कविता - राष्ट्रीय कविता दिवस

राष्ट्रीय कविता दिवस 

         कविता... अशी सहज बाहेर पडत नाही. पंचेद्रियांनी जे काही पाहिलंय, ऐकलंय, अनुभव घेतला आहे त्याचे परिणाम मनावर होत असतात, त्यातूनच मग विचारांची घुसळण सुरू होते.... संवेदनशील मनात. कित्येक दिवस निघून जातात, महिने, वर्षे, काळ निघून जातो...घुसळणीचं रुपांतर घुसमटीत होतं... कविता प्रसवते.

        निसर्गाच्या तुम्ही किती जवळ आहात, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता, त्याची विविधांगी रूपे पाहून तुम्ही किती रोमांचित होता यावर तुमचं आणि त्याचं नातं कसं आहे हे ठरत असतं. जेव्हा त्याच्याशी एकरूप होता, त्याच्या अद्भूत लीलांनी स्तब्ध होता... कविता प्रसवते.

        नाती... जुळतात, वाढतात...बहरतात... आणि दुर्दैवाने तुटतातही. शारद सुंदर चंदेरी रातीत न्हाऊन निघावं... कविता प्रसवते... आणि...घुसमट झाली तरीही कविता प्रसवते.

         अशीच ही एक कविता एका वेगळ्या घुसमटीतून आलेली. घुसमट... समाजाच्या होत असलेल्या अधोगतीतून आलेली. दादर ते ठाणे या अर्धा तासाच्या रेल्वेप्रवासादरम्यान प्रसवलेली. लहान असल्यापासूनच्या वैचारीक घुसळणीतून आलेली.

         एका काव्यस्पर्धेसाठी पाठविली... मी स्पर्धेसाठी कविता पाठविण्याच्या फंदात पडत नाही...उगाच कशाला ‘हात दाखवून अवलक्षण'. पण का कुणास ठाऊक... कदाचित विषय जवळचा, जिव्हाळ्याचा वाटला म्हणून आयुष्यात पहिल्यांदाच... त्यांना दोन किंवा तीन कडव्यांचीच हवी होती पण ओघात माझी चार कडवी झाली. वाटलं होतं  बाद करतील...पण... कवितेने तृतीय क्रमांक पटकावला. तन्वी हर्बल प्रॉडक्ट्स यांच्या वतीने भारतीय स्वतंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन स्पर्धेत कवितेला पारितोषिक मिळाले आणि उगाचच वाटू लागले...साला मैं तो कवी बन गया.


 *भारत माझा देश आहे.* 

समृद्ध झाली माती इथली

होती दिग्गजांची फौज इथे

सातासमुद्रा पल्याड होते

निनादत इथले सूर तिथे


थोरामोठ्यांची परंपरा ती

कळेना आज गेली कुठे

स्वार्थात बुडाले इथले नेते

देश आज हा टाहो फोडे


भारत माझा देश आहे

पण देशाआधी ‘मी' आहे

नैतिकतेची ऐसीतैसी

विस्कटलेली घडी आहे


चला घेऊया शपथ आता

गाऊ देशाची विजयगाथा

फडकत राहो जगात पुन्हा

या देशाची विजयपताका


_विजय भगवान सावंत

०१/१०/२०२३

राष्ट्रीय कविता दिवस 




Comments

  1. हार्दिक अभिनंदन

    ReplyDelete
  2. Congratulations Viju, keep it up

    ReplyDelete
  3. खूप खूप अभिनंदन

    ReplyDelete
  4. हार्दिक अभिनंदनहार्दिक अभिनंदन

    ReplyDelete
  5. हार्दिक अभिनंदन

    ReplyDelete
  6. खूप खूप अभिनंदन!.... अशीच पारितोषिके मिळावीत ही मनापासून इच्छा आणि त्यासाठी नेहमीच शुभेच्छा!... कवितेला पारितोषिक मिळाले,, पारितोषिका साठी ती केली गेली नाही, आणि हेच यशाचे गमक असावे.... 🙏🙏😊

    ReplyDelete
  7. वाहवा, मस्तच विजय. कवितेला अशी दाद मिळाली तर तुला कसे वाटत आहे हे मला नाही कळणार, पण मला खूप आनंद झाला.
    कविता छान प्रसवली आहे 👍👍

    ReplyDelete
    Replies
    1. खरंच छान वाटतंय! धन्यवाद मित्रा!

      Delete

Post a Comment