आणि बरंच काही - वाचे बरवे कवित्व- एक काव्यसंग्रह
वाचे बरवे कवित्व- एक काव्यसंग्रह
आज जागतिक पुस्तक दिन, या विश्वात माणसाचं माणूस म्हणून जे काही वेगळेपण आहे त्यात माणुसकीची भर कोण घालत असेल तर ते आहेत त्याला मिळालेले संस्कार, त्याचबरोबर तितकीच महत्त्वाची पुस्तकं. पुस्तकं नुसतं ज्ञानच देत नाहीत तर कसं जगावं हेदेखील शिकवतात. पुस्तकविश्व हे एक अफाट विश्व आहे. काय नाही इथे...? मी तर चार अक्षरांच्या शब्दांत म्हणेन...आहे इथे... सबकुछ!
एखाद्या टेक्नॉलॉजीचा(online courses) उपयोग करून घ्यायचा झाल्यास किती छान उपयोग करून घेता येतो याचं ‘वाचे बरवे कवित्व' हा काव्यसंग्रह उत्तम उदाहरण आहे. एरवी कोरोना काळात मंद पडलेलं जनजीवन छंद जोपासण्याच्या कामी आलं. रोजच्या रहाटगाडग्यात जिथे माणूस जगणं विसरत चालला होता तिथे छंदांचं काय घेऊन बसलात. पण कोरोनाने ताळ्यावर आणलं. विचार करायला वेळ दिला. या काळात टेक्नॉलॉजीचा वापर करून आपापले छंद जोपासण्यासाठी जणू सर्वच समाजमाध्यमांवरून निरनिराळे अभ्यासक्रम करण्यासाठी आवाहनच करण्यात आलं. त्यातले काही अगदीच टुकार, काही चांगले तर काही आयुष्य बदलून टाकणारे अभ्यासक्रम पुढे आले. त्यापैकीच एक आयुष्य बदलून टाकणारा अभ्यासक्रम... ‘कविता कार्यशाळा.'
‘कार्यशाळेला हजेरी लावून कविता करता येतात का...?' असं म्हणेल बापडा कुणीतरी. खरंच आहे ते...! कवितेचं बीज हे मनात आधी रुजावं लागतं, त्यानंतर कित्येक दिवस ते रुंजी घालत घालत एकदाचं प्रसवतं. आणि कवितेचा जन्म होतो.
कार्यशाळेचा एक फायदा होतो. समविचारी भेटतात. कविता प्रसवली की तीवर संस्कार कसे करावेत यावर जेष्ठ मार्गदर्शकांचं मार्गदर्शन लाभतं. कवितेच्या विविध अंगांची माहिती होते. एकंदरीत काय तर कवितेच्या सखोल विश्वात डोकावता येतं.
खरंतर चारपाच दिवसांचा तो अभ्यासक्रम पूर्ण करायचा आणि आपल्या वाटेला लागायचं....! बास्स...एवढंच वाटलं होतं! पण अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर झूम वर्गाचं रूपांतर व्हाट्सअप वर्गातमध्ये करण्यात आलं आणि सुरू झाला एक नवीन वाटेवरील नवीन प्रवास. कशाचा कशाला थांग लागेल तर शपथ. एकमेकांना अगदीच अनोळखी असले हे नवोदित कवी कवयित्री सुरवातीला थोडेसे गोंधळलेले होते एवढं नक्की. काव्यसफरीवर निघालेली होडी कुठेतरी थोडीशी डळमळू लागतेय की काय असे वाटत असतानाच या समुहातीलच एक श्री. निखिलेश सावरकर यांनी होडीचा सुकाणू आपल्या हाती घेतला. त्यावेळी का कुणास ठाऊक पण होडीचा सुकाणू योग्य माणसाच्या हातात गेला असं वाटलं. एकमेकांना कधीही न भेटलेल्या महाराष्ट्रातील नवोदित कवी/कवयित्रींच्या काव्यसंग्रहाचा प्रवास त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला. वर्धा साहित्य संमेलनात(२०२३) काव्यसंग्रहाचं प्रकाशन करून निखिलेश यांनी समुहातील सर्वांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवला.
काव्यसंग्रहात ज्यांच्या कविता आहेत त्यांच्यापैकी काही कवी/कवयित्रींना वर्धा येथील साहित्य संमेलनात प्रत्यक्ष हजर राहण्याचे भाग्य लाभले. पण सर्वांनाच काही तिथे जाणे शक्य झाले नाही. एकमेकांना कधीही न पाहिलेल्या कवी/कवयित्रींच्या काव्यसंग्रहाचा लोकार्पण सोहळा काल मॉडर्न महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे पार पडला. यावेळी काव्यसंग्रहात ज्यांच्या कविता आहेत ते कवी/कवयित्री आवर्जून उपस्थित होते. पहिल्यांदा सर्वांनी याची देही याची डोळा एकमेकांना पाहिलं. या काव्यसंग्रहात माझ्या पाच कविता आहेत. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या स्मृती कायम लक्षात राहतील.
काय योगायोग आहे बघा, आज जागतिक पुस्तक दिनाच्या मुहूर्तावर पुस्तकाच्या(काव्यसंग्रह) प्रती हाती पडल्या.
धन्यवाद, काव्यगंगा मंच!🙏🏻
सर्वांना जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻
_विजय सावंत
२३/०४/२०२३
जागतिक पुस्तक दिन
९६व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनातून (वर्धा)
पुनर्प्रकाशन आणि लोकार्पण सोहळा, पुणे










सुंदर
ReplyDeleteउमेश पाटील
धन्यवाद मित्रा!
Deleteआपलं साहित्य प्रकाशित होऊन याची देही याची डोळा पाहाणं हा पितृयोग आपल्या भाग्यात आला. त्याबद्दल आपले अभिनंदन !
ReplyDeleteप्रथम कलाकृतीचा जनक म्हणून घेतलेला स्पर्शानुभव शब्दातीत असावा. आपल्या कविता संग्रहाचे मुखपृष्ठ पाहायला आवडले असते. पुनःश्च अभिनंदन, सर !!!💐🙏
मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
Delete