कवडसा - आडवाटेवरचा खजिना -२६- स्ट्यॅच्यू ऑफ युनिटी (भाग२)

         आडवाटेवरचा खजिना -२६, एकतेचा पुतळा अर्थात Statue of unity, नर्मदा, गुजरात 

भाग-२/३

         भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल (३१ ऑक्टोबर १८७५- १५ डिसेंबर १९५०) एक लोहपुरुष ज्यांनी महात्मा गांधी यांच्या प्रभावाखाली येऊन ऐन उमेदीच्या काळात आपल्या विलासी जीवनाचा त्याग केला आणि स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला, या भारतभूमीला एका रत्नाचा लाभ झाला. लंडनहून बॅरिस्टर होऊन आलेले सरदार पटेल गोध्रा येथे वकिली करू लागले. इंग्रजी शिष्टाचार पाळू लागले.  क्लब पार्ट्या त्यांच्या जीवनाचा भाग बनत चालला होता. पण हे काही काळापुरतं राहिलं. इंग्रजांचे भारतातील जनतेवर वाढत चाललेले अत्याचार सर्वांनाच दिसत होते. इंग्रजांविरुद्ध गांधीजींची लढाई जोर पकडू लागली होती. गांधीजींना आपला नेता म्हणून जनतेने मान्यता दिली होती. इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी अनेक चळवळी राबविल्या. या चळवळींचा प्रभाव सरदार पटेल यांच्यावर पडला. गांधीजींच्या विचारांनी ते प्रभावित झाले. त्याची परिणती पुढील त्यांचं संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी वाहून घेण्यात झाली. 

         गुजरातमधील खेडा येथून सुरू केलेली चळवळ Nucleas of India's integration as United country ही त्यांची नवी ओळख निर्माण करून गेली.

          बारडोली येथील सत्याग्रहाचं नेतृत्व त्यांनी हाती घेतलं आणि इंग्रजांना करमाफी करायला लावून यशस्वी केलं. इथूनच त्यांना सरदार म्हणून संबोधलं जाऊ लागलं आणि आपलं हे ‘सरदार' पद त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवलं. आजही वल्लभभाई पटेल हे नाव सरदार लावल्याशिवाय अपूर्ण वाटतं. 

          सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अनमोल होतंच पण देश स्वतंत्र झाल्यानंतर फाळणीनंतर जी काही परिस्थिती उद्भवली होती तीही त्यांनी योग्य रीतीने हाताळली. एकदा ‘राजा' म्हणून गादीवर बसल्यावर सहजासहजी कोणी आपलं राजेपद सोडेल हे वाटतं तेवढं सोपं नव्हतं. भारतात त्यावेळी ५६२ संस्थानं होती. सगळेच आपापल्या राज्याचे राजे. त्यांना समजावून त्यांच्याशी विचारविनिमय करून सर्व संस्थानांची मोट बांधून भारत राष्ट्र निर्माण करणे ही खरंच अवघड गोष्ट होती. हे काम, हे आव्हान सरदार वल्लभभाई पटेल यांनी लीलया पेललं. काश्मीर, जुनागढ आणि हैदराबाद सोडून सारे संस्थानिक  भारतात सामील व्हायला तयार झाले. त्याचं संपूर्ण श्रेय सरदार वल्लभभाई पटेल यांनाच जातं. त्यांच्या या कामाबद्दल गौरवोद्गार काढताना गांधीजी म्हणाले होते,‘हे काम सरदार पटेलच करू शकतात.'

          जुनागढचा नवाब महाबतखान याला पाकिस्तानात सामील व्हायचे होते. पण ८० टक्के हिंदू आणि २० टक्के मुसलमान असलेल्या जुनागढच्या प्रजेला हा निर्णय मान्य नव्हता. त्यांनी नवाबाविरुद्ध उठाव केला, त्याला भारत सरकारने पाठिंबा दिला. त्यानंतर भीतीने नवाब पाकिस्तान पळून गेला. २० जानेवारी १९४९ रोजी जुनागढ संस्थान भारतात सामील झालं.

        काश्मीरचा राजा हरिसिंग याने ना पाकिस्तान ना भारत, आपण स्वतंत्र राहाणार असल्याचं घोषित केलं. पण पाकिस्तानला कुठल्याही परिस्थितीत काश्मीर आपल्याकडे हवं होतं. त्यासाठी पठाणांच्या लष्करी फौजा त्यांनी काश्मीरकडे रवाना केल्या. या लष्करी फौजापुढे आपला टिकाव लागणार नाही हे लक्षात येताच हरिसिंगाने भारताकडे मदतीसाठी याचना केली. काश्मीर भारतात सामील करून घेण्याच्या अटीवर भारतीय लष्कर काश्मीरला पाठविण्यात आलं. तोपर्यंत पाकिस्तानी फौजांनी काश्मीरचा एक तृतियांश भाग गिळंकृत केला होता. काश्मीर भारतात तर आलं पण पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्न आजही तसाच आहे

        हैदराबाद हे भारतातील क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठं संस्थान. त्यांनी भारतात सामील होण्यास नकार दिल्यावर सरदार वल्लभभाई पटेल यांनी ‘ऑपरेशन पोलो' राबवून १७ सप्टेंबर १९४८ साली हैदराबाद भारतात सामील करून घेतलं. जगाच्या नकाशावर भारत एक राष्ट्र म्हणून उदयास आलं.

          सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि पहिले गृहमंत्री म्हणून खूप मोठे यश मिळवलं. त्यांच्या जन्मदिनी ३१ ऑक्टोबर हा दिवस भारतात राष्ट्रीय एकता दिन म्हणून पाळला जातो.

        अशा या महान भारतरत्नाचा यथोचित गौरव व्हावा म्हणून स्ट्यॅच्यू ऑफ युनिटी अर्थात एकतेचा पुतळा उभारावा ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा विचार समोर आला. मोदीजींच्या डोक्यात ही कल्पना खूप आधीपासूनच म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून होती, २०१०ला त्यांनी तशी घोषणा केली. त्यांना असं काहीतरी करायचं होतं ज्याची जगाने दखल घ्यावी. नक्की झालं. ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी निविदेत सर्वात कमी बोली लावलेल्या लार्सन अँड टुब्रो या भारतातील अग्रगण्य कंपनीने कामास सुरुवात केली. त्यासाठी ३००० कामगार, २५० इंजिनिअर लावले. २१०००० घनमीटर काँक्रीट, ६५०० टन स्ट्रक्चरल स्टील, १८५००   टन रिइनफोर्स्ड स्टील , १७०० टन बाहेरील ब्राँझ पॅनल प्लेट त्यावर १८५० टनाचा ब्राँझचा थर असा भव्यदिव्य पुतळा आकार घेऊ लागला. पुतळ्याच्या बाहेरील बाजूच्या ब्राँझच्या पॅनल प्लेट या चीनमधील एका कंपनीकडून बनवून घेण्यात आल्या. भारतात ते काम होणं शक्य नव्हतं.

          या पुतळ्याची अभिकल्पना ही भारतातील प्रसिद्ध मूर्तिकार श्री राम सुतार यांची होती. ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी सुरू झालेलं काम २०१८ च्या ऑक्टोबर मध्यापर्यंत चाललं. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४३व्या जयंतीला, ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले.

         स्प्रिंग टेंपल बुद्धा, चीनला मागे टाकून स्ट्यॅच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा ठरला.

क्रमशः 

_विजय सावंत

माहिती स्त्रोत - भेट दिलेल्या स्थळावरील माहिती फलक, गूगल, विकीपीडिया, विकासपीडिया, वर्तमानपत्रांचे इंटरनेटवर उपलब्ध असलेले लेख.

मंडळी, पोस्ट आवडली तर इतरांनाही फॉरवर्ड करा. धन्यवाद!🙏🏻





       १८२ मीटर उंचीचा हा पुतळा ५८ मीटरच्या पायथ्यावर उभा आहे. या पायथ्यातच सरदार वल्लभभाई पटेल यांचा संपूर्ण जीवनपट उलगडून दाखवणारं अत्याधुनिक अतिभव्य दालन उभारण्यात आलं आहे. बालपण, उमेदीचा काळ, वैवाहिक जीवन, राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील सक्रिय सहभाग, गांधीजींच्या चळवळी, तसेच राष्ट्रउभारणीची संपूर्ण प्रक्रिया कशी होती याचं सचित्र प्रदर्शन या दालनात मांडण्यात आलं आहे.









        या अवाढव्य पुतळ्याच्या छातीपर्यंत लिफ्टने जाता येते. तिथे दर्शन गॅलरीत उभे राहिले असता नर्मदा नदीचे मनोहारी दृश्य पाहता येते.





        व्हॅली ऑफ फ्लॉवर या ठिकाणाहून होणारे स्ट्यॅच्यू ऑफ युनिटीचे मनोहारी दर्शन 







       सरदार सरोवर धरण 



        जंगल सफारी 


Comments

  1. छान आणि इत्थंभूत माहिती दिल्याबद्दल आभार.🙏 पुतळ्याच्या गवाक्षातून नर्मदेवरील सरोवराच्या विहंगम दृश्यास बोडके डोंगर खुपतात. बाग आणि इतर टुरिस्ट आकर्षणे छान आणि निगुतीने तयार करून जपली असली तरी कृत्रिम वाटतात. सरदार सरोवरासाठी शेजारील राज्यांनी सोसलेलं नुकसान आणि आदिवासींची झालेली कायमस्वरूपी दुर्दशा याच्या आठवणींनी विषण्ण आणि अपराधी वाटते. इतके महागडे आणि प्रचंड धरण आणि पुतळा ह्याची खरोखर आवश्यकता होती का ? असा विचार येतो.

    ReplyDelete
    Replies
    1. या विचार करायला लावणार्या कॉमेंटबद्दल धन्यवाद! तिसऱ्या भागात त्याबद्दल थोडं लिहावं म्हणतोय.🙏🏻

      Delete

Post a Comment