कवडसा- आडवाटेवरचा खजिना-२५, शिवतीर्थ रायगड
कवडसा
आडवाटेवरचा खजिना - २५
शिवतीर्थ रायगड
जवळचे मुख्य बसस्थानक - महाड
जवळचे रेल्वेस्थानक - माणगाव
मिसरूड फुटल्यानंतर आयुष्यात एखादं ध्येय आपण एवढं काळजात धरून ठेवलेलं असतं की ते साध्य होईपर्यंत वयाची पन्नाशी उलटलेली असते. मन बजावत असतं, मला हे साध्य करायचंच आहे, या ध्येय आणि ध्यासामुळे उशिरा का होईना ते तडीस जातेच. माझंच बघा ना! महाराष्ट्रातील सत्तरहहून अधिक गडकोट फिरून आलेला मी, रायगडवारी करायला इतकी वर्षे घेतली. याआधी रायगडावर जाण्याची संधी मिळाली नाही असंही नाही. पण काही कारणांमुळे तेव्हा शक्य झाले नाही. १९९० ते २००० या दहा वर्षांत ट्रेकसाथी या ट्रेकिंगला वाहिलेल्या संस्थेतर्फे महाराष्ट्रातील बहुतेक गडकोट फिरलो. या संस्थेचे जनक आणि माझे मित्र धनंजय शिर्के यांचे खरंतर मी कितीही आभार मानले तरी कमीच आहेत. त्यांच्यामुळेच मला ट्रेकींगची गोडी लागली. सुरवातीला त्यांचं बोट धरूनच आम्ही ट्रेक केले. काही साधे सोपे काही अनवट वाटेवरील. त्यावेळी दर महिन्याला एक ट्रेक असायचा. वर्षांचं प्लानिंग आधीच ठरलेलं असायचं. कुठं जायचं, कधी जायचं, किती वाजता कुठं भेटायचं, मोहिमेचा नेता कोण असेल हे सारं सारं वर्षा आधीच ठरलेलं असायचं. वर्षाअखेरीस त्यातले सर्वच्या सर्व ट्रेक ठरल्याप्रमाणे पार पडलेले असायचे. माझे काही ट्रेक चुकलेले असायचे. मग मला न करता आलेल्या ट्रेकच्या गमतीजमती मित्रांकडून ऐकल्यावर, ‘छे..! आपण का नाही केला हा ट्रेक?' असे सतत वाटत राहायचे. त्यापैकीच एक...शिवतीर्थ रायगड. ‘आयुष्यात रायगडवारी केल्याशिवाय मी कुठे जगाचा निरोप घेतोय!' एवढा काळजाच्या कप्प्यात सांभाळलेला हा बकेट लीस्टमधील ट्रेक.
ट्रेकसाथी तर्फे आयोजित करण्यात आलेला सर्वात अविस्मरणीय ट्रेक म्हणजे किल्ले रायगड. त्यावेळी सोबती शीलेदारांसह त्यांच्या घरातील लहानथोर सदस्य, नातेवाईक, मित्रपरिवारही सामील होता. दादर-रायगड-दादर अशी एक मोठी खासगी बस त्यासाठी ठरविण्यात आली होती. त्याकाळी रायगडावर राहाता येते असे, आपापले जेवण करता येत असे. तेव्हा आजच्यासारखी रायगडावर, किंवा खाली जेवणाची सोय नव्हती. असली तरी रायगडवाडीतील मोजक्याच घरांमधून मोजक्याच लोकांसाठी. पन्नासेक माणसांचं जेवण म्हणजे साधी गोष्ट नव्हती. ट्रेकसाथीचा एक हरहुन्नरी शिलेदार राजन याने सगळ्यांच्या जेवणाची जबाबदारी घेतली होती. त्यासाठी त्याने मोठे टोप, अन्नधान्य जिन्नस, आणि ते शिजविण्यासाठी घरातील एक मोठा गॅस सिलिंडर त्यावेळी रोपवे नसलेल्या रायगडावर चढवला होता. मी या ट्रेकला नव्हतो पण हे सिलिंडर प्रकरण जेव्हा मला कळाले तेव्हा या साऱ्याचे मला कोण अप्रूप! (रायगड आता पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असून गडावर राहाणे, जेवण तयार करणे, यावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.)
हा खरोखरच आडवाटेवर असलेला पण महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या हृदयस्थानी असलेला खजिना - किल्ले रायगड.
वर उल्लेख केलेले धनंजय शिर्के यांचा फोन आला, ‘आपल्याला रायगडावर जायचे आहे.' ही तर माझ्यासाठी पर्वणीच होती. कित्येक वर्षांपासून ज्याची वाट पाहात होतो ती संधी समोर हात जोडून उभी होती. कुठलाही पुढचा मागचा विचार न करता मी सरळ ‘हो' म्हणून टाकलं. रायगडवारीचा योग आला या कल्पनेनेच मी रोमांचित झालो.
