कवडसा- आडवाटेवरचा खजिना-२६- स्ट्यॅच्यू ऑफ युनिटी, गुजरात
कवडसा- आडवाटेवरचा खजिना -२६- एकतेचा पुतळा अर्थात Statue of unity, नर्मदा, गुजरात
जवळचे रेल्वे स्टेशन - बडोदा
भाग१/३
मुलांच्या वार्षिक परीक्षा संपल्यानंतर सुट्टीत गावी जाता नाही आलं तर कुठे ना कुठे जाण्याचा बेत बनतोच. दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली घालवल्यानंतर म्हटलं जाऊया कुठेतरी जवळपास. आमचं सगळं अचानक ठरतं त्यामुळे जवळपासची माथेरान, महाबळेश्वर ठिकाणं तपासून पाहिली. शनिवार रविवार धरून जायचं होतं त्यामुळे सगळीकडे बुकिंग फुल्ल. मग एक दोन दिवस विचार करण्यातच वेळ गेला.
संध्याकाळी बायको ऑफिसमधून घरी आली ती एका नवीन ठिकाणाची माहिती घेऊनच. तिच्या ऑफिसमधलं कुणीतरी जाऊन आलं होतं आणि त्यांनी ते ठिकाण तिला सुचवलं होतं.
लगेच मी गुगलून बघितलं. वेगळं काहीतरी होतं, आडवाट होती पण या आडवाटेवर जायला हरकत नव्हती. तसंही या आडवाटेवर कधीतरी जायचं होतच. ठरलं....! नाही म्हणजे बायकोने सुचवलं आहे म्हटल्यावर ठरवलंच.
ठरल्या दिवशी सकाळीच आम्ही सहकुटुंब गाडीत बसलो आणि गाडी निघाली थेट गुजरातच्या दिशेने.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्यांचं योगदान अनमोल आहे, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकसंध राष्ट्र उभारणीसाठी ज्यांनी अतुलनीय पोलादी कामगिरी केली त्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि गुजरात सरकार यांच्या विशेष प्रयत्नाने साकारलेला जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून ज्याची नोंद झाली आहे, तो ‘Statue of unity' पाहण्याची उत्सुकता आता वाढत चालली होती.
गुजरात सरकार असा काहीएक भव्यदिव्य प्रकल्प राबवतोय त्याच्या बातम्या वर्तमानपत्रात सतत वाचनात येत असत. त्यासाठी लागणारं लोह गावागावांतून जमा केलं जात आहे हे वाचून अप्रूप वाटत होतं. या प्रकल्पाबद्दलच्या बातम्या सतत या ना त्या कारणाने वाचनात येत असायच्या. त्यामुळे उत्सुकता म्हणाल तर खूपच होती.
निसर्गाचा छान आस्वाद घेत घेत आम्ही चाललो होतो. गाडीत मुलं असल्यावर स्टिअरींगचा ताबा जरी माझ्या हातात असला तरी म्युझिक सिस्टिम त्यांच्या ताब्यात गेलेली असते. त्यामुळे ते काय ऐकवतील ते आपण बापुडे ऐकत बसायचं. मधलीचा कल जुन्या पिढीतील गाणी ऐकण्याकडे तर मोठीची चॉईसच वेगळी.
सुरतच्या अलिकडे एक रस्ता उजवीकडे वळतो, इथे महामार्ग सोडल्यानंतर सुरू होतो गुजरातच्या ग्रामीण भागातील प्रवास जो बारडोली, मांडवी मार्गे सरदार सरोवरापर्यंत जातो. दुपारी एका चौफुलीवर जेवण उरकून आम्ही पुढे निघालो. इथे जेवणाचे जास्त लाड करून चालत नाही, जिथे मिळेल तिथे उरकून घ्यावे अशी परिस्थिती. संध्याकाळ व्हायला अजून अवकाश होता, आम्ही गरूडेश्वर या सरदार सरोवराच्या जवळ असलेल्या गावात पोहोचलो. दोन दिवस आणि दोन रात्री असा आमचा बेत होता. पैकी दुसऱ्या रात्रीचं हॉटेल बुकींग SOU एपवरून(त्याबद्दल सांगतो नंतर) पक्कं झालं होतं. ही रात्र काढण्यासाठी आम्ही हॉटेल शोधू लागलो. सरोवराकडे जाणार्या रस्त्यावर उजवीकडे एक चांगलं हॉटेल दिसलं. तिथे चौकशी केल्यावर त्याने एका रात्रीच्या मुक्कामासाठी बारा हजार रुपये सांगितले. मी म्हणालो,“देखो भाई, मैं पूरा महाराष्ट्र घुमता हूं, किस हॉटेल का रेट कितना होना चाहिए सब मालूम है! तीन हजार दूंगा!" आला की तो बारा हजारांवरून चार हजारांवर. रूम मात्र स्वच्छ आणि प्रशस्त होते. हॉटेल साई इन, गरूडेश्वर. तासाभरात ताजेतवाने होऊन आम्ही सरोवराच्या दिशेने निघालो. सूर्यास्त झाला होता, आता सरोवराकडे जाऊन काय करणार असे वाटले होते पण स्थानिकांकडून कळाले की ग्लो गार्डनचं सौंदर्य संध्याकाळीच पाहाण्यासारखं असतं, तसेच लेझर शोही बघता येईल.
सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर (५९७फूट) उंच पुतळा हे येथील सर्वात मोठं आकर्षण पण त्याचबरोबर एक परिपूर्ण पर्यटन स्थळ व्हावे म्हणून इथे आणखीही काही स्थळं विकसित करण्यात आली आहेत. त्यात
१. बटरफ्लाय गार्डन
२. ग्लो गार्डन
३. जंगल सफारी
४. एकता नर्सरी
५. कॅक्टस गार्डन
६. आरोग्य वन
७. व्हॅली ऑफ फ्लॉवर
८. एकता क्रूज
९. नर्मदा आरती घाट
१०. एकता मॉल
११. सरदार सरोवर धरण
आणि बरंच काही आहे पाहाण्यासारखं या इथल्या पाच एकरच्या परिसरात.
गरूडेश्वर ते SOU हे बारा कि.मी.चे अंतर. पंधरा वीस मिनिटांत आम्ही SOU च्या पार्किंगजवळ पोहचलो. इथपर्यंतच आपली गाडी नेता येते. इथून स्ट्यॅच्यू ऑफ युनिटी हे अंतर सहा किमी. SOU आणि वर दिलेल्या यादीतील स्थळं फिरण्यासाठी SOU मॅनेजमेंटची बस सर्विस इथून उपलब्ध आहे. संध्याकाळी SOU चे प्रवेशद्वार बंद होते त्यामुळे तिथे न जाता आम्ही GRTCच्या बसथांब्यावर उतरलो. त्याआधी बसमधून झालेले ते सरदार वल्लभभाई पटेल यांचे दर्शन एखाद्या पहाडासारखे भासले.
संध्याकाळी साडेसात वाजता सरदार वल्लभभाई पटेल यांच्या या भव्य पुतळ्यावरच लेझर शोचं आयोजन करण्यात येतं. आम्ही तिथे उतरल्यानंतर काही वेळातच संधिप्रकाशात लेझर किरणांचा शो सुरू झाला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आयुष्यातील ठळक घटनांचा आढावा हा या लेझर शोचा विषय. लेझर शोच्या दृकश्राव्य माध्यमातून तो छान मांडण्यात आला आहे. संधिप्रकाशाच्या पार्श्वभूमीवर सरदार वल्लभभाई पटेल यांचं उत्तुंग कर्तृत्व अधिकच भव्यदिव्य वाटतं. शो संपल्यावर तिथून जवळच असलेल्या ग्लो गार्डनजवळ आलो. बाग खूप सुंदर रीतीने सजविण्यात आलेली आहे. काही ठिकाणी सेल्फी पॉइंट्स उभारण्यात आले आहेत. लहान मुलांसाठी ही बाग म्हणजे खास आकर्षण म्हणता येईल. त्यावर जास्त काही लिहिण्यापेक्षा खालील फोटोंच्या माध्यमातून मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे.
ग्लो गार्डनच्या प्रवेशद्वाराजवळ स्नॅक्सचा छोटासा स्टॉल आहे. तीनचार महिला एकत्र आल्या आहेत आणि त्या तो चालवतात. गोल मुगाची भजी, समोसा, ताक, चहा. मोजकेच पदार्थ. सहज म्हणून भज्यांची एक प्लेट घेतली. इतकी आवडली, इतकी आवडली म्हणून सांगू, एकावर एक चार प्लेट आम्ही कधी संपवल्या आम्हालाच कळलं नाही. मुगाची भजी पहिल्यांदा खात होतो असं नाही पण त्या भज्यांची चव काही औरच. त्या महिलांची तारिफ करताना त्यांना म्हणालो,“ चार साल के बाद आऊंगा तो यही टेस्ट मिलना चाहिए!" त्यावर त्या जरा सुखावल्या आणि म्हणाल्या,“ हां हां यही टेस्ट मिलेगा!" आज जरी त्या गोल भज्यांच्या भरलेल्या प्लेटचे फोटो पाहिले तरी तोंडाला पाणी सुटतं. कधी गेलात SOU ला, तर ग्लो गार्डनच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या या महिला स्टॉलवरची गोल भजी खायला विसरु नका.
क्रमशः
_विजय सावंत
स्थळभेट- १६/०४/२०२२



सुंदर ग्लो गार्डन फोटोज् !
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
Deleteफोटो दर्शन वर्णन दोन्ही सुंदर! पिकनिकसाठी पर्याय छान आहे.
ReplyDeleteपिकनिकही होईल आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचं जीवनचरित्रही अभ्यासता येईल. दुसर्या भागात त्याबद्दल लिहिलं आहे
Deleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
ReplyDeleteवाह, मस्त प्रवास.
ReplyDeleteभजी चा आनंद, नक्की बघेन जेव्हा भेट देईन तेव्हा. SOL ला भेट देण्याची बिलकुल इच्छा नव्हती आणि नाही गेलो.
आदरणीय सरदार यांना नवीन विदेशी पिढीला प्रेरित करण्यासाठी एक भेट झालीच पाहिजे.
नेहमीप्रमाणेच फोटो मस्त 🙏🙏
मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
DeleteVery nice 👌
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
Deleteव्वा! खूपच छान
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!
Delete