कवडसा- आडवाटेवरचा खजिना-२२, श्री महाकाली पंचायतन मंदिर, आडिवरे

आडवाटेवरचा खजिना-२२

श्री महाकाली पंचायतन मंदिर

आडिवरे, तालुका- राजापूर

जिल्हा- रत्नागिरी

जवळचे रेल्वे स्थानक- राजापूर रोड


       कोकणातील मंदिरे हा एक स्वतंत्र आणि अभ्यासण्यासाठी एक मोठा विषय आहे. त्यावर कोकणातील लेखकांनी आणि जाणकारांनी प्रकाश टाकला आहे. मी कोकणातील मंदिरांना अजूनही तितक्याशा भेटी दिलेल्या नाहीत. १९९७ साली गोव्यातील फोंडा येथे असलेली, शांतादुर्गा, नागेशी, मंगेशी, पार्वती, इत्यादी मंदिरे पाहिली आणि मी त्यांच्या प्रेमातच पडलो. सुंदर रंगसंगती, ऐसपैस आणि दिमाखदार सौंदर्याने नटलेल्या या मंदिरांनी त्यावेळी मनाला भुरळ घातली ती आजही कायम आहे. 

       नुकताच कामानिमित्त फोंडाघाट(सिंधुदुर्ग) येथून गणपतीपुळेजवळील खंडाळा गावी जाण्याचा योग आला. वेळ होता म्हणून जाता जाता वाटेतला एखादा खजिना लुटता येतो का पहावं म्हणून गूगलून पाहिलं. वाटेवर असलेला पूर्णगड नजरेत भरला. त्यासाठी नेहमीच्या राष्ट्रीय महामार्गाला टाटा बाय बाय करून राजापूरला मी सागरी महामार्गाचं बोट धरलं.  

     कधी वर कधी खाली, कधी डावीकडे कधी उजवीकडे, कधी मोकळ्या माळरानावर तर कधी गर्द झाडीतून तर कधी एखाद्या व्हाळावरून मजल दर मजल करत मी कोकणातील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत घेत पुढे चाललो होतो. वाटेत एक गाव लागले. कोकणातल्या इतर गावांसारखच. सुंदर...! उजवीकडे एका मंदिराचे उंच शिखर दिसले. मंदिराचे प्रवेशद्वारही ते मंदिर प्राचीन असल्याची साक्ष देणारं आणि त्यामुळेच हा अनपेक्षितपणे गावलेला खजिना पाहून मनात चलबिचल झाली. थांबावं की पुढे जावं... त्याला अव्हेरून पुढे न जाता गाडी दोनशे मीटर पुढे गेल्यावर बाजूला लावली. का कुणास ठाऊक, मंदिराला भेट द्यावीशी वाटली. खाली उतरलो. मंदिराच्या आवारात प्रवेश केला.






        कोल्हापूरच्या महालक्ष्मी प्रमाणे ख्याती असलेले ते होते रत्नागिरी जिल्ह्यातील आडिवरे येथील;  सिंधुदुर्ग, रत्नागिरी तसेच देशविदेशात पसरलेल्या तमाम भाविकांचे आणि ग्रामस्थांचे श्रद्धास्थान श्री महाकाली पंचायतन मंदिर.

