कवडसा- आडवाटेवरचा खजिना-२३, श्री कनकादित्य मंदिर, कशेळी, रत्नागिरी
आडवाटेवरचा खजिना-२३
श्री कनकादित्य मंदिर
कशेळी, रत्नागिरी
रत्नागिरी- कशेळी- ४० किमी.
पावस- कशेळी - २४ किमी
राजापूर- कशेळी- ३२ किमी.
जवळचे रेल्वे स्थानक- राजापूर रोड
आडिवरे येथील श्री महाकाली पंचायतन मंदिर पाहून झाल्यावर मी गाडीत बसलो. एखाद किलोमीटर पुढे गेल्यावर डावीकडे श्री कनकादित्य मंदिर या स्थळाकडे दिशानिर्देश करणारी पाटी दिसली.
खंडाळ्याला जायला उशीर होईल म्हणून त्या पाटीला पाठी टाकत मी पुढे चालत राहिलो. एका वळणावर उतार लागला... खाली उथळ नदीपात्र लक्ष वेधून घेत होते. सुंदर कोकण त्याचे सुंदर फोटो काढण्याचा मोह काही आवरता आला नाही. कधी खाली उतरून तर कधी गाडीत बसून नदीपात्र ओलांडेपर्यंत फोटो काढले. नदीपात्र ओलांडल्यावर एक रस्ता डावीकडे आणि एक सरळ पुढं जात होता. त्या नाक्यावर पुन्हा तीच पाटी...! श्री कनकादित्य मंदिर... हुश्श...! गाडी लावली बाजूला. रस्त्याच्या कडेला दोन वयस्कर गृहस्थ उभे होते, त्यांच्यापैकी एकाला गाडीत बसूनच विचारले, “हे प्राचीन मंदिर आहे का हो?"
"हो! हे सूर्य मंदिर आहे. खूप जुने म्हणजे हजार वर्षांपूर्वीचे आहे." ते गृहस्थ मला माहीती देत असतानाच त्यांच्या बाजूला उभे असलेले दुसरे गृहस्थ पुढे आले,“तुला काय माहिती आहे रे, थांब मी सांगतो. हे सूर्यमंदिर हजार वर्षे जुने आहे. कनिका नावाची एक बाई कशेळी गावात राहायची, ती सूर्याची उपासना करायची. तिने हे मंदिर बांधले म्हणून हे सूर्यमंदिर श्री कनकादित्य या नावाने ओळखले जाते. पेशव्यांनी या मंदिराला मोठी आर्थिक मदत केली आहे. नाना शंकरशेठ यांनी छपरावर तांब्याचा पत्रा चढवला आहे."
“किती लांब आहे इथून मंदिर?" आता मात्र ते हजार वर्षे जुने मंदिर न बघता पुढे जाणे मनाला पटणारे नव्हते, म्हणून मी विचारले.
“जवळच आहे इथून चार पाच किलोमीटरवर." त्यांनी माहिती दिल्यानंतर मी मंदिराची वाट धरली.
कशेळी गाव. अतिशय निसर्गरम्य अस्सल कोकणी सौंदर्य. ते लाल मातीतलं, माडापोफळीचं सौंदर्य लुटतच मी मंदिरासमोर गाडी उभी केली.
मंदिराच्या पूर्व प्रवेशद्वाराजवळ मंदिराची माहिती देणारा मोठा फ्लेक्स लावण्यात आला आहे. त्यामुळे मंदिरात जायच्या आधी मंदिराचे महत्त्व आणि वैशिष्ट्य लक्षात येतं. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पश्चिम दिशेला असले तरी प्रवेश पूर्व दिशेला असलेल्या प्रवेशद्वारातून दिला जातो. मंदिराला चारही बाजूंनी चिरेबंदी आहे. उजव्या हाताला विहीर आहे. मी आधी हातपाय धुवून घेतले. मंदिराच्या सभामंडपात प्रवेश केला. मंदिराची लाकडी श्रीमंती नजरेत भरते. सभामंडप न्याहाळून झाल्यावर मी अंतराळात प्रवेश केला. आडिवरे येथील महाकाली मंदिराच्या अंतराळातील छतावर जशी काष्ट्यकौशल्याची सुंदर रचना आहे तशीच इथेही पाहायला मिळते. या सृष्टीच्या उर्जेचा स्त्रोत सूर्यदेव अर्थात श्री कनकादित्याला नमस्कार करून मी आजूबाजूचे ते सुंदर काष्टवैभव न्याहाळत पुन्हा सभामंडपात आलो. सभामंडपात मंदिराचे व्यवस्थापक येणाऱ्या भाविकांचे स्वागत करण्यासाठी जातीने हजर असतात. असे इतर मंदिरात क्वचितच पाहायला मिळते. चला आधी जाणून घेऊ या या मंदिराविषयी!
