कवडसा- आडवाटेवरचा खजिना- १०, रामटेक

 आडवाटेवरचा खजिना - १०

रुद्र नरसिंह, केवल नरसिंह मंदिर (राष्ट्रीय संरक्षित स्मारक)
सिंदूर बावली ( राष्ट्रीय संरक्षित स्मारक)
त्रिविक्रम मंदिर (राष्ट्रीय संरक्षित स्मारक)
गड रामटेक, जिल्हा - नागपूर

       बल्लारशाचं काम रात्री उशिरा संपल्यामुळे त्याच दिवशी मुंबईला परत निघण्याचा बेत रद्द करावा लागला होता. दुसर्‍या दिवशी मुंबईला निघावे लागणार होते. रात्री ८.५० च्या सेवाग्राम शिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. मध्यरात्री साडेबारा वाजता नागपूरात पोहोचलो, मुक्काम केला. एक उजेडी दिवस हातात होता. झोपण्यापूर्वी आडवाटेवरील खजिना मनात नक्की झाला होता.
       सकाळी लवकर उठून नागपूर सोडलं. नऊ वाजता रामटेक बसस्थानकावर उतरलो. साधंसुधं बसस्थानक. महाराष्ट्रातील इतर बसस्थानकांसारखं. बसमधून खाली उतरून  एका व्यक्तीकडे गडावर कसे जायचे याबाबत चौकशी केली. चौकशी केल्यावर समजले; ऑटोरिक्षा थेट गडावर जाते, तसेच पायी चालत जाणाऱ्या भक्तांसाठी पाचशे पायर्‍यांची दगडी वाट बांधण्यात आलेली आहे. मी दगडी वाटेने पाचशे पायर्या चढायचे ठरवले. तसे रिक्षावाल्याला सांगितल्यावर त्याने मला गडावर जाणाऱ्या दक्षिणेकडील वाटेवर सोडले. मी गड चढायला सुरुवात केली. त्या डोंगरावरावरचे ते श्रीराम गडमंदिराचे प्रथम दर्शन भव्य वाटले. गडावर जायला दक्षिणेकडच्या बाजूने दोन, पूर्व व उत्तरेकडून एकेक वाट आहे. तसेच दक्षिण पूर्वेकडून चढून उत्तरेला जैन मंदिराकडे उतरणारा गाडीरस्ता आहे, जो श्रीराम मंदिराच्या पायथ्याला स्पर्शून जातो.
       त्या गडपायरीचा आनंद लुटत, रामटेक परिसर न्याहाळत अर्ध्या तासात मी गडावर पोहोचलो. गडावर पोहोचताच लक्ष वेधून घेतले ते तिथल्या सकाळी सकाळी फ्रेश असलेल्या वानरसेनेने. धमाल मस्ती चालली होती त्यांची. एकमेकांचा पाठलाग करणारी टोळी... कुणी वाळूत तोंड लपवून बसलंय... कुणी मधेच कोलांट्याउड्या मारतोय... तर कुणी दगडावर पाय ठेऊन ऐटीत बसलाय... तर कुणी झाडीत फळे खाण्यात दंग... जणू काही ती सकाळ आणि तो परिसर त्यांचाच होता, अशी ती धमाल मस्ती आधी डोळे भरून पाहिली आणि नजर वळवली या खजिन्यावर.
           या खजिन्याकडे वळण्याआधी आपल्याला थोडं इतिहासात जावं लागणार आहे, जास्त मागे नाही पण तिसऱ्या शतकात.
 सातवाहन साम्राज्याचा अस्त आणि चालुक्य राजवटीचा उदय यांच्यामधे या राजघराण्याने महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान मोठं आहे. त्यांच्या स्थिर आणि शांतीप्रिय कालखंडात  साहित्य, विद्या, शिल्प, काव्य व इतर कलागुणांना चांगलाच वाव मिळाला. 
   चार अश्वमेध यज्ञ करणारा बलाढ्य सम्राट प्रवरसेन...
चंद्रगुप्त द्वितियशी मैत्रीपूर्ण संबंध जोडणारा रुद्रसेन...
युधिष्ठिर आचरणासाठी ख्यात असलेला शांतीप्रिय पृथ्वीसेन...
गुप्तसम्राट द्वितीय विक्रमादित्यची मुलगी आणि या साम्राज्याची सून प्रभावतीगुप्तच्या काळात पुत्र प्रवरसेन द्वितीयच्या संरक्षणात महाकवी कालिदासांनी निर्मिलेले महाकाव्य मेघदूत...
पाचव्या शतकात प्रवरसेन द्वितीयने लिहिलेले प्राकृत सेतुबंध...
सर्वसेनने लिहिलेले हरिविजय...
असा समृध्द वारसा लाभलेल्या नंदिवर्धन( नगरधन, रामटेक) राजधानी असलेल्या आणि विंध्यशक्तिने स्थापिलेल्या विदर्भातल्या या राजघराण्याचे नाव आहे ‘वाकाटक राजघराणे'. विदर्भाचा त्रिशतकी सुवर्णकाळ.
              रामटेक परिसरात आजही या साम्राज्याच्या समृध्दीच्या खुणा जागोजागी दिसतात. अजंठा येथील लेणी मोठ्या कालखंडात कोरली गेली, येथील १६,१७,१९ क्रमांकाची लेणी आणि घटोत्कच लेणी वाकाटकांच्या काळातली. वाकाटक नरेशाचा मंत्री वराहदेव याने ही लेणी इ.स. पाचव्या शतकात कोरून घेतली होती. तसा शिलालेख आढळतो. वाकाटकांच्या या योगदानामुळे अजिंठा लेण्यांना वाकाटक लेणी असंही संबोधलं जातं.   
