कविता - भास तुझा
भास तुझा
‘तुमने कभी किसी से प्यार किया?' असं ऋषी कपूर विचारतो.
खरंतर असं एखाद्याला विचारणं म्हणजे मलातरी चुकीचं वाटतं. कारण प्रत्येकजण प्रेम करतो. इथं ‘प्रेम' हे मी प्रियकर आणि प्रेयसी यांच्याबाबतीतलं म्हणतोय. बाकी प्रेम हे कुणीही कुणावरही करावं. सांगायचा मुद्दा हा की प्रत्येकजण प्रेम करतो. कुणाचं व्यक्त होतं कुणाचं नाही, व्यक्त होऊनही कुणाचं नाही तर अव्यक्त राहूनही कुणाचं होतं. नुकताच दोन्हीकडून होकार आलेला असतो. सुरवातीच्या काही भेटी होतात आणि मग तिला वारंवार भेटण्याची ओढ वाटू लागते. ते मंतरलेले दिवस असतात आयुष्यातले. ती सतत जवळ असावी असे वाटू लागते. जळी स्थळी काष्ठी पाषाणी तीच दिसू लागते. दिवसभराच्या रहाटगाडग्यात ते शक्य नसते. पण हे वेडच असं असतं, ती जवळ नसते पण दिवसभरात ती भेटत असते.
अशी...
भास तुझा छळतो मला
येते कधीही तुझी स्वारी
लळा तुझा हा असा कसा
स्वप्नातली ही दुनिया सारी
भल्या पहाटे अंगणात
नारायणाची किरणं दारी
तुळशीवृंदावना समोरी
काढी रांगोळी कुणीतरी
धग ग्रीष्माची भरदुपारी
कृष्णसावली कुणी धरी
झुळूक वारा होऊन येई
तुझीच गं ती गोड स्वारी
आकाशाला लेवून लाली
सायंकाळी सागरतीरी
कोरीत वाळूत नाव माझे
खेटून बसते कुणीतरी
रात्रही न उरते माझी
येते स्वप्नात एक परी
मावळतो चंद्र पुनवेचा
एक उरतो माझ्या ऊरी
© विजय सावंत
०४/०४/२०२१
#k3marathi.blogspot.com #vijaysawant #



मस्त लीहीले आहेस....
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!
Delete👌👌👌
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteखुप छान.
ReplyDeleteधन्यवाद!
Delete👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteभास हा आभास नसे हा
ReplyDeleteअस्तित्वाचा वास वा निवास असे हा
🙏🏻
Deleteप्रेम करण सोप असत निभावण कठीण असत.मस्त कविता!
ReplyDelete