        मंदिराच्या आवारात प्रवेश करताच मंदिराचे भव्यदिव्यत्व आणि  त्याचे शिखर नजरेत भरते. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार दक्षिण दिशेला आहे. आडिवरे येथील ही श्री महाकाली दक्षिणाभिमुख आहे. मी पश्चिम प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला. मंदिर मोठे आहे. सभामंडपात प्रवेश करताच लाकडी खांब आणि त्यावरील नक्षीकाम तसेच छताला अडकवलेले मोठमोठे झुंबर लक्ष वेधून घेतात. एका कोपऱ्यात मोठमोठे ढोल अडकवून ठेवण्यात आले आहेत. सभामंडप प्रशस्त आहे. श्री महाकाली मंदिराच्या गर्भगृहाच्या आधी असलेल्या अंतराळात प्रवेश केला. प्रशस्त, सुंदर काष्टकौशल्य...! द्वारपालही अखंड लाकडात कोरलेले. जशी हेमाडपंथी मंदिरे ही दगडातील सुंदर शिल्पांसाठी आणि विशिष्ट रचनेसाठी ओळखली जातात तसेच कोकणातील मंदिरे ही लाकडावरील सुंदर शिल्पे आणि कोरीवकामासाठी ओळखली जातात. अंतराळाच्या छतावरील लाकडी पाटात कोरण्यात आलेले पौराणिक देखावे केवळ अप्रतिम...! रंगसंगतीही प्रसन्न करणारी. गर्भगृहात श्री महाकालीची सुंदर मूर्ती विराजमान आहे, तिच्या शेजारी श्री योगेश्वरी देवी स्थानापन्न आहे. मंदिरात  भाविकांचा ओघ सतत चालू असतो. 






           लाकडी पाटावर कोरलेले सुंदर पौराणिक देखावे

       

           या  प्राचीन मंदिराला छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांनी भेट देऊन दर्शन घेतल्याचे सांगितले जाते. या घटनेची आठवण म्हणून श्री देवी महालक्ष्मी मंदिरामध्ये छ. शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रतिमा भिंतीत कोरलेल्या आहेत.


         महाकालीचे दर्शन घेऊन झाल्यावर मी मंदिर परिसर फिरू लागलो. काही अधिक माहिती मिळेल या उद्देशाने मंदिराशेजारील एका घरात डोकावून पाहिले. एक गृहस्थ बाहेर आले. कुठून आलात, काय करता वगैरे सोपस्कार पूर्ण झाल्यावर ते पुन्हा एकदा मला घेऊन मंदिर दाखवायला आले. मूळ मंदिर कसे होते, जुन्या मंदिराच्या काही खाणाखुणा आजही कशा आणि कुठे शिल्लक आहेत ते त्यांनी दाखवले. तसेच श्री महाकाली मंदिराची प्रचलीत आख्यायिका त्यांनी सांगितली ती अशी.

      साधारण आठशे वर्षांपूर्वी इथून जवळच असलेल्या वेत्ये येथील समुद्रात जाधव भंडारी समाजाचे काही लोक मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेले होते. ज्यावेळी जाळे ओढण्याची वेळ आली तेव्हा ते काही ओढले जाईना. जाळे अडकले आहे असे वाटल्याने त्यांनी दुसऱ्या दिवशी प्रयत्न करण्याचे ठरवले. त्या रात्री भंडारी समाजाच्या मूळ पुरुषाच्या स्वप्नात येऊन देवीने दृष्टांत दिला. दुसऱ्या दिवशी जाळे ओढले असता त्यात महाकालीची सुंदर मूर्ती सापडली. ही बातमी सगळीकडे पसरली. खोत मंडळी, मानकरी, गावकरी एकत्र आले. देवीचा कौल घेतला गेला. तिच्या इच्छेनुसार आडिवरे येथील वाडा पेठ येथेच देवीची  स्थापना करण्यात आली. इथून जवळच असलेले  वेत्ये हे गाव श्री महाकाली देवीचे माहेर समजले जाते.


          देवीचा प्रसाद करताना लागणारे पाणी काढण्यासाठी आजही वापरात असलेला पोहरा




          श्री महाकाली मंदिराच्या आवारात असलेला पिंपळवृक्ष,  इथे दसर्याच्या दिवशी तावडे यांनी देवीला अर्पण केलेली तलवार मान मिळालेला महार आपल्या पोटावर बडवून घेतो.

