गे नाशिक हा माझ्यासाठी नवीन ठळक पर्याय गुगी दाखवत होती; रस्ता चांगला असणार त्याशिवाय ती ठळकपणे दाखवणार नाही, तिच्यावर माझा पूर्ण विश्वास. कधी कधी....
जाऊ द्या ना!
एव्हाना तिला माझा भटका स्वभाव आणि निसर्गवेड माहिती झालंय. या आडवाटेवर आज नक्कीच काहीतरी खास दाखवणार असा विचार करून मी गुगीच्या मार्गाने खोडाळा मार्गे नाशिक गाठायचं ठरवलं. निघालो या नव्या आडवाटेवर. वाडा पाठीमागे टाकल्यानंतर दहा बारा कि. मी.वर अगदी हवा होता तसाच निसर्ग साथ द्यायला हजर. माहिती नाही पुढे काय आहे, रस्ता कसा आहे, कसे जावे, पण निसर्गाची साथ आहे म्हटल्यावर आणखी काय हवे!
परळी पाठी टाकल्यावर गारगाई नदी ओलांडली. थोडंसं गारगाईबद्दल.
मुंबईची भस्मासुरी तहान भागवण्यासाठी अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, तानसा, भातसा, तुळशी आणि विहार हे दररोज चार हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणारे सात जलाशय भविष्यात अपुरे पडण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या डॉ. चितळे समितीच्या शिफारशीनुसार भविष्यात येऊ घातलेल्या दररोज आणखी २८०० दशलक्ष लिटर पाणी पुरवू शकणार्या गारगाई, पिंजाळ आणि दमणगंगा पैकी ओगदे गावाजवळील गारगाई नदीवर ६९ मी. उंचीचे आणि ९७२ मी. लांबीचे मुंबईच्या दररोजच्या पाणीपुरवठ्यात ४४० दशलक्ष लिटरची भर घालणारे अवाढव्य धरण येऊ घातले आहे.
मी ज्या वाडा- नाशिक रस्त्याने चाललो होतो त्याच्या आजूबाजूचा परिसर आणखी काही वर्षांनी पुर्णत: बदललेला असेल. ओगदे, खोडदे व इतर काही गावे पाण्याखाली गेलेली असतील. मुंबईची तहान अजून किती गावांचा घास घेणार आहे कुणास ठाऊक? इथे एक संदेश नक्कीच देईन. मुंबईकरांनो! पाणी जपून वापरा.
पुढे गेल्यावर आमले गावातून शिरघाटाची चढण सुरू झाली. डावीकडे डोंगर उजवीकडे खोल दरी... समोर दूरपर्यत पसरलेली हिरवी शिखरे... खाली तीनशे अंशांत गोल वळसा घालून वाहाणारी गारगाई... डावीकडे खाली भलामोठा प्रपात. सुंदर, नयनरम्य, मनोहारी दृश्य! काही वेळ थांबून तो निसर्ग डोळ्यात साठवून पुढे निघालो. गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसात एका ठिकाणी डावीकडच्या डोंगराचा खूप मोठा भाग रस्त्यावर आल्यामुळे घाट बंद होता; खाजगी वाहनांसाठी खुला होऊन अजूनही वाडा- खोडाळा एस. टी. सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद होती. इथे काही गावकरी आपली गुरे चरायला घेऊन आले होते. घाटात आजूबाजूला कुठे वस्ती दिसत नव्हती म्हणून उत्सुकतेपोटी विचारले “ कुठून आलात तुम्ही?”
“सूर्यमाळ. वर घाटमाथ्यावर आहे!" असं म्हटल्यावर मी त्या आजूबाजूला इतका सुंदर परिसर असणार्या घाटमाथ्यावरच्या सूर्यमाळाचं चित्र रंगवू लागलो. स्वत:ला समजावलं, 'भाई आपल्याला पुढे जायचं आहे. निघा!' निघालो.
त्या सुंदर घाटाची वळणं घेत वर माथ्यावर आलो. खिंडीत मात्र गाडी थांबली. घाटाच्या पश्चिमेची बाजू नजरेआड गेली आणि पूर्वेची नजरेसमोर आली; हा ही नजारा अफलातून होता. डावीकडे सूर्यामाळावर जाणार्या वाटेवरची कमान स्वागताला उभी होती; तिला अव्हेरून पुढे जाणं मनाला पटलं नाही.