      रामटेकच्या डोंगरावर असलेली ही वाकाटककालीन रुद्र नरसिंह आणि केवल नरसिंह मंदिरं महाराष्ट्रातील सर्वात जुन्या मंदिरांपैकी आहेत. जमिनीपासून एक मीटर उंचीच्या प्रस्तर आयताकृती जोत्यावर मंदिराची रचना आहे. मंदिराला गर्भगृह व सभामंडप ही दोन्ही अंगे असून छत सपाट आहे. गर्भगृहात सुमारे ७ फूट उंचीची भव्य, सुबक, ललितासनातली , उजव्या हातात चक्र धारण केलेली नरसिंहाची मूर्ती प्रतिष्ठापिली आहे.
        मंदिराच्या प्रवेशद्वारावर  गणशिल्पांचे अंकन असून गर्भगृहातील सभामंडपातील स्तंभावर पद्मबंधयुक्त कमलाकृत व भौमितिक प्रकारचे अंकन आहे. हे अंकन अजिंठा लेण्यांशी जुळणारे आहे. इसवी सन १९८१ मध्ये पुरातत्व विभागाच्या जतन दुरुस्ती कार्यात वाकाटक सम्राज्ञी प्रभावतीगुप्त हिचा ब्राम्ही लिपीतील अभिलेख प्राप्त झाला आहे. या अभिलेखावरून या मंदिराचा काळ साधारणतः इसवी सन ४२० ते ४९० असा निश्चित करण्यात आलेला आहे. 
         उपलब्ध माहितीनुसार, लग्नानंतर अल्पकाळातच प्रभावतीगुप्त विधवा झाली, तिने आपल्या दोन मुलांच्या मदतीने वाकाटक साम्राज्य सांभाळले. विक्रमादित्यच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक कालिदास प्रशासक म्हणून नंदिवर्धनला आले, आणि इथेच रामटेकच्या परिसरात जगप्रसिद्ध मेघदूत महाकाव्य घडले. मंदिराला लागूनच महाकवी कालिदास यांचं महाराष्ट्र शासनाने उभारलेले भव्य स्मारक आहे. लांब गोलाकार दर्शनी भिंतीवर कालिदासांच्या काव्यपंक्ती आणि त्याचा अर्थ कोरलेल्या संगमरवरी पाट्या बसविण्यात आल्या आहेत.
         (जेष्ठ लेखिका श्रीमती आशाताई कुळकर्णी यांच्या अभ्यासानुसार कालिदासाचा काळ हा दोन हजार वर्षांपूर्वीचा. त्या म्हणतात, 'संस्कृत कवींनी स्वत:बाबत काहीच माहिती  दिलेली नाही. त्यामुळे नुसत्या दंतकथा. पण रामटेक हाच रामगिरी हे आता सिध्द झालं आहे. वाकाटक, गुप्त घराणे आणि अग्निमित्र ते भोजराजा अशा दीर्घकाळात कालिदास काळ  ठरविता येत नाही. पण कालिदासाचा रामगिरी म्हणजे रामटेक हे विद्वांनांनी मान्य केलं आहे. म्हणून मेघदूताची रचना रामगिरीवरच झाली असे मानतात.')
          स्मारक बघून मी दीडदोनशे मीटरवर असलेल्या सिंदूर बावलीजवळ आलो. इथून डावीकडे एक पायवाट श्रीराम गडमंदिराकडे जाते आणि रस्ता खाली उतरतो जैन मंदिराकडे. सिंदूर बावली हे एक सुंदर रचना असलेले  पाण्याचे प्रशस्त भव्य कुंड आहे. वास्तूशास्त्राचा सुंदर नमुना असलेली ती बावली(बावडी) कॅमेर्‍यात उतरवून मी पुढे निघालो. काही अंतरावर एक पाटी दिसली-त्रिविक्रम मंदिर.
      हीच ती मूर्ती. इथली त्रिविक्रम रूपातील वामनाची भग्न मूर्ती पाहून कवी अनिल यांना स्फुरलेलं प्रसिद्ध दीर्घकाव्य ‘भग्नमूर्ति' आजच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करते.
“भग्नमूर्ति आणि भग्नमंदिर
समोरच आहे तिवर पडके
अवघे चारच पाषाणस्तंभ"( कवी अनिल, भग्नमूर्ति)
      भारतीय संस्कृतीतील परममंगल मूल्यांबद्दल अनिलांना अभिमान होता. भौतिक जगातील विज्ञाननिष्ठेलाही ते जपतात आणि त्या दोहोंचा मेळ आपल्या सामाजिक स्वरुपाच्या कवितेतून घालताना दिसतात. आजच्या या विज्ञानयुगात भारतीय संस्कृतीतील पारंपरिक अंगांना धक्का पोहोचणे अपरिहार्य आहे. परंतु त्या संस्कृतीतील परममंगल आणि उदात्त मूल्ये उध्वस्त होणार नाहीत यासाठी भारतीय माणसाने जपले पाहिजे यावर अनिलांचा कटाक्ष दिसत होता. पण आज अज्ञान आणि स्वार्थ यामुळे हे समाजसंस्कृती मंदिर कवीला भग्न वाटते आहे. हा विचार त्यांनी रामटेक येथील भग्न मूर्तीच्या रुपकातून विशद केला आहे.
         कवीला मानवाच्या स्वार्थांध, चुकीच्या तत्वज्ञानाच्या अधीन जाणार्या वृत्तीचे दर्शन घडते; त्यामुळे मानव अधिक दुबळा, चारही बाजूंनी दबलेला, खुजलेला जाणवतो. स्वत:  सारासार विचार न करता अंधश्रध्देने, चुकीच्या मार्गाने जाणारा जाणवतो. अंधश्रद्धाळू माणूस दुर्बल असतो, अशा माणसाला कवी या भग्नमूर्तीच्या प्रतिकातून त्याच्यातल्या शक्तीचे, अवतारांचे रहस्य उलगडून दाखवतो.