रायगडावर जाण्यासाठी आम्ही दादरहून शैलेशच्या गाडीतून निघालो. तीन शिलेदार, जय(धनंजय शिर्के, खरंतर मी किंवा ट्रेकसाथीचे इतर मित्र त्यांना ‘जय' म्हणूनच हाक मारतात. तसा मी त्यांना एकेरी ‘जय' म्हणूनच हाक मारतो.) सोबत होता शैलेश लांगी आणि मी असे तिघेच. १५ जुलै २०२२नंतर पावसाने विश्रांती घेतली होती, चांगलं ऊनही पडायला लागलं होतं, त्यामुळे या काळात रायगडाचे छान फोटो घेता येतील असं जयचं म्हणणं होतं. मी थोडासा सांशकच होतो कारण आजकाल वेधशाळेचे अंदाज तंतोतंत खरे होऊ लागले आहेत. चार दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्रात पावसाच्या पुनरागमनाचे संकेत दिले होते. ६ ऑगस्टला दुपारी आम्ही दादर सोडले, पनवेल सोडेपर्यंत पावसाचे काही वातावरण नव्हते. पुढे मात्र ढग चांगलेच दाटून आले होते. आम्ही पाली- निजामपूर मार्गे जाण्याचे ठरवले. त्याचा एक फायदा झाला रायगड जिल्ह्यातील बदनाम महामार्ग टाळता आला शिवाय निसर्गाची लयलूट असलेल्या नवीन रस्त्याचा प्रवासानंद मनमुराद लुटता आला. पाऊस सुरू झाला होता. निजामपूर येताच शैलेशने दुपारच्या जेवणासाठी गाडीचा गिअर उतरवला त्यावेळी पावसाने आपला टॉप गिअर टाकला होता. मुसळधार पाऊस सुरू झाला होता.
जेवण आटोपून धावतच आम्ही गाडीत जाऊन बसलो. आम्ही रायगडच्या दिशेने कूच केली. पाऊस होताच सोबतीला.
निसर्गाचा छान आस्वाद घेत- घेत आम्ही पाचाड येथे पोहोचलो होतो, पावसाचा जोर कायम होता. डोंगरउतारावरची शेतं धुक्यामुळे झाकली गेली होती. जिकडे पाहावं तिकडे रान माजलेलं, चिंब भिजलेलं.
पाचाड. राजमाता जिजाऊंचं समाधीस्थळ. छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या नावाने उभा महाराष्ट्र आदरयुक्त शहारतो, ज्या राजाचं ऋण महाराष्ट्रच काय अख्खा हिंदुस्तान आजन्म फेडू शकत नाही, ज्यांच्या घोषणेने इथल्या तरुणाईच्या रक्तात नवा जोश संचारतो त्या वीराची जन्मदात्री- वीरमाता जिजाऊ यांचे हे समाधीस्थळ .
पाचाड येथील राजमाता जिजाबाई यांचे समाधीस्थळ
सर्वात आधी आम्ही जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेतले, त्यांच्यासमोर माथा टेकवला. नतमस्तक झालो. ज्या मातेने शिवबांना जन्म दिला... घडवलं... नवं स्वराज्य उभं करण्यासाठी बळ दिलं... या महाराष्ट्र भूमीला तमातून तेजाकडे नेलं... पुढे शिवबांनी इतिहास घडवला...महाराष्ट्राला सर्वगुणसंपन्न राजा मिळाला... जाणता राजा मिळाला...चक्रधारी सिंहासनाधिष्ठित छत्रपती शिवाजी महाराज...जे आजही राज्य करताहेत... करोडो हृदयांवर.
घेऊनी हातात तलवार ढाल
लढले निधड्या छातीने शिवराय
विसरुनी तहान भूक निज
उभारले स्वराज्य नव शिवराज
लोळवुनी शत्रूस बलाढ्य मातीत
फडकविला तेज भगवा गगनात
उगवली पहाट नवी दारात
पसरली लाली केशरी अंबरात
कुहू कुहू कोकीळेची साद
डोलली पुन्हा गवताची पात
आला दाटून आनंद जनमनात
उरली न आता ती काळरात
गुंजतो इथे सदा शिवराय
सह्याद्रिच्या कडेकपार्यात
न झाला न होणे ऐसा राजा
निनादतात पडसाद त्रिलोकांत
निनादतात पडसाद त्रिलोकांत
- विजय सावंत
समाधीस्थळापासून पुढे काही अंतरावर जिजाऊ माँसाहेब यांचा वाडा आहे. वाडा कसला भुईकोट किल्लाच म्हणा हवं तर...त्याला पाचाडचा कोट असंही संबोधलं जातं. दुर्दैवाने आज तटबंदी, दक्षिणेकडील दरवाजा, वाड्याचे जोते, पाय विहिरी याव्यतिरिक्त कुठलेही बांधकाम शिल्लक नाही. वाड्याच्या चहुबाजूस भक्कम तटबंदी आहे. वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून दक्षिणेकडील तटबंदीत लहानसा दरवाजा आहे. उत्तर पेशवाईच्या काळात बळावलेला राजकीय संघर्ष आणि इंग्रजांनी तसेच ऐत्तदेशियांनी केलेले अक्षम्य दुर्लक्ष यामुळे वाड्यातील इमारती, सदर, पाहरेकर्यांची घरे नष्ट झाली.
