आणि बरंच काही - नाना परब
नाना परब
“आप सबका उनके प्रति इतना अटॅचमेंट देखकर मुझे अच्छा लगा, आजकल ऐसा देखने नहीं मिलता। कुछ लोग पेशंट को हॉस्पिटल में भर्ती करवा देते हैं और समझते हैं अपना काम हो गया। फिर पेशंट के तरफ ध्यान भी नहीं देते। ऐसा क्या था उनमें कि उनकी तरफ तुम्हारा इतना प्यार है? शायद बहुत प्यार उन्होंने तुम्हें दिया होगा!" व्हेंटिलेटरवर असलेल्या पेशंटचं शरीर आता साथ देत नाही हे लक्षात आल्यावर आणि एकंदरीत परिस्थिती लक्षात आल्यावर आपल्या टेबलसमोर उभ्या असलेल्या पेशंटच्या कुटुंबियांना कागदावर चित्राकृती काढून समजावत असताना डॉक्टर विचारत होत्या. हॉस्पिटलच्या दारात पेशंटच्या कुटुंबियांची चाललेली घुटमळ गेला आठवडाभर त्या अनुभवत होत्या.
‘नाना परब' नाम ही काफी है. कणकवली तालुक्यातील कळसुली गावातील हा तरुण मुंबईत नशीब आजमावण्यासाठी आला आणि इतरांप्रमाणे गिरणीची वाट न धरता पोलिसांत भरती झाला. ‘पोलीस' या संज्ञेला साजेशी शरीरयष्टी. लवकरच मुंबई पोलीस दलात आपल्या चांगल्या कामगिरीने प्रसिद्ध झाला. निवृत्तीनंतर सबइन्स्पेक्टर नाना परब यांना वांद्रे पोलीस स्टेशन आजही विसरलेले नाही.
पोलीस दलात राहून आपल्या हुशारीने त्यांना अमाप पैसा कमावता आला असता पण आपली हुशारी त्यांनी प्रामाणिकपणासाठी खर्ची घातली. मुंबई पोलिसांचा दबदबा आजही कायम आहे तो अशा प्रामाणिक पोलिसांमुळे.
पोलिसाची नोकरी म्हणजे कुटुंबाकडे दुर्लक्ष हे ठरलेलं पण असं असतानाही त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्याही योग्य रीतीने पार पाडल्या. पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करायचं म्हणजे डोक्याला सतत ताण. पण म्हणून या माणसाने कधी दारूच्या थेंबाला हात लावला नाही. सुपारीच्या खांडाचंही व्यसन नसलेला असा निर्व्यसनी मनुष्य पोलीस डिपार्टमेंटमध्ये विरळाच.
आज जी आर्थिक सुबत्ता आपण पाहतो ती ऐंशी नव्वदच्या दशकात अजिबात नव्हती. त्यावेळी संसार कसे चालवले जात होते हे मी जवळून पाहिले आहे. म्हणूनच मोठ्या मुलाला आपल्या इच्छा आकांक्षा सोडून पोलिसांत भरती व्हावे लागले. दुसऱ्या मुलाने बीएससी करून आपल्या मेहनतीच्या जोरावर कॉर्पोरेट क्षेत्रात प्रवेश केला. नव्वदच्या दशकानंतर भारतात दूरचित्रवाणी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून आले. स्टार या दूरचित्रवाणीची सेवा पुरविणाऱ्या कंपनीचा भारतात प्रवेश झाला. पहिल्या मोजक्या पंचवीस जणांच्या टीममध्ये विजय परब सामील झाला. पुढे झी टीव्हीचा प्रोडक्शन मॅनेजर म्हणून त्याचं नाव टीव्हीवर झळकताना बघून आमचाही ऊर भरून यायचा. आम्ही ओळखीच्यांना सांगायचो,“हा विजय परब माझ्या बहिणीचा दीर हां!" अन्नू कपूरची अंताक्षरी, क्रिकेट मॅचचं प्रक्षेपण, विदेशात होणारे सिनेअवार्डसोहळे या सर्वांची जबाबदारी त्याच्यावर होती. पुढे तोच माझा मेहुणाही झाला. अथक परिश्रमाने त्याने झी परिवारात आपले स्वतःचे स्थान निर्माण केले. खर्या अर्थाने आर्थिक सुबत्ता आली. तुमच्या परिवारातील एक व्यक्ती यश मिळवून पुढे गेली की मागच्यांनाही त्याच्याच पावलावर पाऊल टाकत पुढे जावंसं वाटतं. आज त्याचे पुतणे, भाचेमंडळी त्यालाच डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण करत आहेत.
