आणि बरंच काही - फिश पॉयझन ट्री

 फिश पॉयझन ट्री/ बॉक्स फ्रूट ट्री/ समुद्र फळ

वाशीला सेक्टर १९ मध्ये माझ्या एका ग्राहकाकडे कामानिमित्त गेलो होतो. काम झाल्यावर चहा घेण्यासाठी बाजूलाच असलेल्या उपहारगृहात गेलो. आतमध्ये न बसता बाहेर मोकळ्या जागेत ठेवलेल्या खुर्चीवर बसलो. बसत असतानाच लक्ष उपहारगृहाच्या दारात असणार्या वृक्षाने वेधून घेतले. आधी बदामाचे झाड आहे असे वाटले, पण निरीक्षण केल्यावर ते वेगळे वाटले. तसे माझ्या बरोबर जे होते त्यांना सांगितल्यावर, ‘नहीं नहीं वो बदामकाही पेड है।' असं म्हणत त्यांनी आपल्याला झाडात काही रस नाही असं दाखवत चहाच्या रसात लक्ष घातलं. ते झाडाला पाठमोरे बसले होते आणि मी समोर. चहाचे घोट घेत असताना मी झाडाचे बारकाईने निरीक्षण करत होतो. बदाम कुठे दिसतात काय शोधत होतो. बदाम कुठे दिसले नाहीत पण चहाचा कप खाली ठेवेपर्यंत हे बदामाचे झाड नाही इतपत नक्की झाले होते. 

       चहाचे बील देऊन झाल्यावर त्यांना पुढे जायला सांगितले आणि मी माझा मोर्चा  झाडाकडे वळवला. 

       झाड वीसेक फूट उंच होते, लांब आणि रुंद पाने त्यामुळे गच्च भरलेले. झाडाखाली ऊभे राहिल्यास सूर्याची किरणे अंगावर पडणार नाहीत इतकं दाट.

           प्रथमदर्शनी फक्त पानेच दिसत होती. नजर झाडाच्या पानांमध्ये फळ फूल दिसतंय का शोधत होती. झाडाच्या खाली उभं राहून वर पाहिले तेव्हा एक छोटेसे विशिष्ट आकाराचे फळ दिसले आणि खात्री झाली हे कसले तरी वेगळे झाड आहे. झाडाला चारही बाजूंनी न्याहाळायला सुरवात केली तेव्हा वर एक सुंदर फूल दिसले. फूल वर असल्यामुळे फोटो घेता येत नव्हता. त्या झाडावर एकतर हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच फळे होती. फूलही पलिकडच्या बाजूला गेलो तेव्हा दिसले. गुलाबी रंगाचे ते फूल मात्र खूपच आकर्षक होते. त्यामुळे त्याचा जवळून फोटो काढायचा मोह काही मला आवरता आला नाही. कंपाऊंड वॉलवर चढून फोटो घेतला. मी लहान मुलासारखा काहीतरी करतोय असं जाणवत होतं! पण मला ते फूल दिसत होतं त्यामुळे लोकं काय म्हणतील याचा विचार मी नाही केला.

         चला! झाड, झाडाचं फळ आणि फूल हाताला तर लागलं होतं, आता राहिली होती उत्सुकता, हे झाड कोणतं?

        मग काय! गुगल लेन्सने आपलं काम चोख बजावलं. नाव माहीत झालं, गूगल अभ्यास केला आणि एका नवीन झाडाशी परिचय झाला.

          Sea poison tree, Putat, Laut, Butan, Fish poison tree, box fruit tree , समुद्रफळ या नावांनी ओळखलं जाणारं हे झाड Barringtonia asiatica या कुळातील आहे. हिंद महासागरातील बेटांपासून उष्णकटिबंधीय आशिया, इंडोनेशियाच्या समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात आढळणारा सात ते पंधरा-वीस मीटर पर्यंत वाढणारा हा वृक्ष आहे. रस्त्याच्या कडेला दाट सावली आणि रस्त्याच्या सौंदर्य वाढीसाठी खास लागवड केली जाते. मुंबईत मरीन ड्राईव्ह, वाळकेश्र्वर रोड तसेच वरळी सी फेस इथे रस्त्याच्या कडेला ही झाडे मोठ्या प्रमाणात लावण्यात आली आहेत.

         झाडाचे सर्वच भाग विषारी आहेत. फळातील बियांची भुकटी करून ती मासेमारीसाठी वापरली जाते. मासेमारीसाठी वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पध्दतीपैकी ही एक नवीन पध्दत पहिल्यांदा वाचनात आली. भुकटीच्या संपर्कात आल्यामुळे मासे गुंगी आल्यासारखे एकाच जागी स्थिर राहातात त्यामुळे त्यांना जाळ्यात पकडणे सहजसोपे होते. असे मासे खाल्ल्याने त्याचा मनुष्यावर काही परिणाम होत नाही. भारतात ही पध्दत वापरली जाते का हे माहीत नाही. 

         फळाचा आकार एखाद्या गिफ्ट बॉक्ससारखा असतो म्हणून त्याला बॉक्स फ्रूट ट्री असेही संबोधले जाते.  फिलीपिन्स सारख्या देशात फळातील गराचा पोटातील जंतांवर औषध म्हणून उपयोग केला जातो. पोटाच्या इतर विकारांवर व शारीरिक जखमेवर झाडाच्या पानांचा उपयोग काही देशांत केला जातो. कर्करोगासारख्या समस्येवर या झाडाचा काही उपयोग होईल का यावर संशोधन सुरू आहे. झाडाची फळे पडून समुद्राच्या प्रवाहाबरोबर शेकडो हजारो किलोमीटरचा प्रवास करतात, कित्येक वर्षे तग धरून राहू शकतात. एखाद्या किनार्याला लागल्यानंतर माती आणि पावसाचे पाणी मिळाल्यास नव्याने जन्म घेतात.‌ conservation status अजून तरी lc (least concern) आहे. कदाचित विषारी असल्यामुळे असेल....!


धन्यवाद!

©विजय सावंत

०७/०४/२०२०

फोटो- विजय सावंत




#fishpoisontree #boxfruittree #seapoisontree #samudrafal #vijaysawant

Comments

  1. खरा नीसर्गवेडा आहेस ......

    ReplyDelete
  2. छान...वेगळी माहिती👍🏼

    ReplyDelete
  3. छान ! नविन झाडाची ओळख झाली. धन्यवाद सर ! तुमची निरिक्षण शक्ति तीव्र आहे. म्हणूनच तुम्ही यशस्वी लेखक आहात.

    ReplyDelete
  4. खूप छान माहिती संकलन, मांडणी आणि छायाचित्रण. विशेषकरून त्यासाठी केलेली धडपड आणि त्या विषयी असलेली तळमळ

    ReplyDelete
  5. अथ पासून इति. खुप छान माहिती.

    ReplyDelete
  6. सही विजू
    मानलं तुला
    तुझ्यातल्या लहान मुलाला कायम जिवंत ठेव
    आणि असे लेख लिहीत रहा 😊👍

    ReplyDelete

Post a Comment