मंदिराच्या गर्भगृहाच्या छतावर बसविण्यात आलेला तांब्याचा पत्रा विहिरीतून पाणी काढण्यासाठी वापरात असलेली कोकणातील पारंपरिक पद्धत. खूप कमी ठिकाणी ही पद्धत पाहायला मिळते. मंदिराच्या आवारात जाणीवपूर्वक जतन करून ठेवण्यात आली आहे.
कित्येक शतकांची साक्ष देणारा पोहरा
भारतात परकीय आक्रमणांना सुरुवात झाल्याचा तो काळ. त्याकाळात भारतातील बरीच मंदिरे पाडण्यात आली. अशावेळी आपल्याही मंदिरावर आक्रमण होईल या भीतीने बर्याच ठिकाणी मंदिरातील मूर्ती एखाद्या तलावात किंवा निर्जन ठिकाणी लपवून ठेवल्या जायच्या. त्यापैकीच काही सूर्यमूर्ती. ठळक म्हणता येतील अशा तीनच ठिकाणी सूर्यमंदिरे आज भारतात आहेत. गुजरात वेरावळ जवळील श्रीकृष्णाचे वसतिस्थान प्रभासपट्टण; कोणार्क, आणि कोकणातील कशेळी येथील श्री कनकादित्य मंदिर. सौराष्ट्र...! ज्याला आज आपण गुजरात म्हणून ओळखतो, जिथे भारतातील १२ सूर्यमूर्ती होत्या. परकीय आक्रमणाच्या भीतीने या मूर्ती दक्षिणेकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. समुद्रमार्गे व्यापारी जहाजातून दक्षिणेकडे रवाना करण्यात आल्या. या मूर्त्या घेऊन जाणारे जहाज कशेळी नजीकच्या समुद्रात अडकून पडले. त्याला पुढे जाता येईना. हा देवाचा कौल समजून एक सूर्यमूर्ती कशेळीच्या समुद्रकिनारी असलेल्या एका गुहेत ठेवण्यात आली. त्यानंतर ते जहाज तिथून हलले. याच गावात कनका नावाची एक बाई राहत होती. ती सूर्य उपासना करायची. एकदा तिला दृष्टांत झाला, ‘मी सूर्यदेव आहे, नजीकच्या गुहेत आहे. माझी गावात स्थापना कर.' कनकाबाईने गावकऱ्यांच्या मदतीने ती गुहेतील सूर्यमूर्ती शोधून काढली आणि तिची कशेळी गावात स्थापना केली. आदित्य म्हणजे सूर्य, आणि कनकाबाईने या मंदिराची स्थापना केली म्हणून या मंदिराला श्री कनकादित्य या नावाने ओळखले जाऊ लागले.. तेव्हापासून आजतागायत नित्यनेमाने या मंदिरात पूजाअर्चा केली जाते. कोकणातील हे एकमेव सूर्यमंदिर आणि देशभरातील सूर्यमूर्ती असलेले एकमेव सूर्यमंदिर. कोणार्क येथील सूर्यमंदिरात मूर्ती नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले पर्यटक या मंदिराला भेट देतात.
ही झाली मंदिराविषयीची प्रचलित आख्यायिका. पण मंदिर हजार वर्षे जुने असल्याचा पुरावा आज मंदिर व्यवस्थापनाकडे उपलब्ध आहे.
