आणि बरंच काही... असंही एक जीवदान

 आणि बरंच काही...!

असंही एक जीवदान 

         रस्त्यात होणारे अपघात माझ्यासाठी नवीन नाहीत. असा एखादा अपघात झाला असेल आणि मी त्याच रस्त्याने जात असेन तर गाडी बाजूला घेतो. अपघातस्थळी येतो. परिस्थितीचा अंदाज घेतो. जर पोलीस आणि अँब्युलन्सला आधीच कोणीतरी कळवलं असेल, एखाद्याने किंवा दोघा तिघांनी  पोलीस येईपर्यंत तिथली परिस्थिती हाताळायला घेतली असेल तर गर्दीत आपला भार न वाढवता मी गाडीत बसतो आणि पुढे माझ्या मार्गाला लागतो. एकदा अहमदाबाद महामार्गावर मुंबईकडे येणाऱ्या रस्त्यावर वसई येथे एका म्हातारीला कारने उडवले होते. जिवंत होती पण विव्हळण्याच्या पलिकडे गेली होती. काहीच हालचाल नव्हती. माझी गाडी मागेच होती. बाजूला लावली. तिच्याजवळ आलो. तोपर्यंत बघे बरेच जमले होते. अजूनपर्यंत कोणी पोलिसांना फोन केला नव्हता. मी फोन केला, घटनास्थळाची माहिती दिली आणि अँब्युलन्स पाठविण्याची व्यवस्था करावी अशी विनंती केली. तेवढ्यात एक गावातला कोणीतरी आला, म्हणाला, ‘माझ्या गाडीत टाका मी घेऊन जातो हॉस्पिटलमध्ये.' मी आणि त्याने त्या म्हातारीला उचलून त्याच्या गाडीत पाठीमागच्या सीटवर झोपवले. तो निघून गेल्यावर स्थानिक पोलिस स्टेशनमधून मला फोन आला, त्यांना त्या गावातल्या माणसाचा नंबर दिला, त्याच्याशी बोलून घ्यायला सांगितले आणि मी तिथून मुंबईकडे निघालो. 

      दुसरी घटना गुजरातच्या एका खेडेगावातली. Statue of unity ला चाललो होतो. एका निर्जन स्थळी नुकताच अपघात झाला होता. कारने मोटरसायकलवाल्याला उडवलं होतं. मोटरसायकल चालवणारा वाचला होता पण पाठीमागे बसलेला ऐंशी वर्षांचा म्हातारा रस्त्याच्या मधे रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. आजूबाजूच्या गावातलाच असावा. मोजकीच माणसे गोळा झाली होती. मी गाडी बाजूला लावली. बायको आणि मुलांना गाडीतच बसून राहा म्हणून सांगितलं. अपघात झाला होता तिथे आलो. त्या म्हातार्याचा पाय घोट्यापासून पूर्ण मोडला होता. म्हातारा मजबूत गडी होता. शांत होता. एव्हाना त्याची वेदना सहन करण्याच्या मर्यादेपलिकडे गेली होती.  मी १०८ नंबरवर फोन लावला. लगेच उचलला. आजूबाजूच्या माणसांना विचारून घटनास्थळाचा पत्ता दिला. माझ्याआधी कोणीतरी फोन केला होता. खात्री पटल्यावर आणि लोकेशन पक्क झाल्यावर समोरच्या व्यक्तीने सांगितलं, ‘गाडी निकल गई है, आ जाएगी थोडी देर मे!' अँब्युलन्स येईपर्यंत मी थांबावं म्हटलं. दहा मिनिटांनी अँब्युलन्स आली. अत्याधुनिक पद्धतीचे स्ट्रेचर असल्यामुळे जास्त त्रास झाला नाही. चौघांनी त्याला स्ट्रेचरवर झोपवलं. अँब्युलन्स हॉस्पिटलकडे निघाली. हातपाय धुतले आणि मी माझ्या रस्त्याने. इथे एक सांगू इच्छितो, रस्त्यात असा अपघात पाहिला असल्यास त्याची सूचना पोलिसांना द्यावी तसेच १०८ नंबरवर संपर्क साधून अँब्युलन्स मागवावी. आपण एक दक्ष नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडावे. अनुभव आहे म्हणून सांगतो, हे असे केल्याने पोलिसांकडून आपल्याला कुठलाच त्रास होत नाही. किंवा पोलीस स्टेशनमध्ये फेर्याही माराव्या लागत नाहीत. 

