आणि बरंच काही - गावचव्हाटा

         गावचव्हाटा

         गाव म्हटलं की भानगडी आल्याच. त्यात बारा बलुतेदार नांदत असतील तर... कुठल्या न कुठल्या वाडीत कधीतरी धूर निघणारच. अशावेळेस  गावचा चव्हाटा उपयोगी पडतो आपापसातील वाद मिटविण्यासाठी. पण कोणी चव्हाट्यावर यायचंच नाही असं ठरवलं तर...तर मात्र धुमसणं सुरुच राहातं. वरवर जरी गाव शांत वाटत असलं तरी...!

          मानमरातब आडवे येतात आणि चव्हाट्याकडे येणाऱ्या वाटा अडवतात. कारण असतं शुल्लक... गैरसमज मात्र भरमसाठ. परिणाम...गावाच्या विकासाला बसलेली खीळ.

         यादवकाळाचा अस्त मुस्लिम आक्रमकांसाठी उदय ठरला. संपूर्ण भारत मुस्लिम आक्रमकांनी काबीज केला. तो काळच तसा होता. मांडलिकत्व स्वीकारा...नाहीतर आक्रमणाला तयार राहा. हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढ्यांनीच या आक्रमणाविरुद्ध  लढा दिला...पुढे सुरू ठेवला. इतरांनी सपशेल शरणागती पत्करली. 

         अशा परिस्थितीत हिंदू नामशेष व्हायला वेळ लागला नसता. हजारो वर्षांपासूनची संस्कृती आणि परंपरा लोप पावल्या असत्या. केवळ केवळ आणि केवळ एका कारणामुळे हे कुठल्याच आक्रमकाला शक्य झाले नाही. हिंदू संस्कृतीची पाळंमुळं इतकी घट्ट, ती कुणालाही उखडून टाकता आली नाहीत. कारण एकच...गावगाडा. पूर्वजांनी गावाची घडी इतकी नीट बसवून दिली होती, ती विस्कटवणं किंवा तिला हात लावणं अशक्यप्राय होतं. म्हणूनच किती शाह्या मुघल, इंग्रज आले तरी ही घडी विस्कळीत करायची कुणाचीही हिंमत झाली नाही. दूर राहून महसूल गोळा करण्यातच त्यांनी धन्यता मानली. सतराव्या  शतकाच्या सुरुवातीस या घडीला हात लावण्याचं पाप होऊ लागलं होतं...परकीय तसेच स्वकीयांकडून. या मातीची पुण्याई थोर...त्याचवेळेस उदय झाला...युगपुरुषाचा.  संधीचा फायदा घेऊन छत्रपती शिवाजीमहाराज यांनी महाराष्ट्र देशाची मोट तर बांधलीच शिवाय गावाच्या घडीवरील धूळ झाडताना ती नव्याने घातली.

        काळ बदलला. आधुनिकीकरणामुळे एकमेकांवर असलेलं अवलंबित्व संपुष्टात आलं. एका क्लिकवर हवं ते दारात आणून सोडणाऱ्या एपमुळे गावगाडा ही डळमळू लागला. आज गाव  नावापुरता उरला. विस्कळीत झाली नाती, वाडी...आणि गावेदेखील.

       सण, समारंभ, उत्सव म्हणजे गावाचं ताजेपण टिकवून ठेवणारी व्यवस्था. गावातील जाणत्यांनी तीकडे दुर्लक्ष केल्यास, तीच मोडकळीस आली तर मरगळलेल्या गावाला त्यातून बाहेर काढणे कठीण. सण उत्सव राहिले दूर, गाव पडतं कोर्टकचेरीत अडकून. 

        महाराष्ट्रातील कित्येक गावं मरगळत चालली आहेत...कोर्टाच्या निकालाची वाट पाहत. 

         चव्हाटा आहे तिथेच आहे. वाटा मोकळ्या होण्याची वाट पाहत.


_विजय सावंत 

25/03/2024

होळी



Comments