सूर्यमाळ. घाटमाथ्यावरचा नवा भिडू. नव्यानेच विकसित होत असलेलं पर्यटनस्थळ. तशी आजूबाजूच्या गावांशी ओळख आहे त्याची; पण इतरांसाठी तसं नवीनच. सुंदर. वातावरणात बर्यापैकी पारदर्शिता असल्याने चारही बाजूंचा दूर दूरचा नजारा बघता येत होता. वर निळं आकाश, त्यात मुक्त संचार करणारे ढगांचे पुंजके, खाली जमिनीवर पसरलेला हिरवा गालिचा, पिवळी सोनकी, रानफुले, त्यांच्याभोवती भिरभिरणारी फुलपाखरे, आल्हाददायक वारे, एकंदरीत तिथला नजारा उत्साहवर्धक होता. इथे एक सनसेट पॉइंट विकसित केला गेला आहे. पर्यटकांना राहाण्यासाठी सोय केली आहे. पण बंद आहे. नव्याने प्रयत्न सुरू केल्याचे तिथे आलेल्या दोन गावातल्या मुलांकडून कळाले. सुंदर असूनही दुर्लक्षित असं हे उत्तम पर्यटनस्थळ आहे. पश्चिमेला दूरवर नजर जाईल तिथवर हिरवळ, उंचसखल शिखरे, खाली ती गारगाई नदी, गोलाकार फिरून वाहाणारी, सगळं एक नंबरी! आडवाट करून बघण्यासारखं ठिकाण.
इथून थेट खोडाळा गाठलं; पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी खेड्यांपैकी एक. आपली परंपरा राखून असलेलं, निसर्गाच्या नवलाईने नटलेलं, साधंसुधं. मी गुगीच्या मार्गाने चाललो होतो; तसंच मधेमधे थांबून गावातल्या जाणकारांकडून मार्गाची खात्रीही करत होतो; दोन्ही छान जुळत होते, त्यामुळे मी बिनधास्त होतो. रस्ताही चांगला होता. गजबजलेल्या शहरातून बाहेर पडून गाडीतून नुसताच अहेतूक फेरफटका मारावा इतका सुंदर इथला निसर्ग आहे.
खोडाळा सोडलं आणि मी एका विस्तृत जलाशयाच्या काठावर गाडी थांबवली.
मुंबईच्या फ्लॅटमधील नळात पाणी लहान जलवाहिनीतून येतं, लहान जलवाहिनीत मोठ्या जलवाहिनीतून, मोठ्या जलवाहिनीत त्या अगडबम मोठ्या जलवाहीन्यांतून, त्याच्यात भांडूपच्या जलशुध्दीकरण केंद्रातून, जलशुध्दीकरण केंद्रात ठाण्याच्या कापूरबावडी,भिवंडी मार्गे मोडकसागर मधून, मोडकसागरला मध्य वैतरणाहून, मध्य वैतरणाला अप्पर वैतरणामधून. असा हा अप्पर वैतारणाहून सुरु झालेला पाण्याचा प्रवास मुंबईच्या फ्लॅटमधील नळातून बाहेर पडतो.
लहानपणापासून फक्त ऐकलं होतं, शाळेत शिकलो होतो, मुंबईला पाणीपुरवठा करणारं वैतरणा... वैतरणा...! आयुष्यात कधीतरी नक्की बघायचं असं ठरवलेलं हे अप्पर वैतरणा आज डोळ्यासमोर होतं.
त्याचं पहिलं दर्शन मनाला सुखावून गेलं. गाडीतून बाहेर आलो. खाली जमिनीवर इवल्याश्या सफेद फुलांनी मान खाली घातली होती, कुणाला लाजत होती कोण जाणे? त्यांना न छेडता मी परिसर न्याहाळू लागलो. मुंबईच्या नळाला एवढ्या लांबून येणार्या पाण्याचा विशाल स्त्रोत डोळे भरून प्यालो. लहानपणापासूनची ती उत्सुकता आज शमली.
