आणि बरंच काही- आमुची मायबोली मराठी
आमुची मायबोली मराठी
आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जे मराठी असूनही ज्यांचा मराठीशी काही संबंध नाही त्यांच्यासाठी हा मुद्दा गौण असेल, पण ज्यांनी मराठी भाषेचा अभ्यास केला आहे, मराठी साहित्य वाचले आहे, ज्यांच्या नसानसांत मराठी भिनलेली आहे, मराठी मातीत जे रुजलेले आहेत त्यांच्यासाठी तर हा कळीचा मुद्दा आहे. अगदी इ.स.पूर्वीपासून जिचे अस्तित्व आहे, थोर संत महात्म्यांच्या विचारांनी जी समृद्ध झाली आहे, मान्यवर लेखक कवी, कवयित्री यांच्या लेखणीतून नटलेली आहे अशी माझी मायबोली सर्व निकष पूर्ण करूनही अधिकृत घोषणेची वाट बघत उभी आहे. मूळातच जी अभिजात आहे तिला आणखी कुणी दर्जा देणं म्हणजे सुर्याला कांकण दाखवण्याचाच प्रकार आहे. तरीही राजदरबारात दखल घेतली गेल्यास भविष्यातील आणखी समृद्धीकडे जाणारी तिची वाट प्रशस्त होणार आहे. राजदरबारात हा प्रश्न कधी ना कधी निकाली निघणार आहे. पण लोकदरबाराचं काय...! मराठी शाळा कशातरी तग धरून आहेत. रोजच्या बोलण्यात कितीतरी अनावश्यक इंग्रजी शब्द पुढे पुढे येत असतात. काहींना तर मराठी बोलण्याची लाज वाटते.
मराठी ही एक समृद्ध भाषा आहे. प्रा. हरी नरके यांच्या सिद्धांतानुसार मराठी ही इ. स. पूर्वीपासून असलेली भाषा आहे. त्यांच्या मते महाराष्ट्री ही प्राचीन मराठी, तिच्यातूनच शौरसेनीचा जन्म झाला. शौरसेनीपासून कालांतराने मागधी व पैशाची या दोन भाषा निघाल्या. मागधी व पैशाची ही दोन्ही मराठीची प्राचीन रूपे. सातवाहन राजा हाल याच्या काळात इ.स. पहिल्या शतकात ‘गाथा सप्तशती' हे लोकवाङमय संकलित करण्यात आले. त्यावेळच्या महाराष्ट्रातील लोकजीवनाच्या विविध पैलूंचा आविष्कार त्यात आहे. पुढे भाषा विकसित होत गेली. श्रवणबेळगोळ, अक्षी, सातारा, सोलापूर येथे सापडलेल्या ताम्रपटात, शिलालेखांत मराठी वळणाचे शब्द दिसून येतात. तेराव्या शतकात म्हाइंभट यांनी लीळाचरित्रच्या रूपाने पाया रचला, त्याच शतकात ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सामान्यजनांसाठी मराठीत लिहिली. त्यानंतर एक मोठी संतपरंपरा महाराष्ट्राला लाभली. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी राज्याची मुहूर्तमेढ रोवली. पेशव्यांनी मराठी थेट अटकेपार नेली. १९४७ साली भारत स्वतंत्र झाल्यानंतर मराठी ही भारताची एक भाषा म्हणून तिला दर्जा देण्यात आला. १९६० साली महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर मराठी ही या राज्याची अधिकृत राजभाषा बनली.
मराठी भाषेच्या समृद्धीत ज्यांनी मौलिक भर घातली त्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीचं औचित्य साधून महाराष्ट्र सरकारने २७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्यात यावा असे ठरवले. हा गौरव फक्त एका दिवसा पुरता नको. मराठी भाषेचा गौरव कशात आहे हे ज्या दिवशी समस्त मराठीजनांना उमजेल तो खरा ‘मराठी भाषा गौरव दिन.'
सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
आमुची मायबोली मराठी
अकार आकार संस्कार
काना मात्रा वेलांटी
इकार उकार हुंकार
भाग्य थोर ललाटी
अमृतातेही पैजा जिंके
आमुची मायबोली मराठी
ओवी ती ज्ञानेशाची
अभंगवाणी तुकयाची
सुश्लोक वामनाचा
आर्या मयुरपंतांची
नावे घ्यावी किती कशी
धन्य ती जाहली मराठी
लाभला सहवास थोरांचा
जाहली समृद्ध हो मराठी
तारे अढळ दिग्गज
उजळले मराठीयेचे क्षितिज
रोवला अटकेपार ध्वज
उभे दिमतीला कुसुमाग्रज
उभी जगी या अभिमानी
लेवूनी अलंकार भाषासुंदरी
तरीही का घरघर घरी
अजुनी का उभी दरबारी...?
आमुची मायबोली मराठी
आमुची मायबोली मराठी
_विजय सावंत
२७/०२/२०२२


लेखन खूप छान,
ReplyDeleteमी मराठी असल्याचा अभिमान 👍
मनःपूर्वक धन्यवाद!
DeleteKhup chhan mahiti. Pictures khup chhan
ReplyDeleteधन्यवाद महेश!🙏🏻
Deleteछान आणि औचित्यपूर्ण लेख. 👌🏻
ReplyDeleteमर्हाटी भाषेचा इतिहास उलगडून दाखवल्याबद्दल धन्यवाद. 🙏
नकारात्मक उहापोहाची कडू गोळी नसती तर मर्हाटी भाषेचा सण अधिक गोड झाला असता.
उपरोक्त कविता यापूर्वी वाचलेली स्मरते.
बाकी, तुम्ही नेहमीच सुंदर लिहिता. 🙏
धन्यवाद जय!🙏🏻
Deleteछान लेख विजय 🙏🙏
ReplyDeleteजेव्हा जेव्हा भारतात परततो तेव्हा हा अभिमान जास्त होतो आणि मग जो भेटलो त्याला मराठी करून टाकतो अगदी शिव्यानसकट. 😃
धन्यवाद मित्रा! मी समजू शकतो तुझ्या भावना! अस्सल मराठी गडी!👍🏻
Delete