आणि बरंच काही- भारतरत्न लता मंगेशकर


             आज सकाळी वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर पहिली बातमी वाचली, ‘लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक’, मनात शंकेची पाल चुकचुकली आणि तासाभरातच ती बातमी आली. काही क्षण सुन्न झाल्यासारखे वाटले. जगातील अतिप्रभावशाली व्यक्तिमत्वांपैकी एक लता मंगेशकर. षण्मुखानंद सभागृहात मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ  आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात लता मंगेशकर यांना याची देही याची डोळा पाहण्याचे आणि ऐकण्याचे भाग्य लाभले. पं. भीमसेन जोशी यांना एखाद्या कार्यक्रमात प्रत्यक्ष ऐकण्याची संधी हातातून निसटून गेली होती, पण मंगेशकर कुटुंबियांचा असा काही कार्यक्रम होतो आहे म्हटल्यावर दादरच्या महाराष्ट्र वॉच कंपनी मध्ये जाऊन मी त्या कार्यक्रमाची तिकिटे मिळवली होती.

         चौथी किंवा पाचवीला(१९८३) असताना शाळेने मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून मुलांसाठी जादूचे प्रयोग ठेवले होते. जादूचे काही प्रयोग करून झाल्यावर जादूगाराने मध्येच एक प्रश्न सर्वांना विचारला, ‘भारताची कोकिळा कोण?', हा प्रश्न त्याने बराच वेळ ताणून ठेवला, इतका की आम्हा मुलांची उत्सुकता वाढली. काही मुलांनी आपापल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण मुलांना त्याचे उत्तर देता आले नाही तेव्हा त्याने स्वतःच दिलेले उत्तर होते- भारत कोकिळा गानसम्राज्ञी लता मंगेशकर. ती ‘लता मंगेशकर' या नावाशी झालेली पहिली ओळख. त्याकाळी घरात रेडिओ असणं हेदेखील श्रीमंतीचे लक्षण समजले जायचे. गाण्याचा संबंध एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात वाजविण्यात येणाऱ्या भोंग्यापुरता. पुढे काळ बदलत गेला तसं भारतीय माणसांचं रहाणीमानही काळाच्या पुढे आमूलाग्र बदलत गेलं. रेडिओ, रेकॉर्ड प्लेयर,  टेपरेकॉर्डर , वॉकमन, टीव्ही, सीडी प्लेअर, सेलफोन, यूट्यूब.... खूप काही बदललं,  बदलला नाही तो लताजींच्या आवाजातील गोडवा. 

         लता मंगेशकर हे नुसते नाव नसून स्वर आणि सुरांचे विद्यापीठ आहे असे म्हटले तर कोणी हरकत घेईल असे वाटत नाही. मला गाण्याची तांत्रिक माहिती नाही पण सूर मात्र कळतात. लताजींची एखादी तान जरी कानावर पडली तरी उत्तेजित, प्रफुल्लित व्हायला होतं. त्यांनी गायलेल्या गाण्यांनी आयुष्यात किती वेळा तृप्ततेचा अनुभव दिला त्याचा हिशोब नाही. मंत्रमुग्ध होणे, तल्लीन होऊन जाणे, ब्रम्हानंदी टाळी लागणे, अंगावर रोमांच उभे राहणे, सूर सूर म्हणतात त्या सुरांत चिंब भिजून जाणे, असे कितीतरी वाक्प्रचार त्यांच्या गायकीला लागू पडतात. गेल्या तीन पिढ्यांच्या मनावर त्यांनी घातलेलं गारूड पुढे कित्येक पिढ्या उतरेल असे वाटत नाही. दैवी आवाज लाभलेल्या या कोकिळेशी नातं तरी कुठलं...? श्रोत्याचं की आत्म्याशी जुळलेलं आत्म्याचं...! आयुष्यातल्या भल्या बुर्या प्रसंगात सोबतीला असलेलं हे नातं त्यांच्या जाण्याची बातमी कळताच डोळे पाणावून गेलं.

   हम तुम्हे यूँ भूला ना पाएंगे! 🙏🏻

_विजय सावंत

#latamangeshkar #vijaysawant


#latamangeshkar

Comments

  1. अभिनंदन विजय, खुप छान लेखआहे.

    ReplyDelete
  2. एक पर्व संपलं, आपलीच पिढी ही उणीव जाणवू शकते फार फार.....
    अलविदा लता दीदी😢💐💐

    ReplyDelete
  3. खूप छान लेख विजय.
    तुला लता दीदी ना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी मिळाली, वाह 👍👍🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment