कवडसा- आडवाटेवरचा खजिना-२४, पूर्णगड, रत्नागिरी

आडवाटेवरचा खजिना-२४

पूर्णगड, रत्नागिरी

जवळचे रेल्वे स्टेशन- रत्नागिरी

      कशेळी गावातील एक सुंदर खजिना पाहून मी पूर्णगडाची वाट धरली. एक वाजत आला होता, तरीही डोक्यावरचा सूर्य सुसह्य होता. नागमोडी वळणं घेत डावीकडे सुरूची बनं मागे टाकत मी गावखडी गावात प्रवेश केला. अतिशय निसर्गरम्य गाव. आजकाल हे गाव पक्षी निरीक्षण आणि छायाचित्रण करणार्यांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. विशाळगडाजवळ उगम पावणारी मुचकुंदी नदी पश्चिमेला गावखडी आणि पूर्णगडाच्या मधून वाहात अरबी समुद्राला मिळते. इंग्रजांच्या काळात रत्नागिरी जिल्ह्यातील तीन प्रमुख बंदरांपैकी पूर्णगड हे एक महत्त्वाचे बंदर होते. पैकी रत्नागिरी आणि जयगड येथून आजही व्यापार चालू आहे. प्रत्येक व्यापारी बंदराच्या खाडी मुखाशी येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी एकतर टेहळणी बुरूज, छोटंसं ठाणं किंवा छोटेखानी किल्ला हा असतोच. पूर्णगड अशा मोक्याच्या ठिकाणी उभारण्यात आला आहे, त्याच्या नजरेतून काही सुटण्याचा संभवच नाही.

          गावखडी गावात प्रवेश करताना

         गावखडी आणि पूर्णगड यांना जोडणारा पूल
         गावखडी गावातून दिसणारा पूर्णगड किल्ला.
 

       जसा सोपारा, कल्याण बंदरातील माल नाणेघाट मार्गे जुन्नर, पैठणपर्यंत पाठविला जात असे तसाच कोकण प्रदेश हा आदिलशाहीच्या अधिपत्याखाली असताना पूर्णगड बंदरातील माल, भात, मीठ, मासे, नारळ, तेल इत्यादी वस्तू थेट कोल्हापूर पर्यंत पाठविल्या जात असत. 

          कान्होजी आंग्रे यांनी १७२४ साली पूर्णगड व जयगड हे दोन किल्ले बांधल्याची नोंद रा. ना. जोशी यांच्या आंग्रे शकावलीत सापडते. पुढे पेशव्यांच्या काळात सरदार हरबारराव धुळुप यांच्याकडे किल्लेदारी आली. त्यांनी गडावरील कारभारासाठी भोसले, गवाणकर, कानोजे, आंब्रे यांची नियुक्ती केली. त्यांचे वंशज आजही गडावरील किल्लेकरवाडी येथे राहतात. १८१८ साली महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांप्रमाणे हाही किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला होता.

         पन्नासेक मीटर उंचीवर  असलेल्या या किल्ल्याच्या आजूबाजूला उतारावर गाव वसलेले आहे. पूर्णगड. पायथ्याशी गाडी उभी करून दहा मिनिटातच मी किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. प्रवेशद्वाराजवळ मारुतीचे मंदिर आहे तर उजव्या हाताला मोठा खोल पाणी नसलेला तलाववजा हौद आहे. (तटबंदीच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेला चिरा इथूनच काढण्यात आला असावा.) तटबंदीत लपलेले प्रवेशद्वार भव्य आहे. प्रवेशद्वारावर द्वारशिल्प म्हणून चंद्र, सूर्य आणि गणेशाची प्रतिमा कोरण्यात आली आहे. त्याचा अर्थ जोपर्यत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा गड अबाधित राहो. जांभा दगडातील या प्रतिमा आज काहीशा पुसट झाल्या आहेत. प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच दोन्ही हाताला दोन देवड्या दिसतात. समोर समुद्राकडे उघडणारा पश्चिम दरवाजा,  जुन्या बांधकामांचे जोते, सात बुरुज आणि भव्य तटबंदी नजरेस पडते. या छोटेखानी किल्ल्याचा रुबाब मात्र भारी आहे. आठ वीत रुंद तटबंदी मजबूत आहे. तटबंदीवर चढायला तीन बाजूंनी पायर्यांची सोय आहे. संपूर्ण तटबंदीवरुन गोल फिरता येते. तटबंदीत बंदूका आणि तोफांचा मारा करण्यासाठी ठिकठिकाणी जंग्या आणि खिडक्या ठेवण्यात आल्या आहेत. पश्चिम बुरुजावर उभे राहिल्यास डोळ्यांचं पारणं फिटतं. समोर अथांग पसरलेला निळाशार समुद्र, रुपेरी वाळू, खाडीमुख, त्यापलीकडे गावखडीचं सुरुचं बन.... आहाहा...! हे सारे घटक कोकणच्या सौंदर्याला चार चांद लावतात.