नाना परबांची पुण्याई मोठी. सामाजिक कार्याची आवड...ओळख नसतानाही हसतखेळत हात जोडून नमस्कार करत एखाद्याला खूप जुनी ओळख आहे असं वाटावं अशी सहज भेटण्याची हातोटी... लहान मुलांची आवड... थट्टामस्करी... सतत कुटुंबासाठी आणि लोकांसाठी काहीतरी करण्याची धडपड हे या माणसाचे गुणविशेष होते. हा माणूस खूप माणसं जमवून गेला. माहीम पोलीस कॉलनीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा ‘माहिमचा राजा' बसविण्याचा मान नाना परबांकडे जातो. कॉलनी सोडून तीन दशकं झाली पण आजही नाना परबांची आठवण तिथे काढली जाते.
मुद्दामहून उल्लेख करतोय, हा माणूस ऊर्जेचा अखंड स्त्रोत होता. या माणसाकडे खळाळती उर्जा होती. चारचौघांत हा माणूस जाई तेव्हा तिथली मरगळ पळून गेलेली असायची. आयुष्यात कुठलंही व्यसन न केलेला हा माणूस खूप सारी ऊर्जा साठवून होता. पोलीस दलातील स्वच्छ कारकीर्द पूर्ण करून झाल्यावर एखाद्याने आराम करावा... तर नाही...! पुढील दहा वर्षे रहेजा बिल्डरकडे एखाद्या तरुणाला लाजवेल अशा नव्या उमेदीने आपले ‘रिटायर्ड लाईफ' सक्रिय ठेवले. वर उल्लेख केलेल्या डॉक्टर म्हणाल्या,“इतना अच्छा निरोगी शरीर हमने आजतक नहीं देखा, दुसरे इनकी उम्र के पेशंटका पीएच १२,१४ आता है, इनका ६ है।"
मंडळी, जो जन्माला आला त्याला मृत्यू अटळ आहे. वयाच्या ८८व्या वर्षी निसर्गनियमाचा आदर राखून नाना परब या अवलियाने शुक्रवारी संध्याकाळी(०२/०६/२०२३) देहत्याग केला. मात्र माझे सासरे नाना परब यांच्या स्मृती सदा अमर राहतील.
एक छोटीशी कविता खास पोलिसासाठी लिहिलेली. आज या निमित्ताने सादर करतो.
पोलीस
सदरक्षणाय खलनिग्रहणाय
आयुष्याची ज्योत पेटली
तन मन भावे देश रक्षता
संसारातली गुरफट सुटली
घोर घनघोर लागला जीवा
सदा तिला अन् मुलाबाळा
येशील कधी कसा घरा
वाटेवर तुझ्या असे डोळा
सोयही तुझी तुटपुंजी
रक्षिसी तू लाख जीवा
रक्त रक्त आटवून सुध्दा
ना मिळते कधी दवादुवा
करतात ही वर्दी काळी
सडलेली ती जातकुळी
नको लावून तू घेऊस डाग
आहे वर्दी तुझी शुभ्र आग
जीव तुझा मोलाचा आहे
जपून राहा हे कर्तव्य आहे
ना व्यथा ना कथा आहे
ही तुझी शौर्यगाथा आहे
आम्हालाही मन आहे
कळतं तुलाही मन आहे
काटेरी हा रुबाब आहे
हे तुझे आयुष्य आहे
सलाम तुझ्या कार्याला
सलाम तुझ्या त्यागाला
सलाम तुझ्यातल्या पोलिसाला
सलाम पोलिसाच्या आयुष्याला
सलाम! सलाम! सलाम!
_विजय सावंत
०४/०६/२०२३




🙏🙏💐🙏🙏
ReplyDelete🙏🏻
Delete🙏🙏🙏
ReplyDelete🙏🏻
Deleteयथार्थ श्रद्धांजली ! 🌷😥
ReplyDelete🙏🏻
Deleteतुमच्या यर्थाथ वर्णनामुळे नाना कळले.अस अभिमानास्पद,निष्कंलक आयुष्य असावे.भावपुर्ण श्रध्दांजली!
ReplyDelete🙏🏻
Delete🙏🙏🙏
ReplyDelete🙏🏻
Deleteखूप छान👌👌
ReplyDelete🙏🏻
Deleteछान मित्रा काकांना भावपुर्ण श्रद्धांजली 🌹🌹🙏
ReplyDelete🙏🏻
Delete