 श्री नगरेश्वर मंदिर

श्री नगरेश्वर मंदिर परिसर

    मंदिराचा इतिहास बाराशे वर्षे मागे नेतो. इथल्या महालक्ष्मीची स्थापना बाराशे वर्षांपूर्वी शंकराचार्यांनी केली असे समजते. त्यानंतर आठशे वर्षांपूर्वी श्री महाकालीची स्थापना झाल्याचा उल्लेख आढळतो.  इ.स.१११३ मध्ये शिलाहार राजवंशातील आडिवरे या गावाचा उल्लेख अट्टविरे या नावाने आढळतो. भोज राजाने आडिवरे भागातील कशेळी गावच्या बारा ब्राम्हणांना त्याच गावचे उत्पन्न दिले असे सांगितले जाते. ‘अट्टाविरे कंपण मध्यवर्ती कसेलि ग्रामे' असा उल्लेख इतिहासात सापडल्याचे इतिहासकार वि. का. राजवाडे यांनी लिहिलेले आहे. असाही उल्लेख आढळतो, की छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी, कान्होजी आंग्रे यांनी या मंदिराला भेट दिलेली आहे. श्री देव नगरेश्वर, श्री देवी महालक्ष्मी, श्री देव रवळनाथ, श्री देवी महाकाली व श्री योगेश्वरी, आणि श्री देवी महासरस्वती अशा या देवतांचे हे महाकाली पंचायतन मंदिर म्हणून ओळखले जाते. नवरात्रीच्या काळात पारंपरिक पद्धतीने मोठा उत्सव साजरा केला जातो. नवरात्र उत्सवात भरणारी यात्रा ही राजापूर तालुक्यातील एक मोठी यात्रा म्हणून नावाजली जाते. महाकालीची पालखी काढण्यात येते. दूरवर पसरलेले श्री महाकालीचे भाविक आपली सगळी कामे सोडून या काळात मोठ्या भक्तिभावाने देवीचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित राहतात. तसेच इथला शिमगोत्सवही प्रसिद्ध आहे. देवस्थानामध्ये फा. शु. एकादशीपासून शिमगोत्सवास सुरुवात होते. फा. शु. प्रतिपदा ते फा. पौर्णिमा या कालावधीत मंदिर परिसरात पोफळीचे ओंडे नाचविले जातात. फा. व. प्रतिपदा (धुलिवंदन) या दिवशी होळी उभी करून होलिकोत्सव साजरा केला जातो.

     



       मंदिराचा सभामंडप हल्लीच्या काळात बांधण्यात आला आहे. देवीच्या जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. जिथे जिथे शक्य असेल तिथे जुने काम, तसेच ठेवण्यात आले आहे. शृंगेरी पीठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते देवीच्या इच्छेनुसार शृंगेरी पीठामध्ये कलश पूजन करून त्यांच्या शिष्यांचे हस्ते श्रावण व.चतुर्थी, शके १९३८, रविवार दिनांक २१ ऑगस्ट २०१६ रोजी कलशारोहण करण्यात आले. 

        महाकाली मंदिरापासून काही पावलांवर श्री नगरेश्वराचे मंदिर आहे. हे एक प्राचीन कोकणी पारंपरिक पद्धतीने बांधण्यात आलेले कौलारू मंदिर आहे. जीर्ण आहे पण सुस्थितीत आहे. मंदिरातच उजव्या हाताला मंदिराच्या उंचीएवढे मोठे वारूळ आहे. श्री नगरेश्वराचे दर्शन घेऊन मी श्री महाकाली मंदिराकडे येत असताना डाव्या हाताला एका तुळशी वृंदावनाने माझे लक्ष वेधून घेतले. जवळ जाऊन पाहिले. ‘तावडे हीतवर्धक मंडळ, मुंबई' असा फलक दिसला. त्याबद्दल थोडेसे. 