     तटबंदीत लपलेले किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार

    किल्ल्याबाहेर मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला असलेला पाण्याचा तलाववजा हौद.

        
              
          मुख्य प्रवेशद्वारावर कोरण्यात आलेलं द्वारशिल्प 

      पाहरेकर्यांसाठी केलेली देवडीची सोय.




      मुख्य प्रवेशद्वारावर फडकणारा भगवा
      तटबंदीत ठिकठिकाणी काढण्यात आलेल्या जंग्या
       पश्चिम दरवाजा

    ते कोकणसौंदर्य अधाशासारखं डोळ्यात भरून घेतलं आणि तटबंदीवरुन खाली उतरून तटबंदीच्या बाहेरच्या बाजूस आलो. मी गडाचे निरिक्षण करत पुढे सरकत होतो. संपूर्ण तटबंदी जांभा दगडात उभी करण्यात आली आहे. प्रत्येक दगडाचा आकार दुसऱ्या पेक्षा वेगळा, काही दगड चार वीत बाय तीन, तर काही दगड सहा वीत बाय चार वीत...तर काही आठ बाय पाच वीतापर्यंत भलेमोठे दगड तटबंदीच्या बांधकामात वापरण्यात आले आहेत. खाणीतून काढताना जसा दगड हाताला लागला तसा तो तासून बसविण्यात आला आहे. कदाचित त्यामुळेच या किल्ल्याची तटबंदी भक्कम झाली आहे. असे असूनही काळानुरूप काही ठिकाणी तटबंदीचे नुकसान झाले होते, २०१९ ला महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले होते. आता किल्ला पुन्हा दिमाखात उभा आहे. किल्ल्याच्या आतमध्ये तीनपैकी एका जोत्यावर नवीन बांधकाम केले गेले आहे. तसेच १८६२ साली देखील किल्ल्याची डागडुजी केली गेल्याचा उल्लेख आढळतो. त्यावेळी किल्ल्यावर सात तोफा आणि सत्तर तोफगोळे होते. पण आज किल्ल्यावर ना तोफा आहेत ना तोफगोळे. सध्या किल्ल्याच्या आतमध्ये कोणीही राहात नाही, पण किल्ल्यापासून हाकेच्या अंतरावर घरे आहेत. पूर्णगड. एक परिपूर्ण किल्ला एकदा तरी पाहावा असा.

_विजय सावंत

स्थळभेट- १५/०२/२०२२

#purnagadratnagiri #vijaysawant #fortpurnagad #Marathiblog


Comments

  1. खुप छान माहिती, आणि सुंदर छायाचित्रे.

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻

      Delete
  2. पूर्णगडाची फेरी लेखणी तसेच कॅमेरातून छान उतरलीय. गडाचे बांधकाम ठिसूळ जांभ्या दगडातील असल्याने मारागिरीच्या दृष्टीकोनाऐवजी केवळ टेहळणी आणि साठवण याकामी पूर्णगड उपयोगात असावा. निसर्गरम्य परिसर असल्याने पर्यटकांसाठी काय सोयी आहेत याची माहिती उपयुक्त झाली असती. अधिकच्या ऐतिहासिक माहितीची (अर्थात् उपलब्ध असल्यास) तृष्णा शमवा नां, सर ! आपल्या आडवाटेवरच्या ब्लॉगमुळे वाचकांच्या अधिक अपेक्षा वाढल्यास ते आपले यश आहे. आणि तो आपला हक्क आहे.
    खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद, सर ! ⚘🙏

    ReplyDelete
  3. मनःपूर्वक धन्यवाद!
    तटबंदी जांभ्या दगडातील जरी असली तरी सात ते आठ फूट रुंद आहे. बाहेरून तोफेचा गोळा डागला तर जास्तीत जास्त भगदाड पडेल, पण तटबंदीला काही होणार नाही. म्हणूनच इतक्या वर्षांनंतर आजही चारही बाजूंनी तटबंदी शाबूत आहे. जिथे पडझड झाली तिथे नवीन चिरे बसवण्यात आले आहेत. या किल्ल्याचा मूळ उद्देश टेहळणी हाच होता. इथून जवळच प्रसिद्ध पावस हे ठिकाण आहे, तिथे राहाण्याची सोय आहे.
    आपल्या कॉमेंट नेहमीच उत्साहवर्धक असतात. आभारी आहे.🙏🏻

    ReplyDelete
  4. नेहमी प्रमाणेच खुप छान माहिती आणि फोटो.
    धन्यवाद विजय 🙏🙏

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻

      Delete
  5. सुअंदर

    ReplyDelete
    Replies
    1. सुंदर

      Delete
    2. मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻

      Delete

Post a Comment