आणि बरंच काही - पाऊले चालती पंढरीची वाट
पाऊले चालती पंढरीची वाट
आपल्या भारतात ज्या काही प्रथा परंपरा आहेत, त्यातल्या काहींवर तर जीव ओवाळून टाकावा अशा आहेत. हिंदू संस्कृती ही जगातील सर्वात जुनी, समृद्ध आणि प्रगल्भ संस्कृती आहे. यात साजरे केले जाणारे सण उत्सव ‘का जगावं' हे शिकवणारे आहेत. ‘पंढरीची वारी’ त्यापैकीच एक. तेराव्या शतकात पंढरीच्या वारीचा उल्लेख आढळतो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या अलौकिक ज्ञानाने जगाचे डोळे दिपवून टाकले होते. त्यांच्यामुळे वारीला एक दिव्य रूप प्राप्त झाले. एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, मल्लप्पा वासकर यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली. सातारचे हैबतबाबा यांनी सर्वप्रथम ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आळंदीहून पालखीत बसवून पंढरीची वारी केली. तेव्हापासून आजतागायत आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची आणि देहूहून संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आषाढी एकादशीच्या पंढरपूर सोहळ्यासाठी रवाना होतात. आज या पालखी सोहळ्याला खूप मोठे ग्लॅमर लाभलेले आहे. या सोहळ्याची जगभरातून दखल घेतली गेली आहे. १८५२ साली ब्रिटिश सरकारकडून पालखीची सरकारी व्यवस्था लावून देण्यात आली होती ती आजही कायम आहे.
गेली दोन वर्षे कोरोनामुळे हा पालखी सोहळा होऊ शकला नाही. सर्वसामान्य माणसाचा रथ म्हणून ओळखल्या जाणार्या एसटीने पादुका पंढरपुरी भेटीप्रित्यर्थ नेण्यात आल्या होत्या. महाराष्ट्रातून एकही वारी दिंडी निघाली नव्हती. पहिल्यांदा असे झाले होते, वारीसोबत चालताना पायांना फोड आले नव्हते पण तमाम वारकर्यांच्या हृदयी काटा पहिल्यांदाच टोचला होता.
कोरोनाचे मळभ कधी ना कधी तरी दूर होणारच होते. तसे ते होताच पुन्हा त्याच उत्साहात आषाढी एकादशीच्या वार्या पंढरपूराकडे रवाना झाल्या. आषाढी एकादशीच्या दोन दिवस आधी म्हणजे शुक्रवारी मंगळवेढ्याला कामानिमित्ताने जाणे झाले. टेंभुर्णी येथे पंढरपूरला जाणारे उजवे वळण घेतले त्यावेळी माझ्यासोबत महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावातून आलेल्या दिंडीनेही पंढरपूरच्या दिशेने वळण घेतले. पुढे आणखी काही पालख्या दिसल्या आणि लक्षात आले पंढरपूरात प्रवेश करेपर्यंत या पालख्या सोबतीला असणार आहेत. पंढरपूरात प्रवेश करेपर्यंत शंभराहून अधिक पालख्या, दिंड्या नजरेस पडल्या. पंढरपूरात देशाच्या विविध भागांतून सात महामार्ग येतात त्यापैकी उत्तरेकडून येणाऱ्या या महामार्गावर अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदूरबार येथून आलेले अस्सल मराठमोळ्या वेषातील, शेतात राबून चेहर्यावर राप चढलेले अत्यंत साधेसुधे वारकरी शेतकरी खूप जवळून पाहता आले. सारेच भजनात दंग. डोईवर घडा, तुळस, गाठोडे घेऊन चालणार्या माऊली तोल कसा काय सांभाळत असतील...? कमाल आहे! रस्ता दुभाजक नसलेल्या त्या रस्त्यावर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सारे पंढरीच्या दिशेने निघाले होते. काही पालख्या, दिंड्या विश्रांतीसाठी मधे थांबत, त्यावेळी भजन, कीर्तन, पारंपरिक खेळ, फुगड्या हेही होत होते. असे काही दिसले की मीही मग गाडी बाजूला लावून ते पाहत होतो. मुंबईहून निघताना रस्त्यावर अशा पालख्या दिसतील याचा अंदाज होता पण टेंभुर्णी ते पंढरपूर हा ४५ कि.मी.चा रस्ता फक्त पालख्या आणि दिंड्यांनी फुलला होता.
आयुष्यात एकदा आळंदी ते पंढरपूर वारी करावी, त्या अठरा दिवसांत वारकर्यांची ती भान हरपून आलेली तल्लीनता आपणही अनुभवावी अशी इच्छा मनात आहे, ती कधी पूर्ण होईल तेव्हा होईल पण मंगळवेढा प्रवासादरम्यान वारीला स्पर्श करता आला हे केवढे मोठे समाधान!
सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!🙏🏻
_विजय सावंत
१०/०७/२०२२
आषाढी एकादशी
फोटो - विजय सावंत


































खरोखरच आपल्या लेखनातून वारीला जाण्याचा अनुभव घेता आला , खूपच छान
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
Deleteफोटोमुळे वारीचे पुण्य मिळाले.वारकर्यांचे पायी पडण्याचे पुण्य नव्हते! राम कृष्ण हरी! विठ्ठल विठ्ठल!
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
Deleteयावर्षी ज्ञानेश्वर माऊलीच्या वारीचा तिसरा टप्पा सासवड ते जेजुरी गाठता आला. पांडूरंग भेटीचा दोन वर्षांचा उपवास सुटण्यासाठी पंढरीच्या ओढीचा भागवती उत्साह अक्षरशः अवर्णनीय. तो याच देही प्रत्यक्षात भरभरून घेता आल्याचा अनुभव शब्दात कैसा वर्णू ?
ReplyDeleteरामकृष्णहरि 🙏
तुम्ही खरंच भाग्यवान! 👍🏻
Deleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
खूपच छान विजय. वारी करण्याची तीव्र इच्छा आहे बघू कधी पुर्ण होते.
ReplyDeleteतुला हे जवळून बघण्याचा योग आला हेही नसे थोडके.
मनःपूर्वक धन्यवाद, तुझ्यामुळे आम्हालाही याचा आनंद घेता आला 🙏🙏
होईल, तुझीही इच्छा पूर्ण होईल. माझ्याकडून शुभेच्छा!👍🏻
Deleteविजू भाई खूपच छान
ReplyDelete🙏🏻
Delete