      आडिवरे येथे मोगल काळात एक विचित्र घटना घडली होती. या परिसरावर तावडे मंडळींचा मोठा प्रभाव होता. ते लढवय्ये होते. त्यांना कदम तावडे म्हणून ओळखले जाई. या भागावर अनेक मोगल आक्रमणे झाली. पण तावडे मंडळींच्या पराक्रमामुळे प्रत्येक वेळी मोगलांना हार पत्करावी लागत होती. एकदा कपिलाषष्ठीच्या दिवशी ही सर्व मंडळी वेत्ये येथे समुद्रस्नानासाठी गेली असता बादशहाच्या सरदाराने डाव साधला. त्यात सर्वच्या सर्व पुरुष मंडळी मारली गेली. त्यांच्या स्त्रिया त्यावेळी सती गेल्या. एकच स्री वाचली जी गरोदर होती. तिच्याचपासून पुढे तावडे वंश वृद्धिंगत झाला. आज तावडे मंडळी जगभरात विखुरले गेली आहेत पण त्यांची नाळ जोडली गेलेली आहे ती या आडिवरे गावाशी, या तुळशी वृंदावनाशी.





        

           क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळ, मुंबई यांनी श्री महाकाली भक्तांसाठी बांधलेले तावडे अतिथी भवन.

         

        कार्तिक महिन्यात एकादशीला या तुळशीचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडतो. तावडे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या या मानाच्या तुळशीचा विवाह हे एक वैशिष्ट्यच आहे. श्री महाकाली मंदिराचे उपाध्ये श्री हर्डीकर यांनीच या तुळशीचा विवाह लावायचा असतो अशी प्रथा आहे. या विवाहसोहळ्याला चौदा गावातील चौदा खोत, मानकरी, गावकरी मंडळी उपस्थित राहतात. श्री हर्डीकर उपाध्ये प्रथम तुळशीवृंदावनाची पूजा करतात, त्यानंतर विवाहसोहळा सुरू होतो. या दिवशी पंढरपूर यात्रा असावी लागते. प्रथम वृंदावनासमोर आणि श्री महाकालीला म्हणून एक असे श्रीफळ ठेविले जाते. त्यानंतर प्रार्थना करून, गार्हाणे घालून विवाह सोहळा पार पडतो. यावेळी नवीन कापड, हळद, कुंकू, नथ, नारळ, ओटी, अक्षता इत्यादी वस्तू महाकाली देवस्थानतर्फे पुरविण्यात येतात. (माहिती स्त्रोत- अंग्निवंशीय तावडे पुस्तकातून)

       हे सगळं समजल्यावर वाटतं, खरेच ही मंदिरे, ही जुनी स्मारके  म्हणजे आमचे पूर्वज आणि आजची पिढी यांना जोडणारी दुवा आहेत. आमच्या पूर्वजांचा इतिहास जागवत आहेत.

     श्री महाकाली मंदिराला दिलेल्या भेटीमुळे कोकणातील मंदिर संस्कृतीला, तिथल्या प्रथा परंपरांना थोडासा का असेना पण स्पर्श करता आला.

      सर्वांना शिमगोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏🏻

_विजय सावंत

#shreemahakalimandir #adivareratnagiri #ratnagiritemple #vijaysawant






Comments

  1. खुपच छान माहिती दिली आहे. फोटोग्राफी उत्तम👍

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!

      Delete
  2. मस्त विजू छान माहिती नेहमी प्रमाणे

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!

      Delete
  3. वाह, खुप माहिती गोळा केली आहेस विजय, तुझ्या या प्रयत्नांकरिता धन्यवाद.
    नेहमीप्रमाणे मस्त फोटो.

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद!

      Delete
  4. वाह !
    वाहवा !!
    सविस्तर आणि अभ्यासपूर्ण लेख.
    प्रकाशचित्रेही मनमोहक.
    गणपतीपुळ्याजवळील खंडाळ्याच्या नजिक लक्ष्मी-केशवाचे मंदिरही लाकडात सुबकपणे उभारलेले आहे. परिसरही सुंदर आहे.
    त्याच्याचपुढे जिंदाल फॅक्टरीमागेही पुरातन देवस्थान असून जयगडचा किल्ला हाकेवर आहे.
    विजयजी, आम्ही तुमच्या लेखणीतून आस्वादू इच्छितो.
    पुनःश्च धन्यवाद !🙏


    ReplyDelete

Post a Comment