        असाच एक रस्ता-अपघात कोल्हापूरजवळ घडला होता. 

         किणी टोलनाका सोडला आणि मी कोल्हापूरच्या दिशेने निघालो. जेमतेम आठशे नवशे मीटर गाडी पुढे गेली असेल. रस्त्याच्या मधोमध काहीतरी फडफडताना दिसलं. पुढच्याच क्षणाला मेंदूकडून आदेश सुटला,आणि हातापायांनी काही क्षणातच गाडी रस्त्याच्या कडेला लावली. अर्थात हे सारं क्षणात घडण्याआधी आरशातून गाडीच्या मागील बाजूचा अंदाज घेतला होता. ती फडफड दिसणं आणि गाडी रस्त्याच्या कडेला लावणं हे खरोखरच काही क्षणातच घडलं. साराच क्षणाचा खेळ... गाडीतून उतरलो आणि त्या फडफडणार्या त्याच्याकडे पळतच निघालो. गाड्यांचा ओघ सुरूच होता. चिरडलं जाण्याची शक्यता १०० टक्के होती. एका टेम्पोवाल्याने कसंतरी चुकवलं, दुसरी गाडी बाजूने गेली. गाड्या नाहीत हे पाहून जवळ पोचलो... पण आता कुठलीही फडफड , हालचाल नव्हती. त्याला तसंच तिथे सोडून द्यायला मन तयार होईना...मी पुणे बंगळूर हायवेच्या बंगळूरकडे जाणार्रा रस्त्याच्या मधोमध उभा होतो. पटकन उचललं आणि रस्त्याच्या कडेला आलो. हेही सगळं काही क्षणातच घडलं. एक पाखरु माझ्या ओंजळीत निपचित पडलं होतं. कुठलीही हालचाल नाही. तसंच घेऊन गाडी जिथे लावली होती तिथल्या चहाच्या टपरीवर आलो. पाण्याची टाकी टपरीसमोरच ठेवलेली होती. टाकीचा नळ उघडला. डाव्या हातात पाखरू... उजव्या हातात पाणी घेऊन थोडंसं त्याच्यावर शिंपडलं...असं दोनतीन वेळा केल्यावर थोडंसं हललं...पण अजूनही पूर्ण शुद्धीत आलं नव्हतं. मी माझे प्रयत्न चालूच ठेवले होते. पाचेक मिनिटांनंतर साहेबांनी डोळे उघडले. जिवात जीव आला... माझ्या! उजव्या हाताच्या पशात पाणी घेतलं आणि चोचीजवळ आणलं. पार फिरभिरलेलं पाखरू हे सगळं काय चाललंय पाहून चक्रावलं होतं. आपल्यात उडून जाण्याचं बळ नाही हे त्याला कळलं होतं. चांगलाच मुका मार लागला होता. आधी पाणी प्यायला मागेना, मीही हट्टी...पाणी प्यायलं तर थोडीशी तरतरी येईल असं वाटलं म्हणून ते कधी एकदा पाणी पितंय म्हणून उतावीळ. एव्हाना पशातलं पाणी गळून गेलं होतं. पुन्हा घेतलं...चोचीजवळ आणलं...चोच बुडेल इतक्या जवळ नेलं... क्या बात...! आता मात्र थोडंसं पाणी ते पाखरू प्यालं. त्यानंतर त्याला निरखून पाहिलं. पंखपाय सगळं जाग्यावर होतं. बुडाखाली लाल डाग दिसला, मला आधी वाटलं रक्त आहे की काय, पण नीट निरखून पाहिल्यावर लक्षात आलं की तो नैसर्गिकच डाग होता. मी उगाच घाबरलो होतो. आता या पाखराला कोल्हापुरातल्या एखाद्या पक्षीमित्र संस्थेचा नंबर मिळवून त्यांच्याकडे सुपूर्द करावं असा विचार मनात आला. तोपर्यंत एक कटिंग चहाही झाला होता. पाखरू आता बर्यापैकी शुद्धीत आलं होतं पण त्याला पायावर उभं राहाता येत नव्हतं. त्या पक्षीमित्र संघटनेच्या भानगडीत न पडता त्या पाखराला तिथेच टपरीजवळ सोडून जावं असंही वाटलं. टपरीच्या बाजूला एक कोनाडा बघून मी ते पाखरू तिथे अलगत ठेवलं. जरा लक्ष ठेवा असं टपरीवाल्याला सांगताच निर्विकार चेहऱ्याने ‘बोक्याचा काय भरवसा नाही' असं तो म्हणाला. तेवढ्यात समोरून एक बोकाही बाहेर येताना दिसला. एकंदरीत तिथली ती परिस्थिती पाहता त्या पाखराला तिथेच सोडणं योग्य नाही हे माझ्या लक्षात आलं. पुन्हा पक्षीमित्र संघटनेचा विचार मनात आला. घेतलं त्या पाखराला सोबत आणि बसवलं बाजूच्या सीटवर... निघालो आम्ही दोघंही कोल्हापूरच्या दिशेने. 