“देखा भगवंत वामनमूर्ति
सांगत रहस्य अवताराचे
असलात जरी आज वामन
वाढ खुंटलेले, कुजलेले
दबले दाबले चार्ही बाजूंनी
तरीही धरा त्रिविक्रम रूप
दाबा पायाखाली बळीकाळाला
सांगण्यास, जणू हाच संदेश
खंडित तरी लढत नित्य
निसर्ग- काळाच्या नाशशक्तींशी
अजून येथे समोरच उभी
भग्नमंदिराच्या, भग्नमूर्ति ही" (कवी अनिल, भग्नमूर्ति)

मित्रांनो! हा ध्यानीमनी नसताना गावलेला खजिना खूप सुंदर आहे. कधी रामटेकला जाणे झाल्यास जरूर पाहावा.
धन्यवाद!
विजय सावंत
स्थळभेट - १६/०१/२०२०
चित्रफीत आणि फोटो - विजय सावंत
               गडमंदिरापर्यंत जाणारी पायरीवाट

               गडमंदिराचे पहिले दर्शन
                सकाळीच ताजीतवानी असलेली वानरसेना
                रूद्र नरसिंह मंदिर
               केवल नरसिंह मंदिर



             गाभाऱ्यात ललितासनात नरसिंहाची भव्य मूर्ती



               महाकवी कालिदास स्मारक




             सिंदूर बावली



             त्रिविक्रम मंदिर



           वामनाची भग्न मूर्ती


#Ramtek #Rudranarsinhamandir #Trivikrammandirnagpur #sindurbawali #vijaysawant

Comments

  1. Vaa, mast Vijay.
    Very nice info and perfect photos

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏

      Delete

Post a Comment