आणि बरंच काही - आठवणीतील घड्याळ
आठवणीतील घड्याळ
गेल्या रविवारी आम्ही काही मित्र आमचा शाळामित्र निलेश फडके याच्या मुलुंड येथील घरी गेलो होतो. जेमतेम बसलोच होतो तितक्यात दहाचे तेच ते... ओळखीचे घड्याळाचे ठोके कानावर पडले. ठण्... ठण्...ठण्...नजर घड्याळ शोधू लागली. कदाचित इलेक्ट्रॉनिक घड्याळ असेल असे वाटले म्हणून समोरच्या शोकेसमध्ये नजर फिरवून घेतली. सुजाता की हेमा कुणीतरी म्हणालं, ‘अरे हे बघ वर आहे.' मी उभं राहून पाठमोऱ्या भिंतीकडे वर पाहिलं. आहा...! एखादी मनात घर केलेली आठवण कितीतरी वर्षांनी साक्षात समोर आल्यावर जसे व्हावे तसे काहीसे झाले. डोळे भरून पाहिलं ते रूप. Scientific कंपनीचं ठोक्याचं घड्याळ...! ऐंशी नव्वदीच्या दशकात लय भाव खाऊन गेलं होतं ते. त्याचे तासा तासाला जे ठोके पडायचे ते कानांना खूप गोड वाटायचे. उभी काळ्या रंगाची आयताकार लाकडी पेटी किंवा आपण त्याला केस म्हणू.... त्याला काचेचा नाजूक दरवाजा, पेटीच्या वरच्या अर्ध्या भागात काळ्या, पांढर्या किंवा निळ्या रंगाची डायल... त्यावर ठसठशीत आकडे, आणि तितकेच ठसठशीत तास व मिनिटाचे काटे. खालच्या अर्ध्या मोकळ्या जागेत क्रोमचं कोटींग असलेला आणि सदैव इकडून तिकडे फिरणारा त्या घड्याळाची जान म्हणजे तो गोल लोलक. निमिषार्धात जोडलो गेलो मी त्या घड्याळाशी. म्हणूनच हा लेखनप्रपंच.
कितव्या इयत्तेत असताना बाबांनी ते घरी आणलं होतं हे आठवत नाही पण दहावी व्हायच्या कितीतरी वर्षे आधीपासून ते घरातली आपली एक जागा ऐटीत राखून होतं. त्याचे तासाला होणारे ठोके भानावर आणत असत. पेटीत एक चावी दिलेली असायची, एका ठराविक वेळेला डायलवर असलेल्या छिद्रात घालून फिरवावी लागायची. एकदा का त्या घड्याळाचं पोट भरलं की पुढे ते कुठलीही कुरबुर न करता इमानेइतबारे दर तासाला हवेहवेसे वाटणारे ते ठोके देत पुढे चालायचं. घरात हे चावी देण्याचं काम होतं माझ्याकडे. चावी देणं म्हणजे काय तर आतमध्ये दिलेल्या धातूच्या दोन स्प्रिंग गुंडाळणं. चावी फिरवत असताना गुंडाळल्या जात असलेल्या त्या स्प्रिंगचा येणारा विशिष्ट आवाजही हवाहवासा वाटणारा.
१००% मेकॅनिकल, कुठलाही इलेक्ट्रॉनिक पार्ट नाही किंवा बॅटरीही नाही. दोन मोठ्या धातूच्या पट्टीस्प्रिंग, लहानमोठे गिअर किंवा चक्र, मिश्रधातूच्या दोन उभ्या दांड्या, त्यातली एक दुसरी पेक्षा जराशी आखूड, दर तासाला त्या दांड्यांवर आपटणारी घड्याळाच्या गिअरला कनेक्ट असणारी इवलुशी हातोडी आणि तो लोलक... दिसायला अतिशय सोपी पण खरंतर किचकट रचना, भौतिकशास्त्राच्या नियमावर आधारित. जरा तिरकं झालं तरी बंद पडणार. फक्त चावीवर चालणारं हे घड्याळ त्याकाळी कित्येक घरांच्या भिंतीवर दिमाखात ठोके देत आपली एक विशिष्ट ओळख राखून होतं.
कधी बंद पडलं किंवा मागे पुढे होऊ लागलं तर मीच खोलून त्याला तेलपाणी करायचो. डायल खोलून ती चक्र कशी काम करतात ते अगदी मन लावून पाहायचो. मशीन रिपेअरचे सुरुवातीचे धडे मी या घड्याळासोबत गिरवले असं म्हटलं तरी माझ्यासाठी तरी ते वावगं ठरणार नाही. आमच्याकडे निळ्या डायलचं घड्याळ होतं निळ्याकडे(मित्राकडे) काळ्या डायलचं. विस्मृतीत गेलेली एखादी वस्तू अशी अकस्मात समोर आली की आठवणी उलगडत नेते. या स्प्रिंग गुंडाळणार्या घड्याळाच्या बाबतीत तेच झालं.
लग्न झाल्यानंतर ठाणं सोडलं त्यानंतर कालौघात त्या घड्याळाचं काय झालं कळलं नाही. परवा मित्राच्या घरी ते घड्याळ पाहिलं आणि आठवणी ताज्या झाल्या. त्याचा थोडा हेवाही वाटला. खूप छान सांभाळलंय त्याने घड्याळाला.
मंडळी तुमच्यापैकी कोणी हे घड्याळ पाहिलं असेल किंवा तुमच्याकडेही होतं असेल किंवा आजही असेल, तसेच त्यासंबंधी काही आठवणी असतील तर कॉमेंटमध्ये जरूर कळवावे.
_विजय सावंत
२६/०६/२०२२



👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteमाझ्या आजोळी पण असच घड्याळ होतं. खूप गोड आठवणी जुळल्या आहेत या घड्याळा सोबत. त्याला रोज चावी द्यावी लागायची, आणि प्रत्येक तासाला वेळेप्रमाणे घड्याळाचे ठोके वाजायचे.
माझ्या स्मरणात असलेलं हे पाहिले घड्याळ. विजू, तुझ्यामुळे या सगळया आठवणी उजागर झाल्या ❤
सुंदर आठवण!
Deleteया प्रतिक्रियेसाठी मनःपूर्वक धन्यवाद!
माझी आणि निलेश ची मैत्री 1990 पासून झाल्यापासून या घड्याळाकडे माझा नेहमीच लक्ष असतं आणि मीही निलेशच्या बाबा नी सांगितल्या नंतर बऱ्याच वेळा या घड्याळाला चावी दिलेली आहे.
ReplyDeleteत्या घड्याळाला चावी देन्याचे माझे क्षण मला आठवायला लागले.
धन्यवाद.
समोर पिक्चर चालू आहे असे छान वर्णन केलेस.
क्या बात!
Deleteतुझ्याही आठवणी जाग्या झाल्या.👍🏻
धन्यवाद!🙏🏻
जुन ते सोन! ज्याने हे घड्याळ जपले त्याने माणस,नातीही जपली असतील!
ReplyDeleteनक्कीच!
Deleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
वेळ दाखवत असतानांच ठोक्यांनी
ReplyDeleteवेळेकडे दुर्लक्ष झाले तर ठोक्यांनी भानावर आणणारं यांत्रिक उपकरण कारागिरांनी सौंदर्याने नटविल्यामुळे भिंतीवरील मौल्यवान ऐवज झाले. उन्हाळ्यात वेळे आधी धावे तर, हिवाळ्यात मागे राही. दिवसा ठोक्यांकडे दुर्लक्ष केले तरी रात्री मात्र झोपमोड करी.
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻
Delete