आणि बरंच काही- जागतिक वसुंधरा दिन

जागतिक वसुंधरा दिन

          २२ एप्रिल, जागतिक वसुंधरा दिन. त्यानिमित्ताने थोडंसं जाणून घेऊया...! का बरं साजरा करत किंवा पाळत असतील जगातील लोक हा दिवस...? अशी काय उलथापालथ झाली जगात की हा दिवस वसुंधरेच्या नावाने पाळण्यात यावा?

          एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आतापर्यंतचे मोठे आणि समस्त मानवजातीवर तसेच वसुंधरेवर दुरगामी परिणाम करणारे शोध लावले गेले, लागले. अभियांत्रिकीच्या सर्वच शाखांचा हा सुवर्णकाळ. माणसाचं जीवन आमूलाग्र बदललं. २९ जानेवारी १८८६, कार्ल बेन्झ यांनी ‘vehicle powered by a gas engine' पेटंटसाठी अर्ज दाखल केला जो ‘Birth certificate of automobile' म्हणून ओळखला जातो. मग काय...! विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जग स्वार झालं या नवीन आविष्कारावर! झपाट्याने वाढणाऱ्या औद्योगिकीकरणाबरोबर इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, रासायनिक, धातू, पेट्रोलियम कारखाने जोमाने उभे राहू लागले. गॅस आणि क्रूड ऑइल मिळविण्यासाठी धडपड सुरू झाली. जगभरात तो एक कळीचा मुद्दा ठरू लागला. कोळसा, धातू मिळविण्यासाठी कित्येक किलोमीटरचे हिरवे पट्टे ओरबाडले जावू लागले. जग नवीन शोधांच्या धुंदीत गुंग होतं.

          विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत काही प्रमाणात ही धुंदी उतरायला सुरुवात झाली. औद्योगिक क्रांतीनंतर तापमानात झालेले बदल प्रकर्षाने जाणवू लागले. संवेदनशील माणसं पर्यावरणात होणारा हा बदल एव्हाना तपासू लागले होते. वातावरणात काही वेगळं घडत होतं. कारखान्यांचं प्रक्रिया न करता सोडण्यात येणारं विषारी रसायन, धूर ओकणार्या मोटरगाड्या, बेलगाम जंगलतोड, आणि अशा कितीतरी पर्यावरणविरोधी बाबींनी आपलं राक्षसी रूप दाखवायला सुरुवात केली होती. त्याचे दुष्परिणाम हळूहळू लोकांच्या लक्षात येऊ लागले. जगाचं प्रतिनिधित्व करू पाहणाऱ्या अमेरिकेत यावर आवाज उठवायला सुरुवात झाली. कोणालातरी पुढे येऊन भविष्यात होणाऱ्या दुष्परिणामांपासून वसुंधरेला वाचवणं गरजेचं होतं. 

       १९६२ साली प्रकाशित झालेल्या ‘सायलेंट स्प्रिंग' या सागरी जीवशास्त्रज्ञ राचेल कार्सन लिखित पुस्तकाने पर्यावरण बदलाची नोंद जगासमोर मांडली. जितक्या झपाट्याने विसाव्या शतकात माणसाने प्रगती केली तितक्याच झपाट्याने पर्यावरण र्हासाला सुरुवात झाली होती. भौतिक सुखाच्या धुंदीतून बाहेर येणं गरजेचं होतं.

          अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्याचे सिनेटर गेराल्ड नेल्सन यांनी सर्वप्रथम पर्यावरणविषयक समस्यांबाबत जागृती निर्माण केली. पर्यावरणाच्या म्हणजेच वसुंधरेच्या संरक्षणासाठी चळवळ उभी केली. हवा, पाणी, वने, वन्यजीव, निसर्ग यांच्या रक्षणासाठी अमेरीकेत मोठा राजकीय दबाव निर्माण करण्यात आला. व्हिएतनाम युध्दाच्यावेळी दिसलेला सरकारविरोधातील युवा शक्तीचा जोश आणि ताकद तसेच १९६९ साली सांता बार्बरा येथील तेलगळतीच्या निषेधार्थ झालेल्या  प्रदर्शनातील पर्यावरण विषयक जागरुकता, पुढील पर्यावरण संरक्षण चळीवळींसाठी वळवण्यात गेलार्ड यशस्वी झाले. औद्योगिकीकरणातील दुसरी भेसूर बाजू समोर येऊ लागली होती आणि त्याचवेळी पर्यावरण संरक्षण चळवळ जोर धरू लागली होती. सिनेटर गेराल्ड नेल्सन यांनी पर्यावरणावर राष्ट्रीय शिकवण देण्याची आपली कल्पना राष्ट्रीय प्रसारमाध्यमांमधून जाहीर केली. रिपब्लिकन पक्षाचे पी टी मॅकक्लोस्की तसेच डेनिस हेज हे देखील या चळवळीत सहभागी झाले.