गुगीची ही वाट अप्पर वैतरणाच्या अंगावरून रामसेतूवरून पलिकडे जात होती.
सुंदर परिसर
विशाल जलाशय
ऊंच डोंगर चोहिकडे
हिरवे काळे कातळ कडे
निळ्या आकाशी ढग पळे
शब्द तरी किती जुळवायचे बरे
एकदा आडवाट करून याच इकडे.
त्या विशाल जलाशयाचा पसरलेला भाग उजवीकडे साथ करत होता; त्याच्या पलिकडे डोंगरांचे कडे आता आणखी स्पष्ट दिसत होते; उत्तरेला नजरेसमोरचा निळ्या सावळ्या आकाशाचा बॅकड्रॉप असलेला डोंगर लक्ष वेधून घेत होता; हा नजारा काही औरच होता. राज कपूर किंवा यश चोप्रा साहेबांनी आपल्या चित्रपटाच्या पहिल्या रीळाची सुरवात इथून करावी इतका नितांत सुंदर निसर्ग.
हा परिसर नेमका कुठला हे जाणून घेण्यासाठी काही गावकरी उभे असलेल्या एका तिठ्यावर गाडी थांबवली. गाडीतून उतरून त्यांना त्याबद्दल विचारले.
‘दोन डोंगरांच्या मधे दिसतोय तो अंजनेरी आणि समोर दिसतोय तो त्र्यंबकचा ब्रम्हगिरी'
मी ब्रम्हगिरीच्या दक्षिणेला आणि अंजनेरीच्या पश्चिमेला झारवड गावात उभा होतो. त्र्यंबकचा ब्रम्हगिरी आणि मारुतीरायांच्या जन्मस्थानाने पवित्र झालेला अंजनेरी पर्वत आता मला अधिकच भव्यदिव्य वाटायला लागले. अंजनेरी खूप वर्षांपासून मनात आहे, आज दूरून दर्शन झाले.
सकाळी घरातून ब्रेड जाम आणि चहावर बाहेर पडलो होतो, वाडा सोडल्यानंतर त्रंबकच्या दहा कि.मी.आधी पहिणे येईपर्यंत खाण्याची सोय नाही. साडेतीन वाजत आले होते, नितांत सुंदर निसर्ग बघून मन तृप्त झाले होते. त्या भारलेल्या वातावरणातून आता पहिणे गावच्या तिठ्यावर आलो होतो. माझी निसर्गात तंद्री लागली की पोटातले कावळे आपली चोच पंखाखाली म्यान करून टाकतात. चार वाजले होते, आता थोडी कुरकुर सुरू झाली. मराठमोळ्या धाब्यावरची मावशी म्हणाली “माझ्या हातची बाजरीची भाकरी आणि पिठलं खाऊन बघा! परत याल." खरच होतं. आता पोटही तृप्त झालं होतं.
धाब्याच्या बाहेर पडताना अचानक आभाळ भरून आलं, मघाचा चारही बाजूंचा दिसणारा निसर्ग दाट धुक्याच्या पडद्याआड गेला, समोरचं काही दिसेनासं झालं, जोरदार पाऊस सुरु झाला होता. मनात म्हटलं निसर्गाने आपले अद्भूत रूप दाखवून झाल्यावर पडायला घेतलं.
तशातच गाडीत बसलो, ना लेफ्ट बघितलं ना राईट सरळ धरली धुळ्याची वाट.
स्थळभेट - १९/०९/१९
विजय सावंत






























फारच छान आहे लेख आणि छायाचित्रे.भवीष्यात असेच छान लेख आणि छायाचिञण कर. आमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा.
ReplyDeleteसुंदर वर्णन आणि फोटोज....एकदा नक्की जायला आवडेल 👍
ReplyDeleteफारच सुंदर वण॔न मन उधाण वारा झाल
ReplyDeleteMost of the pictures are amazing..your thoughts on water conservation are so inspiring.
ReplyDeleteWe hardly think about those villagers while using water liberally and casually.
Even if one village benefits from your post.. Your job is done.
I love the way you look at things and the ease with which you describe them... It's an instant connect.
Thank you for the valuable information and a free tour for us.