       पाखरू जरी शुद्धीत आलं होतं तरी हालचाल मात्र अजूनही करत नव्हतं. गाडीचा ब्रेक लागताच घरंगळत होतं. काय करावं सुचेना, गाडी बाजूला लावली. त्या पाखराला कसं ठेवावं विचार करू लागलो. समोरच गाडीत ठेवलेला N95 मास्क दिसला. म्हटलं हे बरं आहे घरटं! त्यात त्याला ठेवलं आणि निघालो मी पुढे. ही युक्ती कामी आली. छान बसलं होतं ते त्या N95 मास्कमध्ये माझ्याकडे टकमक बघत. गाडी चालवता चालवता माझंही त्याच्याकडे लक्ष. 

         त्या पाखराची फडफड दिसल्यापासून त्याला गाडीत बसवेपर्यंत मी खरं सांगतो त्या पाखरात अडकलो होतो. त्या पाखराकडेच बारीक लक्ष ठेवून होतो. कोल्हापूर जवळ आलं तसं माझ्या डोक्यात ज्या कामासाठी कोल्हापुरात आलो आहे ती कामं समोर दिसू लागली. काय करावं काहीच सुचत नव्हतं म्हणून पाच मिनिटे गाडी बाजूला उभी करून विचार केला, पाखरू आता जरा माणसात...माफ करा...पाखरात आलं होतं. ठरवलं... आधी आपली कामं संपवून घ्यावीत आणि मग या पाखराला कुणाकडेतरी सोपवावं. जसजसा वेळ जात होता त्याच्या तब्बेतीत सुधारणा होत होती. कोल्हापुरातलं एक काम संपवून पुन्हा गाडीत येऊन बसलो. नजर मास्कवर गेली. साहेब गायब. असं कसं झालं....पाखरू गेलं कुठे...? काचा तर बंद होत्या. पुढेमागे शोधलं तर साहेब पाण्याची बाटली ठेवतो त्या कप्प्यात येऊन बसले होते. शांत....माझ्याकडे टक लावून बघत. दुपार झाली होती. माझ्यासोबत साहेब कोल्हापूर फिरत होते. 