         या सगळ्याचा परिणाम म्हणून पर्यावरण संरक्षणाचा मुद्दा अमेरिकेच्या राष्ट्रीय राजकीय कार्यक्रमपत्रिकेवर घेणे सरकारला भाग पडले.

         २२ एप्रिल १९७० रोजी पहिल्या वसुंधरा दिनानिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. पर्यावरणाच्या नासाडीविरोधात निदर्शने करण्यात आली. दोन कोटींहून अधिक अमेरिकन यात सहभागी झाले. हजारो महाविद्यालये आणि विद्यापीठांनी निषेधात्मक कार्यक्रम सादर केले. यामुळे तेलगळती, कारखाने आणि उर्जा प्रकल्पांमुळे होणारे प्रदूषण, विनाप्रक्रिया विषारी पदार्थ वातावरणात सोडणे, किटकनाशकांचा वाढता वापर, जंगलांचा आणि वन्यसृष्टीचा नाश या सर्वांच्या विरोधात स्वतंत्रपणे लढणार्या  छोट्या छोट्या गटांच्या लक्षात आले की आपण सारे एकाच उद्दिष्टासाठी लढत आहोत. क्वचितच दिसणारे राजकीय पक्षांचे ऐक्य या निमित्ताने पाहावयास मिळाले. रिपब्लिक आणि डेमॉक्रॅटनी वसुंधरा दिनाला पाठिंबा दिला. तसेच समाजातील सर्वच थरातून मिळालेल्या पाठिंब्याच्या जोरावर पहिल्या वसुंधरा दिनी ‘युनायटेड स्टेट्स एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सी' ची स्थापना करण्यात आली. तसेच स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि नामशेष होऊ पाहणाऱ्या प्रजातींसाठी कायदे करण्याचा मार्ग मोकळा झाला. पहिला वसुंधरा दिन यशस्वीपणे पार पडला.

          वसुंधरा दिन चळवळीतील आतापर्यंतचे महत्वाचे टप्पे.


१९७०- पहिला वसुंधरा दिन

१९९०- अमेरिकेपर्यंत सीमित असणारी ही चळवळ १९९० मध्ये जागतिक झाली. या वसुंधरा दिनी १४१ देश आणि वीस कोटींहून अधिक लोकांचा सहभाग हे वैशिष्ट्य. याच साली वस्तूंच्या पुनर्वापराला चालना देण्यासाठी खास अभियान राबविण्यात आले.

(Recycling) दोन वर्षांपूर्वी अमेरिकेत राहाणार्या माझ्या मैत्रिणीने तिच्या मुलीच्या लहानपणीच्या हातातल्या बांगड्या तिला होतं नाही म्हणून फेकून न देता माझ्या मुलीसाठी दिल्या. कौतुक वाटलं मला तिचं. ही संवेदनशीलता भारतात रुजणं गरजेचं आहे.


१९९२- रिओ दि जानेरो येथे संयुक्त राष्ट्रसंघाकडून वसुंधरा शिखर परिषदेचं आयोजन.


१९९५- सेनेटर नेल्सन यांचा त्यांच्या पर्यावरणविषयक जागृतीसाठी करण्यात आलेल्या कार्याचा यथोचित गौरव राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन  यांनी ‘स्वातंत्र्याचे प्रेसिडेन्सियल पदक' हा अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन केला.


२०००- जागतिक तापमानवाढीचा विषय केंद्रस्थानी घेण्यात आला. १८४ देशांतील ५ हजार पर्यावरणवादी गट आणि कोट्यावधी लोक सहभागी झाले. सर्वांना संघटित करण्यासाठी इंटरनेटचा वापर करण्यात आला.