बाराव्या शतकात कशेळी येथील गोविंदभट्ट भागवत यांची ख्याती दूरदूरपर्यंत पसरली होती. त्यांनी या सूर्यमंदिराची लावून दिलेली व्यवस्था तत्कालीन शिलाहार राजवंशातील राजा गंडरादित्य द्वितीय यांच्या कानावर गेली. त्यावेळी कोकण प्रदेश शिलाहार राजांच्या राजवटीखाली होता. त्यांची राजधानी कोल्हापूर नजीक पन्हाळा येथे होती. राजा स्वतः गोविंदभट यांना भेटण्यासाठी कशेळी गावात आल्याचा उल्लेख ताम्रपटात आहे. राजाने इथे येऊन समुद्रस्नान करून श्री कनकादित्याचे दर्शन घेतल्याचा उल्लेखही त्यात आहे. गोविंद भट यांनी लावून दिलेले मंदिर व्यवस्थापन आणि इतर कार्ये यामुळे राजा आनंदित झाले, त्यांनी गोविंद भटांना कशेळी गाव इनाम म्हणून दिले. इतकेच नव्हे तर मंदिराच्या पूजेअर्चेचा खर्च, बारा ब्राम्हणांना दोन वेळेची शिधा यासाठी सरकारी तिजोरीतून कायमस्वरूपी वार्षिक बत्तीस रुपयांची तरतूदही करण्यात आली. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हे वार्षिक बत्तीस रूपये आजही महाराष्ट्राच्या महसूल विभागातर्फे तलाठ्यामार्फत मंदिराला पोच केले जातात.
१९९८ साली मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या प्रमुख डॉ. गौरी माहुलीकर यांनी या ताम्रपटातील ही माहिती उजेडात आणली.
या मंदिरात दोन प्रमुख उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. कार्तिक शु. एकादशीला २४ तास सलग भजनाचे आयोजन करण्यात येते. माघ शु. सप्तमीला आठवडाभर जत्रा, पालखी सोहळा, धार्मिक विधी, किर्तन यांचे आयोजन करण्यात येते. मंदिराचा सभामंडप पाचसहा वर्षांपूर्वी नव्याने बांधण्यात आला आहे. लाकडावर स्थानिक कारागिरांनी अतिशय सुंदर काम केले आहे. सभामंडपातील छतात बसवलेले झुंबर सभामंडपाच्या सौंदर्यात अधिकच भर घालतात. मुंबईचे प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व, मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेठ यांनी पुत्रप्राप्ती प्रित्यर्थ मंदिराला सढळ हस्ते मोठी आर्थिक मदत केली होती. गर्भगृहाच्या छतावर तांब्याचा पत्रा चढविण्यात आला. मुख्य मंदिरासमोर, श्री विष्णू आणि श्री महादेव यांची छोटी मंदिरे आहेत. मंदिरासमोर पश्चिमेकडील प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. मंदिर सुंदर, स्वच्छ, मनाला समाधान देणारे आणि एकदातरी अवश्य भेट द्यावी असे आहे.
भारतातील मूर्ती असलेले एकमेव सूर्यमंदिर आपल्या कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी गावात आहे. चला...! या भटकंतीच्या निमित्ताने असे कितीतरी अप्रकाशित खजिने उजेडात येत आहेत ज्याचा आम्हाला थांगपत्ताच नाही.
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
_विजय सावंत
स्थळभेट- १५/०२/२०२२
#kanakadityamandir #kasheli #ratnagiritemple






मस्तच विजय.
ReplyDeleteपाणी काढण्यासाठी मोट अजून एका मंदिरात होती, मला आठवतेय तुझ्या अगोदरच्या लेखातील संदर्भातून. 🙏🙏👍
हो! आडिवरे येथील श्री महाकाली मंदिराच्या आवारात, मनःपूर्वक धन्यवाद मित्रा! तू माझ्या सर्वच पोस्ट मन लावून वाचतोस त्याबद्दल तुझे आभार!
Deleteबरे वाटले.
ReplyDeleteमाझे हे अत्यंत फेवरीट मंदिर आहे ते तांब्याच्या पत्र्याचे छत, ती विहीरीवरील मोट, समुद्र सानिध्य आणि काळजीपूर्वक तासलेल्या जांभ्याच्या भिंती. पूर्वी अशी कामे गोव्यात होत असत. पण, रत्नागिरी परिसरात दुर्मिळच.
पुन्हा पुन्हा ओढ लावणारे स्थळ.
धन्यवाद साहेब 🙏
एक नम्र विनंती आहे की, जाहिरातीमुळे लिहिले जात असलेले शब्द दिसत नाहीत. बंद केल्यावरही पुन्हा पुन्हा जाहिरात येते आणि व्हिजन पूर्णपणे अंधारात जाते. त्यामुळे अंदाजे लिहावे लागते. काहीतरी उपाय केल्यास आभारी राहीन.🙏
मनःपूर्वक धन्यवाद! जाहिरातीची बाब लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद! वाचकांना वाचताना जाहिरातींचा त्रास होणार नाही अशी सेटींग आता करण्यात आली आहे.🙏🏻
Delete