कवडसा- आडवाटेवरचा खजिना-२१ ऐश्वर्येश्वर मंदिर, सिन्नर
आडवाटेवरचा खजिना- २१
श्री ऐश्वर्येश्वर मंदिर
सिन्नर, जिल्हा- नाशिक
भारतासाठी तरी ओमिक्रॉन हा फुसका बार ठरला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दोन वर्षे त्या कोविड १९ ने नको जीव करून सोडले होते. कुठे जाता येत नव्हते कुठे मनासारखे फिरता येत नव्हते. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्रत्येक घरात डोकावून झाल्यानंतर जानेवारीच्या पंधरा तारखेनंतर त्याने जवळजवळ निरोपच घेतला की काय असे वाटू लागले आहे. चला! जीवन पूर्वपदावर येतंय, चांगली गोष्ट आहे. त्यातूनच २८ जानेवारी रोजी शिर्डीला जायचे नक्की झाले. अगदी निर्विघ्नपणे साईबाबांचे दर्शन घेता आले, साई निवासातील मुक्काम आणि साई प्रसादालयातील प्रसाद, यामुळे तो संपूर्ण दिवस साईमय झाला होता.
दुसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासात सिन्नर येथील गोंदेश्वराचे मंदिर पाहायचे असे ठरवले. शिर्डी - मुंबई मुख्य रस्त्यापासून जेमतेम किलोमीटर अंतरावर असलेल्या या मंदिराच्या दारात गाडी थांबवली खरी, पण प्रवेशद्वाराजवळ लावलेल्या फ्लेक्सबोर्डावरील सूचनेने आमची पार निराशा केली. गेली कित्येक वर्षे गोंदेश्वराचे मंदिर पाहायची इच्छा मनात बाळगून होतो. त्यामुळे गोंदेश्वराच्या प्रवेशद्वारातून माघारी फिरताना माझ्या मनाची अवस्था काय झाली असेल ते मलाच माहीत. तरीही त्या ओबडधोबड माळरानावर एखाद्या उंच जागेवर जाऊन त्याचे फोटो काढण्याचा मोह काही आवरता आला नाही. त्या अद्भूत सौंदर्याने माझी ब्रम्हानंदी टाळी आधीच लागली होती, नजरेतून इंच इंचही सुटू नये इतकी अप्रतिम कलाकृती. जमतील तसे फोटो घेतले आणि लवकरच मी पुन्हा येईन अशी मनाशी खूणगाठ बांधून तेथून जवळच असलेल्या ऐश्वर्येश्वराच्या मंदिरासमोर गाडी थांबवली.
गोंदेश्वर मंदिर त्यादिवशी उघडे असते तर कदाचित ऐश्वर्येश्वराचं हे मंदिर पाहायचे राहून गेले असते. पण आडवाटेवरील आडवाटेवर गवसलेला हा खजिनाही अप्रतिम.
पहिल्याच नजरेत मंदिर हृदयात जागा करते. अतिशय सुंदर आठ नक्षीदार खांबांवर तोललेला सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे हे परिपूर्ण मंदिर आहे. गाभाऱ्यात पिंड आणि समोर सभामंडपात नंदी आहे. या खजिन्याच्या सभामंडपाचा प्रत्येक खांब हा नक्षीकाम केलेला अस्सल दागिना आहे. त्यावर देवदेवता, यक्ष, नृत्यांगना कोरण्यात आल्या आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर बारीक कलाकुसरीने कोरलेलं सुंदर मकर तोरण लक्ष वेधून घेते. त्यात नृत्य करणारा शिव आहे. शिवाच्या वर पद्मासनातील लक्ष्मी आहे. गर्भगृहाच्या बाहेरील बाजूवर सुंदर शिल्पे आहेत. गर्भगृहाचे शिखर अस्तित्वात नाही, फक्त शिखराचा खालचा भाग तेवढा शिल्लक आहे. मंदिराच्या उजवीकडील बाजूची पडझड झालेली आहे. मंदिराचे एकंदरीत सौंदर्य पाहता मला वाटते शिखरावरील नक्षीकाम डोळ्यांचे पारणे फेडणारे होते असणार. असो! जे काही शिल्लक उरलंय तेही खूप सुंदर आहे. मंदिराच्या आगळ्यावेगळ्या वास्तूशैलीवरून हे वास्तूकाम अकराव्या शतकातील असावे असे तज्ञांचे मत आहे.
अंतराळाच्या छतावरील कोरीवकाम
मंदिराभोवती बर्यापैकी जागा राखून ठेवण्यात आली आहे, त्यामुळे तसेच योग्य वेळी ते सरकारी स्मारक म्हणून घोषित करण्यात आले असल्यामुळे नागरिकीकरणाच्या वेढ्यातही गजबजाट आणि अतिक्रमणासून बचावले आहे. शांतता अनुभवता येते. ज्यांच्या wishlist मध्ये गोंदेश्वर मंदिर आहे त्यांनी हे मंदिरही आवर्जून पाहावे. श्री ऐश्वर्येश्वर मंदिर- एक उपेक्षित खजिना.
धन्यवाद! 🙏🏻
_विजय सावंत
स्थळभेट- ३०/०१/२०२२


खुप छान माहिती आणि अप्रतिम छायाचित्रे.
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
Deleteधन्यवाद सर, एक नविन स्थापत्य शिल्पाचा खजिना आमहापुढे सादर केल्याबद्दल !
ReplyDeleteमंदिर स्थापत्य शैलीच्या चर्चेत त्याची वैशिट्ये आली असती तर उत्सुकता अधिक गहिरी झाली असती.
तरीही आपल्या श्रमाला माझा मनापासून कुर्निसात !🙏
मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
Deleteपुरातन मंदिरांच्या वास्तूशैलीची माहिती देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. या आवश्यक सूचनेबद्दल आभारी आहे.
खूप सुंदर मांडणी आणि मंदिर ही अप्रतिम. तुझ्या मुळे मला याची अजून जास्त जाणीव होत आहे.
ReplyDeleteधन्यवाद मित्रा 🙏🙏👍👍
मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
Deleteसुंदर
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!
Delete