कविता - विठ्ठला !
नमस्कार मंडळी!🙏🏻
सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आज पंढरपूर चैतन्यमय वातावरणाने भारून जाईल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला विठ्ठल भक्त विठूरखूमाई चरणी भक्तीत लीन होऊन जाईल. जरी पंढरपुरात भक्तीला उधाण आले असले तरी त्या भक्तीमय लाटांचे तरंग पंढरपूरापासून दूर असलेल्या महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात , शहरात , विठ्ठलाचे भक्त असलेल्या इतर राज्यांत उठत असतात. अशा या मंगल समयी विठ्ठलाकडे काय मागावे...?
देवा...! सर्वांना सुखी ठेव!🙏🏻
विठ्ठला!
दृष्ट लागण्याजोगा हा
कसा रंगला सोहळा
महाराष्ट्र झाला सारा
पंढरपूरात गोळा
शीण सारा आयुष्याचा
कसा विलयास गेला
विठू माउलीच्या पायी
वारकरी हा रमला
घरदार प्रपंच जो
इथे सोडुनीया आला
आला जो पंढरपुरा
तो तो विठूमय झाला
कोण रंजला गांजला
कसा कळेनासा झाला
उचनीच भाव सारा
चंद्रभागेत हो न्हाला
आस ही अशी कोणती
भला कोणता हा लळा
पंढरीत भक्तीचा हा
पाहा फुलला तो मळा
एक साकडं ते पुन्हा
घालतो विठ्ठला तुला
सौख्य नांदो घरा घरा
झुलू दे सुखाचा झुला
_विजय सावंत
२९/०६/२०२३



👌🏻👌🏻🙏🏻
ReplyDeleteधन्यवाद!🙏🏻
Deleteकविता छान आहे, पण अभंग असता तर... वरचे निवेदन अगदी बेस्ट 👌🏻
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
Delete