     एक वाजत आले होते, त्याला गाडीत घेऊन तीन तास झाले होते. पाखराच्या तब्बेतीत चांगलीच सुधारणा झाली होती. माझं कोल्हापुरातलं काम संपवून मी पुन्हा पुणे बंगळूर महामार्गावर आलो. त्यावेळी ते पुढल्या खिडकीत येऊन बसलं. गलितगात्र होऊन पडलेलं ते पाखरू आता मात्र अगदी ‘कॉन्फिडन्ट' वाटत होतं. गाडी सर्विस रोडला उभी केली. काचा बंद होत्या. पाखरूच ते... त्याला बाहेरचं आकाश खुणावत होतं. पुढच्या खिडकीतून उडून ते मागच्या खिडकीत जाऊन बसलं. त्याच्याकडे नीट निरखून पाहिलं. त्याच्या तरतरीतपणाकडे पाहून खात्री पटली की हे आता उडू शकतं... मी काच खाली केली. काच खाली केली तरी ते पाखरू काही क्षण तिथेच रेंगाळत राहिलं. त्याचं उडणं पाहाण्यासाठी मी उत्सुक. तोपर्यंत त्याची ती नवी झेप कॅमेर्यात कैद करावी याचंही भान मला नव्हतं. जेव्हा आलं तेव्हा ती अविस्मरणीय झेप मला कॅमेर्यात कैद करता आली. जवळच्याच झुडपात पाखराने निर्दोष झेप घेतली. तीन तासांपूर्वी भिरभिरलेल्या अवस्थेत असलेलं ते पाखरू भुर्रकन उडून गेलं. आहाहा! सुखद क्षण...! ते तीन तास...ते पाखरू आणि मी, बास्स!  त्याच्यासोबत घालवलेले ते तीन तास विसरता येणं शक्यच नाही. माझ्यासाठी तरी हा एक अविस्मरणीय अनुभव होता.

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती.

_विजय सावंत









        आणि हा सुखांत...!

मंडळी!, पोस्ट आवडली तर आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकांना अवश्य शेअर करा.

अरे हो! विसरलोच.... त्या पक्षाचं नाव. तसा हा सर्वत्र आढळणारा पक्षी आहे. नाव आहे बुलबुल (Pycnonotidae).

धन्यवाद!🙏🏻

#Bulbul bird #Pycnonotidae #Vijaysawant

Comments

  1. Great. Very Nice. 🙏🙏

    Sandeep Mulay.

    ReplyDelete
  2. सावंत साहेब तुमच्या या माणुसकीला माझा सलाम खूप छान काम केलं

    ReplyDelete
  3. ज्याचे ठाई जिव्हीचा जिव्हाळा, अंतरी सर्वाप्रती मायेचा ओलावा,
    मनुष्यत्वाचा तो मानबिंदू झाला.

    ReplyDelete
  4. जीवदान हेच श्रेष्ठदान.. खूपच छान, आजच्या धावपळीच्या जगात आपल्या लोकांसाठी वेळ देणे कठीण झाले आहे त्यातून तुम्ही जे करत आहात त्या साठी तुमचे मनापासून कौतुक..

    ReplyDelete
  5. खूप छान विजय. कार्यक्रम स्तुत्य आहे आणि प्रेरणादायी 🙏🙏.
    या घड्याळाच्या काट्यावर चालणार्‍या जगात अशी जाणीव ठेवणे दुपरास्त.
    क्रुपया ही जाणीव अशीच राहू दे

    ReplyDelete
    Replies
    1. नक्कीच मित्रा!
      धन्यवाद!🙏🏻

      Delete
  6. मस्त अनुभव। माणसासांठी नेहमीच जगतो अस पक्षासाठी जगण विलक्षण!

    ReplyDelete
  7. Many talk about this ..few think of doing this...fewer actually do this ..you are one among those rare and beautiful people ❤️

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद! तुमचा अभिप्राय नेहमीच उत्साहवर्धक असतो. 🙏🏻

      Delete
  8. विजय सावंत सर,
    तुमच्संया वेदनशिल ह्रदयातून उतरलेलं सुंदर शब्दांकन !
    Hats off to you !!

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻

      Delete

Post a Comment