कविता- घना ये पुन्हा रुजण्या

 घना ये पुन्हा रुजण्या


तप्त झाली वसुंधरा

झाली अधीर भिजण्या

नको विलंब तो आता

घना ये पुन्हा रुजण्या


आसुसली दरी खोरी

अंगा खांद्यार खेळण्या

सज्ज झाला वारा कसा

धारा पाठीवर घेण्या


वाट पाही चातकही

थेंब नभाचे टिपण्या

झाले सज्ज चराचर

तुझे स्वागत करण्या


असा ये ना तू गर्जत

काळा काळोख करत

लखलख वीज आणि

तडतड ती नभात


कर अशी सुरुवात

ओलं होऊ दे शिवार

नदी नाल्याला फुटू दे

लाल तांबडी रे धार


नको लावू पाहू वाट

असा ये ना तू ऐटीत

ग्रीष्म काहिली अंगात

चिंब घे ना तू मिठीत


_विजय सावंत

२९/०५/२०२२



#Marathiblog #vijaysawantpoem #kavita

Comments

  1. फारच छान ! दाटलेले मेघ अनुभवण्याचा आनंद वेगळाच..!

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!🙏🏻

      Delete
  2. व्वा ! यमकं छान जुळून आलीयं.👌🏻

    ReplyDelete

Post a Comment