घोड्यांना पाणी पाजण्यासाठी अखंड दगडात कोरलेली जलपात्र दक्षिण तटबंदीत असलेलं पाण्याचं टाकं आणि खिडकी
या जोत्यावरून वाड्याचे वास्तू सौंदर्य लक्षात येते
खलबतखाना, पावसाच्या पाण्याने भरलेला होता.
अतिशय कल्पकतेने आणि सौंदर्याचा विचार करून बांधण्यात आलेली पायविहीर
अति पाऊस, अति थंडी आणि अति उन्हाळा यामुळे जिजाऊंना रायगडावरील हवामान मानवत नसे त्यामुळे शिवाजी महाराजांनी आईसाहेबांसाठी पाचाडला हा वाडा बांधला. सोबत शिवस्वामिनी पुतळाबाई येथेच असायच्या. रायगड किल्ल्याची ही वारी जिजाऊंची समाधी आणि पाचाड येथील त्यांचा राहाता वाडा पाहिल्याशिवाय पूर्ण होत नाही. दुर्दैवाने आज वाड्याचे फक्त अवशेष शिल्लक आहेत. वाड्याचा कोपरानकोपरा मी न्याहाळला. तटबंदीवर चढून चारही बाजूचं निरिक्षण केलं. पायविहिरींचं सौंदर्य न्याहाळले. या स्थळाच्या बाजूलाच आता एक भव्यदिव्य शिवस्मारक उभारण्यात येणार आहे असे समजते. संध्याकाळ होत आली होती, जिजाऊंच्या वाड्याचा निरोप घेऊन आम्ही गाडी ठरल्याप्रमाणे रायगडाच्या पायथ्याशी हिरकणी वाडीत थांबवली. हिरकणी वाडीत वाजवी दरात रहाण्या आणि जेवणाची सोय उपलब्ध आहे. पावसाची रिपरिप सुरूच होती. रात्रीचे जेवण उरकून झाल्यावर जयने रायगड किल्ला, छत्री निजामपूर, रायगडावरील बाजारपेठ, महाराजांची समाधी, जगदीश्वर मंदिर, बालेकिल्ला, तसेच रायगडाशीसंबंधित इतर वास्तू यासंबंधीची माहिती दिली. गप्पांच्या ओघात आम्ही निद्रादेवीच्या अधीन कधी झालो काही कळले नाही.
सकाळी जाग आली ती इतर गृपच्या गोंगाटामुळे. त्या दिवशी मोठ्या संख्येने दुर्गप्रेमी, शिवप्रेमी रायगड भेटीसाठी आले होते. आम्ही चहा नाश्ता उरकून हिरकणी वाडीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रोपवेच्या दिशेने निघालो. मी रोपवेने जाण्यास उत्सुक नव्हतो त्यातच दुर्गप्रेमींच्या प्रचंड संख्येमुळे तीन तासांचे वेटींग माझ्या पथ्यावर पडले. मी जयला म्हणालो,“जय, तुम्ही या रोपवेने, मी जातो पायरी पायरीने." हिरकणीवाडी सोडली आणि मी चित् दरवाजाची वाट धरली.
सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻
-विजय सावंत
१९/०२/२०२३
# Shivjayanti #fortraigad #Rajmatajijabai #pachad



जय जिजाऊ!जय शिवराय! त्रिवार मुजरा!
ReplyDelete🙏🏻
Deleteरायगड हा राजांचा गड..स्वराज्याच्या तख्ताचा गड..पंतप्नधान मंडळ स्थापनेचा गड..मराठी राजभाषेचा गड..हिंदवी चलन व्यवहाराचा गड..अधिकृत भगव्या ध्वजाचा गड..हिरकणीच्या पराक्रमाचा गड..हिंदू धर्म रक्षणाचा गड..माझ्या राजाच्या चिरनिद्रेचा गड..अवघ्या महाराष्ट्राचे तिर्थस्थान म्हणूनच शिवतिर्थ रायगडाला त्रिवार मुजरा🙏🙏🙏
ReplyDelete🙏🏻
Delete