कविता- कवितेचा जन्म

 कवितेचा जन्म


बनात वेळूच्या शीळ घालतो, वारा वाहतो

सळसळतो पानांत, लडिवाळ गवतात होतो

तालात सृष्टीच्या दंग होतो

अन् कवितेचा जन्म होतो


सागरातुनी प्रवास करतो

घाटमाथ्यावर कोसळतो

दरीखोरी नदीतून सागरा  मिसळतो

आषाढात तो चिंब होतो

अन् कवितेचा जन्म होतो


फळा फुला रंगाची उधळण करतो

वसंत फुलतो, खूब बहरतो, सृष्टीला नटवतो

रंगात तो श्रीरंग होतो

अन् कवितेचा जन्म होतो


टाहो फोडतो जन्म घेतो तिला बिलगतो

असा हा प्रसववेदनेचा सुखांत होतो

मातेचा त्या नवजन्म होतो

अन् कवितेचाही जन्म होतो


नटखट लीला, दुडूदुडू धावतो

बालपणीच्या रम्य जगात न्हातो

वयात त्या तो मग्न होतो

अन् कवितेचा जन्म होतो


भिडता नजरेला नजर शहारतो

स्पर्शाने तिच्या तो मोहरतो

जणू दोन बोटे स्वर्ग उरतो

अन् कवितेचा जन्म होतो


दमतो भागतो अडखळतो परी न थकतो

संसाराच्या तारेवरची कसरत करतो

संसारासाठी भग्न होतो

अन् कवितेचा जन्म होतो


रडतो मोडतो वार्धक्याची पीडाही सहतो

कधी लांबलेली संध्याकाळ, वाट पहात बसतो

सखासोबती कर्म होतो

अन् कवितेचा जन्म होतो


छळ अन्यायाविरुद्ध लढा पुकारतो

क्रांतीचे रणशिंग तो फुंकतो

काळ नवा एक जन्म घेतो

अन् कवितेचा जन्म होतो


_विजय सावंत

२१/०३/२०२२



Comments

  1. ही केवळ जन्माकथा नाही तर आयुष्य उलगडणारा प्रवास आहे, अप्रतीम!... 👏👏🙏👍

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!

      Delete
  2. विजय सर,
    आठव्या कडव्यातील 'सखा सोबती कर्म होतो' हे कळले नाही.
    कृपया, विशद केल्यास अधिक आस्वादता येईल.
    बाकी, कवितेच्या जन्माची चित्तरकथा हे गुढ आहे.
    तुमचा शब्दांत पकडण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद जय! 🙏🏻

      Delete

Post a Comment