२०१०- कार्बन उत्सर्जनात कपात करणे आणि त्यासाठी शाश्वत स्वरूपाचे पाठबळ मिळवून देणे या उद्देशाने ‘अ बिलियन ॲक्टस ऑफ ग्रीन' मोहीम सुरू करण्यात आली.


२०१२- वसुंधरा दिनानिमित्त १९२ देशातील १ अब्जाहून अधिक लोक बिजिंग येथे एकत्र आले. जेम्स कॅमेरॉन यांनी यांनी दहा लाख झाडे लावण्याचा संकल्प केला.


अर्थ डे नेटवर्क (EDN)

पहिल्या वसुंधरा दिनाच्या आयोजकांनी अर्थ डे नेटवर्क ची स्थापना केली. जगभरात पर्यावरण विषयक जागरुकता निर्माण करणे , त्यासंबंधी कामांना गती देणे, जगभरातील चळवळींचे प्रमुख आणि कार्यकर्ते यामध्ये समन्वय साधने तसेच या चळवळीशी संबंधित सर्वांमध्ये आपापसात माहितीची देवाणघेवाण करणे  हे मुख्य उद्देश होते.

          वसुंधरेच्या भल्यासाठी करू तितकं कमीच आहे. कारण आजही तिला ओरबाडू पाहाणारे काही कमी नाहीत. भ्रष्ट राजकीय व्यवस्थेचा सर्वात मोठा फटका जर कुणाला बसत असेल तर तो वसुंधरेला. जगभरात त्याविरोधात आवाज उठवला गेला, उठवला जातो आहे, भविष्यातही उठवला जाईल. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी लढणार्यांचीही कमी नाही.  पण मागल्या शतकात वसुंधरेचं झालेलं नुकसान भरून काढणं सोपं नाही. 

           विकास हवा पण तो भकास करणारा नको. विकास हा गरज आणि निसर्ग यांच्यात संतुलन साधणारा तर हवाच हवा पण माझ्यासारख्या निसर्गप्रेमींसाठी निसर्गाला झुकतं माप देणारा हवा.

          मित्रांनो! या वर्षीची थीम आहे, ‘रिस्टोअर अवर अर्थ.' या थीमच्या नावातच खूप काही दडलंय. चला! या निमित्ताने आपणही संकल्प करूया! 


मी

* आयुष्यात कमीतकमी दहा झाडे नक्कीच लावेन.

* वस्तूंच्या पुनर्वापराचा आग्रह धरेन

* पर्यावरणाचा मोठा शत्रू प्लास्टिकचा वापर टाळेन.

* माझ्याकडून पर्यावरणाचं नुकसान होणार नाही याची काळजी घेईन तसेच त्याच्या भल्यासाठी माझा खारीचा का होईना, वाटा मी उचलेन.


शेवटी एवढंच म्हणेन!


वसुंधरा तुझे ऋण फिटणार नाही 

तूच कर्तीधर्ती तूच सर्वकाही

मंगलमय चराचर सर्व दिशा दाही

तूच सृजन तूच जीवन तूच प्रवाही

वसुंधरा सुंदरा मनोहारी 

वंदितो तुजं मी हे ऋतुकारी!


(माहिती स्त्रोत- विकासपिडीया/ गूगल)

धन्यवाद!🙏

विजय सावंत

फोटो- विजय सावंत









ता. क.

       सौजन्य- गूगल


     ता. क. - मंडळी! जागतिक वसुंधरा दिन २०२३ साठी पुन्हा तीच गेल्या वर्षीची संकल्पना (Theme) जाहीर करण्यात आली आहे. ‘Invest in our planet', या पृथ्वीवर राहाणार्या प्रत्येकाच्या मनात ही संकल्पना बिंबवली गेली तर तर आपण सारे अक्राळविक्राळ रूप घेऊ पाहत असलेल्या जागतिक तापमानवाढीला थोपवू शकू असा विश्वास मला वाटतो.

         सौजन्य - गूगल


          २०२५ साठीची संकल्पना- Our power our planet
     सौजन्य- गूगल

#जागतिकवसुंधरादिन #internationalearthday

Comments

  1. छान माहितीपूर्ण लेख, मस्त.
    सर्वानीच एकत्र समजुन घेउन कर्म करणे खुप महत्वाचे.

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻

      Delete
  2. वसुंधरा दिनाच्या चळवळीत भारत दिसत नाही. भारतात पृथ्वीची एवढी उपेक्षा का ?
    भारतीय तर धरित्रीला माता, जननी म्हणतात. सीतेचा जन्मच धरतीतून झाला आणि शेवटही. जमिनीच्या पोटातील पाण्याचा प्रचंड उपसा, जंगलतोडीमुळे होणारी मातीची झिज, कॉंक्रीटीकरणामुळे पावसाच्या पाण्याच्या पुर्नभरणाला होणारा अटकाव, दुषित रसायनामुळे जमिनीचे होणारे विषारीकरण. मन उद्विग्न झाले. सकाळी उठल्यावर जमिनीला पाय लावण्यापूर्वी तीची क्षमा मागणारा मी, इतका निर्दयी कसा बरं झालो ?
    विजय सावंत सर, तुमच्या लेखामुळे थोडं का होईना पण अंतर्मुख केले.
    धन्यवाद 🙏⚘

    ReplyDelete
  3. छान!... खूप विचार करायला लावणारा आणि समाज प्रबोधन करणारा लेख... 👌🏻👌🏻👍

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻

      Delete
  4. वसुंधरा वाचवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न सजग असणाऱ्यांनी तरी करायलाच हवेत.
    आम्हीही आमच्या "आम्ही स्वच्छंदी फौंडेशनच्या" माध्यमातून वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व इतर कार्यक्रम राबवून आमचा खारीचा वाटा उचलत आहोत
    झाडे लावा झाडे जगवा पेक्षाही झाडे वाचविण्यासाठी अधिक प्रयत्न व्हायला हवेत. वणवा ही फार मोठी समस्या आहे, , त्यावर काही उपाययोजना करता येईल का? यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे.

    एक खटककलेला मुद्दा

    वसुंधरा चळवळीतील महत्वाचे मुद्दे अंतर्गत जो १९९० चा recycling चा उल्लेख झाला आहे व अमेरिकन मैत्रिणीने तिच्या मुलीच्या न होणाऱ्या बांगड्या माझ्या मुलीला दिल्या असं कौतुक करताना भारतात ही संवेदनशीलता (संकल्पना) रुजली पाहिजे असे म्हंटले आहे

    भारतात तर ही आधीपासूनच आहे
    युज एन्ड थ्रो हे पाश्चिमात्त्यांकडून आपल्याकडे आले. आपल्याकडे पूर्वापार मोठ्या कडून छोट्याकडे अगदी नातेवाईक यांपासून शेजाऱ्यांपर्यंत अशी देवाणघेवाण होत आली आहे.

    मध्यमवर्गीयांमध्ये तरी नक्कीच आहे. ‌

    ReplyDelete
    Replies
    1. https://k3marathi.blogspot.com/2020/04/blog-post_27.html

      Delete
  5. खूप छान!... हल्ली बरेचसे दिवस साजरे होतात पण ते का?... ह्याची तुमच्या या लेखाप्रमाणे कारणमिमांसा कळली तर त्याचे महत्त्व आणखी लक्षात येईल.. 🙏w

    ReplyDelete
  6. जागतिक वसुंधरा दिन हे इंग्रजीचे शब्दश: भाषांतर प्रचलित झालयं हे अस्वस्थ करतं. अभिजात भाषा म्हणून ओळख असलेल्या मराठी भाषेत स्वतंत्र शब्द तयार करण्यास भाषाप्रभु सावरकर नसल्याच जाणवतंय. दुसरी बाब वसुंधरेचा परिपेक्ष जागतिकच असणार आहे. भारताची वसुंधरा, अमेरिकेची वसुंधरा, आफ्रिकेची वसुंधरा असे वेगळेपण कसे असेल बरं ? त्यामुळे फक्त वसुंधरा दिन इतकाच शब्दप्रयोग जागतिक ठरत नाही काय ?
    समुद्र वसने देवी ।
    पर्वतस्तन मंडिते ।
    विष्णुपत्नी नमस्तुंभ्य ।
    पादस्पर्श क्षमस्वे।।🙏🏻

    ReplyDelete
    Replies
    1. पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे वसुंधरा दिन हा फक्त अमेरिकेपर्यंत मर्यादित होता. त्याचं महत्त्व लक्षात आल्यावर एकेक देश त्या अभियानाशी जोडला गेला. आज ते अभियान जागतिक झालं आहे.

      Delete

Post a Comment