आणि बरंच काही- सांताक्लाॅज आणि वासुदेव

  सांताक्लाॅज आणि वासुदेव 

          गेल्या काही वर्षांपासून पाहतोय...नाताळ जवळ आला की सांताक्लाॅज आणि वासुदेव यांची तुलना करणारी पोस्ट प्रत्येक गृपवर येतेच येते. कप्पाळावर हात मारावासा  वाटतो. काय गरज काय मी म्हणतो तुलना करायची. सतत तीन चार वर्षे ही पोस्ट बरोबर नाताळाच्या मुहुर्तावर येतेय..या बिनडोक पोस्टकडे खरं तर दुर्लक्ष करावं...पण याही वर्षी नाताळाच्या चार दिवस आधीपासून ही पोस्ट फिरायला लागली...अन् मग त्यावर लिहावंसं वाटलं. 

          या अशा लोकांमुळेच जगातील सलोख्याचं  वातावरण दुषित होत आहे. मनाचा दिलदारपणा नाहीच. आमचा हिंदू धर्म इतका लेचापेचा नाही की सांताक्लाॅजमुळे त्याच्यावर काही संकट येईल. सर्वांना आपल्यात सामावून घेणारा आमचा धर्म आहे. जगभरातील लोक आज या धर्माकडे आकर्षित होत आहेत. धर्माच्या नावाने गळा काढणार्‍यांना खरंच हा धर्म कळला आहे का? धर्म म्हणजे नक्की काय? हे त्या टुकार पोस्टकर्त्यांनातरी कळालेलं असतं की नाही कोण जाणे. सांताक्लाॅज आपल्या धर्मात प्रिय तर वासुदेव आपल्या. तुलना आलीच कुठून. प्राणी जन्माला आला...वाढत गेला...तिच्या निरनिराळ्या क्षेत्रात वसत गेला...बरं! या वसुंधरेचं नेमकं रूप तरी कोणतं...? कुठे बर्फाने आच्छादलेली...कुठे नुसतीच वाळूची चादर पांघरलेली...कुठे हिरवीगार...तर कुठे पाणीदार. माणूस नावाचा प्राणी तिच्या ज्या भागात वाढत गेला तो तिथला होत गेला. तिथल्या वातावरणाशी जुळवून घेत गेला...त्याचे कपडे, त्याची घरं, त्याचे राहणीमान, सण, उत्सव, परंपरा...ज्याचंत्याचं  युनिक होत गेलं. 

          पुढे दळणवळणाची साधनं वाढली आणि संस्कृतीची सरमिसळ होत गेली. दुसर्‍या संस्कृतीतून मूळ संस्कृतीत आलेल्याने त्या मूळ संस्कृतीशी जुळवून घेणं हा अलिखित( काही देशांमध्ये तो लिखितही असू शकतो)नियम म्हणा किंवा शहाणपण. ते तसं होतंही. नाही झालं तर तो वादाचा विषय होतो. मूळ संस्कृतीला वाटू लागतं आता या बाहेरच्या संस्कृतीने आपल्या संस्कृतीवर घाला घातलाय...इथून प्रॉब्लेम सुरू होतात. हे असं वाटणं काडी लावून जातं. आतापर्यंत जगभराच्या इतिहासात यावरून एवढी युद्धे झाली पण माणूस नावाचा प्राणी त्यापासून काही शिकायला तयार नाही. आज जग अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेत आहे. ते निवळेपर्यंततरी या प्राण्याने 'जैसे थे' राहावं. खरं तर दुसर्‍याच्या संस्कृतीतील काही चांगलं असेल ते घ्यावं, त्यात आनंद शोधावा...काही चुकीचं(त्याच्यापुरतं) वाटत असेलच तर दुर्लक्ष करावं. हा कसला करंटेपणा.  स्वार्थीपणा सोडावा. प्रत्येक धर्म आपल्या जागी थोर आहे. पण काही अर्धवट ज्ञानी कारण नसताना वाद निर्माण करू पाहातात. 

तुम्हाला जागतिकीकरणही हवंय...हो ना?

ख्रिस्ती बांधवांना नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

_विजय सावंत 

२३/१२/२०२४

Comments